पंचायत - २

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
21 Jun 2022 - 3:29 pm

टीप : पंचायत सीजन १ पहिला नसल्यास पुढे वाचू नये. सीजन दोन चे रसभंग इथे नाही दिले आहेत. त्यामुळे तो पहिला नसल्यास सुद्धा तुम्ही वाचू शकता.

गावच्या गजाली म्हणून मी एक लेखमाला इथे लिहिली होती. ग्रामीण भागांतील सर्वसाधारण जीवन आणि त्यातील सध्या सध्या गोष्टींतील मनोरंजन हि त्याची पार्शवभूमी होती. ऍमेझॉन च्या पंचायत ह्या सिरीज चे कथानक सुद्धा तेच आहे. त्यामुळे मला ती आवडणे अतिशय अपेक्षित होते. पण सर्वानाच हि सिरीज अत्यंत आवडली आहे.

ह्या सिरीज मध्ये काहीही वॊक पणा नाही. नेहमीच्या बॉलिवूड मध्ये जसे तोंडी लावायला सेक्युलॅरिसम किंवा इतर काही अजेंडे नाचवले जातायत तसले काहीही नाही. कुठलाही विवादास्पद मुद्दा नाही. शिवीगाळ नाही आणि सेक्स नाही. कुठेही सिरीज कसलाही प्रचार किंवा तुम्हाला काहीही शिकवायला जात नाही. एकदा इच्छा नसून सुद्धा मला एका घरी सत्यनारायणाला जावे लागले. तिथे यजमान वहिनींनी स्वतः सपाद (प्रसादाचा शिरा) केला होता. तो मला इतका प्रचंड आवडला कि मी थक्क झाले. नंतर अमेरिकेतून मी कधी गावी गेले कि वाहिनी मुद्दाम माझ्यासाठी तो सपाद करून आणायच्या. प्रत्येक वेळी तो शिरा मला इतका सात्विक आणि निर्भेळ आनंद द्यायचा जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्याची चव कि वाहिनीचे ते प्रेम ह्यांनी माझ्यावर गारुड केले होते ठाऊक नाही. पंचायत सिरीज त्याच प्रकारची आहे. सध्या सोप्या मनोरंजनात मनाला स्पर्श करणारे काही तरी आहे.

जितेंद्र कुमार, ज्येष्ठ अभिनेते रघुबीर यादव , नीना गुप्ता सारखे अत्यंत उत्कृष्ट अभिनेते ह्यांत आहेतच पण ज्या कुणी कास्टिंग इथे केले आहे त्याला माझा साक्षात दंडवत. पंचायत सहायक विकास, उप प्रधान प्रल्हाद पांडे किंवा बनराक्षस सारखी जी काही पात्रे इथे उभी केली आहेत त्याला तोड नाही. कुठलेही पात्र हे ओढून ताणून केलेले वाटत नाही. असली माणसे माझ्या गांवात होती हीच भावना पाहताना मनात येत राहते.

गांवातील माणसे छोटी, कमी महत्वकांक्षा असलेली आणि थोडी सरळ वळणाची असतात असे अनेकांना वाटते आणि ते खरे सुद्धा आहे. पण ह्याचा अर्थ त्या माणसांच्या भावना, स्वप्ने खोटी ठरत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी गुपचूप मस्त पैकी थंड बियर झाडाच्या खाली बसून पिणे हि त्यांची पार्टीची संकल्पना कमी खर्चिक असली तरी त्यातून होणारे बॉण्डिंग हे इतर कुठल्याही मैत्रीपेक्षा कमी असत नाही. आपल्याही दारांत संडास असावा असे स्वप्न गांवातील एखाद्या मजुराचे असते. तो निर्माण झाला कि त्याच्या चेहेऱ्यावर जो अभिमान, जी तृप्ती येते त्याला विनोदाची झालर असली तरी कुठे तरी प्रेक्षक म्हणून आम्हाला ती भावना समजते. गांवातील भांडणे हि प्रेक्षक म्हणून आम्हाला साधी आणि विनोदी वाटली तरी त्या लोकांसाठी ती खरीखुरी आणि मोठी असतात. बिग बजेट चित्रपटात जे खलनायक असतात त्या प्रमाणे येथील खलनायक हे मोठे लार्जर देन लाईफ नाहीत. पण गांवावरील संकटांत त्यांची सुद्धा माणुसकी स्पष्ट दिसते.

