गेल्या साठ वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे आणि संकीर्ण अशा साहित्यप्रकारांचा समावेश आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके काही वाचकांना आवडली व भावली. त्यातली काही खऱ्या अर्थाने गाजली, काही गाजवली गेली तर अन्य काही दुर्लक्षित राहिली. या कालखंडात अनेक लेखकांनी सातत्याने लेखन केले. त्यापैकी काही लेखक खरोखर वाचकप्रिय झाले. अशा लेखकांच्या काही पुस्तकांनी एक साहित्यिक मानदंड निर्माण केला. अशा काही लेखकांना त्यांच्या एकाच पुस्तकाबद्दल त्यांनी काही लिहावे आणि त्यातून संबंधित पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया उलगडावी, अशी विनंती समकालीन प्रकाशनातर्फे करण्यात आली होती. प्रकाशकाने या लेखकांसाठी एक मार्गदर्शक प्रश्नावली देखील तयार केली होती.
त्यानुसार 15 निवडक लेखकांनी प्रत्येकी एक लेख सादर केला. हे सर्व लेख एका मालेच्या स्वरूपात अनुभव मासिकामध्ये क्रमशः प्रसिद्ध झाले होते. त्या लेखांचे संकलन करून या प्रकाशनाने “गोष्ट खास पुस्तकाची” हे संपादित पुस्तक सादर केलेले आहे. या 15 पुस्तकांची साहित्य प्रकारानुसार वर्गवारी अशी आहे :
सात कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन कवितासंग्रह आणि प्रत्येकी एक नाटक, चरित्रात्मक आणि संकीर्ण पुस्तक.
या पुस्तकाचे संपादक सुहास कुलकर्णी आहेत. प्रकाशित पुस्तकांच्या निवडीचा कालखंड 1963 (‘कोसला’ - नेमाडे) पासून 2008 ('अशी वेळ'- सानिया) हा घेतलेला आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2015 मध्ये प्रकाशित झाली होती. सध्या 2021 मध्ये प्रसिद्ध झालेली दुसरी आवृत्ती बाजारात आहे.
संबंधित मान्यवर लेखकांनी या लेखनासाठी आपले एक पुस्तक निवडताना वेगवेगळे निकष लावलेले दिसतात. कुणी आपले सर्वात पहिले पुस्तक निवडले आहे तर अन्य कोणी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित राहिलेले पुस्तक निवडले आहे. ते पुस्तक लिहिताना लेखकाला विषय कसा सुचला, त्याची मनस्थिती कशी होती, पुढे त्या पुस्तकावर प्रशंसा अथवा टीका कशी झाली, इत्यादी मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखक मोकळेपणाने व्यक्त झालेले आहेत. काहीजणांनी त्यांच्या संबंधित प्रकाशकाशी असलेल्या संबंधाबाबत टीकाटिपणी केली आहे. असे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिलेले नाहीत हे त्यातून दिसून येते.
सर्व 15 पुस्तकांची यादी काही इथे देत नाही. ती इथे पाहता येईल.
या 15 लेखांपैकी मला जे लेख विशेष भावले फक्त त्याबद्दल मी लिहितोय. एकंदरीत 15 पुस्तकांपैकी मी फक्त तीन पुस्तके मुळातून वाचली होती. त्यामुळे त्यांच्यावरचे लेख मी विशेष आवडीने वाचले हे उघड आहे.
सुरुवात करतो ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या हमो मराठे लिखित 1972 च्या पुस्तकापासून. याचे कथासूत्र थोडक्यात असे:
एक जोडपे आहे. नवरा बायको दोघेही बेकार आहेत आणि आर्थिक विवंचनेत आहेत. नोकरी शोधताहेत परंतु एकंदरीत त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्या अवस्थेत ती स्त्री गरोदर देखील आहे. कथानायकाच्या हातात पैसा नाही आणि त्यात ही वाढू पाहत असणारी जबाबदारी. त्याने तो भयंकर त्रस्त आहे. आता बायको जर गरोदर नसेल तर तिला नोकरी मिळायची शक्यता अधिक आहे असे त्याला वाटते. त्या तिरीमिरीत तो बायकोचा गर्भपात करून घेतो.
