मुख्यमंत्रिपदावरून विलासराव देशमुख आज जाणार, उद्या जाणार अशा अटकळी बांधल्या जात होत्या. बंडखोर नारायण राणेही गुडघ्याला बाशिंग बांधून होते. दिल्ली वाऱ्या, पक्षश्रेष्ठींचे "मतपरिवर्तन', विलासरावांवर यथेच्छ टीका अशी सर्व कारस्थाने राणे करीत होते; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची काही विलासरावांना अंतर देण्यास तयार नव्हती. विलासी "मुद्रे'ची तिला भुरळ पडली होती. अशातच 26 नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. हा काही मुंबईतील पहिला हल्ला नव्हता; परंतु या वेळी दहशतवाद्यांनी पंचतारांकित जीवनाला लक्ष्य केले होते. त्यामुळे यापूर्वी झालेल्या बॉंबस्फोटांपेक्षा ही घटना समाजमनावर अधिक तीव्रतेने आदळली. या हल्ल्यात काही परदेशी नागरिकही बळी गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर हल्ल्याची दखल घेतली गेली.
भारतीय राजकारणात कोणतीच उलथापालथ झालेली नव्हती. काही दिवसांनी हल्ल्याच्या नैतिक जबाबदारीबाबत चर्चा प्रसारमाध्यमांत सुरू झाली. शिवराज पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही जबाबदारी वाढली होती. मात्र, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे सांगून टाकले. याचा अप्रत्यक्षपणे विलासरावांना लाभच झाला. राज्याचा गृहमंत्रीच हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाही म्हटल्यावर मुख्यमंत्री तरी कसा राजीनामा देणार? कॉंग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही विलासरावांना हटविण्यास इच्छुक नसल्याने त्यांची खुर्ची शाबूत होती.
असे असतानाही विलासराव देशमुख यांना दुर्बुद्धी सुचली. राजशिष्टाचाराला फाटा देऊन ते आपला मुलगा अभिनेता रितेश आणि चित्रपट निर्माता रामगोपाल वर्मा यांना घेऊन ताज हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेले. खासगी प्रसारमाध्यमे बरोबर नाहीत म्हणून सरकारी प्रसिद्धी यंत्रणा त्यांनी बरोबर नेली आणि स्वतःवर आफत ओढवून घेतली. रितेश, रामगोपाल वर्माबरोबर विलासराव असे "फूटेज' वृत्तवाहिन्यांना देऊन प्रसिद्धी यंत्रणेने त्यांचे "काम' करून टाकले होते. मुलाला बरोबर नेऊन त्याचा हट्ट विलासरावांनी पुरवला खरा; पण मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मात्र ते गमावून बसले. विरोधकांच्या कारस्थानांचे धारदार घाव बसले असतानाही त्यांचे पद कायम राहिले; पण मुलाच्या हट्टाचा एक किरकोळ "घाव' त्यांची खुर्ची घालविण्यास कारणीभूत ठरला.
अल्वांचे बंड
सत्ता किंवा अधिकारपदाची चटक लागली, की ती सुटत नाही. आपल्याला नाही, तर आपल्या मुलाला तरी एखादे पद मिळावे, अशी स्वार्थी राजकारण्यांची इच्छा असते. मार्गारेट अल्वाही त्याच रांगेतील आहेत. त्या कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस होत्या. महाराष्ट्राचे प्रभारीपदही त्यांच्याकडे होते. आपला मुलगा निवेदित याला कर्नाटक विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या; परंतु स्थानिक राजकारणात त्यांनी अनेक शत्रू निर्माण केले आहेत. अल्वांकडे पक्षाचे सरचिटणीसपद असतानाही कर्नाटकात त्यांचे राजकीय शत्रूच प्रभावी ठरले. त्यांनी निवेदित यांना तिकीट नाकारले. यामुळे अल्वा संतापल्या. "कॉंग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकिटे वाटण्यात येतात,' असा आरोप त्यांनी केला होता. अल्वांच्या या आरोपाची दखल केंद्रीय पातळीवर घेण्यात आली. मात्र, कारवाई होण्याआधीच त्या राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडल्या. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या निमंत्रक (1972) म्हणून मार्गारेट अल्वा यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. अनेक मंत्रिपदे त्यांनी भूषविली; पण पुत्रप्रेम शेवटी त्यांना भोवलेच.
