(लैंगिक सुख ही स्त्री-पुरुष जोडप्यांच्या जीवनातील एक कादंबरी असते. या कादंबरीतील महत्त्वाचे प्रकरण म्हणजे संभोगसुख. या प्रकरणातील फक्त स्त्रीच्या कळसबिंदू संबंधीचे शास्त्रीय विवेचन करणे हा या लेखाचा हेतू आहे. सहजीवनातील प्रेम, भावनिक जवळीक, मानसिक स्वास्थ्य, इत्यादी पैलू या लेखाच्या व्याप्ती बाहेरचे आहेत).
स्त्री-पुरुष समागमाचे दोन हेतू असतात : वैयक्तिक शरीरसुख आणि पुनरुत्पादन. यापैकी फक्त पहिल्याच हेतूचा या लेखात विचार केलेला आहे - त्यातही प्रामुख्याने स्त्रीच्या दृष्टिकोनातून. संभोगातून स्त्री व पुरुष या दोघांना मिळणारे शरीरसुख हे वेगळ्या पातळीवरचे आहे. पुरुषाच्या बाबतीत ही प्रक्रिया अशी सहजसुलभ आहे :
उद्दीपन >> संभोगक्रिया >> वीर्यपतन >> समाधान.
बहुसंख्य पुरुषांत हा सर्व खेळ काही मिनिटात आटोपतो. स्त्रीसुखाच्या बाबतीत मात्र परिस्थिती इतकी सरळसोट नाही. कित्येक जोडप्यात संभोगांती पुरुष समाधान पावतो तर स्त्रीला मात्र ‘त्या’ सुखाची जाणीवही होत नाही. स्त्रीदेहाच्या बाबतीत लैंगिक ‘कळसबिंदू’ (climax) म्हणजे नक्की काय, त्याचे सुख अनुभवण्यासाठी करावा लागणारा खटाटोप आणि त्याचे यशापयश या सर्वांचा आढावा या लेखात घेतो.
सुरुवातीस निसर्ग व उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहू. एक प्रश्न मनात उद्भवणे अगदी स्वाभाविक आहे. निसर्गाने संभोगातील पुरुषाच्या कळसबिंदूची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली आहे, मग स्त्रीच्याच बाबतीत ती गुंतागुंतीची का? याचे उत्तर सोपे आहे. पुरुषाचे वीर्यपतन हे पुनरुत्पादनासाठी अत्यावश्यक आहे. याउलट, स्त्रीच्या कळसबिंदूचा पुनरुत्पादनाशी थेट संबंध नाही. त्यामुळे सजीवांच्या उत्पत्ती दरम्यान ती प्रक्रिया फारशी विकसित झाली नसण्याची शक्यता आहे. किंबहुना निव्वळ संभोगातून कळसबिंदूची अनुभूती सर्व प्राण्यांमध्ये फक्त मानवी मादीलाच येते; अन्य प्राण्यांमध्ये तसे पुरावे नाहीत.
पुरुषाचा कळसबिंदू हा अगदी उघड असून त्याचा परिणाम दृश्यमान आहे. परंतु स्त्रीचा बिंदू ही संबंधित स्त्रीनेच ‘आतून’ अनुभवण्याची गोष्ट आहे. या बिंदूच्या क्षणी शरीरात खालील घटना घडतात :
1. अल्पकाळ टिकणारी अत्युच्च आनंदाची अनुभूती. इथे स्त्री क्षणभर जागृतावस्थेतच्या काहीशी पलीकडे जाते. म्हणूनच हे परमसुख ठरते.
2. योनीचा भवताल, गर्भाशय आणि गुदद्वारा जवळील विविध स्नायूंचे तालबद्ध आकुंचन पावणे. यावर स्वनियंत्रण नसते.
3. वरील दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रीला तृप्ती आणि समाधान लाभते.
हा कळसबिंदू सरासरी 30 सेकंद टिकतो. पण अपवादात्मक परिस्थितीत तो १ मिनिटाहून जास्त काळ टिकल्याचे काही स्त्रियांत आढळले आहे.
(चित्र सौजन्य : Getty images)
वरील वर्णन हे शास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण आहे खरे. परंतु वास्तवात काय दिसते ? निरनिराळ्या स्त्रियांच्या या अनुभूतीमध्ये लक्षणीय फरक दिसून येतात. अशा अनुभवांचे वर्गीकरण असे करता येईल :
1. काही स्त्रिया निव्वळ संभोगक्रियेतूनच कळसाला पोचतात पण यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. तसेच ज्या स्त्रियांना ही अनुभूती येते ती ‘नेहमीच’ येईल असे नसते. या गटातील मोजक्या स्त्रियांत एकाच क्रियेतून ही अनुभूती अनेक वेळाही आल्याचे आढळले आहे.
2. काही स्त्रियांच्या बाबतीत संभोगाच्या जोडीनेच जननेंद्रियातील शिस्निकेला (clitoris) अन्य प्रकारे चेतवावे लागते (हस्तमैथुन). जननेंद्रियातील हा अवयव भरपूर चेतातंतूयुक्त असतो. त्यामुळे तो सर्वात संवेदनक्षम राहतो.
3. तर काही स्त्रियांच्या बाबतीत वरील दोन्ही उपाय जोडीने अमलात आणून सुद्धा कळसबिंदू येतच नाही.
यावरून एक गोष्ट लक्षात येईल. पुरुषाचा कळसबिंदू हा सर्वांसाठी एकसमान आहे. परंतु स्त्रीच्या बिंदूबाबत मात्र खूप अनुभवभिन्नता आहे.
या भिन्नतेतूनच अनेक संशोधकांचे कुतूहल चाळवले गेले. आधुनिक वैद्यकात या महत्त्वाच्या विषयावर गेली शंभर वर्षे संशोधन चालू आहे. त्याचा संक्षिप्त आढावा घेणे रोचक ठरेल. मेरी बोनापार्ट या संशोधिकेने या संदर्भात काही मूलभूत अभ्यास केला, जो पुढील संशोधकांसाठी पथदर्शक ठरला. या विदुषीना लैंगिक क्रियेत खूप गोडी होती परंतु त्यांना निव्वळ संभोगातूनच कळसबिंदू कधीच अनुभवता आला नव्हता. म्हणून त्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी अनेक स्त्रियांच्या जननेंद्रियांची बारकाईने तपासणी केली. त्यातून जो विदा हाती आला तो त्यांनी 1924 मध्ये टोपणनावाने प्रसिद्ध केला. या संशोधनाचे सार समजण्यासाठी स्त्रीच्या जननेंद्रियाची काही मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे.