मुळात हे लेखन दिवाळी अंकात कथा म्हणून प्रसिद्ध झाले होते. परंतु पुढे त्याचा समावेश कादंबरी प्रकारात होऊ लागला. ही कादंबरी तत्कालीन तरुणांना खूप भावली. या कादंबरीच्या छपाईत लेखकाने विविध प्रयोगही केलेले आहेत. एक म्हणजे त्यात परिस्थितीनुरूप वेगवेगळी चित्रे पण आहेत. तसेच टायपोग्राफी या कलेचा वापर केलेला आहे. कथेच्या नायकापुढे पैसा नसणे ही पहिली समस्या आणि त्यातून आता ‘काय करावं’ असा त्रस्त करणारा प्रश्न. ‘पैसा’ आणि ‘काय करावं ?’ या दोन शब्दांची एकाखाली एक मोठ्या होत जाणाऱ्या छपाईच्या टायपात पुनरावृत्ती केली आहे. ही लेखनशैली वैशिष्ट्यपूर्ण असूनही त्याकडे म्हणावे असं कोणाचं लक्ष गेलेलं नाही असे हमो म्हणतात.
या पुस्तकाबद्दलची एक विशेष टिपणी त्यांनी केली आहे. कादंबरी प्रकाशित झाली त्यावर्षीच्या उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य सरकारचा पुरस्कार या पुस्तकाला द्यायचाच नाही असा आग्रह मंडळाचे अध्यक्ष असलेले ग दि माडगूळकर यांनी धरला होता.
रंगनाथ पठारे यांनी त्यांच्या 1989 साली प्रसिद्ध झालेल्या चक्रव्यूह कादंबरीची निवड या लेखनासाठी केलेली आहे. सुरुवातीस ते एक गोष्ट स्पष्ट करतात की आतापर्यंत त्यांनी ज्या काही साहित्यकृती दिलेल्या आहेत त्यातली त्यांना कुठलीही बिनमहत्त्वाची वाटत नाही. ते कायम गांभीर्यपूर्वकच लेखन करतात.
लेखक स्वतः पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान शिकलेले आहेत. तिथल्या संशोधन वातावरणावर आधारित हे पुस्तक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका वैज्ञानिकाच्या शोकांतिकेची ही कहाणी आहे. तसेच संशोधन संस्थेतील व्यवहार, मानवी संबंध आणि हेवेदावे या सगळ्यांची पार्श्वभूमी कादंबरीला आहे. या कादंबरीत चांगले लेखनगुण असूनही ती गाजली नाही असे काही समीक्षकांना वाटते. यावर पठारे यांनी, ते स्वतः गाजण्यासाठी लिहिणारे लेखक नाहीत आणि ते वाचकांचा अनुनय करत नाहीत अशी टिपणी केली आहे.
आशा बगे यांनी त्यांच्या 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या ऋतूवेगळे या कथासंग्रहाबद्दल लिहीले आहे. वरवर पाहता त्या कथा स्त्रीबद्दल आहेत असं वाचकाला वाटू शकते. परंतु त्या सर्व माणसांच्याच कथा आहेत. नेहमीच्या जगण्यातही जे काही वेगळं सापडून जातं त्याच्यावर या कथा लिहिल्या आहेत. या कथासंग्रहाचे इंग्रजी व फ्रेंच मध्ये अनुवाद झालेले आहेत. हे पाहता,
" ही वाट फक्त माझी एकटीचीच नसून इतर कोणाचीही असू शकते"
असे लेखिका म्हणते. त्यांच्या लिहिण्याचा जो ऐन बहराचा काळ होता त्याचे मार्मिक वर्णन त्यांनी केले आहे. त्या काळात संपादक व लेखक यांच्यात सुसंवाद होत असे तसेच प्रतिभेला व्यासंगाचीही जोड असायची. अफाट वाचन हे त्या काळाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. जीवनातील कोलाहल आपल्याला शांत करता येत नसला तरी समजून तर घेता येतो आणि मग तो पेलताही येतो, या जाणिवेतून या संग्रहातील कथा लिहिल्या गेल्या आहेत.
