काही भटकी कुत्री चार वर्षाच्या मुलाचे लचके तोडत असतानाचा एक व्हिडिओ कोणतीही पूर्वसूचना न देता कुणीतरी ग्रुपवर पाठवला. मला तो दहा सेकंदसुद्धा पाहण्याचे धाडस झाले नाही. पुढे काय असेल या कल्पनेनेच थरकाप उडाला, आणि मन प्रचंड उदास, अस्वस्थ झाले. इतकं की मला आज थेरापिस्ट कडे जावे लागले.
कुत्रा नामक गोष्टीची भिती खूप लहानपणी बसली. मला कुत्रा लहानपणी चावला नाही, पण धाकट्या भावाला एक कुत्रा चावला. करंगळीच फाडली होती. तो धसका बसून मी कुत्र्यांपासून प्रचंड सावध वागू लागलो. नंतर एका बालमित्राला एक पिसाळलेला कुत्रा चावला. सुदैवाने त्याचा मोठा भाऊ दवाखान्यात काम करत असल्याने लगेच उपचार केले गेले. तेव्हा तो वर्गातला एक तप्त विषय झाला होता. पिसाळलेला कुत्रा कसा ओळखावा अश्या चर्चा मी करत असे. एकाने सांगितले- 'त्याची शेपूट हूकासारखी वाकडी राहते. तो पळत जातो तेव्हा त्याला वळता येत नाही आणि एका सरळ रेषेतच तो धावत सुटतो. त्याच्या तोंडातून सतत लाळ गळत असते.' ते वर्ष केवळ अशी कुत्री ओळखण्यात गेले. या लक्षणांनी बहुतांशी कुत्री ही मला पिसाळलेलीच वाटत. मी सायकल प्रचंड वेगाने दामटवत अशा कुत्र्यांपासून शक्य तितका लांब पळे.
हळू हळू ही भिती कमी होत गेली.
मी सातवीच्या अखेरीस असेन. तेव्हाची ही गोष्ट. शनिवारी सकाळची शाळा संपवून मी साडेबारावाजता मला आवडणारा टीव्हीवरचा एक कार्यक्रम पाहावा म्हणून उत्साहाने घरी आलो. आजोबा दाढी करत होते. पटकन आवरून रिमोट हातात घेताच दाराबाहेर शिरम्या नावाचं एक गुराखी पोरगं (माझ्याहून दोनेक वर्षं मोठं असेल) जोरजोरात हाळ्या देत आलं. 'शांताआज्जी शांताआज्जी' असं ओरडत धापा टाकतच तो घरात घुसला. 'तुमच्या रेडकाला पारध्यांची कुत्री फाडायल्यात ओ, चला लवकर' म्हणत दंगा करू लागला. मला काही समजायच्या आतच आजोबांनी खुंट्यावरची बंदूक काढली आणि दिवळीवरच्या लहान दिवळीतून दोन काडतुसे घेतली. माझा काका, शिरम्या आणि आजोबा पळत पळत माळाच्या दिशेने धावू लागले. माझी आजी आणि मी घाबरून पडवीजवळ उभे राहिलो आणि काय होतंय हे पाहू लागलो.
घरापासून साधारण चारशे मीटर अंतरावर आमच्या दोन म्हशी शिरम्याच्या जित्रापांबरोबर चरायला गेलेल्या. त्यातली एक म्हैस तीन आठवड्यांपूर्वी व्याली होती. तिचं रेडकू दावं सुटल्याने तिच्या आईच्या मागोमाग माळाकडं पळालं होतं. ते सुटल्याचं कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. फासेपारध्यांची एक वस्ती त्या माळावरच होती आणि त्यांच्यात खूप कुत्री असत. ती कुत्री मांसाला बर्यापैकी चटावलेली होती.
काय होतंय याचा अदमास घेत होतो तेव्हा एक मोठा बार काढल्याचा आवाज आला. जित्रापं आवाजानं भेदरून हंबरत इकडं तिकडं धावू लागली. एक कुत्रं टिपलं गेलं आणि आवाजानं, माणसांना पाहून बाकीची कुत्री पांगली असावीत. अर्ध्या तासानं काका त्या जखमी रेडकाला घेऊन आला. त्याचा एक कान लोंबकळत होता. अंगावर खूप जखमा झाल्या होत्या आणि ते वेदनेनं अतिशय विव्हल हंबरत होतं. त्याला पाहताच माझ्या आजीनं डोळ्याला पदर लावला आणि ती धावत मला घेऊन आत गेली. माझा सगळ्यात धाकटा काका अकलूजवरून एक व्हेटर्नरी डिप्लोमा करून आला होता. तो गावातच दळण आणायला गेला होता. आजीने त्याला त्वरेनं घेऊन यायला मला सांगितलं. मी लगेच सायकल काढून गिरणीतनं त्याला घेऊन आलो. घरी जनावरांची प्राथमिक उपचाराची औषधं त्यानं आणून ठेवली होती. जमतील तशा जखमा गरम पाण्याने साफ करून त्यातली कसलीतरी पिवळट पावडर त्यानं पटकन जखमांवर शिडकली. तोवर मधला काका जनावराच्या डॉक्टरांना आणायला टू व्हीलर काढून रवाना झाला.