जननेंद्रियांचे वरून खाली निरीक्षण केले असता त्यात प्रामुख्याने तीन गोष्टी ठळक दिसतात : सर्वात वर असते ती शिस्निका. त्याच्याखाली काही अंतरावर मूत्रछिद्र आणि त्याच्या खाली योनीमुख. मेरीबाईंना त्यांच्या अभ्यासात एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे या तिन्ही गोष्टींमधील अंतर हे सर्व स्त्रियांमध्ये समान नाही. किंबहुना त्या अंतरात बर्यापैकी फरक आढळतो. या अंतरासंदर्भात त्यांनी एक थिअरी मांडली.
* शिस्निका 👈
हे उभे अंतर ३.५ सेमी / त्याहून कमी
* मूत्रछिद्र 👈
* योनीमुख 👈
ज्या स्त्रियांमध्ये शिस्नीका ते मूत्रछिद्र हे अंतर ३.५ सेंटीमीटरपेक्षा कमी असते त्या स्त्रियांमध्ये निव्वळ संभोगातून कळसबिंदूस पोचण्याचे प्रमाण चांगल्यापैकी असते. याचे स्पष्टीकरण सोपे आहे. शिस्निका जितकी योनिमुखाच्या जवळ राहते तितके पुरुष लिंगाचे तिच्याशी सहज घर्षण होते. या थिअरीवर पुढे बराच काथ्याकूट झाला. काही अभ्यासांतून तिला पुष्टी देणारे निष्कर्ष मिळाले तर अन्य काही अभ्यासातून तसे मिळाले नाहीत. खुद्द मेरीबाईंनी स्वतःवर तीनदा शस्त्रक्रिया करवून घेऊन ते अंतर कमी करून घेतले. तरीसुद्धा पुढे त्यांना त्याचा अपेक्षित परिणाम जाणवला नाही !
यानंतरच्या ३ दशकांमध्ये अन्य काही संशोधकांनीही या मूळ संशोधनात भर घातली. विविध स्त्रियांमध्ये ते ‘ठराविक अंतर’ कमी किंवा जास्त का असते याचा सखोल अभ्यास झाला. त्यातून एक रोचक गोष्ट पुढे आली. प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या गर्भावस्थेतील जीवनात असते तेव्हा त्या गर्भावर स्त्री आणि पुरुष हार्मोन्स अशा दोन्हींचा प्रभाव पडत असतो. ज्या गर्भांच्या बाबतीत पुरुष हार्मोनचा तुलनात्मक प्रभाव जास्त राहतो त्या स्त्रीत मोठेपणी ते ठराविक अंतर जास्त राहते. याउलट, ज्या गर्भावर स्त्री हार्मोन्सचा प्रभाव तुलनेने खूप राहतो त्या जननेंद्रियामध्ये संबंधित अंतर बऱ्यापैकी कमी राहते. मेरीबाईंची थिअरी पूर्णपणे सिद्ध झाली नाही पण ती निकालातही काढली गेली नाही हे विशेष.
यापुढील कालखंडात अनेक संशोधकांनी अधिक अभ्यास करून आपापली मते मांडली. त्यामध्ये प्रामुख्याने मनोचिकित्सक डॉ. Sigmund Freud यांची दखल घ्यावी लागेल. त्यांच्या मते संभोगातून कळसबिंदूस पोचणे हे मुळातच स्त्रीच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. मुली वयात येत असताना प्रथम त्या मुलांप्रमाणेच शिस्निकेच्या हस्तमैथुनातून हे सुख अनुभवतात. पुढे जर त्यांची मानसिक वाढ उत्तम झाली तरच त्या हे सुख निव्वळ संभोगाद्वारे अनुभवू शकतात. त्यांच्या मते अशा प्रकारचे सुख अनुभवता येणे ही लैंगिकतेतील निरोगी आणि विकसित अवस्था असते.
या थिअरीवर बरेच चर्वितचर्वण झाले. त्या विचारांचा एक दुष्परिणामही दिसून आला. आधीच बर्याच स्त्रियांना निव्वळ संभोगातून कळसबिंदूचे सुख मिळत नाही. त्यामुळे या माहितीतून अशा स्त्रियांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला. आज शंभर वर्षे उलटून गेल्यानंतर ही थिअरी पूर्णपणे मान्य केली गेलेली नसली तरी अजूनही काही प्रमाणात ती विचाराधीन आहे.
१९६०-७० च्या दशकापर्यंत या संशोधनामध्ये अजून काही भर पडली. तत्कालीन संशोधकांमध्ये विल्यम मास्टर्स व व्हर्जिनिया जॉन्सन या जोडप्याचे महत्वाचे योगदान आहे. ते आणि अन्य काही संशोधकांच्या अभ्यासानंतर एका मुद्द्यावर बऱ्यापैकी एकमत झाले. तो म्हणजे, समागमादरम्यान जर स्त्रीची शिस्निका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या चेतविली गेली तरच स्त्रीला कळसबिंदू येतो; अन्यथा नाही. मास्टर्स व जॉन्सन यांच्या भरीव संशोधनानंतर या विषयाचे परंपरागत प्रारूप असे तयार झाले :
लैंगिक सुखाची इच्छा >> उत्तेजित अवस्था>> कळसबिंदू >>> समाधान आणि पूर्वावस्था.
स्त्रीला पुरेशी उत्तेजित करण्यासाठी संभोगपूर्व कामक्रीडांचे (चुंबनापासून इतर उत्तेजक क्रियांपर्यंत) महत्त्व आहे. परंतु त्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. त्या क्रीडांतून उत्तेजना वाढते आणि परिणामी कळसबिंदूस पोहोचण्याची शक्यता वाढते. परंतु या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. इथेही विविध स्त्रियांमध्ये यशापयशाचे वेगवेगळे अनुभव आलेले आढळतात. अलीकडील संशोधनातून वरील परंपरागत प्रारूप हे अतिसुलभीकरण असल्याचे तज्ञांचे मत झाले आहे. ज्या स्त्रियांमध्ये अन्य घटकांमुळे कळसबिंदू येण्याची शक्यता कमीच असते (किंवा नसते), त्यांच्या बाबतीत संभोगपूर्व क्रीडांमुळे दरवेळी यश येईलच असे नाही. त्यामुळे या क्रीडा म्हणजे कळसबिंदूस पोहोचण्याचा खात्रीशीर उपाय म्हणता येत नाही.