अरुण साधू यांनी त्यांची 1999 मध्ये प्रसिद्ध झालेली मुखवटा ही कादंबरी या लेखासाठी निवडली आहे. सुरुवातीसच ते म्हणतात, की त्यांच्या ‘मुंबई दिनांक’ किंवा ‘सिंहासन’ या कादंबऱ्यांवर लिहीण्याची संपादकांची अपेक्षा असली तरीसुद्धा त्यांनी तो पर्याय निवडलेला नाही. मुखवटाची चर्चा फारशी न झाल्यामुळे त्यांना ती कादंबरी या लेखनासाठी घ्यावी वाटली. जेव्हा ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा संगणकीय क्रांतीचा बऱ्यापैकी प्रसार होऊन तरुणांचे वाचनावरून लक्ष उडू लागले होते याचे प्रत्यंतर त्यांना आल्याचे ते लिहितात. ही कादंबरी एका सोवळ्या ब्राह्मण कुटुंबातील एका परंपरेबद्दल आहे. त्या घराण्याच्या 700 वर्षांपूर्वीच्या आदिपुरुषाचा वार्षिक सोहळा ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्या आदिपुरुषाच्या मुखवट्यांची पूजा केली जाते. परंतु त्या पूजेचा मान असतो सवाष्ण दलित स्त्रीला. ही मध्यवर्ती कल्पना घेऊन त्याच्या सामाजिक अंगाने त्यांनी हे लेखन केले आहे. या लेखाच्या शेवटी साधूंनी माणसातील अहंभावावर मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
" मनुष्यप्राणी कितीही निरिच्छ होऊन निर्वाणाप्रत पोचला तरी प्राण असेपर्यंत त्याच्यातील सूक्ष्म अहंभाव जिवंत असतो".
स्वतःच्याच लेखनाबद्दल स्वतः काही लिहीण्याच्या निमित्ताने तो अहम सुखावल्याचे ते प्रामाणिकपणे कबूल करतात.
पुस्तकात काही कवितासंग्रहांवर लेख आहेत. ना धों महानोर यांचा रानातल्या कविता आणि योगभ्रष्ट हा वसंत आबाजी डहाके यांचा संग्रह हे दोन वाचले.
महानोर यांनी रानातल्या कविता कशा जन्माला आल्या त्याची सांगड वैयक्तिक आयुष्यातील घटनेशी घातली आहे. त्यांना कॉलेजचे शिक्षण चालू असताना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते अर्धवट सोडून आई वडिलांना शेतात मदत करण्यासाठी यावे लागले. त्यानंतर ते त्यांची शेती आणि त्यांच्या कवितेतच मनसोक्त रमले.
आता आरण्यक या रत्नाकर मतकरी यांच्या 1974 मधील नाटकाबद्दल. महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे. या नाटकाची निवडक नाट्य अभ्यासकांकडून प्रशंसा झाली परंतु समीक्षकांनी मात्र त्यावर खरपूस टीका केली. या नाटकाला त्याचे योग्य ते श्रेय न मिळाल्याचे मतकरी लिहीतात. परंतु त्याहीपेक्षा त्यांना खेद झाला तो आपल्या समीक्षकांच्या परधार्जिण्या वृत्तीचा. एखाद्या मराठी लेखकाने भारतीय परंपरेशी फारकत घेणारी रचना मूळ मराठीतच लिहिली तर ती आपल्याकडे सहन केली जात नाही. तसे काही करायचे असेल तर त्यासाठी आपण परदेशी लेखक असलेले बरे असे ते म्हणतात !
" मुळातच हे नाटक स्वतंत्रपणे मराठीत लिहिल्यावर मराठी साहित्य कसले डोंबलाचे संपन्न होणार?" असा त्रागा करून ते हा लेख संपवतात.
