(१०, ००, ००,००, ००, ००,०००) : अबब आणि अरेरे !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
17 Oct 2022 - 6:21 pm

मिपाच्या तांत्रिक पुनरुज्जीवनादरम्यान माझा हा पूर्वप्रकाशित लेख उडाला आहे. प्रशासकांच्या सूचनेनुसार तो पुन्हा प्रकाशित करतोय.
...................................................................................

मागच्या महिन्यातल्या एका रविवारच्या संध्याकाळी धोधो पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातच अडकून पडलो होतो. आंतरजालावर पुरेसे बागडून कंटाळा आला होता. मग वेळ घालवायचा म्हणून छापील इंग्लिश वृत्तपत्राची साप्ताहिक पुरवणी बारकाईने पाहू लागलो. त्यातला एक लेख दुबईबद्दल होता. त्या शहराची अनेकविध वैशिष्टे सांगितल्यावर तिथल्या एका संग्रहालयाचा त्यात उल्लेख होता. त्यामध्ये सर्व देशांच्या आतापर्यंत छापल्या गेलेल्या चलनी नोटांचे प्रदर्शन आहे. त्यात जगभरातील जवळजवळ सर्व नोटा असून ‘त्या’ जगप्रसिद्ध १००ट्रिलियन झिंबाब्वे डॉलर किमतीच्या नोटेचाही समावेश आहे. हे वाचून स्तिमित झालो. कित्येक दिवसांनी एवढी मोठी संख्या ऐकली होती. आपल्या नेहमीच्या आर्थिक व्यवहारात दशलक्षच्या पुढे मोजायची वेळच येत नाही ! अगदी भारतीय लोकसंख्येबाबत बोलताना सुद्धा (दीड) अब्ज ही मर्यादा असते. हा अंक तर त्याच्याही पुढे पळत होता. मग गंमत म्हणून ही मोठी संख्या कागदावर लिहून काढली :

१०, ००, ००,००, ००, ००,०००
मराठी अंकमोजणीनुसार या संख्येला दशपद्म म्हणतात (चढती अंकमोजणी अशी : अब्ज, दशअब्ज , खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म.).

ok
आतापर्यंत मी पाहिलेली भारताची सर्वाधिक मूल्याची नोट २,००० रु. ची. माझ्या लहानपणी मी दहा हजार रुपयांची नोट असल्याचे ऐकले होते पण नंतर १९७८मध्ये ती रद्द झाल्याने बघायला काही मिळाली नव्हती. अर्थशास्त्राचा माझा काही अभ्यास नाही. परंतु वरची झिम्बाब्वेची महाकाय रकमेची नोट त्या देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्याचे सुचवते इतपत समजले. मग या विषयावरील कुतूहल चाळवले गेले. आर्थिक मागास देशांच्या चलनी इतिहासावर एक धावती नजर टाकली. तेव्हा लक्षात आले की वरील दशपद्मच्या झिम्बाब्वेच्या नोटेने चलनांच्या अवमूल्यन इतिहासात एक विक्रम घडवलेला आहे !

बरं, जेव्हा ती नोट वापरात होती तेव्हा तिचे बाजारमूल्य तरी काय असावे ? एखाद्याला वाटेल की त्या एका नोटेत एखादी लहानशी कार किंवा गेला बाजार, एखादी स्कूटर तरी येत असेल. पण छे ! तेवढ्या रकमेत जेमतेम ब्रेडचे एक पुडके किंवा सार्वजनिक बसचे शहरांतर्गत प्रवासाचे एक तिकीट येत होते !!
...
आता झिम्बाब्वेच्या 1980 ते 2009 पर्यंतच्या चलन इतिहासावर एक नजर टाकू. 1980मध्ये तिथे पूर्वीचा ह्रोडेशियन डॉलर रद्द करून त्या जागी झिंबाब्वे डॉलर (ZWD) हे चलन अस्तित्वात आले. तेव्हा त्याचे अमेरिकी डॉलरशी १:१ असे समकक्ष नाते होते. सन 2000 पर्यंत हे चलन ठीक चालले. परंतु त्यानंतर मात्र तिथे प्रचंड चलनफुगवटा (hyperinflation) होत गेला. परिणामी त्यांच्या चलनाचे नीचांकी अवमूल्यन झाले. २००६-०९ च्या दरम्यान त्या चलनाचे तीनदा पुनर्मूल्यांकन केले गेले. तेव्हाच वर उल्लेखलेली दशपद्म ZWD ची नोट छापली गेली. अखेर एप्रिल 2009 मध्ये त्यांचे हे चलन पूर्णपणे रद्द करण्यात आले. त्यानंतरचा चलन इतिहास लेखाच्या कक्षेबाहेर आहे.