इथपर्यंतच्या संशोधनामध्ये मुख्यत्वे स्त्रियांच्या शारीरिक तपासणीवर भर दिला गेला होता. 1980 नंतर मानवी शरीराचा आतून सखोल अभ्यास करण्यासाठी विविध वैद्यकीय उपकरणे उपलब्ध झाली. सुरुवातीस अल्ट्रासाउंड आणि पुढे एमआरआय स्कॅन यांचा यापुढील संशोधनात चांगला उपयोग झाला. ज्या स्त्रियांना निव्वळ संभोगातून हे शरीरसुख मिळत होते त्यांच्या योनिमार्गाचा बारकाईने अभ्यास झाला. त्यातून योनीमार्गामधील एका अतिसंवेदनक्षम बिंदूची कल्पना मांडली गेली. या बिंदूला G असे नाव देण्यात आले. यापुढील संशोधनात मात्र अशा विशिष्ट बिंदूचे तिथले अस्तित्व थेट सिद्ध करता आलेले नाही. काहींनी असे मत व्यक्त केले आहे की हा बिंदू म्हणजे वेगळे असे काही नसून ते शिस्निकेचेच एक विस्तारित मूळ असावे.
संभोगादरम्यानचे स्त्री-पुरुषांचे स्थान हाही एक कुतूहलाचा विषय आहे. बहुसंख्य जोडप्यांमध्ये स्त्री खाली आणि पुरुष वर ही पद्धत वापरली जाते. या प्रकारे ज्या स्त्रियांना कळसबिंदू येत नाही अशांच्या बाबतीत वेगळे प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. परंपरागत पद्धतीच्या बरोबर उलट पद्धत (म्हणजे स्त्री वर आणि पुरुष खाली) आचरल्यास काही जोडप्यांना या बाबतीत यश येते. या उलट प्रकारच्या पद्धतीत शिस्निकेचे घर्षण तुलनेने सुलभ होते. अर्थात याही मुद्द्याचे सरसकटीकरण करता येत नाही. त्यात वैयक्तिक कौशल्यानुसार अनुभवभिन्नता राहते.
सरतेशेवटी एक रंजक मुद्दा. काही स्त्रियांमध्ये त्या झोपेत असताना सुद्धा त्यांना कळसबिंदूचा अनुभव आलेला आहे. या स्थितीत त्या नक्की कुठल्या प्रकारे चेतविल्या गेल्या हे अजून स्पष्ट झालेले नाही.
स्त्रीचे शरीरसुख या विषयावर एक शतकाहून अधिक काळ संशोधन होऊनही आज त्या विषयाचे काही कंगोरे धूसरच आहेत; त्यावरील गूढतेचे वलय अद्यापही कायम आहे.
सामाजिक दृष्टीकोन
परिपूर्ण लैंगिक ज्ञान हा शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात समाजातील विविध स्तरांचे निरीक्षण केले असता वेगवेगळे अनुभव येतात. एकूणच स्त्री-लैंगिकता हा विषय अजूनही काहीसा निषिद्ध मानला जातो. त्यावर खुली चर्चा करणे शिष्टसंमत नसते; बरेचदा दबक्या आवाजातच यावर बोलणे होते. अलीकडे विविध वृत्तमाध्यमे आणि दृश्यपटांमधून या विषयाची चांगली हाताळणी केलेली दिसते. २०१८च्या ‘लस्ट स्टोरीज’ या हिंदी चित्रपटातील शेवटची कथा हे या संदर्भात पटकन आठवणारे एक उदाहरण (https://en.wikipedia.org/wiki/Lust_Stories). कामक्रीडेदरम्यान पुरुषाने त्याचा कार्यभार उरकला तरीही स्त्रीच्या शरीरसुखाला गृहीत धरता येणार नाही, हा मुद्दा त्यात अधोरेखित झाला आहे. ज्या स्त्रिया ( व त्यांचे जोडीदार) अशा साहित्यांत रस घेतात त्यांच्या माहितीत यामुळे नक्कीच भर पडते आणि त्याचा त्यांना वैयक्तिक लैंगिक आयुष्यात फायदा होतो.
मात्र समाजाच्या काही स्तरांमध्ये हा विषय पूर्णपणे निषिद्ध आहे. किंबहुना समागम म्हणजे पुनरुत्पादनासाठी केलेली आवश्यक क्रिया इतकेच त्याचे स्थान मनात असते. पुरेशा लैंगिक शिक्षणाअभावी या स्तरातील स्त्रियांना कळसबिंदूच्या मूलभूत सुखाची जाणीवही करून दिली जात नाही. अशा स्त्रियांच्या बाबतीत एकदा का अपेक्षित पुनरुत्पादन उरकले, की मग हळूहळू त्या क्रियेतील गोडी कमी होऊ लागते. ते स्वाभाविक आहे.
त्या क्रियेतून मिळणारे अत्त्युच्च सुख जर एखाद्या स्त्रीने कधीच अनुभवले नसेल, तर तिच्या दृष्टीने समागम म्हणजे पुरुषी वर्चस्व असलेली आणि आपल्यावर लादलेली गचाळ क्रिया आहे असे मत होऊ शकते. ही भावना अर्थातच सुदृढ मनासाठी मारक आहे. त्यातून लैंगिक जोडीदारांमध्ये विसंवादही होतात. त्यादृष्टीने विविध माध्यमे आणि शिबिरांमधून या नाजूक पण महत्त्वाच्या विषयावर जोडप्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. अलीकडे स्त्रियांची मासिक पाळी या विषयावर मुक्त आणि भरपूर चर्चा सार्वजनिक मंचांवर होताना दिसतात. तद्वतच स्त्रीच्या या अत्युच्च सुखाबाबतही पुरेशी जागृती होणे आवश्यक आहे.
..................................................................................
प्रतिक्रिया
11 Apr 2022 - 1:07 pm | कानडाऊ योगेशु
ह्या दोन्ही भावनांना म्हणुनच "भूक" ह्या एकाच शब्दाने संबोधत असावे.
असेही वाचल्याचे आठवते कि एखादा माणुस जेवण कसे करतो ह्यावरुन तो संभोग कसा करत असावा ह्याचेही अनुमान लावता येते.
11 Apr 2022 - 1:32 pm | कुमार१
>>>
रोचक आणि एकदम कडक वाक्य !
अधिक बोलणे नलगे
एक सलाम स्वीकारावा 😀
11 Apr 2022 - 2:16 pm | सुरिया
रिअली?
हे व्हिजुअलायझेशन पॉर्न समजुयात का?
मान्य आहे हे एखाद्या व्यक्तीला बघुन होत ही असते पण जेवण्यासारख्या गोष्टीतले असे जनरलायझेशन?
त्या हिशोबाने ब्रिटिश एटिकेटस पाळनारे, रॉयल फॅमिलीज वगैरे फारच हुच्च समजायला पाहिजेत सेक्स मध्ये. ;)
11 Apr 2022 - 10:38 pm | कानडाऊ योगेशु
लोल. ह्याला फारतर ट्रेन्ड बिहेविअर म्हणता येईल. पण एखाद्या गाफिल क्षणी खरी मानसिकता(पसायकॉलोजी) दिसुन येत असावी.