व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा
देशाचे माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह हेदेखील मुलाच्या कर्तृत्वामुळे अडचणीत आलेले व्यक्तिमत्त्व आहे. "तेलाच्या बदल्यात अन्न' योजनेत नटवरसिंह हे अप्रत्यक्ष लाभार्थी असल्याची टीका झाली. व्होलकर चौकशी समितीने त्यांच्यावर ठपकाही ठेवला होता. त्या वेळी नटवरसिंह परराष्ट्रमंत्री या पदावर होते. त्यांचा मुलगा जगतसिंह आणि "तेलाच्या बदल्यात अन्न' घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अंदलीब सहगल हे दोघे मित्र असल्याने या प्रकरणात नटवर यांनाच जास्त लक्ष्य करण्यात आले. अंदलीबच्या हमदान एक्स्पोर्ट कंपनीशी जगत यांचा आर्थिक संबंध असल्याचाही आरोप केला गेला. या टीकेमुळे व्यथित झालेल्या नटवरसिंह यांनी नंतर कॉंग्रेस पक्षावरच आगपाखड केली. "आपल्यावरच केवळ आरोप करण्यात येत आहेत. कॉंग्रेसवर असलेल्या आरोपांबाबत कोणीच का बोलत नाही,' असे विधान करून त्यांनी पक्षालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. याची गंभीर दखल घेऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पुढे बहुजन समाज पक्षात त्यांनी प्रवेश केला. तेथेही ते स्वस्थ बसले नाहीत. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, याचे भान स्वार्थी राजकारण्यांना राहत नाही. हाती असलेली सत्ता, अधिकार यांचा गैरवापर त्यांच्याकडून केला जातो. या कृत्यांना पक्षातून विरोध होताच पक्षालाच लक्ष्य करण्याची सवय आता राजकारण्यांना जडली आहे. त्याचा शेवट काय होतो, हे समजण्यासाठी नटवरसिंह, मार्गारेट अल्वा आणि विलासराव देशमुख ही तीन नावे पुरेशी आहेत.
प्रतिक्रिया
13 Dec 2008 - 5:50 pm | कलंत्री
शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचेही पद मुलीच्या गुणात फेरफार केल्यामुळे गेल्याचे स्मरते.
विलासराव यांनी मात्र त्यांना जनतेच्या दुखाचे सोयरसुतक नाही हेच दाखविले.
13 Dec 2008 - 6:07 pm | विनायक प्रभू
सहमत
13 Dec 2008 - 6:22 pm | टायगर
या तिघांचे "बळी' गेले असे म्हटले आहे. "बळी' हा शब्द इथे योग्य वाटतो का?
बळी हा दिला जातो, हे तर आपल्याच कर्माने गेले आहेत.
मला असे वाटते की, हे सर्वजण पदावरून बाजूला गेले, ते योग्यच झाले. विलासराव यांच्या रुपाने महाराष्ट्राला प्रथमच एक अत्यंत निष्क्रीय मुख्यमंत्री मिळाला होता. ते गेल्याने महाराष्ट्र मोकळा श्वास घेऊ शकेल, असे वाटते. बाकी मार्गारेट अल्वांबद्दल काय बोलणार? नटवरही आपल्याच करणीचे फळे भोगत आहेत.
13 Dec 2008 - 7:47 pm | विकास
...नटवरसिंह, मार्गारेट अल्वा आणि विलासराव देशमुख ही तीन नावे पुरेशी आहेत.
