हाजीर हो !

Jayant Naik's picture
Jayant Naik in जनातलं, मनातलं
31 Jul 2022 - 12:20 pm

हाजीर हो ! ...

पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या ,तरूण आणि रुबाबदार पस्तीशीतील राजन काळे नी आपली गाडी आपल्या पार्किंग मध्ये लावली. आपला टाय जरासा सैल केला . समोरच्या आरशात बघून आपले काळेभोर केस जरा सारखे केले. गाडीतून बाहेर पडून ,मागच्या सीट वरून आपली लॅपटॉप ची बॅग घेतली . आपल्या खिशातील मोबाईल काढून तो चालू केला. आजच्या दुपारच्या मीटिंग मध्ये त्याने तो बंद केला होता. मेघनाचे एक दोन मिस काल्स होते. एक दोन मेसेज सुद्धा होते. आता घरी जातोच आहे तेव्हा बोलू असा विचार करून तो पुढे निघाला. सहज घड्याळात बघितले तर रात्रीचे नऊ वाजून गेले होते. आज जरा जास्तच उशीर झाला होता. ऑफिस मधील मीटिंग लांबली होती. तो लिफ्टकडे निघाले तेव्हा वॉचमन ने त्याला लवून नमस्कार केला. हात वर करून त्या नमस्काराचा स्वीकार करत तो लिफ्टमध्ये शिरला . खरे तर नेहमी तो जिन्यावरून जात असे. . तेवढाच व्यायाम. पण आज तो जरा जास्तच दमला होता. लिफ्टचा आवाज येताच त्याच्या बायकोने दार उघडले. त्याचा बारा तेरा वर्षाचा मुलगा राहुल सोफ्यावर बसून मोबाईल वर काही तरी पहात होता. त्याने आपल्या बाबांकडे एकदा डोळे वर करून पाहिले आणि तो परत आपल्या मोबाईल मध्ये गुंग झाला.
“ काय रे राहुल? कसा काय गेला आजचा दिवस ? तुझी क्रिकेटची प्रक्टिस काय म्हणते आहे ?” राजन म्हणाला. हा घरी आल्यावर त्यांचा नेहमीचा संवाद असे. पण आज राहुल जरा रागावलेला दिसत होता .त्याने बघितले तर त्याची बायको मेघना त्याला काही तरी खुणा करत होती. आपली बॅग जागेवर ठेवत त्याने आपल्या बायकोकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले . राहुल तिरक्या नजरेने या खाणाखुणा पहात होता. तो सोफ्यावरून एकदम ताडकन उठला .
“ आई ..खुणा करून काहीही उपयोग नाही . बाबा पूर्ण विसरून गेला आहे. ...माझ्या क्लब ची आज २०/२० ची फायनल होती हे तो पूर्ण विसरला आहे. मी मात्र उगीचच हा आत्ता येईल ..मग येईल म्हणून वाट बघत होतो.”
राजन च्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. बापरे ..आपण पूर्ण विसरून गेलो होतो कि ! तरी मेघनाने आज सकाळी जातानाच त्याला आठवण करून दिली होती. पण आज दुपारी एकदम त्याच्या बॉसला त्याची आठवण झाली. मग मीटिंग वर मीटिंग.
“ मी परत तुला संध्याकाळी राहुल च्या फायनल आधी फोन केला पण तुझा फोन स्वीच ऑफ. मग परत थोड्या वेळाने फोन केला तरी तोच प्रकार. मग तुला मेसेज सुद्धा केला.” मेघना म्हणाली.
राजन गडबडीने राहुल जवळ गेला . त्याच्या शेजारी बसत त्याने आपला हात त्याच्या खांद्याभोवती ठेवला . राहुलने तो एकदम झटकून टाकला .
“ I am sorry राहुल ..अरे आज माझ्या बॉस ने मला फारच कामाला लावला. मला सांग काय झाले आजच्या गेमचे ? तुम्ही जिंकलात ना ? तू किती स्कोअर केलास ?”
“ We Lost.. मी पन्नास धावा काढल्या तरी आम्ही हरलो … पण तुला काय त्याचे ? आमच्या टीम च्या सगळ्यांचे आई बाबा आले होते. माझीच फक्त आई .. तू हवा होतास बाबा मला चीअर करायला ..पण मी अनेकदा पाहिलंय ..तुझे ऑफीस ..तुझे फोन कॉल आणि मिटींग्स ..तुला माझी किमतच नाही ..” राहुल एकदम रडवेला झाला.
राजन ने आपल्या मुलाला एकदम जवळ घेतले आणि त्याच्या खांद्यावर थोपटत तो म्हणाला ,
“ बेटा या जगात तू आणि मेघना मला सर्वात प्रिय आहात. मी जे काही करतोय ते तुमच्या साठीच तर करतोय. तुझी मला किमत नाही असे कसे म्हणतोस ? पण आज मला फार काम होते. मला तुला सबबी द्यायच्या नाहीत. मी तुझी फायनल विसरणे ही अक्षम्य बाब आहे . मला तू काय शिक्षा देशील ती मला मान्य आहे.”

