इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: the Novelist's Novelist
रशियन कथा मोठ्या असतात. बऱ्याच लोकांना या वाचताना कंटाळवाण्या वाटतात. ही कथाही तुम्हाला कंटाळवाणी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण रशियन कथांमध्ये माणसांचे स्वभाव, त्यांच्या स्वभावाचा इतरांवर होणारा परिणाम अगदी अचुकपणे टिपलेले असतात. एकतर्फी प्रेमाचे दुष्परिणाम आपल्याला येथेही दिसून येतो पण शेवटी ते प्रेमच असते. प्रेयसीच्या वाट्याला दुःख येऊ नये म्हणून शेवटच्या क्षणाला आपला अहंकार या कादंबरिकेचा नायक बाजूला ठेवतो...
एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी
आव्हेची वॉडी
रशिया.
२० मार्च १८..
आत्ताच डॉक्टर गेले. शेवटी मी त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलेच. त्यांनी सांगण्यास बरीच टाळाटाळ केली पण शेवटी त्यांना त्यांचे प्रामाणिक मत द्यावे लागलेच. बरोबर! मी लवकरच मरणार आहे! अर्थात हे त्यांना माहीत होते म्हणा पण त्यांनी मला ते अजून सांगितले नव्हते. लवकरच माझे प्रेत नदीच्या पाण्यात फेकले जाईल आणि ते वाहात कुठे जाईल ते परमेश्वरच जाणे. काय सांगावे शेवटी समुद्रालासुद्धा जाऊन मिळेल. ठीक आहे. मृत्यू कुणाला चुकलाय पण मरायचेच असेल तर वसंत ऋतूत मेलेले केव्हाही चांगले नाही का? पण मरण्याआधी पंधरा दिवस कोणी रोजनिशी लिहायला घेतात का? माझी गणना आता ते वेड्यांतच करतील. पण मी काय म्हणतो, काय हरकत आहे? जर हे शेवटचे चौदा दिवस त्या माणसासाठी गेलेी चौदा वर्षे किंवा एकशे चाळीस वर्षे किंवा चौदा शतकांपेक्षा वेगळे नसतील तर त्याने जन्मापासून रोजनिशी लिहिली काय किंवा चौदाव्या शतकांपासून लिहिली काय काय फरक पडणार आहे? असं म्हणतात चिरंजीव आत्म्याला कशाचेच महत्व वाटत नाही पण मग तो तरी महत्वाचा कसा? मला वाटतं मी नसत्या झेंगटात पडतोय. हे काही चांगले लक्षण नाही. मी घाबरलेलो तर नाही ना? मला वाटतं त्यापेक्षा काहीतरी सांगितले तर डोस्कं जरा ताळ्यावर येईल. बाहेर वावटळ उठली आहे आणि मला बाहेर जाण्यास परवानगी नाही. पण मी काय सांगू बरं? शहाणा माणूस स्वतःची रडगाणी सांगत बसत नाही. एखादी कथा किंवा कादंबरी किंवा तत्सम काहीतरी लिहावे म्हटले तर ते आपले काम नाही. गोते खायची लक्षणे; काल्पनिक काहीतरी लिहिणे हे माझ्या बुद्धीपलिकडचे आहे. माझ्या अवतीभोवती जे काय चालले आहे त्यात मला काडीचाही रस नाही. पण नुसते बसून राहायचे फार कंटाळवाणे झाले आहे. वाचले तर झ्ाोप येते. मी असं करतो, मी मलाच माझ्या आयुष्याची गोष्ट सांगतो. काय मस्त आणि नवीन कल्पना आहे!! मृत्यू जवळ आलेला असताना मला वाटते हे महत्त्वाचे आहे आणि मुख्य म्हणजे आता त्याने कोणाचीही अस्मिता दुखावली जाण्याची शक्यता नाही आणि कोणाला राग येण्याचीही! सुरुवात करावी हे बरं..