माझ्या कंपनीतला किस्सा सांगतो. दुपारचे लंच फ्रि असते कंपनीत व कधी कधी केटरर एखादा फास्ट फुड आयटम पण ठेवत असत. एका दिवशी पहिल्यांदीच त्याने पाणीपुरी ठेवली. प्रत्येक जण खायला उतावीळ झाला होता. सगळ्यात जास्त उतावीळ झाला होता कंपनीचा एम.डी ज्याचा पगार कोटी मध्ये असावा.आणि त्यावेळी सगळे स्टेटस वगैरे विसरुन अक्षरशः हमरीतुमरी करुन रांगेच्या अग्रभागी आला आणि पाणीपुरीची डिश घेतली. एरवी शहरातली महागतली महाग व उत्कृष्ठ अशी कुठलीही डिश तो घेऊ शकत होता पण त्यावेळेला त्याची ती मानसिकता अचानक समोर आली. त्यानंतर अनेक वेळा केटरर ने पाणीपुरी ठेवली होती पण नंतर आमचा एम.डी कधीही पुन्हा तसे करताना दिसला नाही. कदाचित त्यालाही तो प्रकार तितकासा बरोबर नव्हता हे जाणवले असावे.
12 Apr 2022 - 7:29 am | कुमार१
तुमचा मूळ मुद्दा अगदी पटला आहे. घाईघाईत उरकणे की आस्वाद घेत करणे हे बऱ्याच कृतींना लागू होते.
..............
आता तुम्ही वर जो जेवणाचा किस्सा लिहिला आहे त्यानिमित्ताने थोडेसे अवांतर लिहिण्याचा मोह होतोय. संदर्भ जरा वेगळा आहे. क्षमस्व.
विजय तेंडुलकरांचा ‘एक भूक दंगल’ नावाचा एक फार सुंदर लेख आहे. अन्न फुकट मिळतंय म्हटल्यावर कुठल्याही सामाजिक स्तरातील माणसे त्यावर कशी तुटून पडतात त्याचे त्यात सुरेख वर्णन आहे. लेखातले फक्त शेवटचे वाक्य उद्धृत करतो:
!
12 Apr 2022 - 8:30 pm | टर्मीनेटर
अरे वाह... चर्चा चांगलीच रंगली आहे!
गेले काही दिवसा मिपा वर येणे झाले नव्हते त्यामुळे चर्चेत सहभागी होता नाही आले त्यासाठी क्षमस्व.
13 Apr 2022 - 8:21 am | कुमार१
अभिप्राय, पूरक माहिती आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्व सहभागी मंडळींचे आभार !
लैंगिक जागरुकता या उद्देशाने हा लेख लिहिला. या नाजूक विषयाबद्दल आपण सर्वांनी केलेली चर्चा रंजक आणि माहितीप्रद होती.
आपणा सर्वांना दीर्घकाळ उत्तम लैंगिक आरोग्यसुख लाभो !
13 Apr 2022 - 11:55 am | चौथा कोनाडा
धागोचित शुभेच्छा !
:-)
14 Apr 2022 - 1:32 pm | प्रकाश घाटपांडे
तर्कवादी, कानडाउ योगेशु, सुबोध खरे इ. चे प्रतिसाद विशेष आवडले.
शारिरिक संबंध हा शब्द प्रयोग ज्यावेळी व्यवहारात, न्यायालयात वापरला जातो त्यावेळी त्याचा अर्थ प्रत्यक्ष संभोग क्रिया घडलेली आहे असा आहे का? प्रत्यक्ष संभोगा व्यतिरिक्त अन्य प्रणयक्रिडा याचा समावेश असल्यास देखील ते शारिरिक संबंधच असतात की! संभोगात फक्त गर्भधारणेचा धोका असतो तो प्रणयात नसतो. मग शारिरिक संबंध या शब्दप्रयोगाची व्याप्ति कशी आहे?
14 Apr 2022 - 2:04 pm | कुमार१
संबंध या शब्दाचे शब्दकोशातील अर्थ असे आहेत :
पु. संयोग; संसर्ग; नातें; २ (ल.) विवाह; लग्न.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%...
आणि लग्न म्हटले की संभोग गृहीत आहे.
आता कायद्याचे म्हणाल तर आपल्याकडील मूळ कायदा इंग्लिशमध्ये आहे. त्यामुळे मूळ इंग्लिश शब्द तिथे काय वापरले जातात आणि त्यांच्या व्याख्या काय हे न्यायालयीन अभ्यासक सांगू शकतील.
कायद्यामध्ये बलात्कार, विनयभंग इत्यादी शब्दांच्या व्याख्या सुस्पष्ट आहेत. परंतु निव्वळ शारीरिक संबंधच्या व्याख्येबाबत कल्पना नाही.
15 Apr 2022 - 7:53 pm | कुमार१
धाग्याच्याच विषयावर एक मराठी पुस्तक नव्याने प्रकाशित होत आहे.
इच्छुकांसाठी त्याच्या प्रकाशन समारंभाचे निमंत्रण :
15 Apr 2022 - 8:29 pm | चौथा कोनाडा
छान आमंत्रण !
पण .. पुस्तकाचं मुखपॄष्ठ फारच जनरल वाटते !
15 Apr 2022 - 8:47 pm | कुमार१
अगबाई खरच की !
:)
15 Apr 2022 - 9:21 pm | मित्रहो
खर तर बऱ्यात दिवसांनी डॉक्टरांच्या वर्डलच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मी मिपावर आलो होतो की आजपासून वर्डल अर्काव्ह बंद झाले. तसे न्यूयॉर्क टाइम्सने सांगितले. हा धागा दिसला आणि वाचला. चर्चा वाचली
खूप माहितीपूर्ण धागा आणि चर्चा. बरीच माहिती मिळाली फक्त मुळात या विषयावर अजूनही पूर्ण संशोधन झाले नाही असेच वाटते. बऱ्याच गोष्टी शक्यता आहेत. शेवटी दोघांनी एकमेकांना समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. तरुण वयात त्याचसाठी वेळ द्यायला कुणी तयार होत नाही.
16 Apr 2022 - 9:27 pm | कुमार१
>>> +११
................
मास्टर्स ऑफ सेक्स मालिकेचा 12 भागांचा पहिला मोसम बघून संपवला. केवळ सुंदर ! अतिशय उत्कृष्ट चरित्रपट मांडला आहे. मालिकेत दाखवलेले संशोधन मूळ संशोधनाच्या बऱ्यापैकी जवळ जाणारे असावे असे वाटते.
