How to make sense in the age of tiktok?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture
हणमंतअण्णा शंकर... in जनातलं, मनातलं
22 Jan 2023 - 5:37 am

चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे.

थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा -

मी लहान होतो तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायची पद्धत होती. अभ्यासू मुलांनी टीव्हीवगैरे पाहू नये असं कायम सांगितले जायचे आणि टीव्हीपासून आवर्जून दूर लोटले जायचे. टीव्ही हे कधी कधी इडियट बॉक्स आहे हे मलाही पूर्णपणे पटले होते कारण सगळे कुटुंब मिहीर कधी परत येणार या चिंतेत कामं धामं सोडून टीव्ही समोर येऊन बसायचे. परंतु मला टीव्ही नेहमीच इडियट बॉक्स वाटत नसे. टीव्ही पाहायचो ते फक्त डिस्कवरी आणि हिस्टरी या दोन चॅनेल्ससाठीच. Nat Geo आमच्या केबलला लागायचे नाही. मला कार्टून्स आवडायची पण ती खूप जुनी. हातांनी चितारलेली. तेव्हा डिस्ने अवर या कार्यक्रमाखेरीज पर्याय नव्हता. मोगली मुळे ऍनिमे नावाचा प्रकारही नकळत आवडू लागलेला. तेव्हाची डिस्कवरी सुद्धा ग्रेट होती. लोन्ली प्लॅनेट सारखे अप्रतिम कार्यक्रम लागायचे. म्हणजे भूगोलाच्या पुस्तकात जे देश वाचायचो ते देश प्रत्यक्षात कसे असतात याची थोडक्यात टूरिस्टी का होईना झलक. हिस्टरीवरती ग्रॅनडा टेलिव्हिजनची शेरलॉक (जेरेमी ब्रेट) वाली मालिकाही लागायची अधूनमधून. (त्यातुन मला ब्रिटिशांविषयी जरा जास्तच प्रीती निर्माण झाली होती. पाठयपुस्तकांत तर ब्रिटिश नुसते अन्यायकारीच असायचे). म्हणून टीव्ही हे एक टूल आहे आणि ते जरा आपल्या कलाने ट्विक केले की आपली लालसा बऱ्यापैकी भागते हे उमजले होते. नंतर एम टीव्ही सुद्धा कधी मधी मला आवडू लागले तरीही माझी आवड ही मुख्यत्वे माझ्या आजोबांशी तंतोतंत जुळायची त्यामुळे आम्हा दोघांनाही ब्लॅक अँड व्हाईट गाणी आवडायची. म्हणजे मी लहानपणापासूनच म्हातारा आणि प्रीमिलेनियल दोन्ही होतो. माझे हे स्मरणरंजन उदारीकरण झाल्यावर खेडोपाडी पसरलेल्या या टीव्हीशी निगडित आहे. आणखी कुणाचे असेच रेडिओशी असेल.