खरे आहे. यात अजून एक विरोधाभास वाटणारे (म्हणजे आई-बापाने मुलासाठी करण्या ऐवजी) उदाहरण हे नितेश राणेचे आहे. त्याचा मात्र खरेच वडलांच्या बंडाळीमुळे बळी गेला असे वाटले...बाकी "बळी" हा शब्द इतर तिघांना तितकासा लागू होतो असे वाटत नाही. विलासराव तर काय अजूनही अशोक चव्हाणांचे "कान पिळत" बसले आहे असे म्हणले जाते... इतके महत्व जेंव्हा इतक्या नाकर्त्या माणसाला काँग्रेस नेतृत्व (असेच इतर पक्षातही होऊ शकेल ,आश्चर्य वाटणार नाही) कसे देते हे पाहीले की "डाल मे कुछ काला है" असेच म्हणावे लागते.
कलंत्रीसाहेबांनी सांगितलेल्या निलंगेकरांच्या उदाहरणाव्यतिरीक्त इंदीरा गांधींचे पण आसन संजय गांधींमुळे डळमळीत झाले होते असे वाटते.
तरी देखील, "व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो, याचे भान स्वार्थी राजकारण्यांना राहत नाही. " हे वाक्य जरा बदलावेसे वाटते. त्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे उदाहरण आठवते.
संयुक्त महाराष्ट्र लढा हा महाराष्ट्रातील विविध आणि एकमेकांशी वैचारीक विरोध असलेल्या राजकीय नेतृत्वाने एकत्र येऊन लढला होता. अर्थात काँग्रेस त्यात नव्हते कारण नेहरूंचा त्या लढ्याला विरोध होता. त्या संदर्भात यशवंतराव चव्हाण एका वादात लढ्याला उद्देशून या अर्थी म्हणाले होते की , "नेहरू हे राष्ट्रापेक्षा मोठे आहेत". (पुढे याच पद्धतीने कोणीतरी "इंडीया इज इंदीरा" म्हणाले होते. ). त्यावेळेस या एका वाक्यावर आचार्य अत्रे हे संतापले होते आणि वैतागून या अर्थी म्हणाले होते की "राष्ट्रापेक्षा व्यक्तीला मोठे समजाताहात, तुम्ही कायमच लहान रहाल."
थोडक्यात मला वाटते राजकारणी असो अथवा सामान्य, त्याने व्यक्ती आणि पक्ष/संघटना यांच्याशी कितीही बांधिलकी ठेवली तरी अंतिम आणि प्रामाणिक बांधिलकी ही देशाशी ठेवणे महत्वाचे वाटते. दुर्दैवाने आज अशा विचाराने वागणारे राजकारणी विरळ दिसतात अथवा दिसतच नाहीत आणि त्याचे महत्व सामान्यांना पण रोजच्या पोटापाण्याच्या लढ्यात समजत नाही. म्हणूनच लोकशाही असून देखील बहुमतवाल्या पक्षाचे निर्वाचीत सदस्य नाकर्त्या निर्वाचीत नेतृत्वाला साधे सुनावण्याच्या आणि काढण्याच्या मागे लागण्या ऐवजी दिल्लीकडे डो़ळे लावून मजा बघत बसतात आणि विलासरावांसारखा माणूस इतके सर्व होऊन देखील "मी आनंदी आणि नशिबवान आहे" वगैरे राजीनामा देताना बोलू शकतो.
13 Dec 2008 - 9:17 pm | कलंत्री
लालबहाद्दुर शास्त्रींचा मुलगा नोकरीसाठी फिरत होता आणि नोकरी मिळत नव्हती. तेंव्हा त्याने आपल्या बाबांना विनंती केली की तुम्ही जर कोठे शिफारस केली तर मला नक्की नोकरी मिळेल. लालबहाद्दुर शांतपणे म्हटले की भारतातल्या सर्व बेरोजगांराना नोकरी मिळू दे मग तुझी शिफारस करतो. काही वर्ष थांब. नंतर आपल्या सचिवाला बोलावुन सांगितले की माझा मुलगा माझ्या नावाचा दूरुपयोग तर करीत नाही ना यावर लक्ष ठेवा. माझ्या पदाला, पक्षाला याच्यामुळे बट्टा लागायला नको.
आताच्या राजकारणीवर वेगळे भाष्य करायला नकोच.