तीस वर्षापूर्वी माझा जन्म एका सधन शेतकऱ्याच्या पोटी झाला. त्यांच्याच सल्ल्यानुसार कारभार हाकला जायचा. माझे वडील एक जुगारी होते. त्यांचे जुगारावर मनापासून प्रेम होते असे म्हटलेत तरी चालेल; माझी आई एक घरंदाज आणि सुशील स्त्री म्हणून पंचक्रोशीत ओळखली जात असे. पण स्वतःच्या अंगी असलेल्या गुणांमुळे असमाधानी असलेली अशी दुसरी बाई मी पाहिली नव्हती. बिचारी तिच्या सद्गुणांच्या ओझ्याखाली पिचून गेली होती. त्याच्या अतिरेकाने इतरांचा अणि खुद्द तिचाही छळ होतोय याची तिला कधी कल्पनाच आली नाही. तिच्या ५० वर्षांच्या आयुष्यात मी तिला कधी स्वस्थ बसलेले पाहिले नाही. ती कायम काहीतरी करत असायची. हाताने नाहीतर तोंडाने. तिला पाहिल्यावर मला मुंगीची आठवण येते. फक्त एकच फरक होता म्हणा. हिच्या धडपडीतून काही निष्पन्न होत नसे. मला वाटते तिच्या डोक्यात रात्रंदिवस कसलातरी किडा वळवळत असे आणि तो तिला स्वस्थ बसून देत नसावा. तिला मी फक्त एकदाच शांत पाहिले. त्या दिवशी तिला एका पेटीत ठेवले होते. ती मेली तेव्हा. अंगावर नवीन कपडे होते आणि अंगावर मोजके दागिने. तिचे तोंड उघडे होते, गालफडे बसली होती आणि शांत झालेली बुबुळे जणू स्वतःशी पुटपुटत होती, “न हलता शांत बसायलाही किती मस्त वाटतं नाही!” हो खरेच बरे वाटते. दमछाक करणाऱ्या, सदैव अस्वस्थ करणाऱ्या आयुष्याशी, गोचिडासारख्या चिकटलेल्या आयुष्याशी फारकत घेतल्यावर खरंच बरं वाटते. पण मुद्दा तो नाही.
मी वाढलो अत्यंत त्रासात. मजेचे बालपण असे माझ्या वाट्याला कधी आलेच नाही. दोघेही, म्हणजे माझे आईवडील माझ्यावर प्रेम करायचे पण त्याने माझे बालपण सुखात गेले असे मला म्हणता येणार नाही. माझ्या वडिलांचे घरात काही चालत नसे. त्यांना घरात काडीचेही महत्व नव्हते. त्यांच्यातील चांगल्या गुणांनी अवगुणांसमोर सपशेल शरणागती पत्करली होती. त्यांच्या रुपाने घरात एक कली नांदत होता असे म्हटले तरी मला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना बहुधा हे सगळे मान्य असावे कारण त्यांच्याकडे त्यांचे व्यसन सोडण्यासाठी लागणारी इच्छाशक्तीच नव्हती. ते आईच्या पुढे पुढे करून तिला खूष ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत असत. त्यात थोडासा निर्लज्जपणा डोकावत असे पण स्वतःच्या करारी बायकोची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना ते करावे लागत असे. माझी आई मात्र हे सगळे नशीब म्हणून सहन करीत असे पण त्यात अगतिकतेचा अंशही नसे. उलट मला तिच्या वागण्यात एक प्रकारचा कडवट अभिमान डोकावतोय अशी शंका येई. तिने कधीही माझ्या वडिलांची निर्भत्सना केली नाही. बिचारी चुपचापपणे त्यांनी मागणी केली की जेवढे पदरी असतील तेवढे पैसे त्यांच्या हवाली करायची आणि त्यांची कर्जे फेडायची. तेही तिच्या तोंडावर आणि मागेही तिचे कौतुक करायचे पण कधी घरी मात्र थांबत नसत. जाता येता ते मला थोपटत. बहुदा त्यांना मीही बिघडेन अशी सारखी भीती वाटत असावी. काय माहीत! पण ते जेव्हा माझ्या केसातून हात फिरवायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहात असे. त्यांच्या ओशाळवाण्या हास्याला मागे सारून मग तेथे ह्रदयाला भिडणारे हास्य उमटायचे. त्यांच्या पिंगट डोळ्याच्या भोवताली असलेल्या सुरकुत्यातून मग प्रेम ओसांडून वाहात असे आणि मी नकळत माझा कोमट अश्रूंनी भिजलेला गाल त्यांच्या गालावर लाडाने घासत त्यांच्या मिठीत जाई. मी अंगरख्याने डोळे पुसत पुसत अश्रू थांबण्याची वाट पाही पण एखाद्या भरलेल्या पेल्यातील पाणी जसे वाहातच राहते तसे माझे अश्रू वाहात असत. ते थांबतच नसत. मी हमसून रडायला लागल्यावर मात्र ते माझी समजूत काढत, मला कुरवाळत आणि त्यांच्या थरथरत्या ओठांनी माझ्या चेहेऱ्याची चुंबने घेत सुटत. त्यांना जाऊन वीस वर्षं झाली असतील पण आजही त्यांची आठवण झाली की मला हुंदके आवरत नाहीत आणि माझ्या ह्रदयाचे ठोके अति दुःखाने जलद पडायला लागतात. जणूकाही त्यांची आठवण जोपर्यंत मला येते तोपर्यंत ते ठोके पडण्याचे थांबणारच नाहीत.
माझ्या आईने मात्र मला प्रेमाने वागवले, त्यात काही शंका नाही पण त्यात कर्तव्यभावना जास्त होती. या अशा कर्तव्यकठोर पण प्रेमळ आया फक्त लहान मुलांच्या कथेतच भेटतात. तिचे माझ्यावर खूप प्रेम होते पण माझे मात्र तिच्यावर प्रेम नव्हते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी माझ्या प्रेमळ, कर्तव्य पाड पाडणाऱ्या माझ्या आईला टाळत होतो आणि माझ्या निर्लज्ज, जुगारी बापावर प्रेम करीत होतो.