ही सर्व माहिती संदर्भातून वाचता वाचताच मला पूर्वायुष्यातील एक प्रसंग आठवला- साधारण 2007 चा. तेव्हा माझे वास्तव्य परदेशात होते. तिथल्या आमच्या रुग्णालयात ८५ देशांचे डॉक्टर्स एकत्र काम करीत होते. त्यातले एकजण झिम्बाब्वेचे नागरिक होते. परंतु गेली 20 वर्षे ते अन्य देशांतच स्थिरावले होते. एकदा असेच आम्ही काहीजण चहापानासाठी एकत्र बसलो होतो. गप्पा मारताना गाडी विविध देशांच्या चलनाच्या विनिमय दरावर आली. मग प्रत्येक जण आपापल्या देशाच्या चलनाचा अमेरिकी डॉलरशी विनिमय दर सांगत होता. शेवटी या झिम्बावेच्या डॉक्टरांची पाळी आली. प्रथम ते कसेनुसे हसले. एखादा नापास विद्यार्थी जसे आपले गुण सांगायला अनुत्सुक असतो तसा त्यांचा चेहरा भासला. मग ते म्हणाले,


“मी जर माझी बचत झिंबाब्वे डॉलर्समध्ये रूपांतरित केली तर मला अक्षरशः पोतंभर पैसे मिळतील ! पण उपयोग काय त्या पैशांचा ? ते सगळं अवमूल्यित चलन आहे. तेव्हा मी तो नाद सोडला आहे. मी आता माझी सर्व बचत अमेरिकी डॉलर्समध्येच बँकेत ठेवतो”.

आज दशपद्मच्या नोटेसंबंधी वाचल्यावर मला त्यांच्या तेव्हाच्या उद्गारांचा खरा अर्थ समजला.

जेव्हा या मोठ्या चलनाच्या नोटा छापायची वेळ सरकारवर आली तेव्हाची झिम्बाब्वेची अवस्था दारूण झालेली होती. तिथल्या मध्यवर्ती बँकेला ज्या कागदावर चलन छापायचे तो कागद देखील परवडत नव्हता दुकानदार एकाच दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दुप्पट करून टाकत. लोकांना खरेदीला जाताना या नोटा अक्षरशः टोपलीत भरून नव्या लागत. ! राष्ट्राध्यक्षांनी विविध वटहुकूम काढून किमती नियंत्रणात ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

ok
अशा प्रकारे नागरिकांमधील असंतोष शिगेला पोहोचला होता. विविध निषेधाचे फलक हातांत घेऊन लोकांचे देशभर मोर्चे निघायचे. त्यातला एक फलक लक्ष्यवेधी होता :

आम्ही अब्जाधीश भिकारी आहोत”

ok
2009 मध्ये या चलनाचा अमेरिकेशी अमेरिकी डॉलरची असलेला विनिमय दर हास्यास्पद पातळीवर उतरला होता:

१अमेरिकी डॉलर = (३४ अंकी संख्या) ZWD.

या सर्व कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीचा शेवट हे चलन रद्द करण्यात झाला. त्यानंतर तिथे अमेरिकी डॉलर आणि दक्षिण आफ्रिकी रँड ही चलने मुख्यत्वे वापरात आली.

झिंबाब्वे डॉलर्सचे निश्चलनीकरण पूर्ण झाल्यानंतर देशभर साठलेल्या त्या नोटांना पाय फुटले. अनेक बँकर्स व दलालांनी त्या परदेशातील आपल्या ओळखीच्या व्यक्तींना देऊन टाकल्या. आता वस्तुसंग्राहक जमातीचे या नोटांकडे लक्ष गेले नसते तरच नवल ! अशा शौकिनांकडून या बाद झालेल्या नोटांना मागणी येऊ लागली. मग त्या नोटा पुरवणारे देखील हुशार झाले. शालेय विद्यार्थ्यांपासून ते मुरलेल्या दलालांपर्यंत अनेकांनी या नोटा चढत्या भावाने विकण्यास सुरुवात केली. १-२ अमेरिकी डॉलरला ती नोट घेऊन विविध देशांमध्ये जास्तीत जास्त रकमेला विकण्याची चढाओढ सुरू झाली. इंग्लंडमधील एका पिता-पुत्रांनी याचा जोरदार धंदा केला आणि अल्पावधीतच त्यांनी त्यातून तब्बल १५००% टक्के नफा कमावला. तर काही गुंतवणूक सल्लागारांनी त्‍यांच्‍या अशिलांना ही नोट दाखवून चलनाचे अवमूल्यन म्हणजे काय ते समजावून दिले आणि योग्य त्या गुंतवणुकीचे महत्त्व पटवले.