माझे मुख्य फेसबुक होते पुढारी पेपरचे मागचे पान म्हणजे विश्वसंचार. पुढारीच्या पुरवण्या मी जपून ठेवायचो. शेजारी सकाळ आणि लोकमत यायचे त्यांच्याही पुरवण्या मी जपून ठेवायचो. सगळीकडून उत्सुकता शमवायचा प्रयत्न नेहमी चालू असायचा. अर्थात त्या लिमिटेड गावी लिमिटेड स्कोपमध्ये जिज्ञासा भागवण्याची जेव्हढी शिकस्त करता येईल तेवढी मी केली. मी आठवीत असेन. आमचे गाव तालुक्याच्या गावालगतच. तालुक्याच्या गावात सार्वजनिक ग्रंथालय होते आणि मला त्याचे सभासद होण्याची अनिवार इच्छा होती. मी कसेबसे इकडून तिकडून पैसे मागून गल्ला जमवत होतो.. कुणी पाहुण्यानी दहापाच रुपये दिले किंवा चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांच्यात बक्षिसं मिळाली की मी ते जमेल तसे गल्ल्यात टाके. चट्टामट्टा सोडल्यास मी खाऊ घेत नसे. एका वर्षात दिवाळीच्या आधी त्यात साधारणतः साडेपाचशे रुपये जमा झाले. त्यावेळेस वाचनालयाची फी अडीचशेच्या आसपास असावी. तिथल्या ग्रंथपालाने माझ्याकडून चारशे रुपये घेतले आणि मला पुस्तके घेता येऊ लागली. मात्र मला कोणतेही पुस्तक घेता येत नसे ते आधी त्या ग्रंथपालाकडून मंजूर करून घ्यावे लागे. मला वाटतंय एका नव्या पुस्तकासाठी त्याने माझ्याकडे अधिकचे पाचशे रुपये डिपॉसिट म्हणून मागितले. मी माझ्या आजोबांना एकदा लाडीगोडीत पाचशे रुपयांची मागणी घातली. चौकशी केल्यावर त्या ग्रंथपालाने माझ्याकडून आधीच अधिकचे पैसे लुबाडले होते, आणि आताही ऊस गॉड लागला म्हणून मुळासकट खाण्याचा प्रकार होतोय हे त्यांच्या लक्षात आले. ग्रंथपालाशी आजोबांनी कडाक्याचा वाद घातला आणि माझी ती लायब्ररी मला बंद झाली.

माझे कुतूहल मला स्वस्थ बसू देत नसे. कोल्हापुरात मी रद्दीतून अनेक दिवाळी अंक, नॅशनल जीओची मासिके किलोवर घेत असे. तीन वर्षे कोल्हापूरातलं नगर वाचन मंदिर माझे जीव की प्राण होते. या सगळ्यासाठी मात्र खरोखर कधी कधी पोटाला चिमटे काढावे लागत, उसनवारी करावी लागे.

कन्टेन्टचा सुकाळ

हळू हळू इंटरनेटचा शिरकाव होऊ लागला आणि मी मग जागतिक सिनेमा बघायचा सपाटाच लावला.. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे मी टॉरेन्टस लावत असे. इंटरनेट बेभरवशाची गोष्ट होती. नंतर इंटरनेट रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाली. कोणतेही गाजलेलं इंग्रजी पुस्तक, कोणताही सिनेमा, हव्या त्या डॉकुमेंटरीज सगळे बोटांच्या टोकाशी येऊन थबकले. हातात पैसेही खुळखुळू लागला आणि मला हवी असलेली सगळी मराठी पुस्तके मी विकत घेऊ लागलो. इंग्रजी पुस्तके उतरवू लागलो.

युट्यूब नावाचे एक अक्राळविक्राळ प्रकरण नित्य नेमाचे झाले. का कुणास ठाऊक फेसबुक किंवा ट्विटर हे मला कधीही भावले नाहीत. रेडिट मात्र मला प्रचंड आवडले आणि मी तिथे खूप रमलो. अधून मधून मराठी संकेतस्थळे चाळली.

शेवटी अतिपरिय होऊन इंटरनेटचा उबगसुद्धा येऊ लागला.. व्यवसाय इंटरनेटशिवाय चालतच नाही आणि रोजी रोटी ही सर्वस्वी इंटरनेटवरच अवलंबून आहे. कदाचित त्यामुळे असेल पण सतत कनेक्टेड राहण्याची, काहीतरी नवीन धुंडाळून आवर्जून शोधण्याची आणि कुतूहल शमवण्याची इच्छा सतत तेवत राहील हे दिवस सरले. कन्टेन्टचा सुकाळ झाला. कधी कधी इंटरनेट-वैराग्य घ्यावे असे वाटू लागले.