थोड्या वेळाने आजोबा म्हशींना घेऊन आले. माझ्या आजीच्या वाहत्या डोळ्यांना खळ नव्हता.
जखमा खूप खोलवर झालेल्या होत्या. पावडरने माखलेला कानही तसाच लोंबकळत होता. रेडकू प्रचंड भेदरलं होतं, घायकुतीला आलं होतं.
साधारण दोनेक तासांनी डॉक्टर आले.
सगळ्या मोठ्या लोकांनी काय ठरवलं कोणास ठाऊक. आजोबांच्या हाताखाली काम करणार्या एका मैलकुलीला बोलवण्यात आलं. तो शेतात खड्डा खणू लागला. माझी आजी मला पोटाशी धरून रडत होती. मला ती तिकडं जाऊ देईना. काका एक टेरिकॉटचं नवं शुभ्र कापड घेऊन आला.
डॉक्टर कसल्यातरी इंजेक्शनची तयारी करू लागले. शेवटी तो निर्णायक क्षण आला.
कुठून करूणेची झरा त्या मैलकुलीच्या हृदयात पाझरला आणि तो म्हणाला- "मला औषधं द्या, मी सांभाळतो रेडकाला". शेवटचा सोपस्कार कुणालाच नको होता.
डॉक्टरांनी त्याचा कान कापून काढला. जखमा पुन्हा नीट धुतल्या. काही औषधं लिहून दिली. रेडकाला मैलकुली घेऊन गेला. ते जगलं, वाढलं. काही महिन्यांनी चरायलाही जाऊ लागलं.
कुत्र्यांविषयी, विशेषतः भटक्या कुत्र्यांविषयीचा माझा फोबिया प्रचंड उफाळून आला. मी शाळेतून घरी शॉर्टकटने यायचो तेही पूर्ण बंद केलं. त्यांची दहशत बसली.
यथावकाश मी मोठा झालो, पुण्याला राहायला आलो.
एकदा ऑफिसमध्ये खूप उशीरा थांबलो. बाणेर रस्त्यावर केएफसीसमोर एस-बी-आय बँक आहे तिथं. रात्रीचे साडे अकरा वगैरे वाजले असावेत. रस्त्यावरची रहदारी बरीच कमी झाली होती. मला आठवतं, के एफ सी / पिज्झा हट ही दुकाने लागून लागून होती आणि ती अजूनही चालू होती. माझी गाडी मी रस्त्याच्या त्या बाजूला पार्क केली होती. तिच्याकडे जाताना कुठूनतरी अचानक साताआठ कुत्री गोळा झाली आणि माझ्या दिशेनं भुंकू लागली. मी हाड हाड म्हणत दुभाजकापर्यंत गेलो. ती कुत्री मला धड पलिकडेही जाऊ देईनात ना अलीकडे. मला दुभाजकावरच अडकवून ठेवला. ती घाबरत सुद्धा नव्हती. एकदम डू ऑर डाय अशी सिच्युएशन. एखादी गाडी मधून गेली तरी कुत्री मागे सरकेनात. सुदैवाने माझ्या मागून माझा टीम लीडर खाली आला आणि त्याला पटकन लक्षात आलं. त्याने आरडा ओरडा केला आणि अजून दोन माणसं रस्त्यावर आणली. समोरच्या बाजूने देखील तिथला वॉचमन काठी आपटत आला. एका कुत्र्याला दाणकन काठी हाणली तशी कुत्र्यांनी माघार घेतली.
पुण्यात भर रस्त्यावर, तेही बर्यापैकी रहदारीच्या, माझ्यावर अशी पाळी येईल असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. त्यानंतर अनेक दिवस मी बॅगेत चक्क दगडं ठेवत असे.
राहत होतो तो परिसर तसा उच्चभ्रू होता. एका प्रसन्न सकाळी मी चालत चालत दूध आणायला जात असता पलिकडच्या बंगल्याजवळून एक कुत्रा शांतपणे बाजूने आला त्याने थेट माझ्या कंबरेला चावा घेतला. मी किंचाळलो आणि समोरून कुणीतरी त्याला हाकललं. जीन्स असल्याने त्याचा एकच दात घुसला होता. उरलेल्या दातांचे व्रण पडले होते. शेवटी इतक्या वर्षांनी माझा घात झालाच. कुत्रा भटकाच होता. बंगल्यातले लोक त्याला गेटबाहेच खायला घालायचे म्हणून तो तिथेच आसपास असायचा.
मी तीन इंजेक्शने घेतली. आता इंजेक्शने पोटात घ्यायला लागत नाहीत हे बरं आहे. माझ्या लहान भावाचे चौदा इंजेक्षने घेऊन पोट सुजून बसले होते.
भटक्या कुत्र्यांच्या देशात आपण राहत नाही हे एक खूप मोठे सुख आहे, हे मला आता जाणवते. इथे माणसांची खानेसुमारी एकवेळ चुकेल, चुकेल का, चुकतेच. पण कुत्र्यांची आणि मांजरांची खानेसुमारी मात्र चुकणार नाही. माझा इथला मॅनेजर मला गमंतीने म्हणत असे, इथे कुत्र्यामांजरांचा ट्रेस माणसांहून जास्त काळजीपूर्वक ठेवला जातो आणि त्यांची काळजीही माणसांहून जास्तच घेतली जाते त्यामुळे पुढला जन्म त्याला पेटचाच मिळो. मला हे नेहमी प्रत्ययास येतं.