जगातील काही संग्रहालयांनी देखील ही ऐतिहासिक नोट जतन केलेली आहे. सध्या ही नोट काही इ-विक्री संस्थळांवर उपलब्ध आहे. ‘ॲमेझॉन’ वर ही एक नोट US $200 ला विक्रीस ठेवलेली आहे.
....
या ऐतिहासिक चलनाचा एक मजेशीर उपयोग अमेरिकेत केला जातो. तिथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विचित्र आणि विनोदी संशोधनासाठी ‘अज्ञान नोबेल पुरस्कार’ दिले जातात . त्यातील विविध विजेत्यांना १ दशखर्व झिंबाब्वे डॉलर्सची नोट समारंभपूर्वक भेट दिली जाते. २००९चे अंकगणिताचे अज्ञान नोबेल पारितोषिक तर चक्क झिम्बाब्वेच्या रिझर्व बँकेचे तत्कालीन गव्हर्नर Gideon Gono यांना देण्यात आले.


त्यांनी केलेल्या नीचांकी अवमूल्यनामुळे सामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारात महाप्रचंड अंकांशी खेळण्याची संधी सहज मिळाली”.

असे मानपत्र देऊन गौरव समितीने त्यांचा सत्कार केला !!
Gono यांनी त्यांच्या या ‘संशोधनाची’ कारणमीमांसा करणारे हे पुस्तक लिहीले आहे :
Zimbabwe’s Casino Economy — Extraordinary Measures for Extraordinary Challenges.
दारूण अर्थव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या झिम्बाब्वेच्या ऐतिहासिक चलनाची अशी ही कहाणी.
…..
अशा प्रकारचे चलनाचे तीव्र अवमूल्यन जगातील अन्य काही देशांनी देखील अनुभवलेले आहे. भयानक दुष्काळ, युद्ध किंवा अन्य काही मोठ्या आपत्तीच्या प्रसंगी एखादे राष्ट्र कर्जबाजारी होऊन बसते आणि त्याचे अक्षरशः कंबरडे मोडते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीची अवस्था बिकट झालेली होती. १९२२-२३ च्या दरम्यान तिथे तीव्र चलनफुगवटा झालेला होता. तेव्हा १ अब्ज मार्कची नोट त्यांनी काढली होती. त्या काळातील ‘अबब आणि अरेरे’ वाटणारी प्रकाशचित्रे इथे पाहता येतील:
https://mashable.com/feature/german-hyperinflation
त्यापैकी एक चित्र भेदक आहे. एका दुकानदाराने लावलेली “अन्नाच्याच बदल्यात विक्री व दुरुस्ती” ही पाटी दारूण परीस्थितीची जाणीव करून देते.
.................................................................................................
१. मराठी अंकमोजणी संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4...
२. चित्रे जालावरून साभार !

समाजलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Oct 2022 - 6:49 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

कुमार१'s picture

17 Oct 2022 - 8:16 pm | कुमार१

बहुतेक देशांमध्ये आता चलन मापनाची दशमान पद्धत आहे (दहाच्या पटीतील नाते). परंतु आधुनिक वजनमापे आणि इलेक्ट्रॉनिक प्रगती होण्यापूर्वी अनेक देशांमध्ये बिगर दशमान पद्धतीची पारंपरिक चलने होती. त्या पद्धतीमध्ये तत्कालीन जीवनात अनेक प्रसंगी विशिष्ट प्रकारचे ‘वाटे’ करण्यासाठी फायदा होत होता. याची दोन उदाहरणे पाहू :

१. विकीवर दक्षिण जर्मनीतील एक उदाहरण दिले आहे. त्या चलनात
६० उपचलने = १ चलन असे नाते होते.
६० अंकाचा फायदा असा की त्याला दहा प्रकारच्या अंकांनी भागले जाते
( 2,3,4,……..30).
https://en.wikipedia.org/wiki/Denomination_(currency)

२. भारतात प्रथम ४ पैसे =१ आणा,
१६ आणे = १ रु. = ६४ पैसे

व नंतर :
६ पैसे =१ आणा,
१६ आणे = १ रु. = ९६ पैसे असे होते.

