वेलणकर चाफा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
27 Sep 2023 - 2:15 pm

नमस्कार मंडळी
माझ्या अनेक आवडींपैकी एक म्हणजे बागकाम. त्यासाठी नेहमी वेळ मिळत नसला तरी सकाळचा चहा घेउन गॅलरीत झोपाळ्यावर बसणे आणि मेहनतीने लावलेल्या बागेतील झाडांची विचारपूस करणे ईतके तरी मी करतोच. कधीतरी विकांताला सगळी हत्यारे परजून कुठेतरी खुरपणे, खते देणे, दोर्‍या बांधुन वेल वर चढवणे , बांबूच्या कामट्या खुपसुन आधार देणे, कुंड्या बदलणे असे काहीतरी चालु असते. मग गॅलरी मातीने माखली की घरच्यांचा रोष होण्याच्या आत गॅलरी धुणे हेही त्यात आलेच. अर्थात माझे हात माखलेले असल्याने त्यातही मला मदतीला बायको लागतेच. पाणी दे,खराटा दे, हातावर पाणी घाल वगैरे.(आणि मग "नको ती झाडे आणि नको तुझे गॅलरी धुणे" हेही ऐकुन घ्यावे लागतेच :))

पुर्वी बैठे घर असताना आजीने अंगणात लावलेली जाई,जुई,अनंत्,जास्वंद्,कोरांटी,कर्दळ आणि पाठीमागे असणारा खोबरी आंबा,नारळ ही झाडे , आसपासच्या वाड्यात खेळायला गेले असता तिकडची विविध झाडे ही मित्रमंडळीं ईतकीच ओळखीची होती. पण हळूहळू घरे पाडुन ईमारती बांधायचे खूळ आले आणि बघताबघता ते सगळे वैभव लयाला गेले. मग गॅलरीत जमतील तशी झाडे लावली, पण ती दुधाची तहान ताकावर भागवावी ईतपतच. मग कामानिमित्त "पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन" सुरु झाले आणि आवडीने लावलेली झाडे फुकटावारी लोकांना देउन टाकली. ५-६ वर्षे अशी गेल्यावर जरा स्थिरता आली अणि पुन्हा झाडे लावणे सुरु झाले. यावेळी मात्र ठरवुन जाई,जुई,सायली,कुंदा अशी फुलांची झाडे लावत गेलो. ती जगल्यावर कवठी चाफा,पांढरा चाफा ,लाल चाफा आणि सोनचाफा आणले. तुळस्,वेखंड, आले,हळद,कढीपत्ता सुद्धा लावले. टेकडीवर फिरायला जातो तिथुन सावरी आणि मोहाच्या बिया मिळाल्या. बागेत राय आवळे आणि चिंच मिळाले. जांभळे आणि आंबे/फणस तर घरी येतातच, त्या बिया रुजवल्या. लिंबु,पपई लावुन झाले. बकुळ /अनंत नर्सरीतून आणले.

ईतके सगळे होउनही सोनचाफा मात्र मला म्हणावे तसे यश देईना. एकदा लावले ते झाड जास्त पाण्यामुळे मेले. दुसर्‍या वेळी कुंडी बदलताना काहीतरी लोचा झाला आणि पाने गळून ते झाड मेले. बरे ह्याला देवचाफा म्हणतात कारण याची फांदी लावुन ते येत नाही तर कलमच आणावे लागते. त्याला पाणी कमी आणि उन जास्त लागते अशी बरीच माहिती मिळत गेली. त्यातुन मला कायप्पावर वेलणकर चाफ्याविषयी समजले. वेलणकर नावाच्या गृहस्थांनी ही १२ महीने फुले येणारी सोनचाफ्याची जात शोधली आहे. काही जणांकडुन खात्री करुन घेतली तेव्हा त्यांचे अनुभव चांगले आहेत असे समजले. मग वेलणकरांशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की आम्ही १-२ रोपे पाठवत नाही, फक्त मोठी ऑर्डर असेल तरच पाठवतो. आता काय करावे?
b

