दर्शन

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
17 Jun 2023 - 9:23 am

दर्शन

चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे पंढरपूर सायकल वारी झाली. खूप छान आणि मस्त अनुभव मिळाला. मी फार काही देव देव करणारी नाही. पण म्हणून देवळात जात नाही असाही नाही. मी नियमित पोथी वाचते, देवळात जाते. फक्त गर्दीच्या दिवशी, गर्दीच्या ठिकाणी देवळात जायला मला फारस आवडत नाही. वारीच्या चर्चेत जेव्हा पांडुरंगाचे दर्शन हा विषय निघाला तेव्हा मुखदर्शन साठी माझा हात पहिला वर होता. ३/४ तास लाईन मध्ये उभे राहून दर्शन घेणं मला पटत आणि आवडत नाही. त्यामुळे खरं तर माझ्यासाठी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी ही वारी नसून एक सायकल टुरिंग याच प्रकारात मोडत होती. सायकल चालवत सर्वांबरोबर जायचं, मजा करायची, देवाचं पटकन होईल असं दर्शन घ्यायचं आणि येताना आठवणीने प्रसाद आणायचा. बास हेच डोक्यात.

पंढरपूरला पोहोचलो मात्र बरोबरच्या ज्योती मावशीने सांगितलं, तिच्या ओळखीने दर्शनाची सोय होते आहे पण ५ मिनिटात जे तयार होऊन निघतील त्यांनाच घेवून जाईन. त्या क्षणी काय वाटलं कुणास ठाऊक पण फक्त मुखदर्शनाला हो म्हणणारी मी, इतक्या भरभर तयार झाले. म्हणजे मी आधी काय म्हणाले होते, माझं काय मत आहे हे मी विसरूनच गेले. सायकलिंग करून आल्याने अंघोळ गरजेची होती. पण माझ्या दृष्टीने मी विक्रमी वेळेत अंघोळ उरकली आणि अक्षरशः ६ व्या मिनिटाला मी तयार होते. राहण्याच्या ठिकाणापासून अगदी ४/५ मिनिटांवर देऊळ होत. आम्ही ५/६ जण तिथवर गेलो. फोनाफोनी झाल्यावर आम्हाला आत प्रवेश मिळाला. अर्ध्या पाऊण तासात आम्ही विठ्ठलासमोर उभे होतो. हातातल्या तुळशी फूल देवाच्या पायावर वाहली. देवाला मनोभावे नमस्कार केला. तिथल्या गार्ड नी लगेचच पुढे ढकलल. पुढे तसेच रखुमाई च दर्शन घेवून मगच देवळातून बाहेर पडलो.

माझी पहिलीच पंढरपूर वारी. आणि तेव्हा अचानक अनपेक्षितपणे पांडुरंगाच्या पायाशी जाण्याचा योग आला. त्या क्षणी खूप छान वाटलं. देवाकडे काहीही मागणं नव्हतं. तेव्हा अगदी रिक्त मनाने देवाला नमस्कार केला. आता आठवून सुद्धा आश्चर्य वाटतंय की कशी मी ध्यानी मनी नसताना देवाच्या पायाशी पोहोचले.

सर्वांचं दर्शन, फोटो वगैरे झाल्यावर आम्ही राहण्याच्या ठिकाणी निघालो. चालताना थोडे मागे पुढे झालो. मी एकटी होते. माझ्या शेजारून दोन वारकरी चालले होते. टिपिकल धोतर, डोक्याला टोपी, गळ्यात माळ अश्या वेशात होते. आमचे वारी चे टी शर्ट अंगावर होते. त्यांनी सहजच विचारलं, " कुठून अलाता?"
म्हटलं," चिपळूण".
" ते कुठस आल?"
"कोकणातून आलो काका"
"कितीजण आला?"
"१७/१८ जण आम्ही सायकलने आलो.तुम्ही कुठून आला?"
" नाशिक हून"
"अरे वा! एवढ्या लांब चालत आलात? मानलं तुम्हाला"
"मग झालं का दर्शन?"
" हो झालं ना?"
"झालं?? आम्ही पाच तास थांबलो पण आम्हाला नाही झालं दर्शन. माऊली नाही तयार आम्हाला बघायला."

माझी पावलं त्या क्षणी अडखळली. देवाचं दर्शन झालं म्हणून झालेला आनंद क्षणात मावळून गेला. त्यांच्याशी बोलायला माझ्याकडे शब्द नव्हते. पांडुरंगाचे दर्शन नाही झालं म्हणून वाईट वाटलेल त्यांच्या हळव्या सुरातून कळून येत होते.
त्यांची समजूत घालण्याकरिता मी म्हटलं," मुखदर्शन झालं हो. एवढा वेळ कुठे लाईन मध्ये उभे राहायला. रात्रीची गाडी आहे आमची."
" मग बराबर. मुखदर्शन होत लवकर." अस म्हणून पुढे गेले.