६४ ला ८ ने भाग जातो. तर
९६ ला ३ व ८ ने भाग जातो. याचा काही फायदा ठराविक व्यापारात होत होता असे अन्यत्र वाचनात आले. (अर्थात १० ने भाग जात नाही हा तोटा असावा).

कुमार१'s picture

20 Oct 2022 - 8:59 am | कुमार१

1.जगातील बहुतेक देशांमध्ये त्यांचे:

१ मूलभूत मोठे चलन = 100 छोटी मूलभूत उपचलने असे गणित आहे
(उदाहरणार्थ, एक रुपया बरोबर शंभर पैसे )

परंतु,
इराक, कुवेत, लिबिया, ओमान आणि ट्युनिशिया या मोजक्या देशांमध्ये :

१ मूलभूत मोठे चलन = 1000 छोटी उपचलने असे नाते ठेवलेले आहे.

2. जपानच्या येन या चलनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दोन प्रकारचे उपविभाग आहेत :

Sen = 1/100 of the yen
Rin = 1/1,000 of the yen

या बाबतीत काही प्रश्न नेहमी मनात येतात
अमेरिकेतील मिपाकर काही उजेड टाकू शकतील का ?

- युनाइटेड स्टेट्स मध्ये चलनासाठी दशमान पद्धत आहे ( ती केव्हा आली ? कि अगदी आधीपासून आहे ) त्याआधी काय होते
- चलनासाठी दशमान पद्धत आहे पण मग वजनासाठी आणि अंतरासाठी अजून जुनी पद्धत कशी ? ग्राम - किलो / मिलीमीटर - कि मी अशी दशमान का नाही केली ?
- इंग्लड मधून स्थलान्तर सुरवातीला झाले तेवहा तेथील उजव्या बाजूने गाडीचा चालक असणे हे जर होते तर ते डाव्या बाजूने असे युनाइटेड स्टेट्स मध्ये कसे काय झाले ?

साधारण ब्रिटिश जिथे राज्यकर्ते होते तिथे उजव्या बाजूने गाडीचा चालक आहे ( भारत / मलेशिया / सिंगापोर, ऑस्ट्रेल्या , न्यू झीलंड इत्यादी ) म्हणून हा प्रश्न

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 10:51 am | कुमार१

२.
ब्रिटिश पद्धतीनुसार चारचाकी वाहने रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात ( व चालकाचे आसन उजवीकडे) तर अमेरिकी पद्धतीनुसार याच्या बरोबर उलटे का?

विषय बराच घोळदार आहे. मी रीडर्स डायजेस्ट (https://www.rd.com/article/why-drive-on-different-sides-of-the-road/#:~:....) आणि विकिपीडिया हे दोन संदर्भ पाहिले. त्यातून मिळालेली काही माहिती देतो. सर्वच माहितीसाठी पुरावा नाही; काही मिथकेही असू शकतात.

१. ब्रिटिशांची मूळ डावीकडून चालायच्या पद्धतीचा उगम घोडेस्वारीपासून आहे. घोड्यावर चढतांना डावीकडून चढतात आणि बहुसंख्य जनता उजवीखोरी असल्याने चाबूक उजव्या हातात घेते.
२. परंतु फ्रान्सचा सम्राट नेपोलियन डावखोरा असल्याने तिथे बरोबर उलट पद्धत चालू झाली.
वरील २ पद्धतींचे अनुकरण ज्या त्या वसाहतींत झाले.

आता अमेरिका :
१९०८ मध्ये फोर्ड यांनी कारचे जे पहिले मॉडेल तयार केले त्यात चालकाचे आसन उजवीकडे होते. का??
माहित नाही !
( ऐकीव माहिती : प्रत्येक सवय/यंत्रणा ही ब्रिटीश-विरोधी करायची. जसे की, विद्युत बटणे, कॉफी हे राष्ट्रीय पेय, इ.).
परंतु अमेरिकेतल्या “विशिष्ट सेवा वाहनांचे” आसन उजव्या बाजूस आहे !

… कोणती पद्धत अधिक सुरक्षित यावर मतभेद आहेत.

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 10:53 am | कुमार१

मॉडेल तयार केले त्यात चालकाचे आसन उजवीकडे >>> डावीकडे असे वाचावे.

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 9:39 am | कुमार१

प्रश्न चांगले आहेत. टप्प्याने घेतो.

१. अमेरिका मेट्रिक पद्धत का वापरत नाही ?
या संदर्भात इथे असे दिले आहे :
अगदी सुरुवातीस ते ब्रिटिश शाही पद्धतच (IS) वापरत होते. त्यानुसार त्यांच्या उद्योगांमधील यंत्रे व उत्पादने या पद्धतीनुसार घडवलेली होती. तसेच कामगारांच्याही ती मोजणी पद्धत अंगवळणी पडलेली होती.

