‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Aug 2023 - 7:47 am

आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?.........
ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?

आपल्या महाराष्ट्रात प्रमाणभाषा हीच जवळपास बोलीभाषा असणारा तथाकथित उच्चवर्ग एका बाजूस आणि प्रमाणभाषेशी काहीसा फटकून वागणारा आणि आपापल्या बोलीभाषेवरच जिवापाड प्रेम असलेला सामान्यवर्ग दुसऱ्या बाजूस, अशी एक भाषिक विभागणी पूर्वापार झालेली आहे; आजही ती कमीअधिक प्रमाणात जाणवते. या विषयावर पूर्वी आपल्यासारख्या व्यासपीठावरून आणि अन्यत्रही भरपूर चर्चा झडलेल्या आहेत.

पण आज आपण, “आपलं ठेवणार आहोत झाकून अन दुसऱ्याचं पाहणार आहोत वाकून”! 🙂
...

चला तर मग, साहेबाच्या देशात सुमारे ७० वर्षे मागे. तेव्हाच्या इंग्लंडमधल्या बोलीभाषेतील फरक आणि त्यानुसार झालेली सामाजिक विभागणी हा या लेखाचा विषय आहे. याला शास्त्रशुद्ध भाषेत U & non-U English असे म्हणतात.
U = Upper class, आणि
non-U = non upper class (मध्यमवर्ग)

ok

या सगळ्या प्रकरणाची सुरुवात सन १९५४मध्ये झाली. अ‍ॅलन रॉस या बर्मिंगहॅम विद्यापीठातील भाषाशास्त्राच्या प्राध्यापकांनी ही संकल्पना त्यांच्या एका निबंधातून मांडली. त्यावेळेस इंग्लंडची सामाजिक विभागणी उच्च, मध्यम आणि श्रमजीवी वर्ग अशी त्रिस्तरीय होती. रॉस यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या सामाजिक स्तरानुसारच तो भाषेचा वापर करतो. त्यांच्या निबंधात त्यांनी विविध इंग्लिश लोकांच्या उच्चार व लेखन पद्धती आणि शब्दसंग्रह यासंबंधी काही विवेचन केले होते. परंतु त्यापैकी सामाजिक स्तर आणि दैनंदिन शब्दांचा वापर हा मुद्दाच सर्वात लक्षवेधी ठरला.

रॉस यांच्या निबंधातून प्रेरणा घेऊन उच्चभ्रू इंग्लिश पत्रकार-लेखिका नॅन्सी मिटफर्ड यांनी या विषयावर एक सविस्तर निबंध ‘एन्काऊंटर’ या मासिकात प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी असे म्हटले की, लोक ज्या सामाजिक स्तरामध्ये असतात, त्यापेक्षा वरच्या स्तरात आहोत असं दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात (वेशभूषा, देहबोली इत्यादीमधून). परंतु एखादा माणूस बोलताना जी काही भाषा वापरतो त्यातून त्याचा खरा सामाजिक स्तर कुठेतरी उघड होतोच. या संदर्भात त्यांनी उच्च आणि मध्यमवर्गीयांची तुलना केली आहे. मध्यमवर्गाचे वैशिष्ट्य असे, की ते त्यांच्या विविध शब्दवापरांमधून आपण आधुनिक/शिष्ट असल्याचा आभास निर्माण करतात. सामान्य पारंपरिक शब्दांऐवजी जड व पुस्तकी नवशब्द वापरण्याकडे त्यांचा कल असतो. खरंतर सर्वसामान्यांच्या भाषेतील काही पारंपरिक शब्द अगदी स्पष्ट आणि अर्थवाही असतात. परंतु आपण ते वापरल्यास आपल्याला अगदीच ‘हे’ समजलं जाईल, अशा समजापोटी मध्यमवर्ग त्या शब्दांऐवजी तथाकथित सभ्यतेचा मुखवटा चढवलेले गोंडस शब्द वापरत राहतो. या प्रवृत्तीमागे त्यांच्या मनात असलेली स्वतःच्या सामाजिक स्थानाबद्दलची अस्थिरता/साशंकता असते. या उलट उच्चवर्गाला त्यांच्या भक्कम सामाजिक स्थानाविषयी खात्री असल्यामुळे त्यांच्या बोलण्यात श्रमिक वर्गाच्या बोलीभाषेतील सर्वसामान्य शब्द देखील अगदी बिनधास्त वापरले जातात.