b
मग त्यांनीच उपाय सांगितला. ठाण्याचे एकजण तुमच्या माझ्यासरखेच बाग् प्रेमी. ते सगळ्या ऑर्डर्स एकत्र करतात आणि मोठ्या प्रमाणावर रोपे मागवतात, त्यांच्याशी संपर्क करा असे सांगितले. मग मी त्यांच्याशी बोललो. त्यावर त्यांनी ही रोपे आम्ही कुडाळच्या नर्सरीतुन पावसाळ्यानंतर मागवतो असे सांगितले. मग मी तो विषय सोडुन दिला. ४-५ महीने गेले, आणि एक दिवस कायप्पावर एक ग्रुप तयार झाला ज्यात माझेही नाव होते. ठाण्याच्या शी. प्रशांत ठेंगे यांनी हा ग्रुप तयार केला होता. ज्यांना वेलणकर चाफा हवा असेल त्यांनी आगाऊ रक्कम भरुन झाडे बूक करायची होती. शिवाय ही बातमी ईतरत्र दिल्यावर अजुन २-३ जणांनी मला गळ घालुन एक झाड पाहिजे म्हणुन सांगितले. मी ताबडतोब सगळी रक्कम भरुन टाकली. मग रोज कायपावर मेसेज येउ लागले. झाडे तयार आहेत, झाडे निघाली आहेत, झाडे पोचली आहेत असे करता करता तो सुदीन आला.
b

b

आज पुण्यात ४-५ रूट ठरवुन प्रत्येक रूटवर ४-५ स्पॉट ठरवुन झाडे वाटप होणार होते. रक्कम आधी भरलेल्यांनाच झाडे मिळणार होती. सकाळपासुन कायप्पावर उत्तम नियोजन सुरु होते, प्रत्येक स्पॉटचा अ‍ॅडमिन वाटप करणार होता. स्पॉटवर पोचलो तो मंडळी टेम्पो ची वाट चातकासारखी बघत उभीच होती. यथावकाश तो आला आणि शिस्तीत वाटप झाले. मी माझी झाडे घेउन घरी आलो.
b
सध्या हे पाहुणे गॅलरीत आहेत, पावसात भिजत आहेत. आणि त्यांना योग्य जागी लावण्यासाठी मी रविवारची वाट बघत आहे. बघुया यावेळी कसे यश मिळते ते.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

नक्कीच फुलणार तुमचा चाफा.

इकडे कल्याणला पाठारे नर्सरीत मिळतात ही रोपे. दोन /तीन/चार फुट वाढलेली रोपे १५०/२५०/३५० रु. फुले येतात.
मी आणले नाही. बाल्कनीत (open terrace नाही.) वाढवणे जमणार नाही म्हणून.

पाच सहा उंचीचे फुले असलेले पारिजातक मात्र उचलले. पण ते म्हणाले हे dwarf variety आहे ,किंमत दोनशे रु आहे. तुम्हाला तीसरुपयेवाले देतो. ते दीड फुट होते ते आणले. बाल्कनीत कट्ट्याजवळ टांगले. शेंडा भराभर बाहेर झुकून वाढला आणि त्यास भरपूर कळ्या,फुले येत आहेत. मजा.

स्वस्त झाडे ट्राई करतो. Russellia नावाचे एक झाड तीस रुपयाला मिळाले. शेपूसारखी बारीक पाने येतात. मोठा शेंडा येतो त्यास असंख्य लाल फुले येतात. त्यातला मध प्यायला फुलचुकी पक्षी येतात. त्याची बारीक पाने मुनिया पक्षी काढतात घर बांधण्यासाठी.
-----------
चाफ्याचे ( आणि पारिजातक)बी लावून येणाऱ्या झाडांना पंधरा वर्षांनी फुले येतात . हे लोक गुटी कलम करून रोपे बनवतात त्यास लगेच फुले येतात.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2023 - 3:07 pm | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद कंजूसकाका.

