ब्रेकिंग न्यूज'!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
17 Dec 2008 - 11:44 pm

आमची "स्वर्ग' सोसायटी तशी कुणाच्याच अध्यात ना मध्यात असलेली. (गावरान भाषेत याला "शेपूटघालू' प्रवृत्ती म्हणतात. असो) सोसायटीची इमारत बांधून झाली, तेव्हा कुणाच्याच "अध्यात-मध्यात' नव्हती. नंतर मात्र भोवताली मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि आमची सोसायटी बिचारी शक्ती कपूर किंवा रणजीतसमोर पूर्वी गावातल्या गरीब नायिकेची, सहनायिकेची किंवा ज्युनिअर आर्टिस्टची व्हायची, तशी अवस्था झाली. अंग चोरून, कशीबशी श्‍वास घेत आता ही सोसायटी उभी आहे. त्यामुळं तशी इतर लोकांच्या चर्चेत किंवा पाहण्यात आमची सोसायटी येण्याची काहीच शक्‍यता नव्हती. त्यातून, सोसायटीतले एकेक "नग' सदस्य आणि त्यांचा "आतिथ्यशील आणि सौजन्यपूर्ण' स्वभाव, यामुळं कुठलाही बिल्डर सोसायटीचं "कॉंप्लेक्‍स' करण्याची "कॉंप्लेक्‍स' आयडिया घेऊन आमच्याकडे येण्याची सुतराम शक्‍यता नव्हती. बरं, एवढ्या सगळ्या आलिशान, चकचकीत इमारतींच्या गर्दीत आपल्याच सोसायटीचं "कॉंप्लेक्‍स' का होत नाही, याचाही "कॉंप्लेक्‍स' सोसायटीच्या सदस्यांना येण्याचाही संबंध नव्हता...!
तर, अशी ही आमची सोसायटी एकाएकी नुसत्या शहराच्या नव्हे, राज्याच्या नव्हे, देशाच्या नकाशावर आली. (तशी ती आधी "गूगल अर्थ'च्या नकाशावर होती. या वेबसाइटवर आपल्या घराचा पत्ता आणि इमारतीचं नाव वगैरे देण्याची सुविधा उपलब्ध झाली, तेव्हा सोसायटीतल्या काही वांड कार्ट्यांनी या साइटवर सोसायटीच्या जागेच्या ठिकाणी "भूलोकीचा नरक' असं नाव देऊन ठेवलं होतं. पण ती बदनामी निराळी.) तर, सोसायटीचं नाव देशाच्या नकाशावर कसं आलं, त्याची मोठी रंजक कथा आहे.
मी त्या दिवशी नेहमीप्रमाणेच (उशिरा) ऑफिसला गेलो होतो. मस्टरवर सही वगैरे करून झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी खाली कॅंटीनमध्ये बसलो होतो. सध्या कामाचा लोड किती वाढलाय, त्यातून किती दमणूक होते, वगैरे नेहमीच्या आवडीच्या विषयांवर चर्चा सुरू होती. तेवढ्यात गणू शिपाई बोलवायला आला. ऑफिसात माझ्यासाठी फोन होता.
""हेड ऑफिसचा नाहीये ना? मग मरू दे!'' मी वैतागलो.
""साहेब, हेड ऑफिसचा नाहीये, होम मिनिस्ट्रीकडून आहे. तुमच्या घरून फोन आहे.'' गणूनं खुलासा केला. सरकारी हापिसात कामाला असूनदेखील गणूनं ही विनोद करण्याची वृत्ती जपलेली पाहून मला भरून आलं. तरीही, त्याच्या निरोपामुळं थोडासा धक्का बसला. गौरीचा- माझ्या बायकोचा फोन? एवढ्या सकाळी? कशाला बुवा?
कपातली साखर तशीच टाकून मी ऑफिसकडे निघालो. "आज पुन्हा काहितरी निमित्त काढून बिल न देताच कटले जोशी!' असा शिंदे आणि टाकळीकरांनी मारलेला टोमणा ऐकला, पण त्याकडे दुर्लक्ष केलं.
फोन घेतला. शेजारच्या खरे काकूंचा होता.
""अहो बबनराव, ताबडतोब घरी या! इकडे भूकंप झालाय!!'' खरे काकू एवढ्या प्रेमळ आवाजात ओरडल्या, की ऑफिसातली जमीनही थरथरल्यासारखी वाटली.
""काय सांगताय? डोंबिवलीत भूकंप? मग इथे दादरला कसा नाही झाला? हल्ली पावसासारखा भूकंपदेखील दर पन्नास फुटांवर व्हायला लागलाय की काय?''
""फालतू विनोद कसले करताय? प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय?''
""सॉरी हं खरे काकू! पण भूकंप होऊनही तुमचा फोन चालू कसा? कॉर्डलेस घेतलात की काय तुम्ही?''
""बबनराव, आता ऐकून घेणार आहात का माझं? भूकंप म्हणजे तसला नाही. अहो, आपली सोसायटी गजबजलेय. आपली कामंधामं सोडून सगळे लोक इथे आलेत. सगळे चॅनेलवाले आणि त्यांच्या धोबी व्हॅन पण आल्यायंत.''
