स्थलांतरण - आताचे आणि पूर्वीचे

शेखर काळे's picture
शेखर काळे in जनातलं, मनातलं
19 Jan 2023 - 12:07 pm

प्रस्तावना
उपयोजक यांनी काही दिवसांपूर्वी भारताच्या तुलनेत हा लेख लिहून विचाराला बरीच चालना दिली. त्यावर प्रतिक्रियांचा आणि विचारांचा बराच उहापोह झाला. सगळ्याच प्रतिक्रिया चांगल्या आहेतच. सगळ्यांनीच आपल्या मनातील विचार मांडले. माझे विचार जरा वेगळे आहेत. आपण सगळेच आपापल्या परीने आपले जीवन, जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला हवे ते काम, आवडणारे काम करण्याचा विचार करतो आणि अर्थार्जनाचाही विचार बराच वरचा असतो.

स्थलांतरण
स्थलांतरण किंवा इमिग्रेशन हे आजच होते आहे का? जिथे अर्थार्जन कठीण झाले आहे, नोकऱ्या कमी आहेत, पैसे कमावण्याची संधी कमी आहे, अशा जागांतून पैसे मिळवणाऱ्या संधिंकडे स्थलांतरण नेहमीच होत आलेले आहे. कित्येक लोक महाराष्ट्रातून पूर्वी इतर राज्यात, देशात, प्रांतात अर्थार्जनासाठी गेलेले आहेत. तसे नसते तर आपल्याला मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, कर्नाटकात, तामिळनाडूत, झालंच तर बंगालमध्ये आणि अफगाणिस्तानातही मराठी बोलणारे लोक सापडले नसते. त्यामुळे उपयोजक यांनी जे मत मांडले आहे की ब्रेन ड्रेन ही घटना अलीकडची आहे तर ते माझ्या मते चुकीचे मत आहे. त्यांनी या घटनेला ब्रेन ड्रेन असे म्हटले आहे माझे असे मत आहे की हे स्थलांतरण संधीच्या शोधात, काही बाबतीत नवीन साहसाच्या शोधात झाले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आजोबांनी कोकणातून नागपूरला स्थलांतर केले - संधीच्या शोधात. नागपूरला त्यांना बऱ्यापैकी स्थैर्य आणि पैसे मिळाले तेव्हा ते येथेच राहिले आणि त्यांची मुलं मुलीही इथेच वाढली. त्यांच्या मुलांना नागपूरहून दुसरीकडे जावेसे वाटले नाही कारण पुरेशी संधी आणि पैसे इथेच उपलब्ध होते. माझ्या पिढीला पैसे किंवा स्थैर्य हे जास्त महत्त्वाचं नव्हतं. संधी, साहस आणि नवीन काही करणे हे जास्त महत्त्वाचं होतं. बाहेर जाऊन, धडपडून, नवीन जागांचा, देशांचा अनुभव घेऊन चाकोरी बाहेरचे काहीतरी वेगळे करावे ही जास्त इच्छा होती. आम्हाला तीच ती, दहा ते पाच नोकरी नकोशी वाटत होती आणि त्यासाठी मी किंवा माझ्यासारखे बरेच सुरुवातीला भारतात इतर जागेवर इतर राज्यात जाऊन काम करत होतो आणि पुढे तेही पुरेसे वाटले नाही तेव्हा भारताबाहेर कुठे संधी मिळेल ते शोधत होतो.
त्यात भारतात आणि बाहेर यात फारशी तुलना करायचा काहीच हेतू नव्हता. फार काय, बाहेरच्या देशात जेव्हा सुरुवातीला राहणे चालू केले, तेव्हा ते राहणीमान आम्ही नागपूरला राहिलो असतो त्या राहणीमाना पेक्षा कमी प्रतीचे होते.
आणखीन एक मुद्दा या लेखामध्ये, प्रतिसादामध्ये चर्चिला गेला आहे तो म्हणजे ब्रेन ड्रेन अर्थात भारतामध्ये प्रगती करायला कोणी उरेल की न उरेल. मला असा प्रश्न विचारायचा आहे की भारतात सगळ्या उच्चशिक्षितांना त्यांना हव्या त्या नोकऱ्या आहेत का? हव्या त्या संधी उपलब्ध आहेत का? त्यांना पुरेसे पैसे मिळतात का? भारताच्या लोकशाही व्यवस्थेत नेते अशा संधी उपलब्ध करून देतात का? जर पुरेशा संधीच उपलब्ध नसतील तर या उच्च शिक्षीतांनी त्यांच्या ज्ञानाचे काय करावे? नुसत्या पाट्या टाकत राहाव्यात?