चिखल उपसून कमळापर्यंत जाणे -

ज्या जागा सिनेमातून पहिल्या त्यातल्या काही प्रत्यक्ष पाहता आल्या. ज्या जिंदगीची चाह ठेवली ती झगडून का होईना मिळवली. मला काय पाहायला आवडायचे? स्लाइस ऑफ लाईफ, संथ अशी, शक्यतो मी कधीच अनुभवली नाही अशा एका सुदूर प्रदेशातली एखादी अनवट मुरत जाणारी कथा, त्या कथेत बेमालूम मिसळलेला निसर्ग असं काहीसं. असं फिक्शन मला प्रचंड आवडायचे. बीबीसीची डिटेक्टरिस्ट्स नावाची एक सिरीज आहे. वाटायचं की तसं शांत, थोडंफार आडवळणाचे गाव असावे आणि आपण तिथे राहत असावे. जगण्यापुरते पैसे कमावून उरलेला बहुतांश वेळ एखादा छंद जपावा. तसाच छंद जपणाऱ्या अजून एकाशी किंवा काहींशी आयुष्यभराची लोणच्यासारखी मुरत जाणारी, आयुष्यावर सावली धरणारी स्निग्थ मैत्री व्हावी.. असा समछंदींचा एखादा अस्तिस्त्व जपण्याची धडपड करू पाहणारा क्लब असावा आणि त्याच्या तशाच काही छोट्या परंपरा असाव्यात. साधं सोपं, जटील गुंतागुंत नसलेलं आयुष्य असावं आणि तरीही आयुष्यात सोडवता यावेत असे लहानसहन प्रॉब्लेम्स असावेत, पण ना त्या गावचा ठाव सुटावा ना आपला ठाव सुटावा. अगदी टोकाची गुंतवळ नको पण डे टू डे आयुष्यात गुंतुवून ठेवणारी व्यवधाने असावीत.. टीव्हीवर येणारा ‘युनिव्हर्सिटी चॅलेंज’ सारखा कार्यक्रम रुटीन म्हणून सहज विनासायास पाहता यावा आणि ढीगभर स्बस्किप्शन्स वगैरेंचे जंजाळ नसावे. आपल्या गावात एक छानशी लायब्ररी असावी आणि तिथे कितीही वेळ निवांत बसता यावेत.. दर रविवारी brunch ची जागा ठरलेली असावी, एखादा जुना पब, नेहमीचा सायकल ट्रॅक, असं एक प्लेसबाउंड आयुष्य.

अशी दिवास्वप्ने पार्शली का होईना सत्यात आली. तो क्लब, आणि तो कलेक्टिवली साजरा करायचा छंद नाही सापडला पण इतर बरंच काही. अर्थात इथवर येणे आणि इथून पुढे जाणे हे काही सहजसाध्य नव्हते. संचिताचा, भूतकाळाचा एक झरासुद्धा या वाटेवर शेजारी चालत असतो. कधी कधी सकाळी उठल्या उठल्या कुमारांची उठी उठी गोपाळा ही भूपाळी तीव्रतेने आठवते. आता ती भूपाळी पटकन लावायची सोय आहे, त्यासाठी रेडिओने ती लावायची गरज नाही. एका क्लिकवर ती लावता येते. पण आज्जीने ठेवलेल्या चहाच्या आधणातला आल्याचा गंध फक्त कातर स्मृतीतच पकडता येतो. आपण साखरझोपेतून चुळबुळ करत पहाटेची थंडी निसरड्या पांघरुणासरशी पायाने बुजवून टाकत झोपेच्या अधीन व्हायचो आणि तोवर तिच्या काकणांची किणकिण ऐकून आश्वस्त होत उठून हळू हळू उजळणाऱ्या अंधारात शिरून चुलीच्या उबेशेजारी, तिच्या शेजारी जाऊन बसायचो. असा अनुभव एका क्लिकवर मिळत नाही. (अजूनतरी). अनुभवांना जास्त अर्थ आहे. हा अनुभव कन्टेन्ट मध्ये पकडून जगजाहीर करण्याची खाज मला नव्हती. आणि ती कधीही नसेल. माझ्याबाबतीत मी संयम बाळगायला शिकलो आहे. शेअरिंग शेअरिंगच्या अतिरेकाने आपण आपल्या अनुभवांची किंमत उणावू नये हे मी काटेकोरपणे शिकलो आहे.