पण आजच्यासाठी एवढे पुरे! सुरुवात तर केली, हेही नसे थोडके आणि शेवट काय होणार आहे याची काळजी करण्याचे मला कारण नाही. जो काही व्हायचा आहे तो होईल. माझा आजार त्याची काळजी घेईल.
मार्च २१
आज हवा मात्र मस्त पडली आहे. ऊबदार आणि स्वच्छ. सूर्याची किरणं भुसभुशीत बर्फावर कशी मस्त लोळत आहेत पहा. सगळं कसं चमकतंय. धुराड्यातून धुराच्या लडी हळूवारपणे वर चालल्या आहेत आणि फांद्यांवरून बर्फाच्या पाण्याचे थेंब ठिबकत आहेत.. अंधारातून चिमण्या वेड लागल्यासारखे किंचाळत आहेत. या हवेत मला मस्त वाटतंय खरें पण दमट हवेत मला गुदमरतंय. मी हे सगळे अनुभवत खिडकीत बसलोय आणि माझी नजर नदीच्या पलिकडे असलेल्या शेतांवर लागली आहे. अरे निसर्गा! माझे तुझ्यावर प्रेम आहे पण दुर्दैवाने तुझ्या उदरातून जन्म घेतलेला मी, साध्या जगण्याच्याही योग्यतेचा नाही. तो पहा एक चिमणा उड्या मारतोय आणि चिवचिवाट करतोय. त्या प्रत्येक उडीबरोबर त्याची पिसे विस्कटताना तो निसर्गातून शक्ती आणि आनंद शोषून घेतोय असं वाटतंय
त्यातून काय अर्थ काढायचा? काही नाही! त्याची तब्येत चांगली आहे आणि त्याला चिवचिवाट करण्याचा आणि चोचीने पिसे विस्कटण्याचा पूर्ण अधिकार आहे; पण मी आजारी आणि खंगत चाललोय, मरण्यासाठी. त्याविषयी आता बोलण्यात अर्थ नाही म्हणा! डोळ्यात पाणी आणून निसर्गाची भीक मागणे आता फारच विनोदी दिसेल. ते नकोच करायला... पण जाऊ दे ! आपण माझ्या कहाणीकडे वळू.
अगोदरच सांगितल्याप्रमाणे, माझे बालपण तसे हालातच गेले. मला ना बहीण ना भाऊ. माझे शिक्षण घरीच उरकण्यात आले. नाहीतरी माझ्या आईला काय काम होते? जर मी शाळेत गेलो असतो तर तिचा वेळ कसा गेला असता? मुले त्याचसाठी असतात असं माझे स्पष्ट म्हणणे आहे- वेळ घालविण्यासाठी. आम्ही गावात राहात असू आणि कधी कधी आम्ही मॉस्कोला जायचो. त्या काळातील पद्धतीनुसार मला सांभाळण्यास नोकर व शिकविण्यासाठी शिक्षक होते. त्यातील प्रेतासारखा पांढराफटक, कायम रडणारा एक जर्मन शिक्षक माझ्या चांगलाच लक्षात आहे. त्याचे नाव होते ‘राईशमन’. दैवाने त्याला कायमचा पांगळा करून ठेवले होते. त्याच्या सोबतीला जन्मभूमीची ओढ त्याला सतत दुःखी करीत असे. मला सांभाळणारा एक होता- हा दाईचे काम करायचा त्याचे नाव होते व्हॅसिली. त्याला एक टोपणनावही होते - ‘द् गूज’. खुरटी दाढी असलेला हा गूज एक जुनाट कोट घालून त्या गुदमरविणाऱ्या वातावरणात कायम शेकोटीच्या बाजूला बसलेला असे. ती खोली कायम आंबूस वासानी भरलेली असायची. हा वास दारू आंबविण्याच्या प्रक्रियेपासून येत असे. हा तेथे गाडीवानाबरोबर पत्ते पिसत बसायचा. गाडीवानाचे नाव होते ‘पोटॅप’. याने त्या वेळेस नवा कोरा मेंढीच्या कातड्याचा कोट विकत घेतला होता. अगदी बर्फासारखा पांढराशुभ्र. पण त्याचे बूट मात्र कोळशासारखे काळेकुट्ट होते. हे पत्ते खेळत असताना राईशमन तेथेच पलिकडे गाणे गुणगुणत असे. हे दृष्य नेहमीचेच!