या मुद्द्याच्या समर्थनार्थ त्यांनी सामाजिक स्तरानुसार वापरात असलेल्या काही शब्दांची मोठी यादीच सादर केली. त्या यादीमधील काही महत्त्वाचे व नित्याचे शब्द खालच्या तक्त्यात दाखवले आहेत :

ok

(वरील तक्त्यातील काही शब्दांवरून आजही आपल्याला भारतातील इंग्लिश वापराबद्दल थोडेफार आत्मपरीक्षण करता येईल).

तसं पाहायला गेलं तर तर रॉस आणि मिटफर्ड यांच्या संबंधित लेखनाकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहायला हरकत नव्हती. परंतु बऱ्याच लोकांनी हा विषय गांभीर्याने घेतला. काही विद्वानांनी त्या लेखावर यथेच्छ टीका केली. त्यांच्या मते मिटफर्ड बाईंनी केलेली यादी ही मनमानी होती; ती वस्तुनिष्ठ नव्हती. तसेच या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केल्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढू नयेत असे त्यांनी सुचवले.
पुढे हा विषय भाषा अभ्यासकांच्या वर्तुळापुरता मर्यादित न राहता त्याचे बरेच सामाजिक पडसाद उमटले आणि त्यातून काहीसे भाषिक वादळ निर्माण झाले. प्रसारमाध्यमांनी तर याचा पुरेपूर लाभ उठवून त्यावर आधारित अनेक कार्यक्रम सादर केले. त्यातून या विषयाला नको इतकी अतिरिक्त प्रसिद्धी मिळाली.

या भाषिक भेदभावाचा परिणाम माणसांच्या सार्वजनिक वावर आणि अगदी कौटुंबिक घडामोडींवर देखील झाला. एखाद्या कुटुंबात पाहुण्यांना जेवायला बोलावले असता आमंत्रण देण्यापासून ते मेजवानीच्या विविध टप्प्यांवर कोणते शब्द वापरायचे याचा मानसिक गोंधळ होऊ लागला. लंच, सपर आणि डिनर यांच्या व्याख्या नक्की काय आहेत या बाबतीत तर संभ्रम निर्माण झाला. मेजवानीच्या संदर्भात ज्या शब्दांचा उगम फ्रेंचमधून होता ते शब्द मध्यमवर्गाला प्रिय ठरले. या उलट उच्चवर्गाने मात्र पूर्वीचेच इंग्लिश शब्द वापरण्यास पसंती दिली. एखाद्या अपरिचित व्यक्तीने आपल्याला प्रथम भेटीत,
“ हाऊ डू यु डू ?”

असे विचारले असता, त्याचे उत्तर आपण तोच प्रश्न पुन्हा उच्चारून द्यायचे असते, असा एक मध्यमवर्गीय शिष्टाचार बनला. “हाऊ डू यू डु “ला उत्तर देताना जर एखाद्याने चुकून “फाईन, थँक्स” असे म्हटले तर त्याला लगेचच प्रमाद घडल्याची भावना होई.

ok
अशा तऱ्हेने इंग्लंडमध्ये काहीसा भाषिक वादंग चालू असताना त्याच दरम्यान अमेरिकेतही साधारण याच स्वरूपाचे लेखन प्रसिद्ध झाले. एमिली पोस्ट या उच्चवर्गीय लेखिकेने Etiquette या नावाचा एक लेख तिकडे प्रसिद्ध केला. त्या लेखात त्यांनी non-U & U या दोन संज्ञाऐवजी Never say (Ns) व Say Instead (SI) असे पर्याय निवडले होते. त्यांनी सादर केलेल्या यादीतली वेगळी दोनच उदाहरणे देतो :
• request(Ns)/ask (SI),
• converse/ talk