1963 मधील नेमाडेकृत कोसला आणि 1980 मधील अनिल अवचटांची ‘माणसं !’ या पुस्तकांवर गेल्या काही दशकांमध्ये भरपूर काही चर्चिले गेले आहे. त्यावर प्रस्तुत लेखात अधिक लिहीत बसत नाही. फक्त दोन मुद्दे:
१. कोसलावरील लेखात नेमाडेंच्या पुढील वाक्याने जरा दचकायला झाले:
"कोसला वाचून आत्महत्या केलेले लोक आहेत तसेच ती कादंबरी वाचल्यामुळे आत्महत्येपासून परावृत्त झालेले लोकही आहेत".
या वाक्याचा उत्तरार्ध समाधान देतो परंतु पूर्वार्ध मात्र दुःखद आहे.
२. अवचटांच्या "माणसं !" या एका लेखाचे शीर्षकच त्या लेखसंग्रहाला दिले गेले. फक्त त्या शब्दापुढे उद्गारवाचक चिन्ह द्यायचे हे श्रीपु भागवत यांनी सुचवले. त्या एका चिन्हामुळे किती अर्थ ध्वनीत झाला असे अवचट विनयपूर्वक नमूद करतात.
…
या नववर्षातील माझ्या साहित्य वाचनाची सुरुवात या पुस्तकाने झाली. त्याने सुखद वाचनानंद दिला हे निःसंशय. गेल्या काही वर्षात मला एकाच लेखकाच्या मोठ्या आकाराच्या पुस्तकापेक्षा या प्रकारची पुस्तके अधिक आवडतात. एखाद्या मध्यवर्ती कल्पनेवर अनेक लेखकांनी एकत्रित लिहिलेले असे पुस्तक माझ्या विशेष आवडीचे असते. वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या विविध पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया मान्यवर लेखकांनी या पुस्तकात विशद केली आहे. तिच्या वाचनाने मन समृद्ध झाले. पुस्तकाचे मुखपृष्ठ वेधक आहे. त्याच्या तळातील भागात लिहिलेलं
"पंधरा लेखक, पंधरा पुस्तकं आणि त्यांचं म्हणणं"
हे उपशीर्षक देखील अगदी बोलके आहे.
…………………………………………………..
गोष्ट खास पुस्तकाची
संपादक : सुहास कुलकर्णी
दु. आ. २०२१
प्रतिक्रिया
10 Jan 2023 - 3:19 pm | कंजूस
खूप नवीन कळलं.
10 Jan 2023 - 5:58 pm | टर्मीनेटर
लेख आवडला! मराठी-वाङ्मयाच्या इतिहासात असा प्रयोग सर्वप्रथम माझे 'ऑल टाईम फेवरीट' लेखक कै. सुहास शिरवळकर ह्यांनी, साल नक्की नाही आठवत पण मला वाटतं २००० साली दिलीपराज प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या त्यांच्या फलश्रुती ह्या पुस्तकातून केला होता.
फलश्रुती.
--------------------------------------
लोकप्रिय लेखनाने
लोकप्रिय लेखानासंदार्भातली
निर्मिती-प्रक्रिया उलगडून दाखवणारं
मराठी-वाङ्मयाच्या इतिहासातील
पाहिलं पुस्तक
---------------------------------------
ह्या पुस्तकातून सुहास शिरवळकरांनी त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची/पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया अतिशय सुरेखपणे मांडली आहे.
जेब्बात! मग तर हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचावे अशी आग्रही शिफारस मी करतो. जाता जाता त्यांनी पुस्तकात व्यक्त केलेल्या मनोगतातील एक आणि 'जाई' ह्या त्यांच्या कादंबरी संबंधित त्यांनी मांडलेल्या विचारांबाद्दलचा एक असे दोन उतारे खाली देऊन माझे दोन शब्द संपवतो 😀
10 Jan 2023 - 7:06 pm | कुमार१
केवळ सुरेख !
त्या पुस्तकाबद्दल कुतूहल चाळवणारा तुमचा प्रतिसाद खूप आवडला.
10 Jan 2023 - 7:24 pm | Nitin Palkar
एका वेगळ्याच प्रकारच्या पुस्तकाबद्दल खूप छान माहीती.
टर्मिनेटर यांनी लिहिलेला सविस्तर प्रतिसाद देखील खासच.