सध्या आजूबाजूची सगळी माणसे मात्र अशा अनुभवांचे सार्वत्रिकीकरण करायला अपार उत्सुक आहेत. त्यांनी तावातावाने सगळा रिसर्च करून तावातावानेच नानाविध स्मार्टफोन्स खरेदी केलेले आहेत. तितक्याच त्वेषाने त्या स्मार्टफोन्सचे केमेरे वापरायला त्यांचे हात सतत वखवखताहेत. कन्टेन्टचे लोकशाहीकरण असं गोंडस नावही दिलंय या फेनॉमेनॉनला. तीसचाळीस सेकंदांसाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. सारखं मला सबस्क्राइब करा, मला फॉलो करा असं सांगताहेत. ( तुला फॉलो करायाला आहेस कोण तू? बुद्ध कि जीजस? - गिरीश कुलकर्णी एका मुलाखतीत ). देशकालपरिस्थितीला विपरीत खाद्यपदार्थांची रेलचेल दाखवताहेत. केकचे थर कसे लावायचे, झुकिनीच्या भाजीत काय पेरायचे हे येरळा नदीच्या काठी वसणारी कुणी नुकतीच स्मार्ट झालेली गृहिणी पाहतेय. सगळ्या अस्मिता, आपल्या ओळखी अचानक धोक्यात आल्याचं त्यांना सतत कुणीतरी पटवून देत आहे. त्याला भुलून एखाद्या विधायक गोष्टीतही त्यांना विखार दिसत आहे, नसलेली षडयंत्रे दिसत आहेत. नद्यांचे काठ, रस्त्यांचे तिठे, स्वच्छ मोकळा आसमंत, विशाल तरूचा बुंधा असं कोणतेही स्थळ असो वा अवकाश, हे कोणत्यातरी इव्हेंटसाठीच आपल्याला आंदण आहे असं सतत वाटत आहे. आस्थांचे अहंगंड तयार होताहेत आणि तीस तीस सेकंदांच्या ठिणग्यांनी ते कडकडत आहेत. काय खरं काय खोटं हे तर कळेनासं झालंच आहे पण सद्सद्विवेक ही एक काही चुकार लोकांनी उठवलेली एखादी फँटसी असावी असं वाटत आहे. इंफिनाईट स्क्रोलिंग शरीराच्या मर्यादा म्हणून थांबते, पॉज घेतेय. पुन्हा आहे तिथून कन्टेन्ट गाळण्याची हातभट्टी अव्याहत सुरु.

मी हे सगळं माझ्यापुरतं थांबवू शकतो हे मला मान्यच आहे. कुणीही माझ्यावर जुलूमजबरदस्ती केलेली नाही. पण मला कधीकधी काही चिंता सतावतात.. म्हणजे मला समाजाचा उद्धार करायचा आहे असं नाही. समाजच्या उद्धारात माझंही व्यापक हित आहे ही स्वार्थी जाणीव मला आहे म्हणून मला काळजी आहे. इथून पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी मूल्ये आणि त्यांचा अर्थ कसा समजावून घेतला जाईल? नंदा खरे म्हणत: स्वातंत्र्य < समता < बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे आपल्याला. भारतात कोणत्याही सामाजिक माध्यमात हेट स्पीचचे प्रमाण मलातरी प्रचंड वाढलेले दिसत आहे. केवळ मूल्यऱ्हास नव्हे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय? रोजच त्याचे भजे झाल्याच्या बातम्या आदळत आहेत. आपल्यापुढे असलेले प्रश्न असे तीस तीस सेकंदांच्या कॉम्प्रेहेन्शनने कसे सोडवले जाणार आहेत? की प्रत्येकाला प्रचंड आशावाद आहे आणि मीच नेहमीची किरकिर लावत आहे? डोकं भंजाळून जाते कधीमधी. प्रत्येकजण माझ्यासारखाच भंजाळून गेलेला आहे आणि त्यामुळेच तो एस्केप होण्याचा मिळेल तो चान्स सोडायला तयार नाही? म्हणून हे सतत कशाततरी, कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे?
कदाचित मी वेगाने इर्रिलेव्हंट होत आहे म्हणून मला या प्रतिमा आणि ध्वनींच्या जंजाळातून वाट काढता येत नाहीये. काहीही असो, सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे.
खैर, हळू हळू दिमाग ठंडा हो जायेगा असं मी स्वतःला समजावून देतो. मी जेव्हा या गोष्टींचा विचार करत नव्हतो तेव्हाही असे प्रॉब्लेम्स होतेच. मग आता विचार करून मी काय घोडं मारणार आहे? नागरिकशास्त्र शिकलोच की आपण, त्यातलं काय दिसलं आणि दिसतंय आजूबाजूला? म्हणून पडलोच की आपण त्या डबक्यातून बाहेर आपणहोऊन धडपड करून.