“ मी तुला काय शिक्षा देणार ? पण माझ्या पुढच्या गेम ला ये म्हणजे झाले ..”
“ नक्की येणार ..पण मला आधी सांग मी तुझ्यासाठी काय करू ? तुला नवीन मोबाईल हवाय ? नवीन क्रिकेटची कीट हवी आहे ?”
राहुलने एकदम चमकून आपल्या बाबांकडे पहिले. मग एकदा आपल्या आईकडे पाहिले .
“ मला या वस्तू नको आहेत बाबा.माझ्यासाठी या वस्तू महत्वाच्या नाहीत . तू आणि आई महत्वाच्या आहात. आणि या वस्तू तू मला हव्या आहेत म्हणून देत नाहीस .तुझी गिल्ट कमी व्हावी म्हणून देतो आहेस. मला नको आहेत त्या.मला फक्त तुझा थोडासा वेळ हवाय . ”
राजन ने आपल्या या समजूतदार मुलाकडे प्रेमाने पाहिले .मग तो हसतच म्हणाला ,
“ नक्की. आजच्या गेम मध्ये काय काय झाले ते मला सविस्तर सांग. पण मला आता भूक लागली आहे ..आपण जेवताना बोलूया का ?”
“ चला मग जेवायला ...मी अन्न गरम करते जरा ..” मेघना म्हणाली .
जेवताना राहुल मोठ्या उत्साहाने आजच्या गेम बद्दल सांगत होता.