सत्यजित रे ह्यांच्या पाथेर पांचालीवर तत्कालीन बॉलिवूड मंडळींनी "गरिबीचे उदात्तीकरण" असा आरोप केला होता पण प्रत्यक्षांत त्या चित्रपटानं गरिबी असली तरी चित्रपटाचे मूळ कथानक हे अत्यंत सर्वसामान्य असे होते. गरिबीपेक्षा सामान्य माणसाचे जीवन, त्याची अशा आणि त्याचे बदलते जीवन ह्याचे सुरेख चित्रण होते. गरिबी हि निव्वळ योगायोग होता. त्यामुळे आज सुद्धा पाथेर पांचाली पहावासा वाटतो. अपू आणि त्याची बहीण शेतांतून पळत जातात आणि त्यांना आगगाडी पाहायची असते. त्यांची ती हौस आणि मी गाडी चालवत असताना बाजूने गुगल ची वॉयमो गेली कि तिला पाहायची माझी हौस हि एकाच भावना आहे. त्यांत उणे दुणे नाही. त्याच प्रमाणे पंचायत मधील माणसे, त्यांच्या समस्या, त्याच्या भावना, काळाप्रमाणे एकमेकांत वाढणारी त्यांची भावनिक गुंतवणूक ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या "ग्रामीण" वाटल्या तरी ग्रामीण असणे हा निव्वळ योगायोग आहे. त्या भावनांना आपण कुणीही समजू शकतो.

सीजन २ च्या निमित्ताने फुलोरा गांवाची सैर पुन्हा एकदा घडून येते. सीजन १ मध्ये रिंकी दाखवली नव्हती जी आता जास्त दिसून येते. काही पात्रें जसे उप प्रधान प्रल्हाद वगैरे मंडळी मंडळी जास्त दिसून येतात. माननीय आमदार नावाचे सुद्धा प्रकरण दिसून येते. प्रधान आणि सचिव दोन्ही लोकांतील मैत्री जास्त वाढते आणि ती ठळक पणे दिसून येते. शेवटच्या भागांत एक अशी घटना दाखवली आहे ती हृदय हेलावून टाकते (अनपेक्षित पणे).

सीजन ३ यावा अशी मनापासून अपेक्षा आणि ऍमेझॉन ला शुभेच्छा !

अवांतर :

मागील आठवड्यांत दुर्दैवाने भूल भुलय्या २ नावाचा अत्यंत बाष्कळ आणि निर्लज्ज चित्रपट पाहण्यात आला. असल्या भिकार चित्रपटावर कुणी कसे पैसे गुंतवू शकतो हे समजत नाही. चित्रपटाचे नायक कार्तिक तिवारी (ह्या नटाने आपले आडनावं बदलून आर्यन ठेवले आहे) हा वरून धवन इतकाच अभिनय करण्यास नालायक अभिनेता आहे. त्याचे आई वडील सुद्धा ह्या इंडस्ट्रीत नाहीत त्यामुळे ह्याला नक्की कुणी का काम दिले समजत नाही. चेहेऱ्यावरून मठ्ठ वाटतो. नटी कियारा अडवाणी हिच्यावर पोते भरून मेकअप ओतला असला तरी कुठल्याही फ्रेम मध्ये हि "ठीक" सुद्धा वाटत नाही. अभिनयाच्या बाबतीत फार तर कतरिना ला मागे टाकू शकेल. तुलनेने हिच्या आईच्या (कि काकीच्या ) रोल मध्ये असलेली तब्बू प्रत्येक फ्रेम मध्ये भाव खाऊन जाते.

राजपाल यादव आणि संजय मिश्रा ह्या दोघांनाही नेहमीप्रमाणे फक्त अपमानित करून विनोद निर्मिती केली आहे. असले फुटकळ विनोद मारायला फक्त ह्याचा "छोटे पंडित" सारखी पात्रे का लागतात समजत नाही. एके ठिकाणी तर "चलो पंडितजी आपके गोमूत्र का समय हो गया" असले विनाकारण डायलॉग आहेत. तरी सुद्धा ह्या चित्रपटातून राजपाल आणि संजय मिश्रा काढले तर चित्रपट कुली नंबर १ इतका भिकार चित्रपट बनला असता.

नाट्यसमीक्षा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2022 - 7:55 pm | चौथा कोनाडा

पंचायत २ ... एक नंबर मालिका आहे.

अप्रतिम, बेहद्द आवडली.

पहिल्या पर्वा नंतर दुसऱ्या पर्वाची आतुरतेने प्रतीक्षा करत होतो.
पैसे वसूल झाले.