तसं पाहायला गेलं तर इंग्लंडच्या तुलनेत अमेरिकेत भाषा प्रमाणीकरणाचा आग्रह नव्हता. तरीसुद्धा एक गोष्ट आश्चर्यकारक ठरली. इंग्लंडच्या आणि अमेरिकेच्या ‘U’ शब्दांच्या याद्या जवळपास सारख्याच होत्या.
( एका शब्दाचा ठळक अपवाद मात्र उठून दिसणारा होता. अमेरिकेतील उच्च वर्ग ‘टॉयलेट’ म्हणे, तर मध्यमवर्ग मात्र lavatory हा शब्द पसंत करी ! हे ब्रिटिशांच्या बरोबर विरुद्ध होते).

थोडेसे विश्लेषण केल्यावर याचे कारण स्पष्ट होते. अमेरिकेतील उच्चवर्गीय हे मुळात एकेकाळच्या ब्रिटिश उच्चवर्गीयांचेच प्रतिनिधी होते. दोन्ही देशातील या शब्दयाद्या पाहिल्यानंतर एक रोचक मुद्दा दिसून आला. पारंपरिक उच्चवर्गीयांच्या शब्दसंग्रहात सोपे, छोटे आणि जोरकस अँग्लो-सॅक्सन शब्द अधिक वापरात होते. या उलट मध्यमवर्गाच्या वापरातले शब्द हे जास्त करून लॅटिनजन्य होते. दोन्ही देशांतला (काठावरील) मध्यमवर्ग आपल्या संभाषणात भावनिक आणि दांभिक अशा आधुनिक शब्दांचा वापर करत होता. याचबरोबर अजून एक मुद्दा वैशिष्ट्यपूर्ण होता. उच्चवर्गाला त्यांच्या संभाषणादरम्यान भाषेच्या व्याकरणाशी फारसे देणे घेणे नसायचे; आपले बोलणे समोरच्याला समजले आहे ना, मग पुरे असा त्यांचा व्यवहारिक दृष्टिकोन होता. याबाबतीत उच्चवर्ग आणि श्रमिक वर्ग अगदी एका पातळीवर होते. परंतु मध्यमवर्ग मात्र व्याकरणाच्या बाबतीत या दोघांपेक्षा अधिक काटेकोर असायचा.
...

वरील भाषिक भेदभावानंतर सुमारे पंचवीस वर्षांचा कालावधी उलटला. दरम्यान इंग्लंड व अमेरिकेतील समाजजीवनात बऱ्यापैकी फरक झाले होते. 1978 मध्ये रिचर्ड बकल यांनी या विषयाचे पुनरावलोकन करणारे U and Non-U Revisited हे नवे पुस्तक संपादित केले. त्यात या विषयाच्या प्रगतीवर प्रकाश टाकला आहे. 1950 च्या दशकात जाणवणारा मध्यमवर्गीयांचा शिष्टपणा आता कमी झालेला होता आणि संभाषणात सामान्यजनांचे शब्द वापरण्याकडे त्यांचा कल होता. एकेकाळच्या यू आणि नॉन-यू शब्दांच्या याद्यांमध्येही बऱ्यापैकी घुसळण झाली होती. एकंदरीत पाहता, समाज आणि भाषा या दोन्ही गोष्टींची संथपणे उत्क्रांती होत असते हे खरे. उत्क्रांतीच्या ओघात काही जुने भेद अगदी त्याज्य ठरवले जातात परंतु काही विशिष्ट शब्द मात्र त्यांची ‘वर्गवारी’ टिकवून ठेवतात.

‘भाजीपाला’ यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन इंग्लिश शब्दांचे संक्रमण पहाणे मजेशीर ठरेल. आजच्या घडीला इंग्लंड आणि त्यांच्या राष्ट्रकुलातील भारतासह सर्व देशांमध्ये vegetables हा शब्द सर्रास वापरतात. मात्र अमेरिकेत ‘greens’ हा शब्द अधिक लोकप्रिय झालेला आहे. वास्तविक ‘ग्रीन्स’ हा तर एकेकाळचा नॉन-यू शब्द होता. परंतु इंग्लिशच्या अमेरिकीकरणानंतर तो आता फॅशनेबल शब्द मानला जातो. कालौघात सोपे व सुटसुटीत शब्द संपूर्ण समाजाकडूनच स्वीकारले जाण्याची शक्यता अधिक असते असे म्हणता येईल.

