मुक्त चिंतन

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
16 Sep 2022 - 9:26 pm

मुक्त चिंतन

काळा कभिन्न कातळ. कणखर, खडबडीत, बऱ्यापैकी तापलेला. मधेच वाळकं गवत. खडकातल्या बारक्या कडा, भेगा यात बोटं खुपसून, पावलांच्या कडा आधारासाठी वापरत आपण रॉकला भिडतो. हळूहळू उंची गाठली जात असते. आणि अचानक सावकाश नकळत आपल्या नजरेचा पसारा आकुंचित होतो. अर्धा इंच रुंदीच्या क्रॅक स्पष्ट दिसू लागतात. बोटं दाबलेल्या खडकाच्या आतली धडधड आपल्या छातीतल्या धडधडीशी जोडली जाते आणि क्षणात तो भरवशाचा नाही म्हणून दुसऱ्या कंगोऱ्याकडे हात सरकतो. पावलाच्या बोटापासून ताणलेल्या हातापर्यंत एक हवा-नको-हवासा ताण येतो. आपली पुढली हालचाल 2 फूट अधिक उंची की खाली कोसळत जाणं यातला फरक सांगणार असतात. बिले पोटाला जाणवतो. पण त्यातला धोका, अपयश, हेही दूर नजरेच्या टप्प्यापलीकडे गेलेलं असतं. किती झालं, किती बाकी हे अर्थहीन झालेलं असतं. फक्त आपण आणि 7x4 चा कातळकडा..

लांब पल्ल्याचा पोहण्याचा सराव.. वाऱ्याचा पाण्याचा गारवा, उन्हाची तिरीप, लाटा हे सगळं सवयीचं होत जातं पहिल्या 100 मीटरमधेच. शरीराला पाण्याची जाणीव थांबते. ब्रेस्ट-स्ट्रोक लयीत सुरू राहतो. पाण्याखाली बुडबुड्यानी पाणी सोडत क्षणकाल हाताच्या दाबाने डोकं पाण्यावर येतं. आपसूक श्वास घेऊन परत पाण्यात. श्वास सोडणे, हात फिरवत खाली दाबणे, श्वास घेत परत खाली, पाय तोवर जवळ आलेले असतातच, ते दूर लोटणे, श्वास सोडत परत पाण्यावर.. हे सगळं आपसूक यंत्रवत होत राहतं. रिकाम्या डोक्यात कानात श्वासाचा आवाज घुमत राहतो...

घरात आपण एकटेच असतो. भुकेची हलकी जाणीव व्हायला लागते. रात्रीचं जेवण वरण भातावर करायचा शॉर्टकट. हॉलमधे शफल मोडवर मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. ऐकत काम सुरू राहतं. शिट्ट्या बंद करून वाफ जायची वाट बघत आपण बेडरुममधे पंख्याखाली पसरतो. आणि एवढ्यात हॉल मधून लता साद घालते, हरेक बात पे कहते हो तुम के तू क्या है?! यमन मनाचा ताबा घेत जातो. शरीर सैलावत जातं. डोकं यमनच्या लडिवाळ हुरहुरत्या वळणांच सौंदर्य निरखण्यात रंगून जातं. जो आंख ही से न टपका तो फिर लहू क्या है? क्या बात! नकळत दाद जाते. नंतर बाचिजा ए अतफाल सुरू होतं आणि डोकं काही क्षण बावचळून जातं. ना राग समजत ना ते अवघड शब्द. पण तरी स्वर्गारुड वाढतच जातं. डोळे बंद. खोली वितळून नाहीशी होते. साऱ्या जगात फक्त लताचे जीवघेणे कारुण्यमयी सूर शिल्लक राहतात. बाकी काही काही उरत नाही...

गच्च गर्दीची लोकल. कसाबसा 2 बेंच मधल्या जागेच्या टोकाजवळ येऊन पोचतो. सॅक ठेवायला जागाच नाही. कमीतकमी हालचाल करत सॅकमधून पुस्तक काढतो. 25 मिनिट चेपल्या गर्दीत उभा राहून पाय दुखू लागले असतात. गुडघ्यात सॅक, डाव्या हाती पुस्तक, उजवा हात वर कडीला, वर पिवळा दिवा, घामाची चिकचिक, अशात गोष्ट सुरू होते. चित्रदर्शी भाषेची जादू होते आणि लवकरच हे सगळं गायब झालेलं असतं. नायकाच्या सावलीसारखा त्याच्या सोबत मी महंताच्या मागोमाग चालत मठाकडे निघतो. त्या अंधारात अचानक दिसणारे विजेचे दिवे, रेशमी वस्त्र, सुग्रास अन्न, जमिनीखाली तीन मजले पार करत छोट्या कातळाच्या खोलीत शिरतो...