"धोबी व्हॅन' हा प्रकार काही मला कळला नाही. "ओबी व्हॅन' मला माहीत होत्या. बहुधा, चॅनेलवाले सगळ्या बातम्या आपटून धोपटून धुतात आणि पीळ पीळ पिळतात, म्हणून खरे काकूंनी त्यांच्या गाडीला "धोबी व्हॅन' असं नाव दिलं असावं, असा समज मी करून घेतला.
""पण कशासाठी एवढी गर्दी?''
""अहो कशासाठी म्हणजे काय? तुमच्या गौरीच्या मुलाखती नि शूटिंग घ्यायला.''
गौरीच्या मुलाखती? माझ्या बायकोच्या? तशी आमची गौरी "सजावट स्पर्धे'त (म्हणजे आरशासमोर तासंतास बसून चेहऱ्यावर निरनिराळी रोगणं लावण्याच्या चढाओढीत) एक्‍स्पर्ट असल्याचं मला माहीत होतं. रोज नवनवे मुखवटे घालूनही ती माझ्यासमोर वावरत असते, याचीही कल्पना होती. पण ही सजावट आणि मुखवटे स्पर्धा गणपतीतल्या गौरीसाठी असते. आमच्या गौरीसाठी कशी काय, अशी शंका डोक्‍यात आली.
कुठल्या बरं स्पर्धेत भाग घेतला असावा तिनं? माझ्या माहितीप्रमाणं इयत्ता तिसरीत असताना लिंबू-चमचा स्पर्धेत भाग घेतला, तीच तिच्या आयुष्यातील शेवटची स्पर्धा. त्यातही तिचा सतरावा नंबर आला होता. बाकी, लग्नानंतर आता संसाराच्या "रिऍलिटी शो'मध्ये भाग घेतला आहे, ती गोष्ट वेगळी.
मी निःशब्द झालेला पाहून खरे काकू पुन्हा खेकसल्या, ""अहो, ऐकताय ना?'"
""काकू, नक्की काय झालंय ते थोडक्‍यात सांगाल?''
""अरे परमेश्‍वरा! म्हणजे मी काय पाल्हाळ लावतेय का? बरं. आता नीट ऐका. तुमच्या गौरीच्या अंगात देवी आलेय. काय काय खायला अन्‌ प्यायला मागतेय. दूध प्यायल्यावर पेरू खातेय. ताकावर सरबत पितेय. भेळ, पाणीपुरी खाऊन वर जेवायला मागतेय. कलिंगडावर चिकू खातेय आणि कार्ली तर काकडीसारखी ओरपतेय!''
आता मीही जरा दचकलो. देवी अंगात येणं म्हणजे काय? आम्ही कॉलेजात होतो, तेव्हा आमच्याही अंगात देवी यायची. पण ती पडद्यावरची श्रीदेवी. तिचे सिनेमे आम्ही तासंतास बघायचो आणि घायाळ व्हायचो. पण गौरीची केस निराळी दिसत होती. तिनं खायलाप्यायला मागणं यात काही विशेष नव्हतं. तिच्या प्रकृतिमानाला साजेसंच होतं ते. आणि ती बिथरल्याचा अनुभव तर मी लग्न झाल्यापासूनच घेत होतो. त्यामुळं तिच्या विक्षिप्त वागण्यानंही मला धक्का बसला नव्हता. धक्कादायक हे होतं, की ती चक्क फळं आणि भाज्या खात होती. एरव्ही तिच्या खाण्याच्या सवयींवरून लहानपणी आईनं तिला वरणभाताच्या ऐवजी एसपीडीपी आणि कच्छी दाबेलीच भरवली होती की काय, असं मला वारंवार वाटायचं.
म्हणजे, आजचा प्रकार एकूण गंभीर होता तर!
मला तडक घरी जाणं भागच होतं. अर्ध्या दिवसाची सुटी मांडण्याशिवाय पर्याय नव्हता. ट्रेन, बस, रिक्षा अशी मजल दरमजल करत घरी पोचलो, तेव्हा तिथे हीऽऽऽऽ गर्दी जमली होती. सोसायटीचं मुख्य गेट बंद होतं. पोलिसही पोचले होते. चॅनेलचा एक "दांडुकेवाला' सोसायटीच्या गेटवरच चढून बेंबीच्या देठापासून ओरडत होता. एका हातात ते माईकचं दांडकं आणि दुसऱ्या हातानं गेट धरलेलं, अशी त्याची कसरत चालली होती. मध्येच गेटचं ग्रिल लागून त्याची पॅंट नको तिथे फाटली अन्‌ त्याला तोंड लपवायला जागा राहिली नाही. बरं, "लाइव्ह' प्रक्षेपण असल्यानं कॅमेरामनला वाटलं, आपला बातमीदार काहीतरी भन्नाट न्यूज देतोय, त्यामुळं फाटलेली पॅंट लपवण्यासाठीची त्याची धडपड आणि फजिती कॅमेऱ्यानं इत्थंभूत चित्रित केली आणि सगळ्या जगानं ती "लाइव्ह' पाहिली.
सोसायटीच्या आतही कॅमेरेवाले, पत्रकार, पोलिस आणि बघ्यांची गर्दी होती. मी कशीबशी वाट काढत आत गेलो. बाहेरचं रामायण कमी होतं म्हणून की काय, आत वेगळंच महाभारत सुरू होतं. मध्यमवर्गीय घरातल्या एका सुशिक्षित, सुसंस्कारित, सुपरिचित, सुगृहिणीच्याही "अंगात' येऊ शकतं, याची सगळ्या चॅनेलवाल्यांनी "एक्‍सक्‍लुझिव्ह' आणि "ब्रेकिंग न्यूज' केली होती. सहज एका घरात डोकावलो, तर आमच्या गौरीचं दर्शन झालं. खरं तर टीव्हीच्या 29 इंची पडद्यावर ती मावत नव्हती. "लार्जर दॅन लाइफ' अशी तिची प्रतिमा जाणवत होती. मी "लार्जर दॅन वाइफ' होणं आयुष्यात शक्‍य नसल्यानं तिची प्रतिमा अबाधित राहणार, याचीही खात्री झाली.