कुमार१'s picture

21 Jun 2022 - 8:21 pm | कुमार१

पंचायत २ ... एक नंबर मालिका आहे.
+११२२२

कर्नलतपस्वी's picture

21 Jun 2022 - 8:29 pm | कर्नलतपस्वी

दोन्ही भाग पाहिले. कलाकारांच्या अभिनयाने पाहणार्‍याला आपण पण त्या गावातला एक आहोत आसे वाटते.

भडक सिरीजच्या वाळवंटातले ओयासीस म्हणता येईल.

अक्षय कुमारिका भूलभुलैया बघितला, आवडला पण दुसरा नाही बघीतला.

अभावितपणे झालेला भन्नाट विनोद : अक्षय कुमारिका! (अखंड सौभाग्यवतीच्या चालीवर) इंग्रजी विनोदी पात्रं - स्पिन्स्टर्स - यासाठी अगदी चपखल शब्द

कर्नलतपस्वी's picture

21 Jun 2022 - 8:31 pm | कर्नलतपस्वी

अक्षय कुमार वाचावे.

यश राज's picture

21 Jun 2022 - 9:08 pm | यश राज

लेख आवडला

पंचायत २ दोन वेळा पाहिला , खूप छान आहे
सर्व कलाकारांची भूमिका आणि acting मस्त आहे. अगदी आपल्या आसपास वावरतात असे वाटते.
जितू, रघुवीर यादव, नीना गुप्ता , चंदन रॉय , सुनीता राजुवर सगळे अप्रतिम
शेवटचा भाग पहिल्या भागांपेक्षा वेगळा आणि खूप हेलावून टाकणारा आहे.
या सिरीज चा खरा शो stealer हा प्रल्हादचाचा ( उप प्रधान ) ची भूमिका करणारा फैसल मलिक आहे .
पुढचा सीजन लवकर यावा.

उगा काहितरीच's picture

21 Jun 2022 - 10:31 pm | उगा काहितरीच

काहीही म्हणा पंचायत १ खूप छान होतं २ पेक्षा. १ मध्ये बिलकुल कुणीच व्हीलन नव्हता. सगळे कमी अधिक प्रमाणात ग्रे! खूप भावल होतं पाहिलं सिझन. दुसऱ्या सिझन ची खूप वाट पाहत होतो. पहिल्याच दिवशी संपवलं! पण नाही आवडलं इतकं. आमदार/वांरक्षास वगैरे खूप ब्लॅक characters आहेत. काही काही सिन खूप ओढून ताणून आणले असं वाटत होतं. जे की पहिल्या सिझन मध्ये अजिबातच वाटत नव्हता. जे काय आहे ते नैसर्गिक वाटत होतं, एक सहजपणा /साधेपणा होता सगळीकडे तो साधेपणा मिस केला दुसऱ्या सिझन मध्ये. पाहिलं सिझन पूर्ण कमीत कमी ३-४ वेळा तरी पाहिलं असेल, यूट्यूब वर छोटे मोठे सीन्स तर अगणित वेळा पाहिले असतील. पण दुसऱ्या सिझन च्या बाबतीत तरी असं म्हणता येणार नाही. एवढ्या चांगल्या सिरीजने निदान माझी तरी खूप जास्त निराशा केली. :(

सुजित जाधव's picture

22 Jun 2022 - 9:41 am | सुजित जाधव

छान समीक्षण...
जितेंद्र कुमार (आमचा लाडका जितू भैय्या) यांच्या सर्वच वेबमालिकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, त्यांच्या सर्वच मालिका वास्तवदर्शी आहेत...आणि सीजन ३ नक्की येणार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jun 2022 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिला भाग करोना काळात सलग बघत असे भन्नाट जमलेला. दुस-या भागात आता मुड लागेना. संथपणा वाटू लागला आहे, अर्थात नव्या उत्साहाने पुन्हा बघेन. पंचायतबद्दल लिहिलेले तपशीलवार लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

22 Jun 2022 - 11:52 am | सोत्रि

हिंसा, शिव्यांची लाखोली आणि उत्तानता हे काही गरज नसताना पण अविभाज्य अंग झालेल्या वेब सिरीजच्या मांदियाळीत एका वार्‍याच्या झुळूकीसारखी ही वेब सिरीज मनाला थंडावा देऊन जाते. दोन्ही भाग अप्रतिम आणि भन्नाट जमून आलेत. तिसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

अशीच एक उत्तम वेब सिरीज आहे, गुल्लक! कौटुंबीक आणि वास्तवदर्शी!

- (सौम्य वेब सिरीज आवडणारा) सोकाजी

एका वार्‍याच्या झुळूकीसारखी ही वेब सिरीज मनाला थंडावा देऊन जाते. दोन्ही भाग अप्रतिम आणि भन्नाट जमून आलेत. तिसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहे.