11 Jan 2023 - 10:32 am | कर्नलतपस्वी
पुर्वी सैन्यात ऐज्युकेशन कोअर हा एक स्वतंत्र विभाग होता,आता नाही.यांची भरती डायरेक्ट हवालदार पदावर होत असे
व ते सैनीकांना हिन्दी,मॅप रीडिंग व इंग्रजी शिकवत. याच बरोबर युनिट मधे वाचनालय हा एक अविभाज्य घटक असे.सर्व भाषेतील पुस्तके तीथे मिळणार्या एज्युकेशन ग्रांट मधून घेतली जात.
इथेच सैन्य इतीहासा बरोबरच प्रेमचंद, श्रीलाल शुक्ल,रामधारी सिह दिनकर अशा अनेक दिग्गज हिन्दी साहीत्यीक, राणू, गुलशन नंदा प्रेम कथाकार,हेराल्ड राॅबिन्स,कुक,अगाथा ख्रिस्ती,वुडहाऊस इत्यादी वाचायला मिळाले. १९८४ हे गाजलेले जाॅर्ज ओवरवेल यांचे पुस्तक इथेच वाचले.
मातृभाषेतील पुस्तके काही प्रमाणात होमसिकनेस कमी करण्यास मदत करायची.
जुनी पुस्तके रद्दीत परावर्तित करत. त्यातली काही मी ठेवून घ्यायचो. ब्रह्मलिखीत हे हस्तसामुद्रिक विषयावर १९५० मधे लिहीलेले पुस्तक आजही माझ्या संग्रहात आहे.
सांगायचा उद्देश, १९४९ साली व्यंकटेश माडगूळकर यांचे गावाकडच्या गोष्टी हे पुस्तक ऐंशी मधे वाचनात आले होते. ते मागच्याच वर्षी माझ्या संग्रही दाखल झाले. माडगूळकरांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत आपले मनोगत माझ्या लिखाणा मागची कळसुत्रे या शीर्षकात लिहीले ते आता वाचले. जे लिहीलय ते आजही तितकेच लागू पडते.
काही खास लेखक,पुस्तके मनात छाप सोडून जातात यात शंकाच नाही.
11 Jan 2023 - 11:54 am | कुमार१
खास अभिप्रायांबद्दल सर्वांना धन्यवाद.!
अगदीच. मी कोसला वयाच्या विशीत वाचली तेव्हा अगदी म्हणजे अगदीच भारावून गेलो होतो. पुढे पन्नाशीत दुसऱ्यांदा वाचली तेव्हा 'ठीक आहे' इतपत मत झाले होते.
तरीसुद्धा मुळात त्या पुस्तकाने जी छाप मनात सोडली होती ती कायम आहे.
11 Jan 2023 - 4:31 pm | श्वेता२४
खूप काही वाचायचंय अजून अशी जाणीव होत आहे. वाचनासाठी निवांत वेळ काढायला हवा.....
12 Jan 2023 - 5:26 pm | राजेंद्र मेहेंदळे
एखादा लेखक गोष्ट लिहिताना किवा कवी कविता लिहिताना, त्याच्या मनात काय काय कल्लोळ उठत असतील आणि ते कागदावर ओतण्यासाठी त्याची कशी धांदल होत असेल असे काय काय मनात येउन गेले. हे पुस्तक मिळवुन वाचले पाहीजे.
अवांतर- नेमाड्यांची कोसला मलातरी काही आवडली नाही. कदाचित त्या वातावरणात वाढलेले लोक ते जास्त रिलेट करु शकत असतील. रंगनाथ पठारेंची सातपाटील कुलवृत्तांत उत्सुकतेने विकत घेउन वाचली. पण काही ठिकाणी चर्हाट तर काही ठिकाणी रस भरीत अशी काहीतरी भेळ वाटली. वेळ मिळाल्यास लिहिन त्यावर.