प्राध्यापक रॉस यांच्या मूळ निबंधात शब्दसंग्रहाखेरीज समाजातील शब्दांच्या उच्चारभेदावर देखील काही टिपणी होती. 1950 ते 1980 या तीन दशकांच्या दरम्यान इंग्लंडमध्ये उच्चारांच्या संदर्भात विशेष फरक पडलेला नाही. अर्थात काही बाबतीत ब्रिटिश व अमेरिकी भेद मात्र जाणवण्याइतके उघड झालेत. काही शब्दांमध्ये सुरुवातीचे अक्षर उच्चारित की अनुच्चारित हे ठरवण्यावरून ते फरक पडलेत. उदा., history मधील h इंग्लंडमध्ये उच्चारला जातो तर अमेरिकेत तो अनुच्चारीत असतो. त्यानुसार लेखनात a historic / an historic असे भेद होतात.

आज एकविसाव्या शतकात ‘यू’/ ‘नॉन-यू' या भेदभावाची काय परिस्थिती आहे, या संदर्भात भाषा अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते आता असे काही राहिलेले नसून इंग्लिश समाजात एकंदरीतच शब्दमिसळ झालेली दिसते. तर अन्य काहींच्या मते आजही त्या मूळच्या याद्यांमधले काही शब्द त्यांच्या सामाजिक वर्गवारीशी घट्ट नाते टिकवून आहेत.

….
1950 च्या दशकात इंग्लंडमध्ये उगम पावलेला हा वादग्रस्त विषय. आज अचानक या विषयात मला डुबकी मारावीशी का वाटली, असा प्रश्न वाचकांना पडू शकेल. याला कारण झाले ते म्हणजे अरुण टिकेकर यांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे पुस्तक. त्याचा परिचय यापूर्वी वाचकांना करून दिलेला आहे त्या पुस्तकात टिकेकर यांनी या विषयाचा ओझरता उल्लेख केलाय. त्यातला एक मजेशीर किस्सा सांगून हा लेख संपवतो.

टिकेकर हे इंग्रजी वाङमयशाखेचे गाढे अभ्यासक. त्यांनी जेव्हा या विषयावरील पुस्तके वाचली तेव्हा त्यांना जाणवले, की ब्रिटिशांनी भारतात असताना आपल्याला जे इंग्रजी शिकवलं ते सगळं नॉन-यू होते. एकदा टिकेकर यांना ब्रिटनच्या मुंबईतील उप-उच्चायुक्तांबरोबर जेवणाची संधी मिळाली होती. तेव्हा टिकेकरांनी त्यांना त्यांचे हे निरीक्षण सांगितलं. त्यावर ते उच्चायुक्त हसले आणि म्हणाले,

"इंग्लंडमध्ये मलाही नॉन-यू इंग्रजीच शिकवलं गेलं आहे" !
*********************************************
संदर्भ :
१. Noblesse Oblige Revisited
२. U and non-U English

३. U and non-U english in the 21st century
४. अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर,
दुसरी आवृत्ती २०११, रोहन प्रकाशन
***********************************************

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Aug 2023 - 11:08 am | राजेंद्र मेहेंदळे

वेगळा विषय वाचायला मिळाला. हे असे भेदभाव सगळ्याच देशात्/भाषांमध्ये असतात काय?

अवांतर--आमच्या शाळेतील एक बाई म्हणायच्या की नव्वद टक्के लोक जर आनि/पानी म्हणत असतील तर तीच प्रमाण भाषा मानली पाहीजे.

अवांतर२- अमेरिकन आणि ब्रिटीश ईंग्रजीत बरेच छोटे/मोठे फरक दिसुन येतात जसे की
एलिव्हेटर्/लिफ्ट
पँट्स्/ट्राउझर्स
चिप्स्/क्रिस्प्स
स्टोर्/शॉप
अपार्टमेंट्/फ्लॅट

कुमार१'s picture

1 Aug 2023 - 11:33 am | कुमार१

असे भेदभाव सगळ्याच देशात्/भाषांमध्ये असतात काय?