माझे वडील वारल्यानंतर आम्ही मॉस्कोला हललो. मी त्यावेळी १२ वर्षाचा होतो. मला चांगलं आठवतंय. ते गेले तेव्हा रात्र होती. मेंदूत अचानक झालेल्या रक्तस्त्रावाने त्यांचा मृत्यू झाला. मी ती रात्र कधीच विसरणार नाही. इतर मुले झोपतात तसा मीही गाढ झोपलो होतो. मला आठवतंय, माझ्या त्या झोपेतसुद्धा मला जड श्वासोच्श्वासाचा आवाज ऐकू आला. तेवढ्यात कोणीतरी माझा खांदा हलवून मला जागे केले. मी डोळे उघडले तर माझ्यासमोर मला सांभाळणारा नोकर उभा होता..
“काय झालंय?” मी विचारले. “ॲलेक्सी मिखाईलचे काही खरे नाही! बहुधा त्यांची अखेरची घटका जवळ आली आहे!” मी ताडकन अंथरुणातून उठलो आणि त्यांच्या खोलीत घुसलो. मी पाहिले, माझे वडील डोके मागे टाकून खाली पडले होते. त्यांचा चेहरा वेदनेने लालबुंद झाला होता आणि त्यांच्या घशातून कसला तरी विचित्र आवाज येत होता. घाबरलेल्या चेहऱ्याने नोकर त्या खोलीच्या दरवाजातून ये जा करीत होते. कोणीतरी घोगऱ्या आवाजात विचारले, “डॉक्टरला बोलावलंय का?” बाहेर अंगणात तबेल्यातून एका घोड्याला कोणीतरी बाहेर आणले, फाटकाचा कुरकुरणारा आवाज, खोलीत तेवणारी मंद मेणबत्ती आणि तेथेच बसलेली माझी आई असे दृष्य अजून माझ्या नजरेसमोर आहे. ती उद्धवस्त झालेली असावी पण तिने तसे चेहऱ्यावर काही दिसून दिले नव्हते. ती सगळ्यांसमोर आपला आब सांभाळून होती. दुःखाचे आणि भावनांचेे प्रदर्शन तिला मान्य नव्हतेच म्हणा. वडिलांना पाहताच मी स्वतःला त्यांच्यावर झोकून दिले. त्यांना कवटाळले व हंबरडा फोडला, “ पपाऽऽ पपाऽऽ पपाऽऽऽ” ते तेथे निपचीत पडले होते आणि त्यांचे डोळे विचित्रपणे कुठेतरी टक लावून पाहात होते. मी भेदरून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. एका भयंकर भीतीने माझे ह्रदय बंद पडण्याच्या बेतात होते. मी घाबरून किंचाळलो. एखादा पकडलेला पक्षी किंचाळेल तसा. त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती की काय कोण जाणे कारण आदल्या रात्रीच त्यांनी मला प्रेमाने जवळ घेऊन माझे मुके घेतले होते, माझा चेहरा कुरवाळला होता. माझ्या केसातून बोटे फिरवताना त्यांच्या दुःखी डोळ्यात अश्रू दाटून आलेले मी पाहिले होते.
तेवढ्यात ते एका चुरगळलेल्या कपड्यातील तारवटलेल्या डोळ्याच्या माणसाला घेऊन आले. तो आत येताच व्होडकाचा वास सर्वत्र दरवळला. हा डॉक्टर होता म्हणे. या माणसाच्या शस्त्रक्रिया करण्याच्या सुरीखाली माझे वडील मेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दुःखाने वेडापिसा होत, हातात मेणबत्ती घेऊन ज्या टेबलावर त्यांचे शव ठेवले होते त्या टेबलासमोर उभा होतो. माणसांच्या जाड्या भरड्या आवाजातील भाडोत्री आक्रोश माझ्या कानावर पडला. मधेच पाद्य्राचा क्षीण आवाज त्यात खंड पाडत होता. माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. गालावरून ओघळून ते ओठावर आले आणि तेथून त्यांनी माझा अंगरखा ओलाचिंब केला. मी एकटक माझ्या वडिलांच्या निष्प्राण चेहऱ्याकडे पाहात बसलो. ते कुठल्याही क्षणी काहीतरी म्हणतील अशी मला आशा वाटत होती; माझी आई मात्र शांतपणे शांत चेहऱ्याने काहीतरी पुटपुटत होती. बहुधा कसलीतरी प्रार्थना म्हणत असावी. तिने मधेच हाताच्या बोटांनी क्रॉस केला. ते करताना तिने बोटे ठामपणे भुवयांना, खांद्याला व छातीला लावली. माझ्या डोक्यात कसलाही विचार नव्हता. सगळे शरीर जड झालंय असं वाटत होतं. मला काय होतंय हेच कळत नव्हते. त्याच वेळी मृत्यूने माझ्या डोळ्यात रोखून पाहिले आणि त्याच्या डोक्यात माझी नोंद केली असावी.
माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आम्ही मॉस्कोला घर हलवले. खरं सांगायचं तर आम्हाला हलवावे लागले कारण सगळी कर्जे फेडण्यासाठी आमच्या सगळ्या इस्टेटीचा, जमिनींचा लिलाव केला गेला. बहुतेक सगळ्या जमिनी त्यात गेल्या फक्त एक छोटीशी वाडी सोडून! याच वाडीवर मी आता माझ्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजतोय. मला विशेष अशी समज नसेल त्यावेळी, पण मला कबूल केले पाहिजे की आमचे घर विकले जात होते हे मला समजले होते आणि मला त्याचे फार दुःखही झ्ााले. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर घर गेल्याचे एवढे दुःख नव्हते पण आमची बाग गेली त्याचे दुःख मात्र तीव्र होते. त्या बागेशी माझ्या काही रम्य आठवणी जोडल्या गेल्या होत्या. याच बागेत वसंतातील एका रम्य हुरहुर लावणाऱ्या संध्याकाळी मी माझ्या एका जिवलग मित्राला पुरले होते. माझ्या कुत्र्याला. त्याचे नाव होते ट्रिक्सी. झुपकेदार शेपटीचा आणि वाकडे पंजे असलेला हा कुत्रा मला फार आवडायचा. याच बागेत उंच गवतात लपून मी चोरलेल्या सफरचंदांवर ताव मारायचो. याच बागेत रासबेरीजच्या झुडपांमधून मला आमची मोलकरीण क्लाऊडिया प्रथम दिसली. तिच्या नाकाला शेंडा नव्हता आणि तिला रुमाल ओठावर धरून खुदुखुदू हसण्याची सवय होती. पण तिला पाहताच माझ्या मनात काहीतरी झाले हे मात्र खरे. त्यानंतर ती माझ्याबरोबर असली की मला माझ्या छातीवर दडपण आल्यासारखे वाटायचे. कोणीतरी छळतंय असं वाटायचे. मूर्खपणा! पण एका स्वच्छ रविवारी जेव्हा तिच्यावर, मी मालक म्हणून, माझ्या हाताचे चुंबन घेण्याची वेळ आली तेव्हा मात्र मी गडबडलो आणि तिच्या पायावर पडून तिच्या पायाचे चुंबन घेतले. बापरे! केवढा गोंधळ झाला त्या दिवशी. किती वर्षे झाली असतील त्याला? वीस तरी निश्चित. सगळं कसं परवा परवाच घडले आहे असं वाटतंय. मी माझ्या चॉकलेटी रंगाच्या घोड्यावरून पॉपलरने वेढलेल्या रस्त्यावर रपेट मारायचो ते मला अजून आठवतंय. मी माझ्या घोड्याच्या रिकिबीत उभे राहून दोन्ही बाजूच्या झ्ााडांची पाने तोडायचो आणि स्वतःशीच खिदळायचो... आठवतंय मला.. माणूस जगत असतो तेव्हा त्याला आयुष्याची फारशी जाणीव नसते. काही अंतरावरची सुरावट जशी थोड्यावेळाने ऐकू येते तसेच त्याला ही जाणीव आयुष्य पुढे सरकल्यावर होत असावी. माझा बाग! तळ्याभोवती गर्द झाडीने वेढलेल्या माझ्या पायवाटा! धरणाच्या मोडकळीस आलेल्या भिंतीखालील माझी ती खास जागा जेथे मी मासे पकडीत असे आणि ते बर्चचे विशाल वृक्ष आणि त्यांच्या घड्याळाच्या लंबकासारख्या लोंबणाऱ्या पारंब्या. त्याच्या मागून शेतातून येणाऱ्या शेतमजुरांच्या गाण्याच्या लकेरी, त्यात खंड पाडणारा गाड्यांच्या चाकाचा खडखडाट... तुम्हा सर्वांचा मी शेवटचा निरोप घेतो. या आयुष्याचा निरोप घेताना मला फक्त तुमचाच हात सोडवत नाही.. मला फक्त एकदाच वर्मवूडचा ताजा कडवट वास घेऊ देत, माझ्या जन्मगावात उगविणाऱ्या, कापायला आलेल्या गव्हाचा गोड वास घेऊ देत; परमेश्वरा मला परत एकदा आमच्या गावातील चर्चवरील तडकलेल्या घंटेचा आवाज ऐकू देत! खालवटीतील ओकच्या झ्ााडांच्या गार सावलीत मला परत एकदा पडू दे! गवतावर उठलेल्या लहरींकडे बघत मला वाऱ्याचा माग काढू दे! फक्त एकदाच! पण हे सगळे करून मी काय मिळवणार आता? आज तरी पुढे लिहिणे मला शक्य नाही.. उद्या बघू..
मार्च २२
आज हवा गारठवणारी आहे आणि आकाशात ढगही जमा झाले आहेत.. खरं तर ही अशी उदास हवाच माझ्या सध्याच्या मनस्थितीला पूरक आहे. काल पावसाळा नसताना धो धो पाऊस पडावा तशा माझ्या भावना आणि आठवणी उचंबळून आल्या होत्या. ते काही बरोबर नाही. परत असं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. भावनांचा निचरा होणं म्हणजे जेष्ठमध चाखण्यासारखे आहे; पहिल्यांदा गोड वाटते पण मग नंतर तोंडाची चव जाते आणि जीभ खरखरीत होते. मी फक्त शांतपणे माझी कथा सांगावी हे बरं..
