भाग-१
विकांताला मस्त ट्रेक झाला होता. दमलो होतो आणि घरी जायची ओढ लागली होती. पळस्पे फाट्यावर एस टी बसची वाट बघत उभा होतो. हा शेवटचा टप्पा नेहमीच कंटाळवाणा असतो. तेव्हढ्यात एक आजीबाई बोरे टोपलीत घेऊन विकताना दिसली. तोंडाला चाळा म्हणून तिच्याकडून थोडी बोरे विकत घेतली आणि वीसची नोट आजीबाईला दिली.तेव्हढ्यात माझी बस येताना दिसली म्हणून सॅक सावरत पळालो. आजीबाई पाठीमागे ओरडत होती, "बाळा ,सुट्टे पैसे घे रे" पण बसमध्ये जागा पकडायच्या नादात ५ रुपयाचा विचार कोण करतो? खिडकीत बसायला जागा मिळाली. बस सुरु झाली आणि खिडकीतून सहज मागे वळून पाहिले. झाडाखाली आजीबाई डोळयांवर हात धरून दूर जाणाऱ्या बसकडे हताशपणे बघत उभी होती.
=========================
भाग-२
काही दिवसांनी पुन्हा पळस्पे फाट्यावर बसची वाट बघत उभा होतो, तोच आजीबाईने मला हुडकले आणि ५ रुपये दिले "बाळा , किती शोधला रे तुला?हे ५ रुपये राहिले होते बघ त्यादिशी माझ्याकडे " मी अवाक "आजीबाई, आग राहिले तर राहू दे, ५ रुपयेच तर आहेत."
आजीबाई म्हणे "अरे, हिशोब चोख पायजे. त्या ५ रुपयांसाठी कुठे पुन्हा जल्म घेऊ आणि तुलाही घ्यायला लावू?" तरीही मी चिकाटीने "आजीबाई, एखाद्या भिकाऱ्याला द्यायचे मग, तो ही खुश आणि तुलाही पुण्य मिळाले असते?"
आजीबाई माझ्या वरताण"आरं, तुझ्या पैक्यावर मी पुण्य कमावू म्हंतोस?" मग ३ लोकांना जल्म घ्यावा लागला असता, तुला मला नी त्या भिकाऱ्याला."
न बोलता आजीबाईच्या पाया पडलो.
प्रतिक्रिया
20 Mar 2023 - 3:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
शीर्षक-दोन शशक-शबरीची बोरे असे वाचावे. क्षमस्व.
20 Mar 2023 - 3:54 pm | कुमार१
छान आहेत.
20 Mar 2023 - 4:45 pm | कर्नलतपस्वी
असे म्हणतात या जन्मीचे देणे याच जन्मी फेडावे. ज्याची उधारी राहील तो, म्हणजे घेणेकरी देणाऱ्याच्या पोटी मुलगी म्हणून जन्माला येईल.
आजीबाई जुन्या विचाराच्या,वृद्धपणी पैलतीर दिसू लागले म्हणून,
जन्ममरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार
चराचरा पार न्या हो जाहला उशीर
‘पांडुरंग’ ‘पांडुरंग’.. मन करा थोर
पांडुरंग हरी वासुदेव हरी.
बोला पुंडलिका.......
20 Mar 2023 - 5:54 pm | प्रचेतस
मस्त एकदम.
पळस्पे फाटा म्हणजे प्रबळगडाला जवळ ना?
21 Mar 2023 - 10:43 am | राजेंद्र मेहेंदळे
@प्रचेतस-- नाही, तो शेडुंग फाटा
कथा काल्पनिक आहे. पळस्पे फाटा प्रबळ अणि इर्शाळ दोन्हीपासुन लांब आहे.
21 Mar 2023 - 1:10 pm | Bhakti
वाह!छान,
शशक निरागसपणे आयुष्याचे गुढ सांगतेय.
22 Mar 2023 - 1:28 am | तुषार काळभोर
मस्त आहेत!
23 Mar 2023 - 10:28 am | सौंदाळा
मस्त आहेत दोन्ही शशक
23 Mar 2023 - 10:37 am | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
25 Mar 2023 - 5:25 am | nutanm
कर्नलतपस्वी यांनी लिहिल्या प्रमाणे घेणेकरी देणार्याच्या पोटी जन्माला येतो , त्यावरूनच आठवले माझी आई लहानपणी काही म्हणी आम्हाला मुलींना उद्देशून वापरत असे त्यातली घेणेकर्यावरून आठवली ती म्हण म्हणजे "दिले दान घेतले दान, पुढचया जन्मी मुससमान. मला इथे कुठलेही जाती धर्मवाचक काहीच म्हणायचे नाही फक्त अस्सल पुणेरी ब्राम्हणी घरात, पेशव्यांच्या काळाचा पगडा असलेल्या घरात वाढलेल्या माझ्या आईच्या तोंडच्या अश्या म्हणींबद्दल सांगायचे आहे .