शशक | आवंढा

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
9 Mar 2023 - 3:34 pm

माहूरगडाला निघालेल्या टूर-बसमध्ये काका सहप्रवाश्याला तावातावाने सांगत होते - 'कुणी सांगितलं आपल्याकडे स्त्रियांना किंमत नव्हती? अहो, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियां ऋषिंच्या तोडीस तोड. ते स्त्रीमुक्ती वगैरे कौतुक आम्हाला सांगू नका लेको.. म्हणजे आपल्याकडे शिक्षण, समानता वगैरे आहेच.. आपल्या महान संस्कृतीत..खक्क..' वचावचा बोलून घसा कोरडा पडल्याने काकांना ठसका लागला. काकांनी खिडकीशेजारी बसलेल्या काकूंना सांगितलं - 'ये ऊठं गं, पाण्याची बाटली दे, खिडकीतनं बाहेरची झाडं काय कवा बघितली नाईस काय?' काकूंनी धडपडत वरच्या बॅगेतून पाण्याची बाटली काढली आणि काकांना दिली.

काकांना घटाघटा पाणी रिचवताना काकूंनी आवंढा गिळला.
लांबच्या प्रवासात कुठं लघवीला बसायला लागू नये म्हणून काकूंनी कालपासून पाण्याचा थेंबही घेतला नव्हता.

कथाशुभेच्छा

प्रतिक्रिया

स्वधर्म's picture

9 Mar 2023 - 3:50 pm | स्वधर्म

१०० शब्दात सगळा आशय सामावला आहे. खूप आवडली शशक!

गवि's picture

9 Mar 2023 - 4:04 pm | गवि

अप्रतिम.

सर टोबी's picture

9 Mar 2023 - 4:26 pm | सर टोबी

हणमंतअण्णा. तुमच्या लेखनाचा आणि प्रतिसादांचा मी जबरदस्त फॅन झालोय. सध्याच्या काळात पदोपदी दिसणारी हि वेडगळ प्रवृत्ती तुम्ही मस्त व्यक्त केली आहे. पूर्वजांची कीर्ती सांगे तो एक मूर्ख हे कधी सगळ्यांना कळणार?

चांदणे संदीप's picture

9 Mar 2023 - 5:39 pm | चांदणे संदीप

अजूनही स्त्रीस्वातंत्र्य, महिला सबलीकरण वगैरे नुसत्या गप्पा मारणार्‍यांना आरसा दाखवणारे लेखन. प्रचंड आवडले.

सं - दी - प

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2023 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दमदार.

-दिलीप बिरुटे

Vichar Manus's picture

9 Mar 2023 - 6:48 pm | Vichar Manus

जबरदस्त

Vichar Manus's picture

9 Mar 2023 - 6:48 pm | Vichar Manus

जबरदस्त

सौंदाळा's picture

9 Mar 2023 - 7:33 pm | सौंदाळा

आवडली

प्रसाद गोडबोले's picture

10 Mar 2023 - 10:23 am | प्रसाद गोडबोले

जबरदस्त!
स्त्रीमुक्तीच्या नावाने टाहो फोडणार्‍या अधुनिक सुधारणावाद्यांच्या भारताला आजही स्त्रीयांसाठी साधी शौचालये / प्रसाधनगृहे उभी करता आलेली नाहीयेत अन बसलेत अजुनही टीका करत हजारवर्षांपुर्वींच्या गोष्टींवर .
स्वतःचं ठेवायचं झाकुन अन दुसर्‍याचं बघायचं वाकुन =))))
मजा आली वाचुन .
लिहित रहा !

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Mar 2023 - 12:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

शेवटचा षटकार जबरदस्त (आवडला असे म्हणवत नाही)

गार्गी, मैत्रेयी, ऋषि, आपल्या महान संस्कृतीत, समानता, स्त्रीमुक्ती असे शब्द वापरून बोलणारे काका अचानक काकूवर खेकसताना ग्रामीण कसे झाले..? तेवढे बदलले तर एकसंध परिणाम होईल.

काय कवा बघितली नाईस काय?

गवि आणि मार्कस यांचे नेमके प्रतिसाद आवडले. बाकी स्त्रीमुक्ती वगैरे फार गहन विषय आहे, तो 'शशक'मधे बसवणे अशक्य.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Mar 2023 - 3:32 am | हणमंतअण्णा शंकर...

सर्वप्रथम गवि, स्वधर्म, सर टोबी, सौंदाळा, प्रा.डॉ., मार्कस, विचारमाणूस, तुषार या सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद देतो.

काका एकदम ग्रामीण नाही झाले. ते त्यांच्या मूळ, घरगुती भाषेवर आले. व्हॉट्सप युनिवर्सिटीमधून प्रमाण भाषेत आभाळ हेपलण्याची क्षमता असलेले हे शिकलेले काका आहेत. ते संस्कारांच्या प्रमाण भाषिक बुरख्याआड मूळ स्वभाव राखून ठेवलेले पक्के दांभिक काका असावेत.

आशुतोष पोतदारांचे एक नाटक पुण्यात असताना पाहिले होते. राजकुमार तांगडे हा नट होता. मृण्मयी गोडबोले ही नटी होती. नाव आठवत नाही. त्यातला एक प्रसंग आठवला. क्लाएंटबरोबर अमेरिकन अ‍ॅक्सेंटमध्ये इंग्रजी झाडणारी, नवर्‍याबरोबर प्रमाण पुणेरी मराठी झाडणारी मृण्मयी मात्र आईबरोबर फोनवर बोलताना एकदम मराठवाड्यातली लातुरी बोलते.