आणि काय म्हणता? पाठारे नर्सरीत वेलणकर चाफा मिळतो? मग तिथुनच मागवला असता ना?( रच्याकने -त्यांचा मुलगा माझ्याच शाळेत १ वर्षे पुढे होता)

कंजूस's picture

27 Sep 2023 - 4:43 pm | कंजूस

अगदी वेलणकर नसेल.

पण चाफ्याची कलमे (गुटी कलमे ) खूप ठिकाणी केली जातात.
मूळ झाड जेवढे फुलणारे असेल तसे कलमही होते.
दापोली भागात ती पाहिली आहेत. श्रीवर्धनला जात असाल ट्रिपला तेव्हा विचारा. पाच वेगवेगळे रंगीत जाम (कलमे) मिळतील.

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2023 - 3:11 pm | कर्नलतपस्वी

बागवान सारखं सुख नाही. चाफा फुलला की चित्र जरूर टाका.

बादवे,जास्वंद हे बारमाही फुलणारे कमी मेन्टेनन्स वाले झाड. रिपाॅटिंग केले होते. गणेशचतुर्थीस पहिले फुल आले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2023 - 3:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

लावले होते, पण त्याला एक चिकट बुरशी येते आणि ती ईतर झाडांवर पसरते, म्हणुन काढुन टाकले. सोनचाफा फुलला की फोटो टाकेन

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2023 - 4:05 pm | कर्नलतपस्वी

सोपा उपाय,

एक लिटर पाणी ,दोन टेबलस्पून शाम्पू, दोन टेबलस्पून तेल व एक टेबलस्पून इनो .

घोळ बनवा व फवारून बघा.

मी वापरतो.

कंजूस's picture

27 Sep 2023 - 4:48 pm | कंजूस

जास्वंद - चिकट बुरशी

१)ऊन भरपूर मिळावे.
२) पाणी मुळाशी तुंबत असेल तर पाहा.
एवढ्यावर झाड निरोगी व्हायला हवे.
३) थंडीमध्ये जवळपासच्या पेरूच्या झाडांवरून ही बुरशी येते. धुके फार वाईट.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2023 - 7:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

दोन्ही उपाय करुन बघतो

वाह!मलापण सोनचाफा खुप आवडतो.आमच्याकडे कुठच मिळत नाही.त्यात हा बारमाही म्हणजे भारीच.

राजेंद्र मेहेंदळे's picture

27 Sep 2023 - 3:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

पुण्यात सोमाटणे फाट्याला खूप नर्सरी आहेत

https://www.bing.com/maps?osid=ed99b376-799e-4951-bcd3-84f042ecf115&cp=1...

धाग्याचे नाव वाचता "साठे फायकस" सारखा काही प्रकार असावा की काय असे वाटले.

बाकी सोनचाफा आवडतो. सिग्नलवर छोटा गजरा/माळ विकायला पोरे आणतात तो कारमध्ये लावला की दोन तीन दिवस छान नैसर्गिक सुगंध दरवळतो. बाकी कवठी चाफा आणि अन्यही एक प्रकार (नाव विसरलो) यांचा सुगंध तर आणखी घमघमता विलक्षण असतो.

विंजिनेर's picture

28 Sep 2023 - 12:54 am | विंजिनेर

अन्यही एक प्रकार (नाव विसरलो)

हिरवा चाफा हो... वेड लावणारा सुगंध - वासाने साप झाडाशी असतात असं म्हणतात म्हणून जायचो नाही घाबरून

चामुंडराय's picture

28 Sep 2023 - 4:28 am | चामुंडराय

व्वा व्वा, हिरवा चाफा

लपविलास तू हिरवा चाफा
सुगंध त्याचा लपेल का ...

अरे! मी पण हेच लिहायला आलो होतो.
लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का? प्रीत लपवुनी लपेल का?

एकूण छान लेख! फोटोंनी सजवलेला. जुन्या आठवणी जागृत केल्यात राव.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 11:31 am | मुक्त विहारि

जमेल तसे, बागकाम करत रहावे

सध्या तरी आमचे प्रयोग थंडावले आहेत