म्हणून मी मला प्रिय असणारी व्यवधाने शोधून त्यामध्ये स्वतःला गुंतुवून घेत आहे. उदा. मला आवडणाऱ्या ललित लेखांचे मी अभिवाचन करून रेकॉर्ड करून ठेवतो. रोज पाचेक किलोमीटर चालून/पळून येतो तेव्हा ते लेख वाचून इंटर्नलाईज करून घेतो. कितीतरी निसटलेल्या जागा, सबटेक्सट सापडतात. नवे चित्रपट आणि मालिका पाहणे जवळ जवळ थांबवलं आहे. अर्धांगिनी जे लावेल ते अर्धाएक तास तिचे पाय चुरत किंवा डोक्याला तेलमालिश करून देत घेत पाहतो. रोज एकावेळेस तरी पूर्ण अन्न मन लावून रांधतो. घरी कुणी नसले की अर्धवट सोडलेले लेखनप्रकल्प पूर्ण करत बसतो.. फोमो होत नाही. जाहिराती पहिल्याच जात नाहीत त्यामुळे गरजेहोऊन जास्त खरेदीहि होत नाही. मी दोन वर्षांसाठी सलग नव्याने काही वाचणे पूर्णपणे थांबवले आहे. म्हणजे नवी पुस्तके, नवे अंक इत्यादी. मी इयत्ता सातवीत आहे असं वेळापत्रक आखून चालतोय.. म्हणजे शाळेऐवजी काम आणि उरलेल्या वेळात मी जे इयत्ता सातवीत करत होतो त्या खटपटी. उदा. सायकल, तिची देखभाल, फिजिकल पेपर वाचणे, चित्रे काढणे, संध्याकाळी रुटीनम्हणून थोडावेळ टीव्ही पाहणे, मुद्दाम काही कपडे हाताने धुणे असं.

शेवटी जी ए म्हणत कि मनुष्य पंचवीस वर्षांपर्यंतच काय ते जगतो, नंतरचे आयुष्य हे गतकातरच असते असं काहीसं.
गतकातरतेची नशा म्हणा किंवा मेकिंग सेन्स इन द एज ऑफ टिकटॉक. माझ्यापुरतं तरी सध्या हे काम करतंय.

आईस्क्रीमप्रकटन

प्रतिक्रिया

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

22 Jan 2023 - 5:43 am | हणमंतअण्णा शंकर...

हा पॅरा गंडला आहे..

नंदा खरे म्हणत: स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे आपल्याला. भारतात कोणत्याही सामाजिक माध्यमात हेट स्पीचचे प्रमाण मलातरी प्रचंड वाढलेले दिसत आहे. केवळ मूल्यऱ्हास नव्हे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे काय? रोजच त्याचे भजे झाल्याच्या बातम्या आदळत आहेत. आपल्यापुढे असलेले प्रश्न असे तीस तीस सेकंदांच्या कॉम्प्रेहेन्शनने कसे सोडवले जाणार आहेत? की प्रत्येकाला प्रचंड आशावाद आहे आणि मीच नेहमीची किरकिर लावत आहे? डोकं भंजाळून जाते कधीमधी. प्रत्येकजण माझ्यासारखाच भंजाळून गेलेला आहे आणि त्यामुळेच तो एस्केप होण्याचा मिळेल तो चान्स सोडायला तयार नाही? म्हणून हे सतत कशाततरी, कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे?