1960 च्या दशकातली अमेरिका छान चितारली आहे. जेव्हा डॉ. मास्टर्स चित्रफिती सह हा विषय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसमोर सादर करतात त्या सभेतच कुलगुरू त्यांच्यावर उखडतात, “हे योग्य नाही, अश्लील आहे. इथे बायकाही बसलेल्या आहेत” वगैरे. या सर्वाची परिणती डॉक्टर मास्टर यांची हॉस्पिटल मधून हकालपट्टी होण्यात होते.
25 Apr 2022 - 7:31 pm | नगरी
काय लिहू? कदाचित स्वतंत्र पोस्ट आज उद्या टाकेन
माझा question मार्क मुद्दाम उलट आहे
25 Apr 2022 - 7:44 pm | कुमार१
म्हणजे हे एक अजून गूढ !
25 Apr 2022 - 11:49 pm | गामा पैलवान
कुमारेक,
स्त्रीची सांभोगिक जडणघडण व कार्य हे दोन्ही तिच्या ऋतुचक्राशी घनिष्ठपणे निगडीत असावीत असं मला वाटतं. योग्य ऋतुकाळ असेल तर तिची कामतृप्ती स्वाभाविकपणे होते. अन्यथा अधिक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, हे एक सर्वसाधारण निरीक्षण आहे. यासंबंधी अधिक वाचायला आवडेल.
हा मुद्दा आजूनपर्यंत चर्चेस कसा आला नाही याचं आश्चर्य वाटतं. जमल्यास कृपया विवेचन करावे ही विनंती.
आ.न.,
-गा.पै.
26 Apr 2022 - 5:30 am | कुमार१
लैंगिक ओढ आणि ऋतुचक्र हा विषय कुतूहलजनक आहे. परंतु या संदर्भातले काही जुजबी संशोधन चाळले असता गोंधळात पडायला होते. असे बरेचसे अभ्यास हे स्त्रियांच्या अतिशय मर्यादित गटांवर झालेले दिसतात. स्त्रियांच्या अनुभवांमध्ये अशी भिन्नता आढळते :
१.सर्वसाधारणपणे मासिक चक्राच्या 10 ते 13 या दिवसांत दरम्यान लैंगिक वासना सर्वाधिक असते
२. परंतु, काहींच्या बाबतीत प्रत्यक्ष पाळीदरम्यान संभोग इच्छा वाढलेली आढळली
३. तर काहींच्या बाबतीत ऋतुचक्र समाप्तीच्या वयादरम्यान ती वाढलेली आढळते !
सर्वांना लागू होईल असा निष्कर्ष काढणे इतके सोपे नाही.
अजून एक मुद्दा.
लैंगिक इच्छा वाढणे आणि उत्कटबिंदूस पोचणे हे सुद्धा प्रत्येक वेळी जमून येईलच असे होत नाही. निव्वळ संभोगातून या बिंदूस पोहोचणे हे वाटते तितके सोपे नाही. त्यासाठी खूप झटून तंत्र आत्मसात करावे लागते.
असो.
या विषयावरील अधिकृत खात्रीशीर संदर्भ मी शोधत राहीन. तसे काही मिळाल्यास नव्याने लिहीन
धन्यवाद !
27 Apr 2022 - 7:56 pm | सुबोध खरे
स्त्रियांची कामेच्छा हि स्त्रीबीज तयार होण्याच्या वेळेस ( ovulation) वाढलेली आढळते.
यामुळे स्त्री संबंधाला तयार होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
याचे कारण इस्ट्रोजन या स्त्री संप्रेरकाची रक्तातील पातळी यावेळेस सर्वात जास्त असते आणि हि पातळी एका विशिष्ट पातळीच्या वर गेली कि मेंदूतून एल एच हे संप्रेरक स्त्रवते आणि बीजांडकोषातून स्त्री बीज बाहेर पडते. या स्त्री बीजाचे पहिल्या २४ ते ३६ तासात फलन झाल्यास गर्भ धारणा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. याच कारणासाठी वंध्यत्वावर इलाज करताना डॉक्टर या २४ ते ३६ तासात संबंध ठेवण्यास सांगतात.
यामुळेच निसर्ग या काळात स्त्रीची कामेच्छा वाढवण्याचे काम करत असतो.
Many women will tell you that their sex drive is stronger at certain times of the month. Those tracking their monthly cycles will likely discover that these urges increase right before ovulation.
https://www.verywellfamily.com/in-the-mood-you-may-be-ovulating-1960259#...(LH).
26 Apr 2022 - 2:23 pm | बिपीन सुरेश सांगळे
गंभीरपणे मांडलेला गंभीर विषय
कुमार सर
खूप गोष्टींची उत्तम माहती देता
आभार
8 May 2022 - 9:46 am | कुमार१
वरील चर्चेत अशी सूचना आलेली आहे की स्त्रीच्या मानसिक अवस्थेचा कळसबिंदूशी असलेल्या संबंधावरही विवेचन व्हावे. त्यानुसार या विषयाचे काही प्राथमिक वाचन केले.
विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. तूर्त काही महत्त्वाचे मुद्दे :
लैंगिकक्रिये साठी सहज उत्तेजित होणे आणि त्यातूनच पायरीपायरीने कळसबिंदूस पोचणे अशी एकंदरीत प्रक्रिया आपण पाहिली आहे. यासंदर्भात स्त्रियांची ढोबळमानाने दोन गटात विभागणी करता येईल :
A. बिंदूचे सुख मिळण्याची अधिक शक्यता खालील प्रवृत्तीच्या स्त्रियांमध्ये आढळते :
१. स्व-मादकतेची जाणीव
२. आत्मविश्वास व धिटाई
३. दुसऱ्यावर वचक ठेवणारा स्वभाव
४. इतरांचे लक्ष आपल्याकडे नेहमी वेधले जाईल या अनुषंगाने केलेले आकर्षक राहणीमान
५. संभोगातून मिळणाऱ्या आनंदानुभावाची नित्य उत्सुकता
B. या उलट दुसर्या गटामध्ये बिंदूचे किंवा एकंदरीतच संभोग प्रक्रियेचे सुख मिळण्याची शक्यता कमी राहते. त्या स्त्रियांची स्वभाववैशिष्ट्ये अशी असतात :
१. सतत चिंता/ काळजी करणे
२. निराशावादी वृत्ती आणि ताणतणाव सहन करण्याची क्षमता कमी असणे
३. जोडीदारासंबंधी मनात असणाऱ्या अप्रीति, राग इत्यादी भावना.
४. संभोगाबद्दल तिरस्काराची भावना
५. प्रत्यक्ष क्रियेदरम्यान कौशल्याचा अभाव
11 May 2022 - 2:56 pm | वामन देशमुख
प्रतिसादातील मुद्दे विचारणीय वाटले; पटले.