रोज फिरायला जातो तेव्हा किमान चार कुत्री मला क्रॉस करतात. अर्थात, सोबत त्यांचे मालक-मालकीणी त्यांना फिरवायला आलेले असतात. एकही कुत्रा माझ्यावर भुंकत नाही तरी मी आपला चार हात लांबूनच जातो. कधी कधी काही कुत्री इतकी लोभस असतात की आवर्जून त्यांची विचारपूस करतो. माझा रोजचा ट्रॅक मोहरीच्या विशाल शेतांतून जातो आणि मध्ये मध्ये छान गवती रानही आहे. गवतांमध्ये खेळायला या कुत्र्यांना खूप आवडतं. माझ्या ऑफिसमध्ये एका सहकार्याचा मिलू नावाचा डाक्सहुंड जातीचा एक खूप मायाळू कुत्रा रोज त्याच्याबरोबर येई. तळ्यावर पोहायला गेल्यावर एका मित्राचा एक गोल्डन रिट्रीव्हर तर हमखास पोहायला सोबत येई. माझ्या घराशेजारी एक वेडसर पण मायाळू म्हातारी राहते. ती नेहमी जाता येता भेटल्यावर एक प्रश्न हमखास विचारत असते - "तुम्ही माझ्या लालसर कुत्र्याला खेळताना पाहिलंय का हो? त्याचं नाव मॅक्स". उन्हाळ्यात ती रात्री एक-दीडवाजता मॅक्स मॅक्स असं ओरडत हिंडतेदेखील. एकदा खूप वेळ जागत होतो तेव्हा खिडकीतून मी माझ्या डोळ्यांनी तिला फिरताना पाहिलं आणि तिच्या आयुष्यात, स्मृतींत मॅक्स किती खोलवर रुजला आहे हे जाणवून आलं.
माझी कुत्र्यांविषयीची भीड खूप चेपली आहे.
तरीही कधी कधी चिमधार करुणेने भरलेले ते तीन आठवडे वयाचे डोळे आठवतात आणि मन गहिवरून येते.
प्रतिक्रिया
24 Feb 2023 - 6:30 am | कंजूस
एकूण तुम्हाला कुत्र्यांची भीतीच बसली आहे.
24 Feb 2023 - 7:37 am | गवि
लेख सुंदरच उतरला आहे. एक वेगळा परस्पेक्टिव वाचायला मिळाला. तुम्हाला किमान भारतातील श्वानांबाबत जवळपास सर्वच वाईट अनुभव आलेले आहेत असे वाटते.
कदाचित मुळात भीती बसलेली असल्याने तुम्ही फक्त अनाहूत संकटपरिस्थितीतच कुत्र्यांना सामोरे गेले असावेत (किंवा नाईलाजाने जावेच लागले तेव्हाच सामोरे गेले असावेत)
अगदी विदा उपलब्ध नसला तरी सर्वसाधारण व्यक्तिगत पातळीवर लोकांना जे अनुभव येतात त्यात स्टॅटिस्टिकली इतके ९९% वाईटच अनुभव नसतात. असे वाटते.
मला खुद्द एक तुम्ही म्हणता तसा रीतसर पाळीव कुत्राही व्यवस्थित कचकून चावला आहे. तीन चार वेळा बाईकमागे कुत्र्यांनी चवताळून पाठलाग केला आहे. विनाकारण वैर असल्याप्रमाणे भुंकणारे दोन तीन कुत्रे बघितले आहेत. अगदी मांजरे देखील चावली आहेत.
पण उरलेले शेकडो हजारो प्रसंग हे कुत्र्यांचे अत्यंत प्रेमळ हृदय दर्शन घडवणारेच आहेत. वरील सर्व प्रसंग घडूनही त्यांचे प्रमाण इतके कमी आहे की मी अनेक कुत्री स्वतः पाळली. त्यांनी खूप आनंद दिला. रस्त्यातल्या, रानातल्या, खेडेगावातल्या भटक्या कुत्र्यांनीही बहुतांश वेळा माया दाखवली, ट्रेकिंग करताना रस्ते दाखवले, सोबत केली.
तरीही एखाद्या पिटबुल ने घरातील वृद्धेवर हल्ला करून ठार केल्याची बातमी येते. लहान मुलावर हल्ला झाल्याचे व्हिडिओ येतात आणि हे सर्व तर्कशास्त्र गोठते. कोणाच्या आई, वडील, मूल यांच्यावर असा हल्ला झाला तर कोणीही हे श्वानप्रेम दाखवू शकणार नाही हेही निश्चित. तेव्हा हा एक गूढ विषय आहे असे म्हणून सोडावे.
24 Feb 2023 - 3:28 pm | हणमंतअण्णा शंकर...
अगदी अनाहूत परिस्थितीच गेलो आहे असं म्हणवत नाही.
आम्ही कुत्री पाळलीच नाहीत असे नाही. मोती म्हणून एक कुत्री आम्ही पाळली होती. म्हणजे भारतीय पद्धतीने पाळली होती. तिला उंबर्याआत प्रवेश नव्हता. तिच्या आणि आमच्या दोघांच्याही अपेक्षा भारतीय परंपरेनुसार अॅडजस्ट करून जगू अशा होत्या.