जेव्हा जेव्हा संसदेत मेट्रिक पद्धत अनुसरण्याचा विषय आला तेव्हा मोठ्या उद्योगपतीनी आणि काही अंशी नागरिकांनीही त्याला सक्त विरोध केला.
अमेरिका हा जगाचे अनुकरण करणारा देश नसून स्वतः नेतृत्व करणारा आहे हेही ठसवणे हा त्यामागे हेतू होता !

अलीकडे तिथे 'मिश्र' पद्धत वापरात आहे.

पण मग चलनात दशमान कशी काय आली? कदाचित सर्व यंत्रे बदलण्यापेक्षा चलन पद्धती बदलणे त्यातल्या त्यात सोप्पे असावे बहुतेक !
असो

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 11:44 am | कुमार१

खरंय !
….
वर उल्लेख केलेल्या फक्त पाच देशांनी त्यांच्या चलन व उपचलनाचे नाते 1000 : 1 असे का ठेवले आहे, हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता.
जालावर स्पष्टीकरण मिळाले नाही म्हणून एका अर्थतज्ञांशी संदेश संपर्क साधला. त्यांचे एका वाक्यात उत्तर आले:

"यातील बराचसा भाग सोय व सवयीचा आहे".

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 11:44 am | कुमार१

खरंय !
….
वर उल्लेख केलेल्या फक्त पाच देशांनी त्यांच्या चलन व उपचलनाचे नाते 1000 : 1 असे का ठेवले आहे, हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता.
जालावर स्पष्टीकरण मिळाले नाही म्हणून एका अर्थतज्ञांशी संदेश संपर्क साधला. त्यांचे एका वाक्यात उत्तर आले:

"यातील बराचसा भाग सोय व सवयीचा आहे".

पण मग चलनात दशमान कशी काय आली? कदाचित सर्व यंत्रे बदलण्यापेक्षा चलन पद्धती बदलणे त्यातल्या त्यात सोप्पे असावे बहुतेक !
असो

कुमार१'s picture

21 Oct 2022 - 2:11 pm | कुमार१

मोठे अंक लिहिण्याच्या भिन्न पद्धती :

१०, ००, ००,००, ००, ००,००० (भारतीय)
१००, ०००,०००, ०००,००० (अमेरिकी)

अंकांच्या मध्ये जे स्वल्पविराम आहेत त्यांना delimiter म्हणतात.

भारतीय पद्धतीत स्वल्पविराम : उजवीकडून पहिला स्वल्पविराम तिसऱ्या अंकानंतर अन मग पुढचे दर दुसऱ्या अंकानंतर.

अमेरिकी पद्धतीत स्वल्पविराम : उजवीकडून प्रत्येक स्वल्पविराम तिसऱ्या अंकानंतर.

कुमार१'s picture

23 Oct 2022 - 11:13 am | कुमार१

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी युएस डॉलर, युरो आणि येन या चलनांना पसंती असते.

2009 मध्ये रशिया व चीन यांनी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चलन असावे अशी मागणी केलेली आहे.
2016 पासून चीनचे renminbi हे चलन वरील चलनांच्या पंक्तीत जाऊन बसलेले आहे. परंतु अजूनही ते पूर्णपणे जागतिक नाही.

डॉलर क्र. १ चे जागतिक चलन का झाले वगैरेचा इतिहास इथे थोडक्यात चांगला दिला आहे

कुमार१'s picture

26 Oct 2022 - 7:10 pm | कुमार१

भारताचे 1942 चे दुर्मिळ नाणे
किंमत तीन लाख रुपये !

कुमार१'s picture

23 Nov 2022 - 7:49 pm | कुमार१

पाकिस्तान, तुर्कीये, इजिप्त, रोमानिया हे देश चलन अवमूल्यनाच्या आणीबाणीत..

कुमार१'s picture

27 Dec 2022 - 9:09 am | कुमार१

गेल्या काही दिवसातील एक लक्षवेधी बातमी

आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकी डॉलरवर बऱ्याच देशांची भिस्त आहे.
परंतु आता अनेक देश आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरला पर्याय म्हणून वेगळ्या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत आहेत.

यामध्ये अर्थातच रशिया व चीन आघाडीवर आहेत. पण त्याचबरोबर भारत, बांगलादेश, कजाकस्तान, लाओस आणि अन्य आशियाई देशही तसा विचार करीत आहेत.