हंऽऽ कुठपर्यंत आलो होतो मी? हंऽऽ आम्ही मॉस्कोला हललो...
मी विचार करतोय, माझ्या आयुष्याची कथा सांगणे खरोखरीच आवश्यक आहे का? त्याची गरज आहे का? खरे उत्तर आहे, मुळीच नाही! माझ्यासारख्या फालतू माणसाचे आयुष्य इतर माणसांपेक्षा कसे वेगळे असेल? आईवडिलांचे घर, शाळा, कॉलेज, कुठल्यातरी फालतू पदावर नोकरी, निवृत्ती, दोनचार मित्रांचे व ओळखीच्या लोकांचे छोटेसे वर्तुळ, कर्मदरिद्री, सुखाच्या अत्यंत सामान्य कल्पना, सामान्य इच्छा आकांक्षा...तुम्हीच सांगा हे सगळे कोणाला माहीत नसते? सगळ्यांची हीच कहाणी आहे. पण मी माझ्या आयुष्याची कथा लिहितोय ती माझ्यासाठी. इतर कोणासाठीही नाही. आता जर माझ्या भूतकाळाने मलाच आनंद दिला नाही किंवा अस्वस्थही केले नाही तर मात्र नाईलाजाने मला म्हणावे लागेल की लोकांनी त्याकडे लक्ष न दिलेलेच बरे. पण त्याआधी माझा स्वभाव कसा होता याचे विश्लेेषण करायला लागेल. म्हणजे तुम्हाला मी नीट कळेन..
कसा होतो मी? कोणी तरी निश्चित कुचका प्रश्न विचारेलच, की कोणी विचारले आहे का रे बाबा तुला तू कसा होतास ते? मान्य आहे पण बाबांनो मी मरणार आहे. परमेश्वर साक्षी आहे की मी मरणार आहे आणि जर मी मरण्याआधी कोणाला मी कसा होतो हे जाणून घेण्याची इच्छा झाली तर ते साहजिकच आहे नाही का? अर्थात असं, मला वाटतंय.
या प्रश्नावर विचार केल्यावर मला सांगण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही की माझ्यासारखा फालतू, अतिसामान्य माणूस या जगात शोधूनही सापडणार नाही. शिवाय ज्यांच्यात काही अभिमान वाटावा असे गुण असतात अशी माणसे स्वतःची बाजू कडवटपणे मांडतात. माझ्याकडे तो प्रकारच नसल्यामुळे बाजू मांडायचा प्रश्नच नाही. अर्थात ते कसे, हे मी उद्या तुम्हाला पटवून देईन कारण आत्ता ते शक्य नाही. मला ढास लागली आहे आणि माझी म्हातारी परिचारिका, तारन्तिव्हा मला आता काही करू देणार नाही. तिची आता सारखी बडबड चालू होईल,“जरा पडून रहा मालक! चहा पाहिजे आहे का तुम्हाला? प्या थोडासा तरी! म्हणजे बरं वाटेल तुम्हाला!”.. आता ती चहाचा आग्रह का करते आहे हे मला चांगले माहीत आहे. तिला चहा प्यायचा आहे म्हणून. पण जाऊ देत आता शेवटी त्या म्हातारीला जर तिच्या मालकामुळे काहीतरी फायदा होत असेल तर... होऊ देत. काही काळानंतर तोही होणार नाही..
मार्च २३
परत हिवाळा. बर्फाचे कण आता मोठ्या आकाराचे झालेत.