भारतात काय कमी आहे हो?
भारतात काय कमी आहे हे विचारण्यापेक्षा, आम्ही जे करू शकतो ते भारताला हवे आहे का, हा प्रश्न जास्त योग्य आहे असं मला वाटतं.
भारताच्या नेत्यांनी भारतातून बाहेर गेलेल्या लोकांकडून, भारताचा कसा फायदा होईल व तो मार्ग सुकर कसा केला जाईल हे पहावे असे मला वाटतं. तसं बघितलं तर भारताच्या बाहेर राहणारे सगळेच काही दुधाने आंघोळ करत नाहीत आणि दागिने, जड जवाहर घालून बसत नाहीत. छन्दी-फन्दी लोक भारतातही राहतात. काही लोकांचे छंद पत्रकारांच्या डोळ्यात येतात तर काही छंद लपून राहतात. म्हातारपणी काहींचे आयुष्य भारतात सुसहनीय असते तर काहींचे परदेशात. त्यात सरसकटीकरण करणे शक्य नाही.
एक मात्र खरं, भारतात कामे होतात ती ओळखीमुळे. ही ओळख, संबंध हे आपण आपले वाढवावे लागतात. तुम्ही जर नीट संबंध ठेवलेत, इतरांबरोबर नीट वागलात, नीट बोललात तर कामे नक्कीच होतात. आरडा ओरडा केल्यास कामे होतील पण नीट होणार नाहीत.
भारताची स्वतःची एक व्यवस्था आहे - सिस्टीम आहे - त्यातच राहून कामे करून घ्यावी लागतात. तुम्ही परदेशी भारतीय असाल तर तुम्हाला काही सोने लागलेले नाही.

परदेशात काय कमी आहे हो?
मी वर लिहिले तसे परदेशात लोक जातात ते संधी आहे म्हणून, काहींना आवडीचे काम मिळते म्हणून, काही कदाचित घरापासून दूर जावे म्हणून. प्रत्येकाची आपली कारणे असतात - त्यात सगळेच एकाच कारणासाठी जातात हे काही खरे नाही.

माझे बरेच नातेवाईक नागपूरला त्यांच्या शालेय जीवनानंतर भारतात इतर शहरात स्थलांतरित झाले - काही उच्च शिक्षणासाठी, काही नोकरीसाठी, काही चांगली संधी मिळते म्हणून तर काही हवे ते काम करायला मिळते म्हणून आणि काही नाईलाजास्तव कारण नागपूरला तेवढ्या संध्या नव्हत्याच. मग त्यांना आम्ही काय म्हणावे - का तुम्ही नागपूर सोडून जाताय ? त्यांना काय म्हणावं - पुण्याला काय सोनं लागलंय असं? आणि म्हातारपणी तुम्ही नागपूरला परत यालंच ?
आणि तुम्ही जर म्हणत असाल की नागपुर आणि पुणे हे महाराष्ट्रातच आहे तर त्यात काही अर्थ नाही. असंख्य नागपूरकर, जे पुण्या मुंबईत जाऊन आज आपले पूर्ण जीवन राहिले आहेत, त्यांना जर विचारलं की तुम्हाला कुठलं शहर आवडतं तर सगळेच सांगतील - आम्हाला नागपूर आवडतं.
तसंच माझ्यासारखे बरेच परदेशस्थ लोक, जरी परदेशात राहत असले तरी आम्हा सगळ्यांचे लक्ष भारतावर असतेच की. सकाळी उठून आम्हीदेखील भारताच्याच बातम्या वाचतो.

खरं सांगायचं तर अमेरिका भारताच्या तुलनेत कुठेच, कशीच कमी पडत नाही. नातेवाईक आमचेही आता इथे भरपूर आहेत, मित्रमंडळी आहेत, महाराष्ट्र मंडळ आहेत, आम्हाला सगळ्या कलाकारांना भेटायला बोलायला मिळतं. नाही, हे मी बंगलोर बद्दल बोलत नाहीये, अमेरिकेबद्दल बोलतोय. तसं म्हटलं तर आता सतरा अठरा तासात मुंबईला पोहोचू शकतो. नागपूरहून मला मुंबईला पोहोचायला तेवढाच वेळ लागतो.

जातीभेदाबद्दल आणि वर्णद्वेषा बद्दल जितके बोलू तितके कमी आहे - कोळसा किती उगाळला तरी काळाच असतो.
मला चांगल्या कॉलेजच्या ऍडमिशन मिळायच्या वेळेला माझे वेटिंग वर दुसरे नाव होते... कारण तुम्ही ओळखलेच असेल. त्यामुळे भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल माझ्या मनात थोडी कटूताच आहे.

'गोरे लोक' याबरोबर बरीच तुलना आधीच्या लेखात केलेली दिसते. मला असं वाटतं की ही तुलना करण्याबरोबरच इतिहासाचा पण जरा अभ्यास करावा. पूर्वी जेव्हा मराठी लोक राज्य आणि संपत्ती मिळवण्याकरता स्वतःच्याच लोकांबरोबर फितुरी करून गोऱ्या लोकांबरोबर हात मिळवणे करत होते, तेव्हा अमेरिकेतले गोरे लोक स्वतःचा देश चांगला करण्याकरता, आणि लोकांची व्यवस्था चांगल्या करण्याकरता काम करत होते.

यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
बऱ्याच वर्षांनी लिहितो आहे. चुकभूल देणे घेणे. _/\_.

समाजविचार