गौरी घरातलं कायकाय खात होती, त्याची क्‍लिपिंग दाखवून काही काही चॅनेल कुठल्या कुठल्या भुताटकीच्या सिनेमांतली भयानक दृश्‍यं सोबत दाखवत होते. भुतांच्याही अंगात येतं, हे मला माहीत नव्हतं. हा संबंध त्यांनी कसा जोडला, हे कोडंच होतं.
गर्दीतून वाट काढत मी घरात प्रवेश मिळवला. तिथलं दृश्‍य हृदय पिळवटून टाकणारं होतं. घरात सर्वत्र पसारा पडला होता. टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, अन्य तंत्रज्ञांनी घरात अक्षरशः नंगानाच घातला होता. म्हणजे टीव्हीच्या पडद्यावर ती भुतं नंगानाच घालत होती, इथं आमच्या घरात ही भुतं! गौरीला सर्वांनी घेरलं होतं. तिच्यावर सर्वांच्या प्रश्‍नांच्या फैरी चालू होत्या. घरातल्या संडासापासून बेडरूमपर्यंत सगळीकडची क्‍लिपिंग चॅनेलवाले टिपत होते. गौरीला वेगवेगळ्या ऍक्‍शन करायला लावून तिचे बाइट्‌सही घेत होते. एकदा तर चुकून एका पत्रकारानं माईकचं दांडकं तिच्या तोंडाच्या एवढं जवळ नेलं, की रागावलेल्या गौरीनं माइकचाच "बाइट' घेतला, असं कुणीतरी सांगितलं.
मी घरात आल्याचं कळल्यावर गौरीच्या जिवात जीव आला. प्रश्‍नांच्या सरबत्तीनं ती भंडावून गेली होती. मी जवळ गेल्यावर ती माझ्या गळ्यातच पडली. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर बायको स्वतःहून जवळ येण्याचा हा दुसराच प्रसंग! असो. खासगी तपशीलात जास्त शिरणं योग्य नाही.
मलाही भरून आलं. तिची अवस्था पाहवेना. चेहराही सुकलेला वाटत होता. चॅनेलवाल्यांच्या आग्रहामुळं की काय कुणास ठाऊक, प्रमाणाबाहेर खाल्ल्यानं ती मूळच्या आकारमानापेक्षा दीडपट भासत होती. मी तिला आधार दिला. तिच्याशी काही बोलणार, एवढ्यात गौरी अचानक खाली कोसळली.
तिचे डोळे मिटलेले होते.
"काय झालं, काय झालं?' सगळे चॅनेलवाले सरसावले.
""नालायकांनो, तुमच्यामुळं झालंय हे सगळं!'' कधी नव्हे तो चढ्या आवाजात मी ओरडलो. तसे काही जण चपापले. काही जणांनी मागच्या मागे काढता पाय घेतला.
""कुणीतरी डॉक्‍टरांना बोलवा रे पटकन!'' मी शेजाऱ्यांना आर्त साद घातली.
शेजारचा राजू पटकन धावत जाऊन सोसायटीच्याच आवारात असलेल्या डॉक्‍टरांना घेऊन आला. तोपर्यंत मी सगळ्या चॅनेलवाल्यांना हाकलून लावलं होतं. डॉक्‍टरांनी गौरीची तपासणी केली. मी गॅलरीत येरझाऱ्या घालत होतो.
डॉक्‍टर बाहेर येऊन म्हणाले, ""जोशी साहेब, पेढे काढा पेढे!''
या डॉक्‍टरांना कुठल्या वेळी काय बोलावं याचं कधी भान नसतं. चक्कर आल्यावर पेढे कसले? मला काही कळेना.
""अहो, डॉक्‍टर, प्रसंग काय, बोलताय काय?'' मी जरासा वैतागलो.
""बबनराव, प्रसंगच तसा आहे. आनंदाची बातमी आहे. तुम्ही बाप होणार आहात. गौरीताई गरोदर आहेत...!''
डॉक्‍टरांच्या या बोलण्यानं मला धक्काच बसला. म्हणजे, तसे आमचे प्रयत्न बरेच दिवस चालले होते, पण अशा प्रकारे अचानक फलप्राप्ती होईल, याचा अंदाज नव्हता.
आनंदाच्या भरात काय बोलावं तेच मला कळेना. "देऊया,' असं म्हणून मी डॉक्‍टरांची बोळवण केली.
एवढ्या सगळ्या रामायणाची ही फलनिष्पत्ती झाली होती. दिवस गेल्याचं कळण्याआधीच गौरीला काहीबाही खाण्याचे डोहाळे लागले होते आणि गैरसमजातून चॅनेलवाल्यांनी त्याची "ब्रेकिंग न्यूज' केली होती.
या प्रकरणातली खरीखुरी "ब्रेकिंग न्यूज' साजरी करायला मात्र एकही चॅनेलवाला तिथे हजर नव्हता...

