आठवणीतला गणेशोत्सव

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
15 Sep 2022 - 8:01 pm

रात्रीचे साडेअकरा वाजले, आणि मी फोनाफोनी सुरू केली. पोलीस कंट्रोल, महापालिका, फायर ब्रिगेड, अन्य वर्तमानपत्रातल्या रात्रपाळीच्या रिपोर्टरांशीही फोनवर बोललो. नवी एडिशन काढावी लागेल असं काही फारसं घडलं नाहीये, याची खात्री करून घेतली, आणि मी आवराआवर केली. तो १९८९ सालातला गणेशचतुर्थीच्या आधीचा दिवस होता. चतुर्थीला सुट्टी होती. ‘उद्या अंक नाही’ अशी चौकट पेपरात ज्या मोजक्याच दिवशी छापली जाते, त्यापैकी हा एक दिवस! मी तयार होऊन थांबलो आणि काही वेळातच एक जाडजूड पिशवी खांद्यावर घेऊन सन्मित्र तानाजी कोलते Tanaji Kolte दाखल झाले. तानाजी तेव्हा माझा सीनियर सहकारी होता. मी माझी पिशवी घेतली, आणि एक्स्प्रेस टॉवरच्या ऑफिसातून आम्ही उतरलो. रस्त्यावर एक कोरी करकरीत बुलेट उभी होती. तानाजीने आमच्या बॅगा मागे बांधल्या, आणि बुलेटला किक मारली. रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही नरीमन प्वाइंटच्या एक्स्प्रेस टॉवरपासून प्रस्थान ठेवले…
तेव्हा आईवडीलही मुंबईतच असल्याने व गणपती देवरुखच्या घरी आणायचा असल्याने, चतुर्थीच्या आदल्या दिवशीची रात्रपाळी संपविलावर आमची बुलेट सवारी कोकणाच्या रस्त्याला लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पोहोचून गजाभाऊं (भोंदे)च्या कारखान्यातून मूर्ती आणायची आणि पूजा, प्रतिष्ठापना, नैवेद्य वगैरे वेळेत पूर्ण करायचे असे ठरविले असल्याने बुलेटचा वेग आणि वेळ ठरवून ठेवला होता. त्याच्या काही दिवस अगोदर रायगड जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडला होता. अतिवृष्टीने हाहाकार उडाला होता. मुंबई गोवा मार्गावर चिखल पसरला होता आणि त्या अडथळ्यांतून उत्तररात्री आमची बुलेट सवारी देवरूखच्या दिशेने दौडत होती.
महाडजवळ पोचलो तेव्हा पहाटेचे पाच साडेपाच वाजले असावेत. रस्त्याकडेला बुलेट स्टॅंडला लावून आम्ही दोघंही कोरड्या डांबरी रस्तावर अंग पसरून दिलं, आणि काही वेळातच डोळा लागला... अर्धापाऊण तासानंतर जागे होऊन आम्ही पुन्हा रस्ता धरला. पण गरजेच्या या विश्रांतीने वेळ वाया गेला होता. पुढचं वेळेचं गणित बिघडणार होतं हे माहीत असूनही आमची नवीकोरी बुलेट आरामात वेगाने पुढे जात होती.
चांगलं उजाडल्यावर वाटेत कुठेतरी चहा घेऊन ताजेतवाने होऊन पुन्हा प्रवास सुरू झाला.
सरत्या पावसाळयातील हिरव्याकंच कोकणातली काळी डांबरी वळणांची वाट कापत प्रवास करण्यातला आनंदसोहळा अनुभवल्याशिवाय समजत नाही.
देवरूखला पोचलो, तेव्हा सकाळचे अकरा वगैरे वाजले असावेत. आख्खं गाव गणेशोत्सवाच्या आनंदात ओसंडून गेलं होतं.
घरी पोचलो. माझी बहीण, सुबोधिनी Ashwini Watve सकाळीच रत्नागिरीहून येऊन दाखल झाली होती. घराची झाडलोट करून देवघराजवळ गणपतीचे आसनही तिने तयार करून ठेवलं होतं. तेव्हा मोबाईल वगैरे नसल्याने ती तयारी करून आमचीच वाट पहात होती.
आम्ही घरी गेलो, थोडे फ्रेश झालो, आणि पाट, वस्त्र, नारळ घेऊन मी गणपती आणायला कारखान्यात गेलो. तोवर गावात घरोघरी आरत्यांचे सूर सुरूही झाले होते. मी मूर्ती घेतली आणि मनातल्या मनात गणपतीचे आभार मानले. या वेळी भटजींची धांदल आटोपलेली असल्याने लगेच वेळेवर पूजा पूर्ण होणार होती. लगेच अंघोळ करून पूजेला बसलो. तासाभरात पूजा आटोपेपर्यंत सुबोधिनीने उकडीचे मोदक आणि स्वैपाक केला होता. अगदी वेळेत सारे काही मस्त पार पडले, आणि रात्रभराच्या बुलेट प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळाला!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मूर्ती विसर्जन झाल्यावर रात्री मी परतीच्या प्रवासासाठी पाली-देवळे- मुंबई गाडीत बसलो, आणि बुलेटवर टांग मारून तानाजी कोल्हापूर पुणे मार्गे मुंबईच्या प्रवासाला निघाला!
पुढच्या दिवशी पुन्हा आवराआवर करून सुबोधिनीने घराला कुलुप लावले आणि ती रत्नागिरीस परतली.
त्यानंतर आमचा गणेशोत्सव मुंबईतल्या घरीच सुरू झाला… गेली ३२ वर्षे गणेश चतुर्थीला इथे, मुंबईत गणेशाची पूजा, प्रतिष्ठापना होते, भक्तिभावाने घर भारून जाते, पण तो उत्सव मात्र आजही आठवणीत घर करून राहिलाय…
कारण, दीड दिवसांच्या त्या गणेशोत्सवाने एक अविस्मरणीय प्रवासानुभव दिला!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2022 - 9:54 pm | कर्नलतपस्वी

कधी कधी नवल वाटते की हे सगळं कस काय झालं पण भाव तीथे देव.

मुक्त विहारि's picture

17 Sep 2022 - 11:50 am | मुक्त विहारि

सहमत आहे ...

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Sep 2022 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडले
पैजारबुवा,