सामान्य, अहंऽऽ अतिसामान्य हाच शब्द योग्य आहे. जसा मी माझ्याबद्दल जास्त खोलात जाऊन विचार करतो, माझ्या पूर्वायुष्यावर नजर टाकतो तसंतसं मला सामान्य या शब्दाचा खरा अर्थ कळत जातो. माझे पूर्वायुष्य म्हणजे त्या शब्दाला न्याय दिल्यासारखेच आहे. सामान्य किंवा अतिसामान्य. ‘अति’ म्हणजे जास्त. हा शब्दसुद्धा माझ्याबाबतीत उच्चारायचा नसेल तर सामान्य हाच शब्द ठीक आहे. माणसे दुष्ट असतात, चांगली असतात, हुशार असतात, मूर्ख असतात, त्यांच्याशी मतभिन्नता असू शकते किंवा तुमची मते त्यांच्या मतांशी जुळूही शकतात पण सामान्य, अतिसामान्य, फालतू... नको! मी काय म्हणतोय ते समजून घ्या. इतर माणसांशिवाय जग चालेल कदाचित पण ‘निरुपयोगी’ हे त्यांचे विशेषण नसते. जेव्हा त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करता तेव्हा प्रथम ‘‘सामान्य” “फालतू” हा विचार तुमच्या मनात येत नाही आणि त्यामुळे तुमच्या ओठावरही येत नाहीत. पण माझ्याबाबतीत तुम्ही दुसरं काहीही म्हणू शकत नाही. सामान्य किंवा अतिसामान्य किंवा फालतू बस्स! परमेश्वरानेही मला बहुधा विचार न करताच जन्माला घातले असावे म्हणून कदाचित मला त्याने अशी वागणूक दिली असावी. एखादा नको असलेला पाहुणा जगात अवतरावा तशी. असो. आता मी कुठलीही कटुता न बाळगता माझ्याविषयी सांगतोय.‘मी आता भूतकाळात जमा झालोय!’ माझ्या पूर्वायुष्यात प्रत्येक वेळी कोणी ना कोणीतरी माझी जागा बळकावली आहे पण याला कारणीभूत मीच होतो. मीच चुकीची जागा घेण्याचा प्रयत्न चुकीच्या दिशेने करीत होतेो. मी संशयी स्वभावाचा होतो, आतल्या गाठीचा, पांगळ्या माणसांसारखा चिणका होतो. मी सदैव कुरकुर करीत असे; ‘‘शिवाय उथळ पाण्याला खळखळाट फार’’ या उक्तिनुसार माझे वागणे असे. माझे विचार आणि त्याच्या मागच्या भावना यात एक पार न करता येणारी रुंद दरी असायची आणि जेव्हा जेव्हा मी हिंमत धरुन ही दरी पार करण्याचा प्रयत्न करीत असे तेव्हा तेव्हा माझ्या मनात चाललेल्या संघर्षामुळे माझ्या चेहऱ्यावर वेदना उमटत. एवढेच नव्हे तर माझे व्यक्तिमत्वच त्यावेळी त्या असह्य ताणास बळी पडायचे. त्यावेळेस मी अमानवी वाटतो असं लोक म्हणतात पण खरं सांगायचे तर त्यावेळेस मी कुठल्यातरी अनैसर्गिक शक्तीच्या कह्यात जायचो. मला स्वतःला त्याची जाणीव आहे. त्या विचित्र भावनांची जाणीव होण्यास जेव्हा सुरुवात होत असे तेव्हा मी निकराचा प्रयत्न करून परत सामान्य स्थितीत येण्याचा प्रयत्न करीत असे. (‘त्या’ अर्थाने सामान्य नाही. तो तर मी होतोच.) मग माझ्या मनात प्रचंड गोंगाट उठायचा. त्याने मी हडबडून जायचो. या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा मी खूप प्रयत्न केला. मनातल्या मनात मी माझ्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या केल्या आणि उत्तर सापडेल म्हणून त्याचा प्रत्येक धागा उलगडून पाहिला. त्याचा कीस पाडला. मी माझी स्वतःची तुलना इतर लोकांशी करून पाहिली; ज्या ज्या माणसांना मी भेटत असे किंवा ज्यांच्याशी मला ओळख करून घ्यावीशी वाटे त्यांचे वागणे बोलणे, हसणे याचा मी अभ्यास करू लागलो. प्रत्येक गोष्टीच्या वाईट बाजूची मी चिकित्सा करू लागलो आणि माझ्या हेतूवर खुनशीपणे विकटपणे हसलो. इतर जणांसारखे होण्याचा हेतू मी मनात धरला होता. मग अचानक हसत असताना मी खजील व्हायचो आणि शांत व्हायचो पण थोड्याच वेळात ते सगळे परत सुरु व्हायचे. अशारितीने मी एखाद्या चक्रात अडकलेल्या खारीप्रमाणे भेदरून सैरभैर व्हायचो. हा अत्याचार मग दिवसभर चालायचा. मग सांगा बरे हा असला माणूस कोणाच्या उपयोगी पडणार? हे माझ्या बाबतीतच का घडत होते आणि यामागचे कारण काय होते? काय माहीत आणि कोण सांगणार !
मला आठवतंय एक दिवस मी माझ्या बग्गीने कुठल्यातरी कामासाठी मॉस्कोच्या बाहेर पडत होतो. मनात नेहमीप्रमाणे विचार चालू असल्यामुळे गाडी हाकताना मला बराच प्रयत्न करावा लागत होता. शेवटी मी लगाम गाडीवानाच्या ताब्यात दिले. रस्ता चांगला होता पण का कोणास ठावूक गाडीवानाने गाडीला पाचवा घोडा जोडला होता. या पाचव्या घोड्याचे हाल कुत्रा खात नाही. याला एका विचित्र चालीने पळावे लागते. याची शेपूट मागच्या घोड्याच्या दोरीला घासते त्यामुळे तो सारखा दचकत पळतो. खरे तर हा घोडा गाडीला आवश्यकच नव्हता. मला या घोड्यांची नेहमीच कीव येते. मी त्या गाडीवानाला म्हटले, “रस्ता चांगला आहे, चढ नाही मग या घोड्याला कशाला जुंपलाय?” तो काही क्षण गप्प राहिला. त्याने दोन तीन वेळा मान हलविली आणि समोरच्या घोड्यावर पाच सहा वेळा चाबुक ओढला आणि गंभीरपणे म्हणाला,
“मालक, तो आपला जुंपला गेलाय. नाहीतरी त्याचा काहीच उपयोग नाही..” मीही असाच जुंपला गेलोय...