कदाचित मी वेगाने इर्रिलेव्हंट होत आहे म्हणून मला या प्रतिमा आणि ध्वनींच्या जंजाळातून वाट काढता येत नाहीये. काहीही असो, सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2023 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'स्वातंत्र्याहून मोठी समता, तिच्याहून बंधुता. अशी या मूल्यांमध्येही प्रायोरिटी पाहिजे' ते 'सभोवताल माझ्या अवलोकनबुद्धीतून वेगाने निसटत जात आहे अशी जाणीव मला व्यापून टाकत आहे'

हे सर्वात महत्वाचं आहे. सध्या एका गावात काव्यमहोत्सवात उपस्थिती लावायची आहे. सविस्तर प्रतिसादासाठी रुमाल टाकून ठेवतो.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2023 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर लिहिलय सगळंच. एका पन्नाशीप्लस मिपाकराचे आत्मकथन. मन की बात. वयाच्या एका वळणावरुन मागे पाहात घेतलेला वेध. आवडी-निवडी, आठवणी कालपरत्वे नीसटत जाणा-या आणि आपल्या पुढे पळत जाणा-या गोष्टी आणि मग आपण आपलेच काही निर्णय घेऊन टाकतो तसं सगळं.

एका सूटीची सकाळ चांगली सुरुवात झाली किंवा मग ''कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे चालले आहे?" असेही.

-दिलीप बिरुटे
(इर्रिलेव्हंट होत चाललेला)

आग्या१९९०'s picture

22 Jan 2023 - 8:49 am | आग्या१९९०

छान लेख. माझेही जीवन असेच काही आहे. २०१२ पासून टीव्ही बघणे सोडून दिले ( बातम्याच बघायचो, परंतु त्यातील भडकपणाचा उबग आला ). शहरातील धावपळीचे जीवन सोडून गावाकडे शांत जीवन जगण्यासाठी आलो. परंतु आगीतून फुफाट्यात आल्यासारखे वाटले. जिद्दीने शेती करतो आहे. मनासारखे जीवन जगण्यासाठी ' जातीसाठी माती खाणे ' बंद केले आणि उगाच पैसे आहे म्हणून गरज नसलेल्या गोष्टी खरेदी करणे बंद केले, कर्ज काढून तर अजिबात नाही. आणि अद्याप कार घेतली नाही, गावात भाड्याने भरपूर मिळतात, शेअर मार्केट आणि शेती हेच छंद. खूप सुखात आहे.

चित्रगुप्त's picture

22 Jan 2023 - 11:44 am | चित्रगुप्त

विलक्षण - मननीय - मनोगत.
पुन्हा अगदी सावकाशीने वाचून त्याहूनही अधिक सावकाशीने प्रतिसाद लिहीता यावा अशी इच्छा आहे.

कुणाच्यातरी सुखासीन आयुष्याच्या तुकड्यात स्वतःला गुंतुवून घेणे

--- याचा आवाका (हल्लीच्या विविध साधनांमुळे) फार विस्तृत झालेला आहे. पूर्वी कल्पनाही केली नव्हती एवढ्या विविध गोष्टी जाणून घेणे, करणे, त्यात रमणे हे आता शक्य झालेले असले, तरी शरीर थकत चालल्याने त्यातले फार थोडेच आता करता येते, आणि तेही हळूहळू कमी होत जात असल्याची जाणीव वेदनादायक आहे.
तुमच्या चित्रकलेचा उल्लेख आलेला आहे, कृपया त्याविषयीपण लिहावे आणि चित्रे द्यावीत.

तुम्हाला दंडवत. असे मूलभूत आणि खणखणीत लेखन वाचून सकाळ उत्तम गेली.

