नमस्कार मंडळी
अंगात भटकंतीचा किडा असल्याने मी भटकत असतो आणि जेव्हा भटकत नसतो तेव्हा भटकंतीविषयक काही मिळाले तर आधाशाप्रमाणे वाचत असतो. तेव्ह्ढीच दुधाची तहान ताकावर. तर असाच कुठेतरी या पुस्तकाचा उल्लेख वाचला आणि पुस्तक मागवले. पहीली एक दोन प्रकरणे वाचुन झाली, पण नंतर पुस्तक कपाटात गेले आणि हापिसच्या कामांच्या गडबडीत जरा बाजुला पडले. पण विकांताला आठवण झाली आणि पुस्तक बाहेर काढुन जवळपास एका बैठकीत संपवले. त्यापायी दुपारच्या साखरझोपेवरही मात केली. कारण पुस्तकच तसे आहे. वाचता वाचता कधी लेखकाचे बोट धरुन आपण सह्याद्रीत शिरतो समजतच नाही.
प्रसाद निक्ते म्हणतात त्याप्रमाणे ते ट्रेकर होतेच, पण २-३ दिवसाच्या सुट्टीत चाकरमानी माणुस जितके फिरु शकेल तितकेच. मात्र मनाच्या कुपीत कुठेतरी आत "एकदा पूर्ण सह्याद्री उत्तर-दक्षिण फिरुन पाहीला पाहीजे" अशी इच्छा दडलेली होती. त्यासाठी कधी वेळ मिळेल, काय करावे लागेल, किती खर्च येईल वगैरे काहीच माहित नव्हते. पण प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. आणि तशी ती प्रसादच्या आयुष्यात आली. २० वर्षे नोकरी केल्यावर आता थोडी स्थिरता आली होती आणि स्वतःचा व्यवसाय चालु केला होता. मनात हा भटकंतीचा विचार होताच, आणि अचानक २०१५ मध्ये बायपासच्या तशा साध्या समजल्या जाणार्या ऑपरेशन नंतर झालेल्या काही गुंतागुंतीमुळे सासूबाई गेल्या. प्रसाद यांनीच लिहिल्याप्रमाणे "आपण कागदाची चळात समोर घेउन लिहायला बसावे, आणि अचानक सोसाट्याच्या वार्याने सगळी पाने उडुन जाउन लिहितोय तेच पान शेवटचे ठरावे" असे झाले. आणि मग प्रसादने वेळ न दवडता आपली गोष्ट पूर्ण लिहायचे ठरवले.
या मोहिमेचे त्याने ६ ढोबळ भाग केले. गुजरात आणि महाराष्ट्र सीमेवरचे भराड गाव ते अक्कलकुवा, अक्कलकुवा ते ईगतपुरी,ईगतपुरी ते भीमाशंकर, भीमाशंकर ते ताम्हिणी, ताम्हिणी ते कोयनानगर आणि कोयनानगर महाराष्ट्र् गोवा कर्नाटक सीमेवरचा चोर्ला घाट. मुळात मोहीमेचे दिवस ठरलेले ६०, पण ती थोडी लांबली आणि ७५ दिवस लागले. या ७५ दिवसात प्रसाद साधरण १००० कि.मी. चालला.
त्यात तो रोज वेगवेगळ्या गावांमध्ये राहीला. काही ठिकाणी जेवण्/मुक्कामाचे पैसे विचारले आणि दिले, तर बर्याच ठिकाणी फुकट सोय झाली. जिथे ट्रेकर्सची पैसे घेउन व्यावसायिक तत्वावर सोय केली जाते अशाही ठिकाणी राहीला. जिथे गरज लागेल तिथे वाटाड्या घेतला. मात्र वाहन वापरले नाही. अपवाद फक्त २-३. एकदा कोयनानगरच्या जंगलात फॉरेस्ट खात्याने पकडले तेव्हा, एकदा आंबोलीला नियोजित ठिकाण गाठायला वगैरे. या सगळ्या प्रवासात दरदिवशी त्याला विविध अनुभव आले, बहुधा स्वागत झाले तर कुठे कुठे, विशेषतः शहर जवळ असेल तिथे थंड प्रतिसाद किवा नकोसा पाहुणा आल्याची वागणुक मिळाली. पण त्यातही सुरुवातीच्या दिवसात सातपुड्यात दुष्काळी भागात त्याला जी माणसे भेटली आणि जी माणुसकी दिसली त्याने तो गहिवरला. अशा दुष्काळी भागात जिथे स्व्तःची खायची मारामार तिथे दारात आलेल्या पाहुण्याला न विचारताच तो ईथे जेवणार हे गृहीत धरुन केलेली जेवायची सोय, त्यातही जमल्यास कोंबडी किवा निदान अंडे तरी. म्हणजे फारच झाले.