अजून एक आठवण आहे, लेखात आता मिसळता येत नाही. म्हणून इथे ती देतो.
माझ्या मेव्हण्याला कुत्र्यांची प्रचंड आवड. त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक मस्त कुत्रा भेट द्यावा असं मी ठरवलं. माझ्या गावात आणि गावाजवळच्या शहरांतदेखील जातिवंत श्वानांच्या किमंती खूप आहेत. पुण्या-मुंबईच्या मानाने नसल्या तरी जर्मन शेफर्ड (अगदी पिव्वरच नव्हेत) ७-८ हजार प्रतिपिल्लू तरी पडलं असतं. माझ्या मेव्हण्याला जर्मन शेफर्ड खूप आवडतात. मला ती खूप जास्त अॅग्रेसिव्ह वाटतात आणि माझ्या एका बालमित्राकडचा भलाथोरला कुत्रा पाहूनच माझी पाचावर धारण बसायची. हाच बालमित्र या कुत्र्याची पिल्ली विकायचा. अगदी जवळचा मित्र असल्यानं त्यानं मला एक पिल्लू असंच देऊ केलं. खरेतर मेव्हण्याच्या बाबतीत युझ केस केवळ श्वानप्रेमाची नव्हती. त्याच्या हेव्ही वेल्डिंगचे वर्कशॉपची राखण करायला दमदार कुत्रा हवाच होता. माझ्याकडे गाडी नव्हती, म्हणून मी गावाहून पुण्याला येताना रातराणीतूनच माझ्याबरोबर पिल्लू न्यायचं ठरवलं. मित्राचं वर्कशॉप हायवेला वाटेवर आहे. गाडीचा ड्रायव्हर ओळखीचाच होता. पिल्लाला आधी एक आईस्क्रीम खायला घातलं. एका बास्केटमध्ये अजून एक अमूल आईस्क्रीमची डबी ठेऊन पिल्लू ठेवलं. (जेणेकरून पिल्लांना गाडी लागत नाही आणि ती केकाटत नाहीत)..मध्यरात्री त्याला वर्कशॉपवर सोडलं आणि मी पुढे गेलो.
साताआठ महिन्यातच पिल्लू जबरदस्त वाढलं. मेव्हण्याने खूप लाड केले. वर्षातच ते भारदस्त दिसू लागलं. मुळातलंच 'पाणी' चांगलं असल्याने दणकट झालं. अगदी लहान भाचरं त्याच्या पाठीवर बसून त्याचा घोडा करायची. एका भाचीला तर त्याचा खूप लळा लागला. मीही अधूनमधून गेलो तर मला ओळखायचं. पायाशी येऊन बसायचं. खाजवून घ्यायचं. मेव्हणातर त्याच्या तोंडात हात घालून हात हलके चावून घेई. कुत्रं खूप खेळकर आणि आनंदी होतं. जातीला साजेसं चौकससुद्धा. त्याच्यापायात वेल्डिंगची स्लरी काचली होती तर एक पाय वर करून ते काढून घ्यायलाही आलं होतं.
एकेदिवशी एका कोंबडीच्या मागे ते हायवेवर पळालं आणि चिरडलं गेलं.
कुत्र्यांना खूप काळजीपूर्वक ट्रेन करावे लागते. माझ्या कर्मभूमीत त्यांचे असे प्रशिक्षण केले जाते. कुत्र्यांना आवर्जून अनोळखी माणसांत नेले जाते. मेट्रो, बसेस, रेल्वे अगदी सगळीकडे. अॅग्रेसिव्ह कुत्र्यांच्या मुसक्या आवळून त्यांना बाहेर काढलं जातं. मी भारतात एकाही पाळीव कुत्र्याला मुसक्या पाहिल्या नाहीत. सिलेक्टिव्ह ब्रिडिंग करून अधिकाधिक नॉन अॅग्रेसिव्ह कुत्री निवडली जातात. त्यांचे विमे उतरवले जातात. त्यांचे व्यवस्थित लसीकरण केले जाते. विकल कुत्र्यांचे इच्छामरणदेखील केले जाते.
मला मांजरी खूप आवडतात. घराशेजारी दोन मांजरी सारख्या वावरत असतात. मी एकदा एक ताजा मासा बाहेर ठेऊन दिला तर एकाही मांजरीने त्याला तोंड लावले नाही. केवळ कॅटफूडवरच वाढल्याने ती मांसाला चटावलीच नव्हती. मार्जारस्वभाव माझ्याशी मिळताजुळता असल्याने मी कुत्र्यांना घाबरणं आलंच.