कंजूस's picture

22 Jan 2023 - 7:20 pm | कंजूस

आज्जीने ठेवलेल्या चहाच्या आधणातला आल्याचा गंध फक्त कातर स्मृतीतच पकडता येतो. आपण साखरझोपेतून चुळबुळ करत पहाटेची थंडी निसरड्या पांघरुणासरशी पायाने बुजवून टाकत झोपेच्या अधीन व्हायचो आणि तोवर तिच्या काकणांची किणकिण ऐकून आश्वस्त होत उठून हळू हळू उजळणाऱ्या अंधारात शिरून चुलीच्या उबेशेजारी, तिच्या शेजारी जाऊन बसायचो. असा अनुभव एका क्लिकवर मिळत नाही.

अगदी पटतंय.

सुखी's picture

22 Jan 2023 - 8:04 pm | सुखी

छान मुक्तक

शेवटी जी ए म्हणत कि मनुष्य पंचवीस वर्षांपर्यंतच काय ते जगतो, नंतरचे आयुष्य हे गतकातरच असते असं काहीसं.

खरयं.
अण्णा लेख मस्तच आहे.

शेर भाई's picture

23 Jan 2023 - 10:39 am | शेर भाई

|शेअरिंग शेअरिंगच्या अतिरेकाने आपण आपल्या अनुभवांची किंमत उणावू नये हे मी काटेकोरपणे शिकलो आहे.
एकदम सहमत, पण कधी कधी या शेअरिंगमुळेच मिळणाऱ्या अभिप्रायात आपल्याला स्वतःच्या अनुभवाची न दिसलेली बाजू उमजू शकते. अर्थात यासाठी तुम्ही कुठल्या माध्यमावर व्यक्त होता ते देखील महत्वाचे.
प्रकटन आवडले

सौंदाळा's picture

23 Jan 2023 - 10:40 am | सौंदाळा

चिखल उपसून कमळापर्यंत जाणे

अप्रतिम
याखालील पहिल्या परिच्छेदाप्रमाणे - अगदी असेच जगायची इच्छा आहे पण काय करावे कळत नाही.
म्हणजे अगदी शहर सोडून बाहेर पडायची योग्य वेळ कोणती? त्यानंतर मुलीच्या शिक्षणाचे कसे करायचे? किती पैसे गाठीशी ठेवावे? एक ना अनेक.
खूप लोक असा विचार करत असतील पण प्रत्यक्षात निर्णय घेणारे खूपच कमी. त्यामुळेच तुमचे अभिनंदन आणि कौतुक. मिपावरच 'चौकटराजा' होते त्यांच्याशी व्यनितून याच विषयावर बोलत होतो पण त्यांचे दु:खद निधन झाले. गणेशा या मिपाकराने पण याच अनुषंगाने काही पाऊले टाकली आहेत. असो.
तुम्ही हे कसे जमवले यावर एक लेख लिहाच. पूर्वी घराच्या बांधकामाबद्दल पण एक लेख लिहिला होता त्याची काय प्रगती पुढे?

Bhakti's picture

23 Jan 2023 - 11:33 am | Bhakti

वाह ! मस्त प्रकटन!
ते लेखनप्रकार आईस्क्रीम आहे ते बरोबर आहे.भाकरीपासून -पिझ्झा खाऊन झाल्यावर आईस्क्रीम खाण्यासाठी योग्य वेळ हीच आहे.शेवटचा परिच्छेद _/\_
म्हणून मी मला प्रिय असणारी व्यवधाने शोधून त्यामध्ये स्वतःला गुंतुवून घेत आहे.
आधी वाटायचं नाही जमणारं हे,आता जमतंय +१११

श्वेता व्यास's picture

23 Jan 2023 - 12:34 pm | श्वेता व्यास

आठवणी आणि अनुभवांचं मिश्रण असा हा लेख खूप आवडला.
मनाजोगतं जगण्यासाठी शुभेच्छा :)

भृशुंडी's picture

25 Jan 2023 - 1:56 am | भृशुंडी

माझ्याच मनातलं लिहिलं आहे असं कित्येकदा वाटून गेलं.
गेल्या काही वर्षांतील कंटेंटोच्छादाचा उत्तम सारांश मांडला आहे
-------
काहीसं अवांतर - तुमची निरीक्षणे फार नेमकी असतात, लिहिते राहा.