यावर विस्तृत लेख वाचायला आवडेल.
11 May 2022 - 3:33 pm | कुमार१
धन्यवाद.
सवडीने विचार करू
29 May 2022 - 1:58 pm | प्रसाद गोडबोले
कळसबिंदु चे परमोच्च सुख प्राप्त करुन घेण्यासाठी काय काय केले पाहिजे हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे ;)
10 May 2022 - 12:56 pm | प्रकाश घाटपांडे
वैद्यकीय अभ्यासक्रमात फक्त योनीद्वारे होणाऱ्या संभोगाला नैसर्गिक व इतर लैंगिक क्रियांना अनैसर्गिक संबोधले जात होते. आता यापुढे असे वर्गीकरण करता येणार नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमातील ‘एलजीबीटी’ समुदायाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. वैद्यक आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अरुणा वाणीकर यांनी त्या अनुषंगाने एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. यात डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. विजेंद्रकुमार (दिल्ली), डॉ. प्रभा चंद्रा (बंगळूरू) व डॉ. सुरेखा किशोर (गोरखपूर) या तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने ‘अनैसर्गिक’बाबतचा आपला अहवाल दिला आहे.
https://www.loksatta.com/maharashtra/national-medical-commission-removed...
10 May 2022 - 6:03 pm | चौथा कोनाडा
माहितीपुर्ण.
फक्त नाव बदलले "अनैसर्गिक"च्या ऐवजी "अपायकारक" हा शब्द वापरणार.
अशा संबंधातून एखाद्याला / एखादीला त्रास झाला तर "अपायकारक"च्या नावाखाली तक्रार करून शिक्षा घडवता येणारच की !
एलजीबीटीच्या अनुषंगाने लैंगिकतेच्या इतरही बाबींवर चर्चा होत आहे हे आशादायक चित्र आहे.
10 May 2022 - 6:48 pm | कुमार१
आता एलजीबीटीच्या अनुषंगाने वैद्यकात "लैंगिक अल्पसंख्याक" हा शब्द रूढ झालाय.
त्याबद्दल इथे लिहीले होते.
11 May 2022 - 12:52 pm | चौथा कोनाडा
"लैंगिक अल्पसंख्याक" शब्द समर्पक वाटतो, पटला. (पण, शब्द मोठा आहे)
सातत्याने वापरला तर रुळून जाईल.
11 May 2022 - 7:36 am | चौकस२१२
थोडेसे विषयान्तर
- समलिंगी व्यक्तींमध्ये ( पुरुष उदाहरण घेऊयात ) जोडीत एक पुरुष हावभावाने स्त्री सारखा वागतो असतो आणि एक पुरुष हा पुरुषी दिसतो / वागतो वागतो ! असे दिसते
तर दोघांच्यात मानसिक / शास्त्रीय दृष्ट्या काय फरक असतो ?
एका चित्रपटातील वाक्य काहीसे असे होते " दोन क्वीन्स एकतर कधी नसतात !"
11 May 2022 - 8:49 am | कुमार१
प्रश्न चांगला व ‘चौकस’ आहे ! याचे मर्यादीत उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.
मुळात (स्त्री अथवा पुरुष) समलैंगिकता का निर्माण होते हा गहन प्रश्न आहे. त्याचे ठाम असे उत्तर सापडलेले नसल्याने विविध जैविक थिअरीज मांडल्या गेल्या आहेत :
१. व्यक्तीच्या X गुणसूत्रावरील डीएनए संबंधित विशिष्ट रचनेतील भेद.
२. गर्भावस्थेत असताना आईच्या हार्मोन्सचा झालेला कमी-अधिक प्रभाव.
त्यामुळे या सूक्ष्म पातळीवर जे काही बदल दोन व्यक्तींमध्ये असतील तिथे कुठेतरी याचे उत्तर असावे.
....
तृतीयपंथीसंबंधी थोडे वेगळे लिहिता येईल. अशा ज्या निरनिराळ्या व्यक्ती असतात त्यांच्यात स्त्री व पुरुष गुणधर्मांचे प्रमाण भिन्न असते (म्हणजे 80 अधिक 20 टक्के किंवा 30 अधिक 70 टक्के वगैरे). कुठला गुणधर्म अधिक प्रभावी आहे त्यानुसार लैंगिक क्रियेतील ‘भूमिका’ ठरत असावी.
............
आता मास्टर्स ऑफ सेक्स या मालिकेतील एक प्रसंग सांगतो.
एक व्यावसायिक समलैंगिक पुरुष आहे. त्याला एकदा दुसरा पुरुष विचारतो की तू तुझ्या व्यवसायामध्ये ‘कर्त्या’ची भूमिका घेतोस की ‘स्वीकारण्याच्या’ भूमिकेत असतोस ? त्यावर तो उत्तरतो,
“माझी दोन्हींची तयारी असते. परंतु बहुतांश वेळा मला स्वीकारण्याच्या भूमिकेत जावे लागते (ग्राहकाच्या तशा मागणीनुसार).
हे कल्पनेतील संवाद वास्तवाच्या किती जवळ जाणारे आहेत त्याची मला कल्पना नाही.
11 May 2022 - 12:03 pm | चौकस२१२
माझ्य कल्पनेतील एक उत्तर
१) जो समलिंगी पुरुषी स्त्री सदृश्य वागतो ( भडक किंवा सॊम्य ) हा कुठेतरी मनात स्वतःला स्त्री समजत असावा? ( यातील काही पुढे जाऊन लिंग बदल पण करून घेतात )
२) जो समलिंगी पुरुषी कर्त्या’ची भूमिका घेतो तो मुख्यत्वे पुरुष असतो आणि कदाचित त्याला पुरुष स्त्री दोघांशीही संभोग करून आनंद मिळत असावा .
नुसता अंदाज माझा कोणतेही शास्त्रीय कारण नाही
समलिंगी स्त्री जोडप्यात पण तेच फक्त °शब्द १८० ° बदलावे असो
10 May 2022 - 1:23 pm | कुमार१
धन्यवाद.
चांगली माहिती.
समितीच्या चर्चा चालू असल्याचे मध्यंतरी कानावर होते
10 May 2022 - 5:50 pm | गामा पैलवान
कुमारेक,
माझ्या मते योनीची रचना संभोगासाठी अनुकूल असते. याउलट इतर अवयवांची रचना तशी नसते. त्यामुळे योनीव्यतिरिक्त इतरत्र केलेला संभोग अनैसर्गिक धरायला हरकत नाही.
आ.न.,
-गा.पै.