अशीच जादू अनेकदा घडते. सायकलवर बहुतेकदा, कविता/लेख घडताना, स्वच्छ कोऱ्या कागदावर रेषा मारायची हिम्मत करत हळूहळू त्यावर चित्र उमटत जाताना..

डोकं, पोट वगैरे दुखतंय म्हंजे तब्येत नीट नाही. जखम असेल तरच वेदना असतात. सगळ ठीक असेल तर हे अवयव आहेत याची जाणीव देखील नसते. ते निवांत आपलं काम करत राहतात. आपल्या मनात डोक्यात कायम विचारांची भावनांची दंगल सुरू असते, सवयीचे असले तरी सततचे ताण असतात. विचार भावना एकमेकांना धक्के देत पुढे घुसून लक्ष वेधून घेत राहतात. त्यांना आराम हवाच. झोपलो तरी स्वप्न सुरूच राहतात. ते 100% शांत रिकामे करता येणे खूपच अवघड. योगीलोक करतात म्हणे. आपल्यासारखे लोक काय करणार? आपल्या प्रत्येकाकडे अशी मन बुद्धी पूर्ण बंद जरी नाही तरी मिनिमम सुरू राहील अशी सोय असते. त्याला छंद म्हणतात. ज्यात आपण स्वतःला विसरून जातो. माझ्या मी असण्याची जाणीव अगदीच पुसट नाममात्र होत जाते. आपल्यासारख्या सामान्यांसाठी ही सोय उपलब्ध आहे ही किती छान गोष्ट आहे!

हेच पहा ना.. हा लेख लिहिता लिहिता सीएसटी ते डोंबिवली प्रवास झाला देखील.. लेख आणि मी.. बाकी काहीही न समजता!

- अनुप

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 9:57 pm | कर्नलतपस्वी

आहो काय भरारी,कातळातून पात्रात आणि पाताळातून सरपट पळणाऱ्या लोहपथगामीनीवर.

छान मुक्तक.आवडलं

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 9:58 pm | कर्नलतपस्वी

पात्रात ऐवजी पाताळात वाचणे.

अन्या बुद्धे's picture

17 Sep 2022 - 5:46 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)

चष्मेबद्दूर's picture

17 Sep 2022 - 7:28 pm | चष्मेबद्दूर

पटलं.

अन्या बुद्धे's picture

18 Sep 2022 - 12:48 pm | अन्या बुद्धे

:)

Nitin Palkar's picture

17 Sep 2022 - 7:51 pm | Nitin Palkar

आवडलं!

अन्या बुद्धे's picture

18 Sep 2022 - 12:49 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

अनन्त्_यात्री's picture

18 Sep 2022 - 5:39 pm | अनन्त्_यात्री

आवडले

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 1:12 am | मुक्त विहारि

खूप दिवसांनी, काही तरी वेगळे वाचले ...

अनियंत्रित पण सैरभर नसलेले मन, असेच मोकळे सोडावे...

दर शनिवारी संध्याकाळी, मी हेच करतो ....

अन्या बुद्धे's picture

19 Sep 2022 - 12:22 pm | अन्या बुद्धे

व्वा! माझिया जातीचा...

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Sep 2022 - 2:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

ईंजिनीयरिंगला असताना एका मित्राला स्मिथि, कार्पेंटरी अशी सहसा रटाळ वाटणारी प्रॅक्टीकल्स फार आवडायची. कारण हातांना काम करायला सोडुन देउन डोक्याला विचारांचा खुराक देता यायचा. अर्थात तो त्यात एक्सपर्ट होता म्हणुन, कारण तेच जॉब करताना आमच्या नाकी नउ यायचे :)

या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली.

अन्या बुद्धे's picture

20 Sep 2022 - 10:39 am | अन्या बुद्धे

क्या बात! भाग्यवंत लोक

सस्नेह's picture

19 Sep 2022 - 2:59 pm | सस्नेह

सहीच मुक्तक..

सनईचौघडा's picture

19 Sep 2022 - 3:30 pm | सनईचौघडा

आवडलं लेखन

वामन देशमुख's picture

20 Sep 2022 - 5:31 pm | वामन देशमुख

मुक्त चिंतन आवडलं.

अजून येऊ द्या.

अन्या बुद्धे's picture

21 Sep 2022 - 4:38 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद!

श्वेता व्यास's picture

21 Sep 2022 - 5:37 pm | श्वेता व्यास

छान मुक्त चिंतन, आवडले.

अन्या बुद्धे's picture

22 Sep 2022 - 4:12 pm | अन्या बुद्धे

धन्यवाद! :)