“ आम्ही गोलंदाजीत कमी पडलो बाबा. नाही तर ही फायनल आम्ही नक्की जिंकली असती . माझ्या पन्नास धावा सुद्धा कमी पडल्या. मी आज छान खेळलो बाबा ...तू हवा होतास बघायला ! मी आज एक हुक पण मारला . चौकार ! आमच्या कप्तानाने पण २५ धावा काढल्या आणि तीन विकेट्स काढल्या. पण आमच्या प्रतिस्पर्धी संघातल्या आशुतोष ने नाबाद ७५ धावा काढल्या. आणि आम्ही हरलो. आमचे क्षेत्ररक्षण पण खराब झाले ..माझ्या हातून एक फलंदाज धावबाद होता होता वाचला ...मी जरा जास्त चपळपणे चेंडू अडवून फेकायला हवा होता …”
राहुल हे सांगत होता तेवढ्यात राजन चा मोबाईल वाजला. राजनने चमकून आपला मोबाईल पाहिला. त्याच्या कंपनीच्या अमेरिकन ग्राहकाचा फोन होता. त्याला हा घ्यावाच लागणार होता. त्यांचा दिवस सुरु झाला होता.
राजनने एकदा राहुल कडे आणि एकदा मेघनाकडे अपराधी नजरेने पाहिले.
“ Sorry, राहुल मला हा कॉल घ्यावा लागणार .. मी लवकर संपवतो मग आपण बोलू.” तो अर्ध्या जेवणातून उठला .हा खरे तर ठरलेला कॉल नव्हता त्या मुळे काही तरी तातडीचे काम असणार . राजन फोन घेऊन आपल्या बेडरूम मध्ये गेला.
लवकर संपायची शक्यता असणारा कॉल,चांगला एक तास चालला. मेघना टीवी बघताना एक दोनदा आत डोकावून गेली.
राजन कॉल संपवून बाहेर आला तेव्हा राहुल झोपायला गेला होता. त्याला सकाळी लवकर शाळेला जायचे होते.
“ राहुलच्या गेमचा वृत्तांत ऐकायचा राहून गेला बघ मेघना ..अमेरिकेत आमच्या प्रोजेक्ट मध्ये काही तरी मोठा प्रोब्लेम आला आहे. मला बहुदा दोन तीन दिवसात अमेरिकेला जायला लागणार ..राहुल परत चिडला ना ?”
“ हो ..मी त्याला समजावून सांगितले कि बाबाला बेक ऐण्ड कॉल असायला लागते. तो प्रोजेक्ट डिरेक्टर आहे. त्याच्या कामाचा तो एक भागच आहे. तू जेऊन घेतोस ना? तुझे जेवण अर्धवटच राहिले. ”
“ नको आता. मी झोपताना थोडे दुध घेईन ..पण राहुल काय म्हणाला मला असे बेक ऐण्ड कॉल असायला लागते यावर ?”
“ मला म्हणाला . म्हणजे अगदी “हाजीर हो ! .. “ असेच ना ? त्याच्या शाळेतील एका नाटकात होते असे. अमका अमका हाजीर हो ...असे पुकारले कि लगेच हजर . . .तू सुद्धा कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेस ..तुला बरे नसतात असे रात्री बेरात्री फोनअसे म्हणाला . मी त्याला समजावले आहे पण ..तू पण उद्या त्याच्याशी बोल.
“ नक्की. या फोनला पण आजच यायचा होता.”
“ हा कॉल आधी ठरवून नव्हता पण बाकीच्या दिवशी तुझे scheduled call असतातच की … तुझा जॉबच तसा आहे ..त्याला तू तरी काय करणार ? चला आता झोपायला . आज खूप दमला आहेस तू ” असे बोलून मेघना थांबली . राजनला सांगावे कि नाही अश्या द्विधा मनस्थितीत.
“ काय झाले मेघना ? अजून काही राहुल म्हणाला का ? मला कळू दे तो काय म्हणाला.”
“ त्याला समजून घे राजन ! तो चिडला आहे. म्हणाला ..या अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मला खूप राग येतो . त्याने हा फोन चा शोधच लावला नसता तर बाबाचा मला जास्त वेळ मिळाला असता. मला आता बाबाशी काही बोलायचे असेल तर त्याला फोनच करायला पाहिजे ..पण माझा फोन हा घेईल का नाही माहित नाही . मी त्याचा ग्राहक कुठे आहे. ? माझ्यासाठी हा असा तातडीने हजर व्हायला माझा एखादा अपघात व्हायला पाहिजे …”
“ मेघना !” राजन एकदम ओरडला ..
“ मी सुद्धा असेच ओरडले त्याच्यावर ..त्याला आता मी नीट समजावून सांगितले आहे.”
“ मेघना ..हे काय होतंय माझ्या मुलाला ? माझे इतके दुर्लक्ष होतंय का ?” असे म्हणत राजन एकदम राहुलच्या बेडरूम मध्ये गेला. त्याने पहिले राहुल शांत झोपला होता. राजन त्याच्या जवळ गेला . त्याच्या कपाळावर ओठ टेकत तो म्हणाला ,
“ I love you,my son. Don't ever doubt that …”
राजन आणि मेघना मग किती तरी वेळ आपल्या झोपलेल्या मुलाकडे पहात उभे होते.
“ देव करो आणि आपल्यावर आपल्या मुलाशी फक्त फोन वर संवाद साधायची वेळ कधीही न येवो.” मेघना बाहेर जाता जाता हळूच म्हणाली .
“ ते होणारच आहे मेघना ..काळाची गरज आहे ती . आपण काहीही करू शकणार नाही . आज मी आणि तू जे कष्ट करतोय ते राहुलचे भविष्य साकारण्यासाठी ..त्याची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणूनच ना ? आज किती स्पर्धा आहे बिझिनेस क्षेत्रात .. असे काम केले नाही तर मी मागे पडेन . पण आज जसा मला राहुलला द्यायला वेळ नाही तसाच एक दिवस येईल कि राहुलला आपल्यासाठी वेळ नसेल. आपण ते टाळू शकणार नाही . ” राजन म्हणाला.