24 Feb 2023 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर लेख आठवणी. बॅगेत दगड ठेवण्याचं हसु आलं पण भिती वाटली की हे सगळं आलंच. बाकी, कुत्री प्रेमळ असतात असे म्हणायचं धाडस चार कुत्री पाळून झाल्यानंतरही अजिबात म्हणनार नाही. त्याची ती जबड्याची कातडी मागे जावून दिसणारे भयंकर दात पाहून कुत्र्याजवळ जायची हीम्मत होत नाही. 'तेरी मेहरबानीया' सिनेमातलं घळाघळा डोळ्यातून अश्रू ढाळणारं कुत्रं. 'चल रे वाघ्या बीगी बीगी, पाया कुणाच्या पडू नको' या दादा कोंडकेला सोबत करणारं कुत्रं. अशा प्रभावाने कुत्री पाळली आहेत. पाळलेली कुत्री चावली नाहीत कधी. घरी आणि बाहेरही. कुत्री जगत नाहीत, ते दु:खदायक असतं. बाकी, इतकं सगळं माहिती असूनही फोर व्हीलरच्या मागे धावणारी कुत्री, आपल्याच नादात चालत असता अचानक आपला कॉन्फीड्न्स लेवल चेक करणारी कुत्री. अधे मधे दिसणारी कुत्र्यांची गँग, अजुनही धडकी भरवतातच हे मात्र मला कायम मान्य आहे.
हणमंतअण्णा लिहिते राहा. लेखन कायम आवडतं.
-दिलीप बिरुटे
24 Feb 2023 - 10:37 am | Bhakti
अगदी बराच काळ सुन्न होते!तो व्हिडिओ पाहून चर्र झालं,किती यातना चिमुकल्या जीवाला.
भटकी कुत्री बहुतांशदा भयानकच वाटतात,सावधच असावे.फार जवळ आले की दगडाचेच भय दाखवावे लागते.
रस्त्यावरच्या कुत्र्यांना भुकेसाठी दया समजू शकते पण त्यांचं monitoring ही गरजेचं आहे,त्यांची संख्या आटोक्यातच हवी.
माझीही भीड चेपली आहे पण यावर उपाय हवा.
24 Feb 2023 - 10:44 am | प्रशांत
लेख आवडला.
मला अजूनही भटक्या कुत्र्यांची भीती वाटते खास सायकलिंग करताना.
24 Feb 2023 - 11:13 am | राजेंद्र मेहेंदळे
लहानपणी खुप कुत्रे एकामागुन एक पाळले आणि सोडुन दिले आहेत, त्यामुळे कुत्रा प्रकरणाची भिती वाटली नाही कधीच. मात्र माझ्या एका पाळलेल्या कुत्र्याला बाहेरचा पिसाळलेला कुत्रा चावला आणि माझा कुत्रा २-३ दिवसात माझ्या समोरच आचके देत मेला. त्या नंतर पुन्हा कुत्रा पाळायची हिम्मत झाली नाही.
गाडीच्या मागे लागणार्या कुत्र्यांची धांदल उडवायला मला आवडते. म्हणजे पहिले त्याना मागे लागु द्यायचे, मग एकदम बचकन गाडी थांबवायची मग पुन्हा चालु करायची , पुन्हा थांबवायची म्हणजे त्यांचा जो काय घोटाळा होतो त्याने हसुन पुरेवाट होते. पण तरीही भटक्या कुत्र्यांना रस्त्यात खाउ घालणारे तथाकथित प्राणीमित्र बघुन डोक्यात तिडिक जाते.
दुसरे म्हणजे आमच्या ईथे काही काही ठिकाणी भटके कुत्रे बिनधास्त रस्त्यात उन खात बसलेले असतात, आणि अगदी जवळुन गाड्या गेल्या तरी ढिम्म हलत नाहीत. अगदी गाडी अंगावरुन जाईल असे वाटले तरच हलतात, त्यामुळे अशा कुत्र्यांच्या (आणि कधी कधी माणसांच्याही) अंगावर सरळ गाडी घालावी अशी सणक अधुन मधुन डोक्यात येते.
24 Feb 2023 - 11:33 am | सौंदाळा
कुत्र्यांचे निर्बिजीकरण जर गंभीरपणे केले तर त्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल आणि १०-१५ वर्षात भटक्या कुत्र्यांची समस्या खूपच कमी होईल.
चिंचवडमधे मागील महिन्यात एका माणसाचा कुत्र्याच्या चाव्याने मृत्यु झाला आहे.
रस्त्यावरील फुटपाथ, सोसायटीमधील वॉकिंग ट्रॅक इकडे तर चालायची सोय नाही. लोक पाळीव कुत्री फिरवायला आणतात आणि कुत्री तिकडेच मल-मुत्र विसर्जन करतात.
अत्यंत कमी लोक स्वत:च्या कुत्र्याची विष्ठा उचलून योग्य जागी टाकतात.
मला कुत्र्यांपेक्षा त्यांचे असले मालक आणि भटक्या कुत्र्यांना खायला घालणारेच डोक्यात जातात.
तेच कबुतरांच्या बाबतीत. काही वर्षात सोसायट्यांच्या पायपात, खिड्क्यात रहाणारी शहरी कबुतरे कोंबडी सारखी होतील, त्यांचा आकार वाढतोय आणि ऊडायची रेंज कमी कमी होतोय असे निरिक्षण आहे.
24 Feb 2023 - 2:28 pm | स्मिता श्रीपाद
भयंकर व्हिडीओ आहे.
माझ्या घराजवळच्या गल्लीत सुद्धा नेहेमी फौज असते. आणि कुठल्याही क्षणी मागे लागतात एकदम सगळी कुत्री. कायम जीव मुठीत ठेवुन जावं लागतं.
बिल्डींग मधे रहाणारे २-३ आजोबा लोक बाहेर पडताना कायम काठी घेउन जातात अशी परिस्थिती आहे.
