तो चेहेरा दिसताच माझ्यात काहीतरी बदल होताना मला जाणवतोय. ते मोहक हसू माझ्या ही चेहेर्यावर पसरत जाते. मघा बासरी वाजवताना ऐकू आलेल्या पैंजणाच्या आवाजाची ओळख पटते
मागील दुवा http://misalpav.com/node/49987
मी बासरी वाजवताना मुग्ध होऊन पहाणारा. हा चेहरा मी पहिल्यांदा पाहिला ते ही डोळ्यासमोर उभे रहाते. कदम्बाच्या झाडाला टेकून बासरी वाजवत होतो. त्या वेळेस रागदारी वगैरे काही असतं हेच माहीत नव्हते. बासरी वाजवत होतो. माझे लक्ष्य नव्हते. समोरच्या पायवाटेवरून काही गवळणी पाणी आणायला म्हणून निघाल्या होत्या. माझी बासरी ऐकून त्या काही काळ थांबल्या असतील. काहितरी आवाज आले म्हणून मी डोळे उघडले. समोर तू उभी होतीस. कमरेवरचा पाण्याचा घडा हिंदकाळला होता.
तुझ्या हाताला धरून कावेरीमावशी ओढत होत्या. आणि तुला तेथून हलायचं नव्हतं. तुला बासरी ऐकायची होती.
अगं चलं लवकर. उशीर होईल. घरी जाऊन चूल पेटवायची आहे अजून. कावेरीमावशी तुझा हात ओढत होत्या.
"हो ना थांब जरा एक .... किती छान वाजवतोय हा . तुम्ही पुढे व्हा. ना मी येतेच. पाव घटीकेत." तुला बासरी ऐकायची होती.
"अर्धी घटीका, पाव घटीका म्हणत मघापासून मला थांबवलंस. अगं मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. तुला काय ! सासू आहे घरी. माझे तसे नाही , आत्ता दुपार होईल, आणि घरी कधी जाणार भोजन कधी बनवणार या पुढे"
" मावशी तसे नाही हो. पण कित्ती छान वाजवतोय हा. ऐकलंत ना तुम्ही"
तुमच्या आवाजाने माझी बासरीची तंद्री मोडली. मी डोळे उघडले. बासरी वाजवणं थांबवलं बासरी वादन थांबलं तसं कावेरीमावशी ना जोर आला. त्यांनी तुला अक्षरश ओढत नेलं.
जाताना तू पुन्हा पुन्हा मागे वळून पहात होतीस अगदी दावणीला बांधलेली गाय ओढत नेताना घराकडे वळून पहाते ना तशी. मला तर तसेच वाटले. मी मनात हसलो ही. कदम्बाच्या झाडामागे गाय हंबरली माझे लक्ष्य तिकडे गेले. गायीला गवतात काहीतरी दिसले होते. आणि ती हंबरत होती. सुंदर आणि चंद्रा काठी घेऊन धावत येत होते.
त्यांच्या कडे जायला मी निघालो.
त्या दिवशीची तू लक्ष्यात राहिलीस. का माहीत नाही. कदाचित इतक्या आसोशीने माझे बासरी वाजवणे ऐकत होतीस म्हणून असेल किंवा बासरी वाजवणे इतक्या तन्मयतेने लोक ऐकतात हे मला नव्याने कळाले असेल म्हणून . तू लक्ष्यात राहिलीस की तुझे डोळे हे आत्ता सांगणं कठीण आहे. गोरापान चेहेरा, किंचित कुरळे केस.एखाद्या रेखीव चित्रात चितारलेले असावेत तसे बदामी आकाराचे नेत्र. भरजरी वस्त्राला किंवा चित्राला किनार आखावी तशी काजळाची बारीक रेघ त्या डोळ्यांना अधीकच रेखीव बनवत होती. डोळ्यांमधले भाव कळण्याचे ते वय नव्हते पण काहितरी खूप वेगळे सांगणारे होते ते डोळे. असे लक्ष्य वेधून घेणारे डोळे यशोदामायी चेच पाहिले होते आत्तापर्यंत.
मग तू येतच गेलीस. मी बासरी वाजवत असलो की तू हमखास आसपास असायचीस. सोबत येणार्या इतर गवळणी तुला घरी अक्षरशः ओढून नेईपर्यंत तू तिथेच थांबायचीस. माझ्या बासरीलाही त्याची सवय झाली असावी. तू आसपास असलीस की बासरी चे सूर वेगळेच जाणवायचे. सूर्योदयाच्या वेळच्या प्रकाशकिरणांसारखे. लख्ख , तेजस्वी आणि तरीही कोवळे.
एकदा सगळे सवंगडी गायींमागोमाग गेले होते. कदंबाच्या झाडाखाली मी एकटाच बासरी वाजवत बसलो होतो. वाजवताना इतका तल्लीन झालो होतो माझेच मला भान राहिले नव्हते. मी बासरी वाजवायचा थांबलो आणि डोळे उघडले समोर तू बसलेली होतीस. मला एकटक पहात होतीस.तुझ्या त्या रेखीव डोळ्यातून अश्रुधारा वहात होत्या. त्या पुसण्याचे तुला भान उरले नसावे.मग तू हुंदके देऊन रडायला लागलीस. असे रडताना कोणाला मी कधीच पाहिले नव्हते. काय करावं हे मला उमगेना. मी बासरी वाजवायचा थांबलो आहे हे तुझ्या लक्ष्यात आले असावे. हाताच्या बाहीने डोळे पुसलेस. " काय वाजवलेस तू हे आत्ता." डोळे पुसतापुसता तू विचारलेस.
डोळे पुसताना डोळ्यातले काजळ थोडे फिसकटले. गालावर उतरले. गोर्यापान चेहेर्यावर ते तसे उतरलेलं तसे काजळ उगीचच पावसाळी ढगांची आठवण करून देऊन गेलं.
"काय वाजवलेस रे..... हे इथे एकदम आतपर्यंत पोहोचले बघ. " उजवा तळहात छातीवर मारत तू मला सांगतेस. हे सांगताना तुझ्या चेहेर्यावरचे ते एखाद्या लहान मुलीसारखे भाव इतके निरागस असतात की मला हसू आवरत नाही. मी तोंडभरून हसतो. माझ्या चेहेर्यावरचे ते हसू तुझ्या चेहेर्यावरही पसरते.
का कोण जाणे आपण दोघेही एकदम हसायला लागतो. आपल्याला कसला आनंद झाला आहे हे दोघानाही समजत नाही. समजण्यापलीकडची भावना. दोघांनाही एकाच वेळेस जाणवते. एक अलौकीक अनुभूती ,बासरीच्या स्वरांनी , त्या अनहद नादाने आपल्याला दिली.
क्रमशः
प्रतिक्रिया
30 Apr 2022 - 8:55 pm | कर्नलतपस्वी
छान विजूभाऊ.
1 May 2022 - 4:56 am | सुखी
सुरेख लिहिलं आहे.. बऱ्याच दिवसांच्या अंतराने लिहिल्याने मागचा भाग परत वाचावा लागला
1 May 2022 - 8:09 am | प्राची अश्विनी
छान चालली आहे मालिका.
1 May 2022 - 2:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजूभाऊ, वाचतोय. सुरु ठेवा...!
-दिलीप बिरुटे
6 May 2022 - 12:03 am | विजुभाऊ
हो
http://misalpav.com/node/50097