अशीच एक उत्तम वेब सिरीज आहे, गुल्लक! कौटुंबीक आणि वास्तवदर्शी!
अगदी अगदी ... सहज सुंदर

वामन देशमुख's picture

28 Jun 2022 - 6:01 pm | वामन देशमुख

अशीच एक उत्तम वेब सिरीज आहे, गुल्लक! कौटुंबीक आणि वास्तवदर्शी!

धन्स, नक्की पाहीन.

सौंदाळा's picture

22 Jun 2022 - 12:43 pm | सौंदाळा

खूप सुंदर, हलकीफुल सिरिज. स्टोरी अशी म्हणावी तर विशेष काहीच नाही पण तरीसुध्दा एकदा चालू केली की सोडवत नाही.
हृषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट पण असेच असायचे.
तुम्ही लिहिलेले परिक्षण, ओळख छानच.
रच्याकने : माझ्या मोबाईलची रिंग्टोन 'पंचायत' ची ठेवली आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Jun 2022 - 9:23 pm | चौथा कोनाडा

रच्याकने : माझ्या मोबाईलची रिंग्टोन 'पंचायत' ची ठेवली आहे.

ग्रेट !
सुंदर आहे पंचायतची सिग्नेचर ट्यून !

वामन देशमुख's picture

28 Jun 2022 - 6:04 pm | वामन देशमुख

माझ्या मोबाईलची रिंग्टोन 'पंचायत' ची ठेवली आहे.

हं. हा प्रतिसाद वाचून मीपण ही रिंगटोन ठेवली. मस्त आहे.

जन् मताला डावलून तिघाडा सरकार स्थापन सेनेने केले याचा राग आलेल्या न पैकी मी एक आहे त्यामुळे जे झालाय त्यात एक आनंद म्हणजेतर जे झाले त्यात सेनेतूनच हा उठाव झाला .. .. घरचा आहेर मिळाला (अर्थात हे गृहीत गृहीत कि खरंच या ३५-४० भाजपबरोबर राहावे असे वाटत आहे " )
असो लवकर घ्या निवडुनिक

मायबाप जनतेने कोना तरी एक पक्षाला चांगले मतदान करावे ... मग तो कोणताही पक्ष असो ..

Nitin Palkar's picture

23 Jun 2022 - 8:31 pm | Nitin Palkar

गल्ली चुकली काय ओ....?

Nitin Palkar's picture

23 Jun 2022 - 9:01 pm | Nitin Palkar

पंचायत... पहिल्या हंगामातील प्रत्येक भाग अनेक वेळा बघितला. दुसऱ्याहंगामाची आत्ता सुरुवात आहे (दोन वेळा बघून झाले...).

वामन देशमुख's picture

28 Jun 2022 - 6:00 pm | वामन देशमुख

पंचायत १ व २, दोन दिवसांत सलग पाहिले.

पहिलं पर्व खूप आवडलं. दुसरं पर्व मध्यापर्यंत आवडलं. शेवटचा दुःखद प्रसंग आवडला नाही, त्या घटनेचे प्रयोजनही कळले नाही.

---

अवांतर: मला विडिओ या माध्यमात फारसा रस नाही; टीवी सिनेमे फारच कमी पाहतो; माझं पाहिलं आणि शेवटचं प्रेम वाचनावरच. पण हा धागा वाचून पंचायत पहायची उत्सुकता झाली आणि पाहून छान वाटलं. धागालेखिकेचे आभार.

---

सवांतर: पंचायतसारख्या कुटुंबातील सदस्यांबरोबर पाहता येणाऱ्या अजून कोणकोणत्या आंतरमालिका आहेत?

यातिल वाहिनी शब्द खूपच खटकला आपण आपला भाऊ किंवा मानलेला भाऊ कल्पून त्याच्या पत्नीस वहिनी असे म्हणतो, वाहिनी नाही म्हणत वाहिनीचा अर्थ वाहून नेणारी .ईथे वहिनी भावाची पत्नी या अर्थी लेखिकेला म्हणायचे आहे म्हणून वहिनीच बरोबर आहे., वाहिनी नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Sep 2023 - 2:41 pm | अमरेंद्र बाहुबली

पंचायत २ आज पाहून संपवलं. शेवटचा भाग अतिशय दुखद आहे. वेबसीरीजच्या जगात ही सिरीज रामायण म्हणावी लागेल. केव्हाही पहा कधीच जूनी होणार नाही.