माझ्या गल्लीमधे 'न रहाणारे' प्राणिमित्र आवर्जुन गाडी घेउन इथे येउन त्यांना पार्ले जी बिस्किटांचा पौश्टीक आहार देतात तेव्हा भयंकर राग येतो.
भटक्या कुत्रांना पोटभर खायला द्या म्हणजे ती हल्ला करणार नाहीत असं परवा कोणीतरी स्टेटमेंट केलेलं वाचलं.
काय बरोबर, काय चूक कळत नाही.
लेख आवडला.
24 Feb 2023 - 5:41 pm | मित्रहो
तुमचे अनुभव फार चांगले नाही असे दिसते. भटकी कुत्री मागे लागतात हेही खरे आहे. सकाळी सायकलींग करताना हा त्रास नेहमीचा आहे.
मी लहान असताना आमच्या वाड्यात भरपूर कुत्री होती. आम्ही अगदी लहानपणापासून कुत्र्यांसोबत वाढलो. ती कुत्री इतरांच्या अंगावर धावली नाही असे म्हणणार नाही पण आम्हा मुलांना कधी त्रास झाला नाही. अगदी पिले झाली की आम्ही बघायला जायचो पण कुत्री गुरगुरत सुद्धा नव्हती. पिलांच्या डोळे उघडायच्या आधीपासून आम्ही पिलांजवळ राहायचो. नगरपरिषदच्या मंडळींनी विष खाऊ घातले तरी आम्ही गवत खायला द्यायचो. गवत खाऊन उलटी झाली तर विष बाहेर पडेल. काही कुत्री अशी वाचली.
आज काळ बदलला आहे. रस्त्यावर गाड्या खूप वाढल्या आहेत. त्यात मोकाट कुत्र्यांचा जीव नेहमी धोक्यात असतो. त्यापेक्षा त्यांचे निर्बिजीकरण संख्या कमी केली तर पब्लीकला आणि कुत्र्यांना दोघांनाही फायद्याचे होईल.
कुत्रा पाळणारी मंडळी त्याला पाळून मग काही त्रास झाला की सोडून देतात ते आवडत नाही. अशांनी मग कुत्रा पाळण्याच्या भानगडीत पडू नये.
कुत्री अंगावर का धावतात त्यामागचे त्यांचे मानसशास्त्र काय असते माहित नाही. स्कुटर किंवा कारच्या मागे कुत्री लागली तर मी पर्वा करीत नाही. सायकल चालवताना मागे लागली तर मी वेग कमी करतो आणि कुत्र्यांशी बोलायचा प्रयत्न करतो. साधारण अनुभव असा आहे की ते थांबतात.
लहानपणापासून ऐकले पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सावध राहावे आणि दूर राहावे.
24 Feb 2023 - 8:33 pm | धर्मराजमुटके
आज नेमका आमच्या सोसायटीच्या ग्रुपवर पण ही चित्रफीत आली. कुत्र्यांच्या बाबतीत माझा "आपलं ते कुत्रं आणि दुसर्यांच ते कुत्तरडं" असा अॅप्रोच नसतो. माणूस काय किंवा कुत्रं काय शेवटी स्वभाव कोणाला चुकला नाही. त्यावर औषध शोधता आलं पाहिजे.
मी देखील सुरुवातीला भु़ंकणार्या कुत्र्यांना घाबरायचो. माझे वडील सांगायचे की कुत्रे भु़ंकायला लागले की गोड गोड बोलायचे. पण कुत्रं म्हटलं तरी चावत आणि कुत्तरडं म्हटल तरी चावतच असे लक्षात आल्यावर भु़ंकणार्यावर सरळ चाल करुन जायचे धोरण अवलंबावयास सुरुवात केली आहे. एखादा फटका बसला की आपोआप त्यांचा मेंदू ताळ्यावर येतो.
शेवटी मऊ लागेल तिथे कोपरानं खणायचं हा मनुष्याचा आणि प्राण्याचा देखील स्वभाव आहे. आमच्या सोसायटीच्या आवारत अशी अनेक मोकाट कुत्री आहेत आणी काही मोकाट मनुष्यप्राणी देखील आहेत. ( या चित्रफीतीच्या निमित्ताने त्यांना व्हॉटसप ग्रुपवर वापरायला एक शस्त्र मिळालयं. असेही ते व्हाटसअप वर नेहमीच भुंकत असतात. धोकादायक झाड छाटलं, कर तक्रार, झाड पडलं कर तक्रार ! कुत्र्याला मारलं कर तक्रार, कुत्र चावलं कर तक्रार ! इ. इ. )
कुत्र्यांना बिस्कीटे खाऊ घालणारे कुत्रेमित्र नसतात तर खरे शत्रू असतात पण कुत्र्यांना आणि आपल्याला दोघांनाही ते ओळखता येत नाहीत. नजरिये का फरक होता है !
मैदा आणि साखर खाऊन कोणी मजबूत झालयं का ? मला तर ही मंडळी फार आवडतात.