12 Jan 2023 - 5:50 pm | कुमार१
>>
अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
12 Jan 2023 - 5:50 pm | कुमार१
>>
अगदीच शक्य आहे ! या पुस्तकाबाबत टोकाची अनुकूल व प्रतिकूल मते आतापर्यंत शेकड्यांनी व्यक्त झालेली आहेत. कोसलाबद्दल खुद्द नेमाडे प्रस्तुत पुस्तकात काय म्हणतात बघा :
12 Jan 2023 - 8:21 pm | मित्रहो
तुमच्या लेखाने पुस्तक वाचण्यातली उत्सुकता वाढली.
आशा बगे यांच्या कथा वृत्तपत्रात यायच्या तसे वाचत होतो. आता फारसे आठवत नाही.
कोसला विशिष्ट हेतुने लिहिली होती असेच वाटते. तरुणपणी वाचली तर त्यातला निराशावाद ती जगण्यातली निरर्थकता भावते. नंतर ते तितके भावत नाही. एक काळ असा होता ज्यात निराशावादी लिखाणाचा ट्रेंड होता.
20 Jan 2023 - 8:38 am | सुधीर कांदळकर
प्रतिसादाला फारच उशीर झाला. कारण अशाच प्रकारच्या एका पुस्तकाचा उल्लेख मला करायचा होता. पण त्या पुस्तकाचे तपशीलच आठवत नाहीत. गेल्या शतकातील उल्लेखनीय पुस्तकांचा परामर्ष त्यात होता. गोविंदराव तळवलकर, कुमार केतकर, अरुण साधू, रविंद्र पिंगे असे कुणीतरी मान्यवर त्या पुस्तकाचे संकलक होते. कुणाला आठवत असल्यास लिहितील.
असो! एका छान लेखाबद्दल धन्यवाद.
20 Jan 2023 - 10:31 am | कुमार१
१.
खरंय. अगदी १९४५ मधील The Catcher in the Rye या सारखी पाश्चात्य उदा. पण आहेत.
..
२.
रोचक असावा. बघूया शोधून
20 Jan 2023 - 10:35 am | कुमार१
मूळ लेख लांबलचक होऊ नये म्हणून मी त्यातील काही निवडक लेखांबद्दलच लिहिले.
पुस्तकातील अन्य लेखनातले काही वेचक-वेधक:
१. लक्ष्मण माने(उपरा) :
त्यांनी हे आत्मकथनात्मक पुस्तक अनिल अवचट यांच्या प्रोत्साहनाने व आग्रहामुळे लिहिले. पुस्तक गाजल्यानंतर मानेंवर अशी जाहीर टीका झाली, की “एक कैकाडी इतकं चांगलं पुस्तक कसं लिहू शकतो आणि त्याला एवढे यश कसं काय मिळू शकतं? त्याला ते नक्कीच अनिल अवचट यांनी लिहून दिले असेल”.
अर्थात दोन्ही लेखकांनी त्याचे खंडन केले.
२. ‘पांगिरा’बद्दल विश्वास पाटील :
“या पुस्तकावरून याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. तो मूळ आशयापासून दूर गेलेला आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन्ही माध्यमे बरीच परावलंबी असतात. कादंबरी ही एका आईच्या मांडीवर सानाची थोर होते. मात्र, चित्रपट उद्योगात बाळाला अनेक आयांच्या आणि दायांच्याही अंगाखांद्यावरून प्रवास करावा लागतो”.
20 Jan 2023 - 11:14 am | श्वेता व्यास
सर्व खास पुस्तकांचा परिचय आवडला.
वाचनासाठी वेळ काढला पाहिजे.
31 Jan 2023 - 9:11 am | कुमार१
धन्यवाद.
......
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अतिशय बहुमनाचा ‘जनस्थान पुरस्कार’ (२०२३) ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे.
अभिनंदन !
5 Feb 2023 - 8:57 pm | कुमार१
ज्येष्ठ कथा-कादंबरीकार रंगनाथ पठारे यांना ‘महाराष्ट्र फाउंडेशन’ (अमेरिकेचा)चा २०२२चा ‘दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. त्यांच्यावरील लेख :
रंगनाथ पठारे : हा स्वतःसह वाचकांशीही कठोरपणे वागणारा लेखक आहे, तरी वाचकांना तो आवडतो, यातच त्याचे श्रेष्ठत्व आहे