हा कॉन्टेक्स्ट स्वीच दाखवायचा होता.

गविंनी थर्ड रिडींग करण्याइतपत कथा वाचनीय झाली हे भाग्यच म्हणावे. पुनश्च धन्यवाद!

अशी शंका एकदा आलीच होती. धन्यवाद..

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2023 - 12:46 pm | चौथा कोनाडा

भारी
+१

दिव्याखाली अंधार या म्हणीची आठवण झाली !

हा 'किस्सा काका-काकू'झाला. ('किस्सा तोता-मैना' च्या धर्तीवर) त्या जुन्या पिढीचे सोडा हो, आताच्या नवीन पिढीला 'पुरुषस्वातंत्र्याची चळवळ' सुरु करणे दिवसेंदिवस गरजेचे होत चालले असल्याचे घरोघरी दिसून येते आहे. कितना बदल गया इन्सान.
आणि गावोगावी मुतार्‍या चालू करून त्यांचा उत्तम रितीने रखरखाव करणे गरजेचे आहेच. या बाबतीत गेल्या सहा वर्षांपासून इंदौर शहराने उत्तम उदाहरण स्थापित केलेले आहे.
काकू खिडकीजवळच्या सीटवर होत्या तर काका आणि 'सहप्रवासी' कोणकोणत्या सीटवर होते, हे समजले नाही.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Mar 2023 - 3:48 am | हणमंतअण्णा शंकर...

दोन शक्यता मी धरल्या होत्या.

गाडी २ बाय २ सीटची असावी किंवा ३ बाय २ ची असावी.

दोन्ही सिटींग अरेंजमेंट मध्ये या शक्यता आहेत.

२ बाय २ -

खिडकी | काकू काका सहप्रवासी सहप्रवासी | खिडकी

३ बाय २

खिडकी | काकू काका सहप्रवासी सहप्रवासी सहप्रवासी | खिडकी

आता काकूंना खिडकीशेजारी का बसवले? साहजिकच उलटी झालीतर खिडकीतून करता यावी म्हणून. आता सहजशक्य असूनही आईल सीटवर बसलेले काका स्वतः उठून पाण्याची बाटली काढत नाहीत. खिडकीशेजारी बसलेल्या काकूंना ते अवघड असूनही करायला लावतात. म्हणून कथेत काकू 'धडपडत' पाण्याची बाटली काढतात असे सांगितले आहे. यावरून घरी असताना जेवलेले ताटही काका अंगठ्याने पुढे सरकवतदेखील नसावेत. परंतु सहप्रवाश्याला व्हॉट्सप ग्यान देऊ शकतात.

शिवाय खिडकीतून पळती झाडे पाहण्याचा साधा आनंद घेण्यासाठी कितीतरी लहानमोठ्या गोष्टींसाठी बायकांना झगडावं लागतं हे ही सांगायचे होते.

लेखकाने त्याची विचारप्रक्रिया सांगण्यासारखे बोअरिंग काही नाही. असे करावे लागत असेल तर कथा फसली असे म्हणतो!

बाकी, एक मात्र नक्की. मी इंदूराचे अनेक विडिओ पाहिले. अशक्य म्हणावे असे कार्य इंदूरकरांनी केले आहे. एक इंदूरकर म्हणून तुमचे हार्दिक अभिनंदन! खूप इंप्रेसिव्ह काम आहे. परवा सहाशे कोटींचे ग्रीन बाँड्सदेखील विकले इंदूरकरांनी म्हणे. अभिनंदन!

छ्पन्न दुकानांचाही कायापालट केला आहे असे दिसते. इंदूरच्या या स्टोरीबद्दल अवश्य लिहा अशी विनंती करतो. एक विचारावेसे वाटते, तुमच्या नगरसेवकांना 'संकल्पना - अमुक' असे बोर्ड करायची आयडिया कशी सुचली नाही अजून? फ्लेक्सबद्दल काय धोरण आहे इंदूराचे?

महाराष्ट्रात विटा नावाच्या एका निमशहराने अशीच करामत केली आहे. बीबीसी मराठीचा युट्यूबवरती एक मस्त व्हिडियो आहे विट्याबद्दल. इच्छुकांनी अवश्य पाहावा.

तुषार काळभोर's picture

10 Mar 2023 - 8:30 pm | तुषार काळभोर

समयोचित!
काल कित्येक जणांनी व्हाट्सअ‍ॅप्प वर महिला दिनाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस ठेवले होते. त्यातील किती जण रोजच्या आयुष्यात आई, बायको, बहीण, कामाच्या ठिकाणी महिला सहकर्मचारींना मनापासून आदर देत असतील?
ज्या महिलांनी असे स्टेटस ठेवले होते, त्यातील किती इतर महिलांना आदराने वागवत असतील?

कर्नलतपस्वी's picture

11 Mar 2023 - 11:34 am | कर्नलतपस्वी

बोले तो आज जागतीक महिला दिन है l

क्या बात करते हो! मै तो हर रोज महिला दिन मनाता हू l

सुबह उठते ही उसके लिये एक कप चाय बनाता हू l

सुबह शाम हर कोई मुझे आयना दिखाती है l
फिर भी,हर महिला मेरे लिये मायना रखती है l

इसलिये महिला या महिलादिन का लोड नही लेता .

तुर्रमखान's picture

13 Mar 2023 - 12:19 am | तुर्रमखान

दांभिकपणा मस्त दाखवलाय.