24 Feb 2023 - 11:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे, बिबट्या पाळायचा, कारण तो कुत्री खातो, ते नाही जमले तर एक पिंपभर विष घेऊन ते अख्या पुण्यातला सगळ्या कुत्तरड्यांना खायला घालायचे, बघू यातले काय जमते ते
पैजारबुवा,
25 Feb 2023 - 9:04 am | धर्मराजमुटके
अरे देवा ! असा जहाल डावा विचार देखील मनात आणू नका. एखाद्या दांडक्याच्या फटक्यानं काम होत असेल तिकडे तोफ वापरायचा विचार का करता ?
25 Feb 2023 - 9:29 am | गवि
बुवा, असे केलेत तर उर्वरित श्वाननिर्दालन मिशनची सूत्रे तुम्हाला सरकारी अनिवार्य निवास व्यवस्थेत आत बसून तिथूनच हलवावी लागतील. जसे अनेक दिग्गज करतात.
25 Feb 2023 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> श्वाननिर्दालन मिशनची सूत्रे तुम्हाला सरकारी अनिवार्य निवास व्यवस्थेत...
हहपुवा... =))
-दिलीप बिरुटे
27 Feb 2023 - 9:09 am | पाषाणभेद
पैजारबुवांशी सहमत. मागे मी याच अर्थाचा धागा काढला होता. शहरांकडे बिबटे धाव घेत आहेत. त्यापेक्षा शहरातली भटकी कुत्री जंगलात नेऊन सोडायची.
25 Feb 2023 - 2:28 pm | सविता००१
गाडीवरून जात असताना या भटक्या कुत्र्यांची फौज मागे लागते तेव्हा आता नक्की मरणार हे प्रत्येक वेळेस वाटतं मला. माझी भीती काही जात नाही. खूप लोक सान्गतात तू ह्ळू कर गाडी, ते जातात दूर. पण त्यांचे ते विचकलेले दात आणि हिंस्त्र चेहरे, देहबोली पाहून मला आजपर्यन्त हे करता आलेले नाही. पाळीव कुत्री असतील तर मला इतकी भीती नाही वाटत. पण हे भयाण आहे.
26 Feb 2023 - 2:25 pm | Nitin Palkar
शहरांमध्ये होणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या या त्रासाला भूतदया, प्राणीमीत्र, मेनका गांधी यांच्यासारखे लोक कारणीभूत आहेत. हणमंतअण्णा शंकर... यांच्याप्रमाणेच मी देखील तो व्हिडिओ पूर्ण पाहू शकलो नाही. या प्रकारचा प्रसंग लाखात एखादा असू शकेल तरी देखील एक लक्षांश शक्यता तरी का शिल्लक ठेवावी या मताचा मी आहे.
खुळचट धार्मिक अंधश्रद्धाच्या आहारी जाऊन कबुतरांना दाणे घालणे भटक्या कुत्र्यांना दूध, बिस्किटे घालणे, देवळांच्या दरात बांधलेल्या गायींना चारा घालण्याने पुण्य मिळते ही गैरसमज जोवर नष्ट हॉट नाहीत तो पर्यन्त असे व्हिडिओज येतच राहणार.
27 Feb 2023 - 10:23 pm | श्रीगणेशा
माणसाने, इजा पोहोचवू शकतील अशा सर्व हिंस्र प्राण्यांना, मानवी वस्तीपासून दूर केलं आहे. कुत्रा हा अपवाद.
कुत्रा मुळातच हिंस्र प्राणी आहे हे प्राणी प्रेमी गटाच्या गळी उतरवणं अवघड.
22 Jun 2023 - 5:05 pm | आदित्य कोरडे
फार पूर्वी साधारण १७ १८ वर्षांपूर्वी मला कंपनीत सेकंड शिफ्ट करावी लागे. रात्री बस घराजवळ सोडून जाई तोपर्यंत साडे बारा वाजलेले असत. रास्ता अगदी निर्मनुष्य असे आणि घराची गल्ली अंधारलेली असे. ह्या गल्लीत दोन भटकी कुत्री होती . त्यांची जोडीच होती म्हणाना.दोन्ही कुत्री अशी अंगावर येत कि भीतीने अगदी गाळण उडत असे. आधी हाड हूड केले तर ती मागे हटत पण हळू हळू त्यांची भीड चेपू लागली आणि ती अंगावर येऊ लागली. आता मला कामावर जायची भीती वाटू लागली. पण काय करता. मग मला शाळेत वाचलेला हिंदीचा धडा आठवला आणि मी बटनाची छत्री जवळ ठेवली. पुढच्या वेळी जेव्हा कुत्री अंगावर येऊ लागली तेव्हा छत्री त्यांच्या समोर धरून खटकन उघडली आणि जणू जादूच झाली. अचानक समोर उघडून पसरलेली छत्री पाहून ती कुत्री अशी भ्याली आणि केकाटत पळली कि सांगता सोय नाही. नंतर मला अजून एक उपाय सापडला. फक्त कुत्र्यांना ऐकू जाणारी एक शिट्टी असते ,ती किल्लीला लावून ठेवायची आणि कुत्रा अंगावर येऊ लागला कि जोरात फुंकायची, कुत्रा घाबरून पळ काढतो. आणखी एक सोपा उपाय म्हणजे कुत्र्याला पोळी बिस्कीट वगैरे खाऊ घालून दोस्ती करायची. ह्यात गम्मत अशी कि जरी ७-८ कुत्री असतील आणि त्यातला एकच आपला दोस्त असेल तरी बाकीचे कुत्रे आपल्याला काही त्रास देत नाहीत जणू तो कुत्रा त्यांना सांगतो तो आपला दोस्त आहे याला त्रास देऊ नका . अर्थात हे माझे अनुभव आहेत
22 Jun 2023 - 7:26 pm | कंजूस
माझा अनुभव चांगला आहे. कधी त्रास झाला नाही. भटकंती दरम्यान स्थानिक गावातले कुत्रे सोबत करत अगदी वरपर्यंत येतात आणि माझ्याबरोबरच परततात. पण वाटेत माकडे असली तर मी त्या ट्रेकमध्ये बरोबर येऊ देत नाही. कुत्रा ( आणि काठी)आणि माणूस दिसला की माकडे चेकाळतात. एकट्या माणसाकडे लक्षही देत नाहीत.