10 May 2022 - 6:01 pm | कुमार१
तज्ञांच्या समितीने बराच विचारविनिमय करून तो निर्णय घेतलेला दिसतो. मी एवढेच पुस्ती जोडेन:
१. योनी संभोग हा पुनरुत्पादनाच्या दृष्टिकोनातून नैसर्गिक आहे.
तर...
२. अन्य प्रकारचे संभोग हे सुखवैविध्याच्या दृष्टिकोनातून वेगळ्या अर्थाने नैसर्गिक म्हणता येतील.
नैसर्गिक आणि natural या शब्दांच्या खोलात गेल्यास कदाचित अजून काही वेगळे समजू शकेल. कोणी सांगावे
11 May 2022 - 9:47 am | सुबोध खरे
नैसर्गिक या शब्दाची व्युत्पत्ती पाहिली तर यौनसंबंध सोडला तर इतर सर्व संबंध अनॆसर्गिकच म्हणावे लागतील.
स्त्रीच्या शरीरात योनी मध्ये जसे अत्युच्च सुखाचे संवेदक असतात तसे कोणतेही संवेदक गुदद्वारात( किंवा इतर अवयवात) असल्याचा शास्त्रीय पुरावा नाही. त्यामुळे योनी सोडल्यास इतर ठिकाणी केलेला संभोग हा जास्त करून मानसिक असतो शारीरिक नव्हे
कायदा हा गाढव असतो कारण जीवशास्त्रात काळे आणि पांढरे यात एक रेषा नसून करड्या रंगाच्या अनेक छटा असतात.
जेंव्हा तुम्ही अज्ञान या शब्दाची व्याख्या ठरवता तेंव्हा वय वर्षे १८ हि काटेकोर रेषा ठरवली आहे. त्यामुळे १७ च्या वर्षी बलात्कार करणारा अज्ञान ठरतो त्यामुळे
त्याने केलेल्या गुन्ह्याला शिक्षा फारच थोडी आहे तेच वयाची १८ वर्षे पूर्ण झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याने केलेला गुन्हा हा भयानक गंभीर ठरतो.
असेच १७ वर्षाच्या बायकोशी केलेला यौनसंबंध सुद्धा बेकायदेशीर म्हणून बलात्कार ठरतो.
तेंव्हा केवळ मद्रास उच्च न्यायालयाने ठरवून दिले म्हणजे ती काही काळ्या दगडावरची रेघ ठरत नाही. उद्या मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले कि या संबंधाला
अनैसर्गिकच म्हटले पाहिजे तर त्यांना मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय हा बंधनकारक नाही तेंव्हा मुंबईत याला अनैसर्गिक म्हटले जाईल आणि मद्रास मध्ये असंगत.
इंग्रजीत याला abnormality न म्हणता sexual deviation (विसंगत आचरण) म्हणतात ते जास्त योग्य आहे.
11 May 2022 - 12:44 pm | प्रकाश घाटपांडे
दोन वर्ष लिव्हइनमध्ये राहून त्यांनी नुकतीच आत्ता एंगेजमेंटही केलीय. स्वागत करूया लीना नायर आणि ऋजुता जामगावकरचं! अतिशय उत्तम मुलाखत आहे एक वेगळाच पैलू आपल्या नजरेसमोर येतो.
https://www.storytel.com/in/en/books/sex-var-bol-bindhast-s03e09-1710186
11 May 2022 - 12:48 pm | कुमार१
आणि स्वागत या 'जोडप्याचे' !
14 May 2022 - 2:27 pm | कुमार१
योगायोग !
@ प्र घा
नुकताच तुम्ही हा संदर्भ दिला होतात.
आज मी प्राईम व्हिडिओवर नव्याने आलेली Modern लव्ह मुंबई ही कथामालिका पाहण्यास सुरुवात केली. त्यातील दुसरी ‘बाई’ नावाची कथा समलैंगिक पुरुषांच्या प्रेमाबद्दल असून त्यात त्या दोघांचा विवाह झालेला दाखवला आहे.
कथा तरल आहे.
11 May 2022 - 12:54 pm | sunil kachure
ह्या विषयावर चर्चा किती ही करा निष्कर्ष तो पण थोडा तरी ठाम निघू शकणार नाही.
सेक्स आणि organisms.
खुप घटकावर अवलंबून आहे.
१)सेक्स करण्यासाठी असणारे अवयव सशक्त हवेतआणि कोणतेच व्यंग असलेले ,कमजोरी असलेले नसावे.
इथे शरिरशास्त्र वरील अभ्यासातून निष्कर्ष काढता येतात.
२) जिथे ज्या जागेत सेक्स करायचा असतो ती जागा नवखी नसावी,परिषयाची असावी.सुरक्षित आहे ह्याची पूर्ण खात्री असावी.
३)है व्यक्ती शी सेक्स करणार आहात तिच्या शी आपले काय नाते आहे ह्याचा मनावर पगडा असतो.
समाज नियमाने ज्या नात्यात सेक्स ची क्रिया घडणे चुकीचे असते.त्याच व्यक्ती शी सेक्स करताना एक अपराधी भावना असते.
४) नात्यात किती ओलावा आहे हा घटक सर्वात महत्वाचा असतो सेक्स मध्ये सर्वोच्च क्षण अनुभवण्यास .व्यवहारिक नात्यात हा क्षण कधीच अनुभवता येणार नाही.
५) शरीराचे कोणते भाग सेक्स करण्याची भावना वाढवतील काय किंवा कोणत्या प्रकारात सेक्स चा सर्वोच्च अनुभव मिळेल हे प्रतेक व्यक्ती च्या सेक्स विषयी आवडी निवडी वर आहे.
६)शास्त्र ह्या सर्व घटकांना कव्हर करू शकत नाही.त्या मुळे शास्त्रीय रित्या फक्त सेक्स करणाऱ्या अवयव ची क्षमता फक्त हेच सिद्ध करता येईल.
बाकी अनेक घटक सायन्स सिध्द करू शकत नाही.
11 May 2022 - 1:13 pm | चौथा कोनाडा
गल्ली चुकली की काय ?
सुका साहेब, आपलयाला " orgasm " असं म्हणायचंय का ?
11 May 2022 - 2:23 pm | वामन देशमुख
हा आणि इतर असंख्य प्रतिसाद पाहता, बालमिसळपाव असा वेगळा विभाग सुरू करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
---
बाकी, वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे लागू आहेतच.
11 May 2022 - 2:40 pm | sunil kachure
अभ्यास वाढवा
सेक्स मध्ये सर्वोच्य बिंदू म्हणजे काय ह्याचा पहिला अभ्यास करा.