आज अजूनही माझ्या मनात ते गिल्ट आहे. वाईट वाटतंय मला. मला खरंच त्याच्या दर्शनाची अशी ओढ होती का? तर नाही. पण मनापासून सांगते, जेव्हा पाच मिनिटात दर्शनाला जायचं आहे हे ज्योती मावशी म्हणाली मला काहीही सुचलं नाही. इतर कुठलाही विचार आला नाही. आणि मी दर्शनाला गेले. पण हे वारकरी भेटल्यावर मात्र मला वाईट वाटलं की जे खरोखर आस लावून येतात, ज्यांना विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकताच आयुष्याचं सार्थक झाल्याचे समाधान मिळतं अश्या सारख्याना डावलून कुणाची तरी ओळख काढून लाईन मध्ये घुसण्याचा काय अधिकार? जे खरोखर पायी चालून देवाचं नाव घेत इथवर येतात ते बाजूला राहतात. अस नाही होता कामा हे जाणवलं.

तशीच दुसरी गोष्ट. खूप दिवसापासून फेसबुक वर काळया रंगाच्या विठ्ठल रखुमाई च्या मूर्ती बघत आहे. मला त्या पाहताक्षणी खूप आवडल्या होत्या. पण घेवून त्या देवघरात ठेवणं म्हणजे जड वाटतं होत. कारण आमच्याकडे पूजा आमचे बाबा म्हणजे माझे सासरे करतात. त्यांना न विचारता आणून ठेवणं शक्य नव्हतं. बरं त्यांनी तर आधीच सांगितलं होत की आहे यात काहीही वाढवायचं नाही, हवं तर कमी करा. त्यामुळे खूपवेळा मनात येऊनही मी कधी त्या मूर्ती घेतल्या नव्हत्या.

परवाच्या पंढरपूर सायकल वारी झाल्यावर आम्हाला वारी पूर्ण केल्याचं मेडल मिळणार होत. पण प्रसादच्या काय मनात आल कुणास ठावूक त्याने सर्वांसाठी या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती खरेदी करून मेडल ऐवजी दिल्या. मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला. केव्हापासून मी या मूर्ती माझ्या घरी असाव्यात म्हणून वाट बघत होते. काळ्याभोर रूपातील ते विठ्ठल रखुमाई च रूप फारच लोभस आहे. आकाराने छोट्याश्या तरीही नजर जाताच भक्तिभाव निर्माण होईल अशी ही सुबक मूर्ती न मागता, न विकत घेता माझ्या घरी आली याच मल खूप अप्रूप आहे. घरी आणल्यावर बाबांनाही ती मूर्ती आवडली आणि आनंदाने त्यांनी ती देव्हाऱ्यात ठेवली. हा तर पुढचा धक्का होता. आता रोज इतर देवांबरोबर या विठ्ठल रखुमाई ला सुद्धा फुलं वाहिली जातात. मी देवांना रोज हात जोडते तेव्हा आधी लक्ष या दोघांकडे जातं. आणि मन प्रसन्न होत.

खरंच मला काही कळत नाही. एकीकडे देवाच्या पायाशी जाऊन दर्शन मिळालं म्हणून खुश तर दुसऱ्या क्षणी इतरांना नाही मिळालं म्हणून खट्टू झालेलं मन. तर परत आवडत्या देवाची मूर्ती न मागता मिळाली याचा आनंद. काय करू समजत नाही अशी स्थिती झाली आहे. वारी होऊन आठवडा उलटला तरी अजूनही मी थोडी साशंक आहे. नक्की काय धडा घ्यावा यातून?

- धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

17 Jun 2023 - 1:52 pm | अहिरावण

देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव अंतरात नांदे देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही देव सर्वाभूतां ठायी
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव मूर्तीत ना मावे तीर्थक्षेत्रात ना गावे
देव आपणात आहे शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत
देव सगुण निर्गुण देव विश्वाचे कारण
काळ येई काळ जाई देव आहे तैसा राही
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल अशी कोणाची पुण्याई
देव देव्हार्‍यात नाही देव नाही देवालयी

खूप प्रांजळपणे लिहिलेला लेख आवडला.
भक्तीभावाचे हेलकावे चार पाच प्रसंगातून छान दिसले.

आणि देवाची किंवा देवीची इच्छा असेल तर ते नक्कीच घरा पर्यंत येतात ......

आजकाल, मी देवाचे दर्शन घ्यायला मंदिरात जात नाही ...

कळसाला नमस्कार करायचा आणि मोकळे व्हायचे ...

सुप्रिया's picture

27 Jun 2023 - 11:06 am | सुप्रिया

नशिबवान आहात.

कॉमी's picture

27 Jun 2023 - 11:17 am | कॉमी

छान लेख.

मलाही खूप पूर्वी थेट पायाशी हात लावून दर्शन मिळाले होते. तेही न मागता. एका deligation चा भाग म्हणून. अचानक अनपेक्षित. त्याचवेळी तिथे लाखो वारकरी होते. नंतर बाहेर त्या रांगा बघून कसेसेच झाले. आधी जाणीव असती तर कोणा इतराला ते दर्शन घेऊ दिले असते. दे डीजर्वड इट मोअर.

लेख आवडला.