सामान्य.. अतिसामान्य. माझ्या या मताला न्याय देण्याचे मी कबूल केले आहे आणि मी ते वचन पूरे करेनच. आता सगळे अगदी बारकाव्यासकट सांगण्याची काही गरज नाही म्हणा. दररोज घडणारे प्रसंग सांगण्याची मला गरज वाटत नाही. पण विचार करणाऱ्या माणसाला, हे प्रसंग निर्विवादपणे माझेच मत योग्य आहे असे सांगतील याची मला खात्री आहे; पण सरळ महत्वाच्या घटनेपासून करावी हे बरं.. ते सांगितल्यावर सामान्य या शब्दाचा अर्थही तुम्हाला कळेल. परत एकदा सांगतो मला हे सगळे सविस्तर मुळीच सांगायचे नाही परंतु काही प्रसंग सांगायलाच हवेत उदा. जेव्हा जेव्हा मी मित्रांना भेटण्यासाठी जात असे तेव्हा माझे मित्र मला कसे वागवीत त्याबद्दल. मलाही मित्र होते बरं का! मी तेथे गेल्यावर ते अस्वस्थ व्हायचे. जेव्हा ते मला भेटण्यास पुढे येत तेव्हा कुत्सितपणे हसत असा मला भास होई. तसे नसेलही पण ते हसणे निरागस नसायचे एवढे मात्र मी ठामपणे सांगू शकतो. ते माझ्या डोळ्यात पाहात नसत ना माझ्या पायाकडे. ते माझ्या गालाकडे पाहात आणि घाईघाईने विचारत, ’‘ठीक आहेस ना चुल्काटुरीन! आणि पटकन बाजूला होत आणि माझे तोंड चुकवत. काही जण तर कुठल्यातरी गहन विचारात गढून गेल्यासारखा चेहरा करून बाजूलाच उभे राहात. मी हे सगळे बघत होतो. कारण मी कितीही मूर्ख असलो तरीही देवाने मला चांगले डोळे आणि निरीक्षणशक्ती दिली आहे आणि मी दिसतो तेवढा मूर्ख नाही. माझ्याही डोक्यात कधी कधी अचाट कल्पना येतात पण मी अत्यंत ‘ढ’ माणूस असल्यामुळे ते विचार बोलून दाखविण्यास घाबरतो कारण मला खात्री असते की मी ते नीट मांडूच शकणार नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटते की काही लोक इतक्या मनमोकळ्या मनाने, आत्मविश्वासाने आपली मते किंवा विचार इतरांसमोर कसे मांडू शकतात... ‘अवघड आहे मग..’ तुम्ही विचार कराल. पण जरी मी ‘ढ ’असलो तरी माझी जिभही बऱ्याच वेळा वळवळ करते आणि माझ्या तरूणपणी मी मनात येईल ते बोलत असे पण नंतर नंतर जसा मी मोठा होत गेलेो तसा मी जिभेवर ताबा ठेवू लागलो. मी स्वतःला सांगत असे, “जरा गप्प बसशील तर बरे होईल.’’ आणि मग मी गप्प बसत असे. आपण सगळेच पाहिजे तेव्हा गप्प बसू शकतो आणि मला वाटते स्त्रियांमधे हा गुण विशेष आढळतो. पण तो मुद्दा नाही आणि मी येथे लोकांवर टीका करणार नाही. मी आपलं माझी रोजनिशी लिहावी हे बरं...
अनुवाद : जयंत कुलकर्णी.९/११/२०२२
प्रतिक्रिया
9 Nov 2022 - 6:22 pm | कर्नलतपस्वी
अनुवाद छान केलाय.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
10 Nov 2022 - 5:57 pm | प्रचेतस
सहजसुंदर, ओघवता अनुवाद.
रशियन जीवनाचे चित्रण सुरेख चितारले गेले आहे. लहानपणी काही रशियन कादंबऱ्यांचे अनुवाद वाचलेले आठवतात पण त्यांचे लेखक आणि कथानकं आता अजिबात आठवत नाहीत.
11 Nov 2022 - 5:13 pm | नजदीककुमार जवळकर
12 Nov 2022 - 9:18 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान. पुभाप्र.
17 Nov 2022 - 2:52 pm | श्वेता व्यास
वाह! काहीतरी छान वाचायला मिळणार नक्कीच!