मनात माझ्या

किरण कुमार's picture
किरण कुमार in जे न देखे रवी...
11 Jan 2023 - 6:24 pm

तुझ्या बटांतून अवखळ वारा
छेदित जातो सळसळ पाने
मनात माझ्या तुझ्या ओठीचे
अल्लड आणिक अचपळ गाणे

नदी वळावी कटी पाहूनी
ओठांवरती लाली नभाची
मनात माझ्या कवेत घ्यावी
मोहक मूर्ती तुझ्या तनाची

फिकेच पडती सागर येथे
इतुके चंचल नयनी पाणी
मनात माझ्या खोल आतवर
तुझ्या प्रीतीची अबोल वाणी

सुरेख बांधा घट्ट कंचुकी
पदर जरीचा त्यावर तारे
मनात माझ्या चुंबून घ्यावे
पाठीवरचे कोंदण प्यारे

लाखेचे ते चढवूनी कांकण
साद कशाला नुपूर पदांना
मनात माझ्या इथे टिपावे
तुझ्या खोडकर खेच अदांना

घरा घरातून दर्प सुटावा
देह तुझा की आहे अत्तर
मनात माझ्या प्रश्न कितीसे
तूच त्यावरी होशी उत्तर

गाभाऱ्यातील देव मनाचे
तुझ्या कांतीने उजळून जावे
मनात माझ्या जगता जगता
काव्य तुझ्यावर लिहून जावे

- किरण कुमार

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

12 Jan 2023 - 9:59 am | कर्नलतपस्वी

कांती नवनवतीची
कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
जशी चवळीची शेंग कवळी
जशी चवळीची शेंग कवळी
दिसे नार सुकुमार नरम गाल व्हट पवळी
तारूणपण अंगात झोक मदनाचं जोरात
चालणं ग मोठ्या नखर्याचं
बोलणं ग मंजुळ मैनेचं

कविता भारीच शंकाच नाही.

कुमार१'s picture

27 Jan 2023 - 9:29 am | कुमार१

छान आहे.

कुमार१'s picture

27 Jan 2023 - 9:31 am | कुमार१

डॉ. दिलीप महालनबीस
यांना काल भारत सरकारतर्फे मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.

कुमार१'s picture

27 Jan 2023 - 9:31 am | कुमार१

जागा चुकली.

प्राची अश्विनी's picture

29 Jan 2023 - 11:20 am | प्राची अश्विनी

वाह!

किरण कुमार's picture

30 Jan 2023 - 2:17 pm | किरण कुमार

सर्वांचे आभार

कानडाऊ योगेशु's picture

31 Jan 2023 - 8:57 am | कानडाऊ योगेशु

काव्य आवडले.
फक्त एक सुचवावेसे वाटते.

घरा घरातून दर्प सुटावा

च्या ऐवजी

घरा घरातून गंध सुटावा

असा बदल केला तर योग्य होईल असे वाटते. कारण दर्प हा शब्द उग्र वास ह्या साठी वापरला जातो.