“ राजन मला त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. आपल्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मोरे आजी आणि आजोबांचे मी बघते ना . सारखे बिचारे मुलाच्या फोन ची वाट पहात असतात.” मेघना म्हणाली.
झोपायला जाताना हाच विचार तिच्या मनात वादळ निर्माण करत होता. पण तिला माहित होते राजन म्हणतो आहे ते खरे आहे. सुपातले दाणे आणि जात्यातले दाणे इतकाच काय तो आपल्यात आणि मोरे आजी आजोबा मध्ये फरक आहे.
********
त्याच वेळी त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे तात्या मोरे आजोबा आणि रोहिणी आजी आपल्या दिवाणखान्यात
बरेच फोटो अल्बम काढून बसले होते. ते या सदनिकेत दोघेच रहात होते. त्यांचा एक मुलगा होता तो अमेरिकेत होता. मुलगा आणि सून दोघेही तिकडे नोकरी करत होते. त्यांना एक पाच सहा वर्षाचा मुलगा सुद्धा होता.
“ आजोबा ..हा बघितलात का आपल्या जीवनचा शाळेत जातानाचा फोटो. शाळेच्या ड्रेस मध्ये किती गोड दिसतोय ना ?” आताशा रोहिणी आजी तात्या ना आजोबाच म्हणत असे.
“ बघू बघू ?” असे म्हणत मोरे आजोबा आपल्या हातातील अल्बम खाली ठेऊन पुढे आले. रोहिणी दाखवत होती तो फोटो बराच वेळ बघून ते म्हणाले ..
“ मग ..माझा मुलगा आहेच रुबाबदार ..आता सुद्धा सूट आणि टाय मध्ये कसा सुरेख दिसतो ..”
“ अरे वा ! माझा मुलगा म्हणे ! माझा नाही का काय ? . आणि हा परवा काढलेला आपल्या नातवाचा फोटो बघा . झंप्या अगदी लहानपणीच्या जीवन सारखा दिसतो .”
“ बघू दे मला ...हे असे अगदी शेजारी शेजारी ठेऊ या ..हो अगदी लहानपणीचा जीवन दिसतो . किती गोड दिसतोय ना ?”
“ किती दिवस झाले हो आपल्या या नातवाला ..आपल्या मुलाला आणि सुनेला पाहून ? एक वर्ष तरी नक्कीच झाले. ..”
“ अग रोहिणी असे काय करतेस ? मागच्या आठवड्यात रविवारी नाही का आपला व्हिडीओ कॉल झाला ? किती तरी वेळ आपण त्या सगळ्यांशी बोलत होतो खूप मजा आली नाही का ? “ आजोबा म्हणाले.
“ ती कसली डोंबलाची भेट . प्रत्यक्ष भेट झाली का ? आपल्याला त्यांना जवळ घेता आले का ? त्यांच्या गालावरून हात फिरवता आला का ? या फोन वर नाही तर त्या व्हिडीओ कॉल वर समाधान मानून घ्यायचे झाले.” आजी म्हणाल्या.
“ मग चल कि जाऊन येऊ या अमेरिकेला ..मुलगा केव्हाचा बोलवतो आहे.”
“ आपले दोघांचे गुढघे दुखतात. आपली दोघांचीही तब्येत अशी तोळामासा. हा लांबचा प्रवास झेपत नाही आता आपल्याला ..हे काय माहित नाही की काय तुम्हाला ? ..पण ते जाऊ दे ..अजून या जीवन चा फोन कसा आला नाही ? ऑफिस ला गाडीतून जाताना फोन करीन म्हणाला होता ..आता नाही यायचा ...ऑफिस ला पोचला सुद्धा असेल आता. त्याला त्याच्या ऑफिस चे सारखे फोन येत असतात. बघू या आता उद्या करतो का ?”
“ अजून थोडा वेळ वाट बघू या ..येईल अजून आत्ता रात्रीचे साडे अकरा तर वाजलेत. थोडा वेळ वाट पाहू नाही तर उद्या सकाळी ..म्हणजे त्यांच्या रात्री आपणच त्यांना फोन करू ..” मोरे आजोबा म्हणाले .
“ या अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत . प्रत्यक्ष भेट नसेल का होईना ..अश्या व्हिडीओ कॉल वर किवा साध्या कॉलवर तरी भेट होते.” आजी म्हणाल्या.
“ तुला लक्षात येतेय का रोहिणी ? ..आता माणसाची प्रत्यक्ष भेट दुर्मिळ होते आहे .. फोन वर ,वॉट्सएप्प वर किवा मग व्हिडीओ कॉल वर अशीच भेट .. आपला संवाद माणसांशी न होता त्याच्या कडे असणाऱ्या यंत्रांशी होतोय. प्रत्यक्ष भेटीची आशा सोडून आपण फक्त मुलाचा फोन येईल ...व्हिडीओ कॉल येईल ,आपला नातू दिसेल याची फक्त वाट पहात बसायचे. आता तो परमेश्वर तरी शेवटी आपल्याला प्रत्यक्ष भेटतोय कि नाही कुणास ठाऊक ? का तो सुद्धा सांगतोय बोला या यंत्राशी .. ..” मोरे आजोबा म्हणाले. हा विचार मनात आला आणि ते एकदम जोर जोरात हसायलाच लागले .
“ हो तेही आहेच म्हणा. नाही तरी तो स्वतः कुठे येतो ? तो आपला त्या यमाला पाठवतो .रेड्यावर बसवून .
असाच केव्हा तरी त्याचा कॉल येणार ,हाजीर हो ! असा पुकारा होणार आणि आपण निघालो ..हाजीर है ! असे म्हणत ..” आजी हसत हसत म्हणाल्या.पण हसत असताना केव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले ते त्यांचे त्यांनाच समजले नाही .