प्रसाद्ला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे"ही पायपीट कशासठी?" पण प्रसाद म्हणतो जिथे रोजचे जीवनच कष्ट्मय तिथे लोकांना हा प्रश्न पडणे साहजिकच. बाकी मग कुठुन निघालात? कुठे जाणार? घरी कोण कोण? मुले किती? मंडळी काय करतात? हे तर नेहमीचेच. रोजच्या पायपीटीतला एक महत्वाचा पण धाकधूक वाटणारा भाग म्हणजे रात्रीचे जेवण आणि मुक्काम. प्रसाद म्हणतो त्याप्रमाणे धूर्त मांजराप्रमाणे गावात शिरल्यावर घरे हेरत फिरायचे. जिथे ४-५ माणसे जमलेली असतील तिथे जाऊन टेकायचे, रामराम घालायचा, पाणी मागायचे. मग हळूहळू गप्पांना सुरुवात होणार. थोड्या वेळाने हळूच विषय काढायचा. बहुतेक ठिकाणी जेवा ईथेच, असे आवतण मिळायचे, की हुश्श. शहरात राहीलेल्या माणसाला असे अनोळखी लोकाच्या दारात जाऊन जेवण मागणे जरा जडच गेले असणार, पण ते अटळ होते, कारण प्रत्येक गावात काही लोकांचे संपर्क मिळाले नव्हते. मग कधी कधी तर पुढच्या गावाची वाट विचारली की ईथलेच यजमान त्या गावातील आपल्या नातेवाईकाचे नाव सांगुन तिथे जेवा म्हणुन सांगायचे. शिवाय ठाण्याहुन निघताना वाटेतील काही गावातील जेवणाची सोय करणार्यांचे नंबर मिळाले होते, ते उपयोगी पडत.ही पायपीट सुसह्य करण्यासाठी मधल्या काही टप्प्यांवर त्याच्याबरोबर चालायला प्रसाद चे मित्र आले, तर साधारण दर रविवारी तो जिथे असेल तिथे त्याला कोरडा शिधा आणि पैसे वगैरे घेउन कोणीतरी ठाण्याहुन येत असे. पण तेव्हढा भाग सोडला तर तो एकटाच सलग ७५ दिवस चालला.
काही काही टप्प्यांवर त्याला आलेले अनुभव वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात. रतनगड, कुमशेत्,हरीश्चंद्र, नाणेघाट,जीवधन अशी रेंज पार करुन प्रसाद ढाकोबाला पोचला. जिथे जायचे होते ती वाट नीट समजून घेतली होती. पण डोंगराच्या कडेशी पोचल्यावर जिथे जायचे ते गाव डोंगरावर नसून मध्ये एक खोल दरी आहे हे त्याच्या लक्षात आले. ती दरी पार करायला ना त्याच्याकडे वेळ होता ना अंगात त्राण. जिथुन निघाला ते गावही पार मागे पडलेले, अंधारात जंगलात राहणार कुठे? तशात जवळचे पाणी संपलेले. तहान ईतकी मरणाची लागली की मनावर दगड ठेवुन तो आपलीच लघवी प्यायला. शेवटी काही अंतर परत येऊन दूर झाडीत १-२ खोपटी दिसत होती तिथवर पाय ओढत कसातरी पोचला. पण ती खोपटी रिकामी निघाली. सुदैवाने बाजुच्या झाडीतुन माणसाचा आवाज आला. प्रसादने त्याला आपली परीस्थिती सांगितली आणि उष्माघाताने तो जवळपास कोसळलाच. तो माणुस अजुन १-२ जणांबरोबर खालच्या गावातुन जंगलात हिरडा गोळा करायला आला होता, पण अंधार पडायच्या आत त्याला परतायचे होते. त्याने प्रसाद्ला पाणी पाजले, पण त्याच्या विनंतीवरुन तो तिथे थांबायला मात्र काही केल्या तयार होईना. दोघांना एकमेकांची परीस्थिती समजत होती पण दोघांचा नाईलाज होता. ईथे प्रसाद लिहितो, धनगराला लाख रुपये दिले तरी त्याच्या गुरे परत यायच्या आणि पाणी पाजायच्या वेळेला तो तुमचे ऐकणार नाही. त्याची गुरे म्हणजे त्याचे सर्वस्व. शेवटी तो माणुसच त्यावर तोडगा काढतो आणि त्याला थोड्या अंतरावरील ढाकोबाच्या देवळात सुरक्षित सोडुन, दुसर्या दिवशी येण्याच्या बोलीवर परत जातो. दुसर्या दिवशी तो येत नाहीच, पण आता परिस्थिती जरा बरी असल्याने प्रसाद मनाचा धीर करुन निघतो आणि सुदैवाने पुढे वाटेत असेच हिरडा गोळा करायला आलेले मामा त्याला भेटुन सगळे ठिक होते.