कुत्र्याला खायला द्यायचे असेल तर ते पटकन त्यांच्यासमोर टाकावे लागते. हळूहळू हातातून देण्याचा प्रयत्न केल्यास ते खाणं हुसकावून घेण्याची प्रवृत्ती/ सवय असते. तेव्हा दात लागू शकतो.
22 Jun 2023 - 11:00 pm | रंगीला रतन
आमचे लाडके श्री शरचंद्रजी पवारजी यांनी सांगितले होते कि नियमबाह्य झाड मारायचे असेल तर त्याला मोरचूद घालायचे.
नियमबाह्य भटकी कुत्री मारायला फोरेट वापरायचे. काम पण होते आणि कायद्याचा कचाटा पण नाय.
हाय कि नाय आमचे साहेब हुषार? झंडू बाम लोकं उगाच त्यांना शिव्या देतात.
मनेका गांधी अमर रहे !!!
23 Jun 2023 - 8:02 pm | सुबोध खरे
फोरेट गुगलून पाहिलं. ते ऑरगॅनो फॉस्फरस विष आहे.
आपण फोरेट वापरलं आणि कुत्री मेली तर आपल्याला प्राण्यावर क्रूरते बद्दल सरकारी पाहुणे होऊन दोन चार वर्षे आत जावे लागेल.
अकारण कुत्रे मेले तर त्यांचे शवविच्छेदन केले जाते आणि त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे सिद्ध झाल्यास त्याचा संपूर्ण तपास होऊ शकतो आणि आपण त्यात अडकण्याची दाट शक्यता असते.
तेंव्हा असले उपाय ( कितीही करावेसे वाटले तरी ) कोणीही करू नयेत हि विनंती
23 Jun 2023 - 7:42 pm | सुबोध खरे
फोरेट वापरायचे.
हे कसं वापरायचं. याचं काही सविस्तर मिळेल का?
23 Jun 2023 - 7:51 pm | सुबोध खरे
आंतरिक उर्मी ने कुत्रे एखाद्या पळणाऱ्या सावजासारखे वाहनाच्या मागे धावतात. त्यात केवळ दुचाकींचा नव्हे तर रिक्षा चार चाकी सुद्धा येते. अर्थात चार चाकीमध्ये आपण सुरक्षित असतो. पण ते कुत्रं आपल्या गाडीखाली येईल याची भीती वाटते.
दुचाकीच्या मागे येणाऱ्या कुत्र्यांसाठी शंभर टक्के उपयुक्त म्हणजे आपण एकदम ब्रेक लावायचा आणि कुत्रं जवळ आलं कि जोरात "हाड" म्हणून ओरडायचं. तुम्ही अचानक थांबल्यावर अशा वेळेस कुत्र्याला नक्की काय करायचं हे समजत नाही पण "हाड" म्हटल्यावर आपण पळायचं हे मात्र माहिती असतं.
हा उपाय नेहमीच यशस्वी झालेला आहे.
बाकी कुत्र्याला "विकत घेऊन" बिस्किटे खायला घालणाऱ्या आणि कबुतरांना दाणे घालून त्यांची पैदास बेसुमार वाढण्यास मदत करणाऱ्या माणसांचा मला अत्यंत संताप येतो
तीच बिस्किटे/ दाणे विष घालून कुत्र्याला/ कबुतरांना खायला घालावी
आणि
याच माणसांना प्राणी हत्येच्या गुन्ह्यात अडकवावे असा भीषण विचार माझ्या मनात अनेक वेळेस येतो.
( कबुतरांच्या विष्ठेची एलर्जी असल्याने दमा लागलेले/ फुप्फुसाचे असाध्य रोग लागलेले असंख्य केविलवाणे रुग्ण मी पाहिलेले आहेत)
13 Mar 2024 - 4:05 pm | हणमंतअण्णा शंकर...
नुकतीच एक बातमी वाचली. भयंकर आहे. कोल्हापूर मध्ये एक २१ वर्षीय तरुणी रेबिजने वारली. तिने रीतसर सगळी इंजेक्शन्स घेतली होती तरीही शेवटचे इंजेक्षण घेतल्याच्या दुसर्या दिवशी रेबिजची लक्षणे दिसू लागली. भयंकर आहे हा भटक्या कुत्र्यांचा प्रकार.
14 Mar 2024 - 3:34 pm | नठ्यारा
हा लसबळी म्हणावा का? लशीची ऐशीतैशी करावी का?
-नाठाळ नठ्या