ठिगळ

उपाशी बोका's picture
उपाशी बोका in जनातलं, मनातलं
24 Jul 2022 - 12:31 am

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे गृहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको. ते आमचं प्रिन्सिपल आहे." :) नंतर १५ मिनिटात त्यांनी माझे काम केले.

अजून १ थोडासा वेगळा अनुभव. बऱ्याच वर्षांपूर्वी मी फ्लॅट विकला, तेव्हा रजिस्ट्रारच्या ऑफिसात गेलो होतो. १ एजंट माझं काम करणार होता, म्हणून मी तिथे उभा होतो. तेव्हा १ गरीब बाई हमसून हमसून रडताना दिसली. ती म्हणत होती "काय ओ साएब, माझं काम कराना. आता १० वेळा आले इथे. दरवेळी म्हणता, हा कागुद आणा, मग तो कागुद आणा. मला बदलापूरवरून यावं लागतं. मी भाजी विकते, माझा खाडा होतो, रातच्याला खायला कसं मिळणार..." वगैरे वगैरे. तिच्या बरोबर १ लहान मुलगा होता, तो बिचारा भेदरून इकडेतिकडे बघत होता.

म्हणून मी त्या क्लार्कला म्हणालो, "अहो, जाऊ द्या ना, गरीब बाई आहे, करून टाका तिचं काम." तर मला म्हणाला "अहो साहेब, तुम्हाला काय सांगू. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मला दिसतंय, ती गरीब आहे. तिनं तर रेल्वेचं तिकिट पण काढलं नसणारं आहे, तेव्हडे पण पैसे नाहीत तिच्याकडे. पण मी काय करु? मी तिचं काम केलं तर साहेब बोलणार, ह्यानं काम केलं आणि मला पैसे दिले नाहीत, म्हणजे माझे पैसे खाल्ले. आता मी तिच्यासाठी स्वतःच्या खिशातून तर पैसे देऊ शकत नाही ना? तुम्ही सांगा, मी बरोबर की चूक?" मला काय बोलावे ते कळेना. मी १००० रुपये त्याला दिले आणि सांगितलं की तिचं काम करा. त्या क्लार्कने तिला बोलवून तिचं काम केलं, तर तिने अक्षरशः त्या क्लार्कचे पाय धरले. तिला काही माहित नाही, की त्याचे मत का बदलले, पण मुद्दा तो नाही.

आज इतक्या वर्षानंतर पण मला तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. त्या लहान मुलाचा केविलवाणा चेहरा दिसतो. मी बरोबर केलं की चूक, मला माहीत नाही. जे केलं ते स्वतःसाठी, स्वतःच्या समाधानासाठी केलं. पण एक विचार मात्र मनात नक्की येतो की आकाशचं जर फाटलंय, तर मी तरी ठिगळं कुठे कुठे लावणार?

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

कंजूस's picture

24 Jul 2022 - 4:59 am | कंजूस

फाटलं आहे वरपासूनच.

जेम्स वांड's picture

24 Jul 2022 - 8:33 am | जेम्स वांड

त्या स्त्रीचे वाचून फारच वाईट वाटले, तुम्ही केले ते चूक का बरोबर हा मुद्दाच सोडा सरजी, अश्या प्रसंगी तुमची विवेकबुद्धी जे सांगत होती ते तुम्ही केलेत, विवेक सहसा चुकत नाहीत, बिचारीचे काम होण्याशी मतलब, झाले असेल अशी अपेक्षा.

आकाशचं जर फाटलंय, तर मी तरी ठिगळं कुठे कुठे लावणार?

तसं पाहिलं तर आपापल्या परीने ठिगळं लावणारी माणसं आजूबाजूला भरपूर आहेत.

माझी आई मागील वर्षी गेली. तिचा मृत्युचा दाखला आणण्यासाठी मी महानगर पालिकेत गेलो असता तिथे त्यांनी काही कागदपत्रांच्या छायाप्रती आणण्यास सांगीतल्या. मी त्या आणण्यासाठी ज्या दुकानात गेलो त्यांनी छायाप्रती काढण्यासाठी त्यांनी पैसे घेतले नाहीत. म्हणाले की आम्ही एखाद्या व्यक्तीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांच्या छायाप्रतींसाठीसाठी कोणतेही पैसे घेत नाही. आम्ही हे कार्य सेवाकार्य म्हणून करतो. म्हणायला गेलो तर दोन-पाच रुपयाचा प्रश्न होता पण त्याच्या उत्तराने माझ्या डोळ्यात पाणी आले. मनपुर्वक त्याचे आभार मानले तेव्हा तो म्हणाला अशा मनापासून दिलेल्या शुभेच्छाच आम्हाला पैशापेक्षा महत्वाच्या आहेत.