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रेवती's picture

18 Dec 2008 - 12:13 am | रेवती

नव्हे बातमीदार गोष्ट आहे.
मनोरंजन झाले.

रेवती

आपला अभिजित's picture

18 Dec 2008 - 8:38 am | आपला अभिजित

धन्यवाद!

वेताळ's picture

18 Dec 2008 - 9:32 am | वेताळ

साधा प्रसंग अगदी छान फुलवला आहे.
वेताळ

अनिल हटेला's picture

18 Dec 2008 - 9:55 am | अनिल हटेला

खुसखुशीत आणी विनोदी ढंगाने सजवलेली कथा आवडली...

येउ द्यात अजुनही ब्रेकींग न्युज...=)) =))

(ब्रोकन ऍरो)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Dec 2008 - 10:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त आणि खुसखुशीत!

झकासराव's picture

18 Dec 2008 - 10:40 am | झकासराव

मजेशीर कथा. :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धमाल मुलगा's picture

18 Dec 2008 - 10:53 am | धमाल मुलगा

अभिजीत,
ह्या न्युज चॅनेलवाल्यांची तर टोटल करुनच टाकलीयेस की रे!!!!!
=))
आधीच जनतेनं ह्यांच्या लंगोट्या काठीला लाऊन त्याचे झेंडे नाचवायचे तेव्हढे ठेवले होते....वर आणि हा फटका..लय भारी रे!
मजा आली वाचायला!

सही है भिडू :)

मदनबाण's picture

18 Dec 2008 - 10:55 am | मदनबाण

लय मस्त...
आपल्याला अचानकपणे झालेल्या फलप्राप्ती बद्दल हबिणंदण....

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

प्रकाश घाटपांडे's picture

18 Dec 2008 - 11:10 am | प्रकाश घाटपांडे

या प्रकरणातली खरीखुरी "ब्रेकिंग न्यूज' साजरी करायला मात्र एकही चॅनेलवाला तिथे हजर नव्हता

याची ऍक्षिलरेटिंग न्यूज फक्त वर्तमान पत्रात होउ शकते.
प्रकाश घाटपांडे

परिकथेतील राजकुमार's picture

18 Dec 2008 - 11:22 am | परिकथेतील राजकुमार

उट्टम भट्टी जमली आहे ;) यकदम दणकेबा़ज !
>>तशी आमची गौरी "सजावट स्पर्धे'त (म्हणजे आरशासमोर तासंतास बसून चेहऱ्यावर निरनिराळी रोगणं लावण्याच्या चढाओढीत) एक्‍स्पर्ट असल्याचं मला माहीत होतं.
=)) =))

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

आपला अभिजित's picture

18 Dec 2008 - 5:04 pm | आपला अभिजित

;) अजून येऊ द्या!!!