बहुतेक होय !
....
इंग्लंड व अमेरिकेच्या भाषेतील फरकाबाबत सन 1887 सालीच ऑस्कर वाइल्ड काय म्हणाले ते पहा :

"

We have really everything in common with America nowadays except, of course, language."
टर्मीनेटर's picture

1 Aug 2023 - 11:28 am | टर्मीनेटर

मस्त लेखनविषय!
मला हिटलरचे भाषेच्या बाबतीतले विचार पटतात, त्याच्या मते "बोलण्यात / भाषणात अशा प्रकारच्या भाषेचा वापर करावा कि जी समाजातल्या शेवटच्या माणसालाही समजली पाहिजे". थोडक्यात, जास्तीत जास्त लोकांना समजेल तीच प्रमाणभाषा.

"तसं पाहायला गेलं तर इंग्लंडच्या तुलनेत अमेरिकेत भाषा प्रमाणीकरणाचा आग्रह नव्हता."

+१, त्यांनी तर असंख्य शब्दांच्या ब्रिटिश इंग्लिश स्पेलिंग्ज मध्येही बदल करून टाकले जसे कि Colour चे Color, Organise” चे “Organize, Catalogue चे Catalog, Grey चे Gray वगैरे वगैरे. ह्यातल्या Gray च्या स्पेलिंग बाबतचा गमतीशीर (आणि बहुतेक काल्पनिक) युक्तिवाद म्हणजे ब्रिटिश इंग्लिश मध्ये Grey शब्दातला 'e' इंग्लंडचे प्रतिनिधित्व करतो तर अमेरिकन Gray शब्दातला 'a' अमेरिकेचे प्रतिनिधित्व करतो 😀

"उच्चवर्गाला त्यांच्या संभाषण दरम्यान भाषेच्या व्याकरणाशी फारसे देणे घेणे नसायचे; आपले बोलणे समोरच्याला समजले आहे ना, मग पुरे असा त्यांचा व्यवहारिक दृष्टिकोन होता. याबाबतीत उच्चवर्ग आणि श्रमिक वर्ग अगदी एका पातळीवर होते. परंतु मध्यमवर्ग मात्र व्याकरणाच्या बाबतीत या दोघांपेक्षा अधिक काटेकोर असायचा."

सहमत! बऱ्याच वर्षांपूर्वी मुकेश अंबानी ह्यांची एका ब्रिटिश कि अमेरिकन पत्रकाराने घेतलेली मुलाखत वाचली होती त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे कॉर्पोरेट जगतात बोकाळलेल्या अशा प्रकारावर भाष्य केले होते. नंतर सवडीने त्यावर आणि माझ्या काही निरीक्षणांवर दुसरा प्रतिसाद टंकतो....

कुमार१'s picture

1 Aug 2023 - 11:35 am | कुमार१

हिटलरचे भाषेच्या बाबतीतले विचार आणि gre (a)y
हे दोन्हीही छानच !

वामन देशमुख's picture

1 Aug 2023 - 11:59 am | वामन देशमुख

'
काही अमेरिकी लोकांचा तर, "आमच्या भाषेचे नाव 'इंग्लिश' नाही तर आमच्या भाषेचे नाव 'अमेरिकन' हे आहे", असा आग्रह असतो!
'

कर्नलतपस्वी's picture

1 Aug 2023 - 12:00 pm | कर्नलतपस्वी

संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा याचा फार आग्रह नसावा. लेखात उल्लेख केल्याप्रमाणेच संभाषण हे व्यक्तीमत्वाचा आरसा, कारण त्याचे शिक्षण, सामाजिक, आर्थिक स्तर इ. संभाषणातून कळते.

आपल्या देशात संभाषणातून व्यक्तीमत्व कुठून आला याचे सुद्धा आकलन होते. तसे साहेबांच्या देशात सुद्धा होत असावे?

उत्तम लेख उत्तम विषय.