आई आजारी होती तेव्हा तिला वारंवार रक्ताची गरज लागायची. त्यावेळीही अनेक तरुण कोणतीही खास ओळख नसताना रक्तदानासाठी निरपेक्ष भावनेने धावून आले होते.

अनेक रिक्षावाले / टॅक्सीवाले रुग्णांकडून प्रवासाचे पैसे घेत नाहीत किंवा अर्धेच पैसे घेतात.

नुकतेच महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधीत एका कामाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांत जाणे झाले. कोविड काळात कोविडमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबांना सरकारने काही आर्थिक मदत जाहिर केली होती. आज दोन वर्षे झाली तरी काही काही कुटूंबांना ते पैसे मिळाले नाहित. आपत्ती व्यवस्थापन विभागात काही अधिकारी अगदी आस्थेने, कोणत्याही प्रकारची अरेरावी न करता अशा लोकांना मार्गदर्शन करत होते, त्यांना आखून दिलेल्या सीमारेषेपलीकडे जाऊन देखील लोकांना मदत करण्याची धडपड दिसली. त्यामुळे सगळ्या सरकारी कामांत पैसे दिल्याशिवाय काम होतच नाही या समजुतीला आणखी एक तडा गेला.

अजूनही बरेच प्रसंग आहेत. आठवले तेव्हढे लिहिले.
चांगूलपणा अजूनही टिकून आहे. मात्र चांगली लोक आयुष्यात येण्यासाठी भाग्य असावे लागते असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

24 Jul 2022 - 6:32 pm | कर्नलतपस्वी

शेवटी माणूसच आहे कुठल्याही थरावर जाऊ शकतो. देणे लागतो म्हणून देऊन टाकायचे पण आपण मात्र या गोष्टी पासुन लांब रहायचे.आपले टेबल स्वच्छ ठेवायचे.

प्रदीर्घ अनुभव नंतर शिकलोय.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jul 2022 - 1:02 am | अमरेंद्र बाहुबली

छान काम केलंत तुम्ही. ऐकदा मध्य प्रदेशात प्रवास करत होतो. एक म्हातारी कंडक्टर ला तीची कापडी पिशवी दाखवून सांगत होती की ईतकेच आहेत, पण कंडक्टर तिला बस मध्ये घेत नव्हता. मी तिचे भाडे भरले, तीने तीच्या कडे होते नव्हते तेवढे मला देऊ केले पण मी घेतले नाहीत.
एकदा कुठलातरी सरकारी कागद काढायला तहसीलदार ओफीसात गेलो होतो, सही करनार्या अधिकार्याला १०० दिले तर लगेच कागद अथवा १५ दिवसानी अशी प्रोसेस होती. पावसामुळे चपलेला चिखल लागला होता मी ओफीसात घुसताना चप्पल बाहेरच काढली (ओफीस मातीने खराब होऊ नये ह्या हेतूने). हे पाहून त्या अधिकार्याने १०० रूपये घेतले नाहीत. राहुदे म्हणाले.

मी तरी ठिगळं कुठे कुठे लावणार? >> असा विचार मनात आणू नका. Even one Act of Kindness can have ripple effects in our society.
बाकी लेख आवडलाच.

सौन्दर्य's picture

25 Jul 2022 - 11:15 pm | सौन्दर्य

तुम्ही अत्यंत चांगले काम केलंत. तुमची कृती नुसती वाचूनही डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला त्या गरीब स्त्रीचे अतिशय चांगले आशीर्वाद लाभले असणारच, जरी तिला तुम्ही पैसे दिले हे माहीत नसले तरीही.
जगात सर्व प्रवृत्तीची माणसे आहेत, पण माझ्या मते चागली माणसे अजूनही टिकून आहेत म्हणून हे जग चालतंय. आपण चांगले वागत राहायचे बाकी सर्व त्या परमेश्वरावर.आपल्या एका ठिगळाने एकाचं जरी काम झालं तरी त्या ठिगळाचा उपयोग झाला समजायचा.

नमस्कार.