************

जयंत नाईक .

कथाविचार

प्रतिक्रिया

भागो's picture

31 Jul 2022 - 3:04 pm | भागो

आपला संवाद माणसांशी न होता त्याच्या कडे असणाऱ्या यंत्रांशी होतोय.>>
खरय.

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:28 am | Jayant Naik

हे सत्य दिवसेंदिवस अधिक अधिक प्रत्ययास येते आहे. खरे तर पूर्वी आपला मनुष्याच्या शरीरा द्वारे त्याच्या मनाशी संवाद होत असे. पण आत्मा तसाच आपल्या पासून लपलेला ,अस्पर्श राहत असे. म्हणजे आत्म्याचे कवच शरीर असे. आता या शरीराभोवती अशी अनेक कवचे निर्माण केले आहेत माणसाने. फोन, संगणक , वगैरे. पण या सगळ्यात मनुष्य मानुष्या पासून लांब जातो आहे हे सत्य आहे.

कर्नलतपस्वी's picture

31 Jul 2022 - 3:48 pm | कर्नलतपस्वी

पहिली कथा

कोमेजून निजलेली एक परी राणी,

उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी

रोजचेच आहे सारे काही आज नाही

दुसरी कथा

पिलास फुटून पंख तयांची
घरटी झाली कुठे कुठे

मेघना म्हणते ते बरोबर आहे, काळाची गरज आहे.

छान लिहिलंय.

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:30 am | Jayant Naik

तुमच्या दोन्ही कविता सर्वोत्तम.

सरिता बांदेकर's picture

31 Jul 2022 - 7:14 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे. फोन कुणासाठी वरदान आहे तर कुणासाठी शाप.
हे सत्य छान मांडलंय.

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:31 am | Jayant Naik

फोन हे एक साधन आहे. आपण कसे वापरतो यावर तो मित्र का शत्रू हे ठरते .

Nitin Palkar's picture

31 Jul 2022 - 8:31 pm | Nitin Palkar

छान कथा.
बदललेली जीवनशैली, बदललेली जीवनमूल्ये या सर्वांचा हा परिणाम आहे. कालाय तस्मै नम: दुसरे काय....

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:37 am | Jayant Naik

बरोबर . काळ हे सगळ्याचे कारण आहे.

सौंदाळा's picture

1 Aug 2022 - 11:17 am | सौंदाळा

छान लिहिले आहे.
वेळ कसा घालवायचा असा यक्ष प्रश्न पडलेल्यांसाठी, एकलकोंड्या लोकांसाठी मोबाईल वरदानच आहे.

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:38 am | Jayant Naik

प्रतिक्रिये बद्दल आभार

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:38 am | Jayant Naik

प्रतिक्रिये बद्दल आभार

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Aug 2022 - 12:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान लिहिले आहे, आवडले
पैजारबुवा,

Jayant Naik's picture

2 Aug 2022 - 10:40 am | Jayant Naik

नेहमीप्रमाणे तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आभार. थोड्याफार फरकाने हे आपल्या सर्वांचीच कथा आहे.