भारतात काहीच लोकांना त्याची अनुभवती होते
तसेच खरे प्रेम म्हणजे काय ह्याचा अभ्यास करा.
लाखात ekadhya व्यक्ती लाच त्याची anubhati होते.
काही तरी बकवास प्रतिसाद देवू नका
.
11 May 2022 - 2:52 pm | वामन देशमुख
अले, अच्चं जालं?
---
बाकी, चांगल्या धाग्यांचा काश्मीर करण्यात काही मिपाकरांचा हातखंडा आहेच म्हणा.
11 May 2022 - 1:36 pm | sunil kachure
स्पेलिंग चुकीचं टाईप झाले घ्या समजून.सुधारता तर आता येणार नाही.
चूक तर झालीच आह.
11 May 2022 - 3:02 pm | कानडाऊ योगेशु
चूक तर झालीच आह.
कचुरे साहेबांचा प्रतिसाद लिहितानाच ऑरगॅझम झाल्यासारखे वाटले.
16 May 2022 - 9:11 am | कुमार१
जरा अवांतर, पण लैंगिकते संदर्भात असल्याने इथे लिहितो.
https://www.loksatta.com/mumbai/kissing-fondling-not-unnatural-bombay-hc...
16 May 2022 - 12:05 pm | चौथा कोनाडा
बरोबर. निरागस पप्पी देखील असू शकते
16 May 2022 - 1:29 pm | तुषार काळभोर
बातमीमध्ये असा उल्लेख आहे:
ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने १४ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला.
लोकसत्ताने मथळा देताना खोडसाळपणाने किंवा गलथानपणाने चुकीचे शब्द वापरलेत:
चुंबन घेणे हा लैंगिक गुन्हा नाही! ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण, आरोपीला जामीन मंजूर
न्यायालयाने संबंधित कृत्य लैंगिक गुन्हा आहे, हे मान्य करताना ते कृत्य अनैसर्गिक आहे,असे म्हणण्यास नकार दिलाय. शिवाय POCSO कलम कायम ठेवलंय.
चुंबन घेणे हा लैंगिक गुन्हा आहेच, असे दिसते .
16 May 2022 - 2:18 pm | कुमार१
बातमीचे शीर्षक चुकीचे असल्याने अर्थाचा अनर्थ होतो.
...
>> कलम 294 संदर्भात इथे काही उहापोह आहे.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने असाच काहीतरी निकाल दिलेला दिसतोय. वर टिपणीही केली आहे.
अश्लील (obscene) याची व्याख्या आयपीसीमध्ये सुस्पष्ट नाही असे दिसते.
अर्थात अज्ञान मुलगा हा वेगळा मुद्दा आहे.
18 May 2022 - 10:07 am | सुबोध खरे
पूर्ण बातमी वाचली तर आरोपीने केलेले कृत्य कलम ३७७ प्रमाणे "अनैसर्गिक लैंगिक कृत्य" मध्ये मोडत नाही.
ओठांचे चुंबन घेणे आणि लैंगिक अवयवाला स्पर्श करणे हा अनैसर्गिक लैंगिक कृत्याचा गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे.
Section 377 in The Indian Penal Code
377. Unnatural offences.—Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal, shall be punished with 1[imprisonment for life], or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine. Explanation.—Penetration is sufficient to constitute the carnal intercourse necessary to the offence described in this section.
या शिवाय आरोपी १ वर्ष तुरुंगात आहे त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा असे म्हटलेले आहे.
आरोपी निर्दोष आहे असे कुठेही म्हटलेले नाही
16 May 2022 - 2:44 pm | sunil kachure
स्त्री जोपर्यंत स्वतः पुढाकार घेत नाही तो पर्यंत कोणते हे कृत्य पुरुष करत असेल तर तो मानवी कायद्या नुसार गुन्हाच आहे
सेक्स ही स्त्री आणि पुरुष दोघांची गरज आहे.संयम पुरुषाला सेक्स हवा असतो आणि स्त्री ला नको असतो.
हा बकवास विचार आहे.
पुरुष संयमी झाले तर खूप प्रगती करतील.
18 May 2022 - 10:11 am | सुबोध खरे
काही पुरुष टंकन संयमी झाले तर मिपा खूप प्रगती करतील (करेल).
18 May 2022 - 1:22 pm | चौथा कोनाडा
😄
29 May 2022 - 11:14 am | कुमार१
"रधों आणि स्त्री-लैंगिकता"
चांगला लेख.
र. धों. कर्वे यांच्या प्रखर बुद्धिवादाचा आजच्या बुद्धिमांद्य आलेल्या समाजाला परिचय व्हावा, या हेतूने महाराष्ट्र फाऊंडेशनने (अमेरिका) रधोंवर www.radhonkarve.com हे संकेतस्थळ तयार केले आहे.
अभिनंदन !
31 May 2022 - 1:36 pm | तर्कवादी
र. धों. कर्वे यांचा अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेला चरित्रपट "ध्यासपर्व" हा आवर्जुन पहाण्यासारखा आहे.
रघुनाथ कर्वे यांची व्यक्तिरेखा किशोर कदम यांनी साकरली आहे.
थोडा वादाचा मुद्दा असू शकेल पण माझ्या मते जर गांधीजी सारख्या नेत्यांनी कर्वेंवर टीका न करता त्यांच्या संततीनियमनाशी संबंधित कार्याला थोडा जरी जाहीर पाठिंबा दिला असता तर आज भारताची लोकसंख्या १३० कोटी पेक्षा बरीच कमी असती. कर्वे प्रखर बुद्धिवादी असलेत तरी लोकप्रिय नव्हते तर गांधीजींच्या लोकप्रियतेला तोड नव्हती.
31 May 2022 - 2:20 pm | कुमार१
>>>+११
पाहिलाय.
त्या संस्थळावर चक्कर टाकली. रचना छान आहे.
2 Jun 2022 - 8:41 pm | चौथा कोनाडा
संकेतस्थळ +१
कित्येक वाक्यं सुभाषित म्हणून ध्यानात रहावीत अशी आहेत !
2 Jun 2022 - 8:45 pm | कुमार१
शंभर वर्षांपूर्वीची काही संशोधने भन्नाट आहेत.
आज त्यांचा फेरविचार करावा लागेल.
11 Jul 2022 - 5:50 pm | Trump
स्त्रीयांच्या योनी मार्गातील असलेल्या जिवाणुंचा वापर करुन नवीन बीयर बाजारात आली आहे.
https://www.maxim.com/maxim-man/worlds-first-vagina-beer-has-arrived-201...
जर तुमच्याकडे €10,000 असतील तर तुमच्या आवडत्या स्त्रीच्या जिवाणुच्या बीअरचा आस्वाद घेउन शकता.