अथांग आकाश's picture

1 Aug 2023 - 8:24 pm | अथांग आकाश

कुमार सर, लेख आवडला!
0

कुमार१'s picture

1 Aug 2023 - 8:42 pm | कुमार१

१.

आमच्या भाषेचे नाव 'अमेरिकन' हे आहे"

+१ अ - ग - दी !
..
२.

संभाषणातून व्यक्तीमत्व

+१ . होय, महत्वाचा मुद्दा.
..
३. अ आ,
उत्तम पूरक चलतचित्र व खास भारतीय इंग्रजी !

सिरुसेरि's picture

1 Aug 2023 - 9:07 pm | सिरुसेरि

इंग्लंड व अमेरिकेतील लेखन शैलीतील एक लक्षात राहिलेला फरक --
America --- If you need any help , then please contact our helpdesk .

England -- Should you need any help , then please contact our helpdesk .

कानडाऊ योगेशु's picture

2 Aug 2023 - 8:39 am | कानडाऊ योगेशु

अमेरिके कडुन इकडे आलेला अजुन एक प्रकार म्हणजे रेस्टरुम.
आधी सरळसरळ टॉयलेट कुठे आहेत असे विचारले जायचे आता रेस्टरुम्स कुठे आहेत असे विचारले जाते.

कुमार१'s picture

2 Aug 2023 - 8:46 am | कुमार१

इंग्लंड व अमेरिकेच्या शब्दप्रयोगांमधील फरक दाखवणाऱ्या वरील दोन्ही प्रतिसादांशी सहमत.

वैद्यकातील काही पूर्वीचे ब्रिटिश शब्दप्रयोग मात्र अमेरिकेने नवे शब्द वापरून सुलभ आणि अर्थवाही केले आहेत. तूर्त एकच उदाहरण देतो.

कुटुंबवैद्याला ‘जनरल प्रॅक्टिशनर’ असे म्हणणे ही ब्रिटिश परंपरा. पण पुढे भारतात काय झाले बघा. ‘जनरल’ शब्दाचे फारच सामान्यीकरण झाले. मग त्याचे लघुरूप gp असे आणि मग त्याचा एक टिंगलस्वरूप अपभ्रंश देखील झाला (आणि ते निषेधार्ह आहे).

अमेरिकेने मात्र कुटुंबवैद्यासाठी ‘प्रायमरी केअर फिजिशियन’ (PCP) हा अतिशय सुरेख शब्द प्रचारात आणला.

विवेकपटाईत's picture

2 Aug 2023 - 5:04 pm | विवेकपटाईत

एक बोले
दुसरा समजे
तीच भाषा प्रमाण.
बाकी लेख आवडला.

चौथा कोनाडा's picture

2 Aug 2023 - 10:27 pm | चौथा कोनाडा

मस्त, छान लेख ! लेख आवडला.
बर्‍याच दिवसांनी भाषिक विषयावरचा रोचक लेख वाचला.

जस जश्या देशाच्या सीमा स्थलांतराच्या दिशेने लवचिक होत राहतील तेव्हा असे भेद तयार होणारच.
अनेक भाषिक व्यापारी, कामगार, कर्मचारी एकत्र येऊन जो काही संवाद होत राहतो, ती आणखी वेगळी भाषा आणि त्यातली प्रमाणे वेगळळीच आहेत, असतील.
त्या लोकांना असे विचार करायला वेळच नसतो, त्यांचे त्यांचे जग प्रवाही, वाहते असते !

कुमार१'s picture

3 Aug 2023 - 8:53 am | कुमार१

१.

एक बोले, दुसरा समजे

+१ खरंय ..
..
२.

त्या लोकांना असे विचार करायला वेळच नसतो, त्यांचे त्यांचे जग प्रवाही, वाहते असते !

अगदी बरोबर.
आपण जर दोन राज्यांच्या सीमाप्रांतात फिरलो तर एक जाणवते.
तिथल्या व्यापाऱ्यांना साधारण चार भाषा येत असतात. त्यांच्या गिऱ्हाईकानुसार ते त्याला खुश ठेवणारी भाषा वापरत असतात.