असाच एक दुसरा अनुभव--मोहरी पठारावरुन मोहरी गावी जात असताना त्याला झाडाखाली पहुडलेला माणुस दिसतो. अशा ओसाड भागात अचानक माणुस दिसल्याने प्रसाद थांबुन गप्पा सुरु करतो. तो माणुस धनगर असतो आणि सांगतो की गुरे पाण्याला येणारेत म्हणुन बसलोय. प्रसादला कुठेच पाणी किवा गुरे दिसत नसतात. त्याला वाटते की हा माणुस एकतर वेडा आहे किवा मला मला फसवतोय. पण काही मिनिटे जातात आणि अचानक लांबुन एका उंचवट्यावरुन एक मग दोन करताकरता १५-२० गुरे तिथे जमतात. मग हा माणुस तिथल्याच एका विहिरवजा खड्ड्यात उतरतो आणि तिथुन पाणी काढुन एका दगडाच्या डोणीत ओतत राहतो. गुरे पाणी पिउन तृप्त होतात आणि प्रसाद आश्चर्य चकीत.
पुढे कोयनानगरच्या जंगलातुन जाण्याची वनखात्याची परवानगी नसते पण रस्ता चुकुन प्रसाद आणि त्याचा मित्र बफर झोनमधे शिरतात आणि पकडले जातात. पण त्यांची थोडक्यात सुटका होते. तोही प्रसंग मस्त. शेवटच्या टप्प्यात मात्र पावसाळा जवळ आल्याचे चाहुल लागते आणि मोहिम अर्धवट राहते की काय अशी धाकधूक निर्माण होते. मात्र सगळ्यावर मात करत प्रसाद चोर्ला घाटात ही मोहीम पूर्ण करतो आणि आपण पुस्तक मिटतो. (समाप्त)
प्रतिक्रिया
3 Sep 2023 - 9:02 pm | कुमार१
चांगला परिचय करून दिलात
3 Sep 2023 - 9:12 pm | चित्रगुप्त
खूपच वाचनीय दिसते आहे पुस्तक. परिचय उत्कृष्टपणे करून दिला आहे.
मुळात सलगपणे ७५ दिवस एकट्यानेच डोंगर-जंगले-दर्याखोर्यात चालायचे हे विलक्षणच. साहस, धैर्य्,समयसूचकता, चिकाटी, ध्येयपूर्तीचा ध्यास असे अनेक सद्गुण असलेल्या प्रसाद निक्ते यांना, आणि त्यांचा परिचय करून देणार्या तुम्हाला कोटि कोटि प्रणाम.
6 Sep 2023 - 10:44 pm | शशिकांत ओक
मिलिटरीत जंगल आणि स्नो सर्व्हायवल... कोर्स मधे अशा गोष्टी करायला लागतात.
पण प्रसाद सारख्यांना आतूनच ही ऊर्मी येत असावी.
3 Sep 2023 - 9:33 pm | Bhakti
सुंदर परिचय,
खरच महाराष्ट्राचा पाठीराखा सह्याद्री जाणून घ्यायलाच पाहिजे.
4 Sep 2023 - 1:17 am | रीडर
पुस्तक इंटरेस्टिंग वाटतंय
4 Sep 2023 - 11:17 am | राजेंद्र मेहेंदळे
_/\_
4 Sep 2023 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान...!पुस्तकाची ओळख आवडली.
-दिलीप बिरुटे
4 Sep 2023 - 4:21 pm | सौंदाळा
अवलीयाच दिसतोय प्रसाद
पुस्तक नक्की वाचेन
4 Sep 2023 - 5:18 pm | प्रचेतस
ह्या पुस्तकाबद्दल ऐकलंय.
उत्तम परिचय, पुस्तक विकत घेण्यास उद्युक्त करणारा.