कशी पुरी पडावी शब्दांच्या भाषेची बाराखडी आभाळाएवढी चिमुकली दुःख कागदावर पेलताना ????.....
कोसळणाऱ्या पावसात गळक्या छताखाली चिंब भिजल्या मनामधून पाझरणारं काळंभोरं दुःखी आभाळ आणि गालावर ओघळून सुकलेल्या आसवांच्या मागे लपून डोळ्यांच्या कडांमधून उसळणारा चिमुरड्या पोटातील भुकेचा आगडोंब.....
कसा शमवता येईल शब्दांतून ???
भर दुपारी उन्हाने तापलेल्या एकाकी डांबरी रस्त्यावर चालताना छोट्या अनवाणी पायांची होणारी लाही-लाही आणि त्यात मध्येच पायाखाली आलेल्या चुकार टोकदार दगडाच्या दंशाने पापण्यांच्या कडांमध्ये दाटून आलेला वेदनांचा पूर....
कसा अडवता येईल शब्दांचे बांध घालून ??
भेगाळल्या भुईच्या छाताडावर नांगराच्या रेघोट्या
ओढणाऱ्या बापाच्या फाटक्या धोतरातून दूरवर दिसणारं
भकास कोरडं आभाळ आणि अहिर्निश आग ओकणाऱ्या सुर्याच्या क्रोधात करपून गेलेली कोवळ्या डोळ्यांमधील स्वप्न....
कशी उजवतील शब्दांच्या छायेत ???
हे आणि असंच काही, आणखी ही बरंच काही-बाही,
कुठंतरी लपून बसलेलं, आत खोल काहीतरी रुजलेलं
शब्दांच्या आधाराने अंकरून येईल असं वाटत नाही
आता गिरवावी लागेल जाणिवांच्या भाषेची बाराखडी...
©चक्कर_बंडा