पटवर्धन अण्णा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
23 Feb 2022 - 12:44 pm

पटवर्धन सरांकडे आम्ही इंग्लिश विषयासाठी क्लासला जायचो. युनायटेड इंग्लिश स्कूल अर्थात आमच्याच शाळेतून खूप पूर्वी सर रिटायर्ड झालेले होते. शाळेत होते म्हणून सर नाहीतर त्यांना अण्णा म्हटलेलंच आवडायचं. बरीच मुलं त्यांना सर म्हणायच्या ऐवजी अण्णाच म्हणत. सर घरीच इंग्रजीचे क्लास घ्यायचे. फक्त 9 वी आणि 10 वी ची मुलं. सकाळी 7.30 ते 8.30 10 वीची बॅच, 8.30 ते 9.30 9 वीची बॅच आणि शेवटी 9.30 ते 10.30 परत एक दहावीची बॅच. एवढ्या तीनच बॅच दिवसभरात असायच्या. त्यांच्या घरातल्या त्या छोट्याश्या पडवीत हा क्लास चालायचा.एक वेळी जास्तीत जास्त 15 ते 17 मुलं माऊ शकतील एवढीच खोली होती ती. खूपच दाटीवाटीने सगळी मुलं तिथे बसायची. त्यामुळे सरांकडे क्लाससाठी आधीपासून नंबर लावायला लागायचा. जेव्हा इतर कलासेसची फी महिन्याला 100 किंवा 150 होती तिथे अण्णांच्या क्लास चि फी फक्त 40 रुपये होती.

अण्णांच्या घरासमोर छोटंसं अंगण होत. तिथे सगळ्यांच्या सायकली पार्क केलेल्या असायच्या. क्लास भरताना आणि सुटताना काय व्हायचा तो थोडाफार मुलांचा आवाज व्हायचा.एरवी या घरात 15/20 मुलांचा क्लास चालू आहे याचा पत्ता लागणार नाही इतका pindrop silence असायचा. एरवी वर्गात कितीही धुमाकूळ घालणारी मुलं असली तरी इथे सगळीच शांत असायची. अण्णा कधी ओरडलेले आठवतच नाहीत. किंबहुना या माणसाला ओरडता येत असेल का अशी शंका यावी इतके ते शांत होते.कमालीचा संयम होता त्यांच्याकडे. एखादा हुशार आणि दुसरा ढ म्हणून कोणालाही वेगळी खास वागणूक नव्हती त्यांच्याकडे. सगळी मुलं शिकायला आली आहेत आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करणार यावर त्यांचा कटाक्ष होता.

अण्णाकडे जायचं म्हणजे तयारी करून जावं लागायचं. उद्या काय शिकवणार हे आधीच माहीत असायचं. त्यामुळे आदल्या दिवशी तो धडा वाचून त्यातले अडलेले शब्द डिक्शनरीतून शोधून वहीत टिपून ठेवावे लागत. सर कुणालाही विचारायचे. सरांनी कधी आयतं काही दिल नाही.डिक्शनरी बघायची सवय लागायला हवी म्हणून हे बंधन. वाचताना सर मग शब्दाचा अर्थ विचारायचे. तो सांगितला की मागचा पुढचा शब्द बघितला का? त्याच्या पाठी,पुढे कोणता शब्द होता?, naun, pronaun, verb इत्यादी कोणते प्रकार हे त्या त्या अनुषंगाने समजवायचे. केवळ गरजेपुरता एकच शब्द बघितला हे त्यांना पटत नसे. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी या सगळ्याची गरज पटवून द्यायचे. 10 वी आहे म्हणून उगाच बाऊ करायचे नाहीत. नेहमीची वार्षिक परीक्षा जशी अभ्यास करून देऊ तशीच ही पण. हे सगळे असूनही त्यांचा एकही तास कधीही रटाळ झालेला मला आठवत नाही. कायम हसतमुख. कोणतीही शंका विचारा, चुटकीसरशी सोडवणार. आपण जो विषय शिकवतो तो आधी आपण समजून घेऊन मग मुलांना शिकवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं.जर आपल्यालाच समजाला नसेल तर मुलांना काय समजावणार?अस त्यांचं मत होत. टवाळ मुलांना देखील ते कधी ओरडले नाहीत. पण हळूच कानपिचक्या मात्र देत. ज्याला बोललं जाई त्याला बरोबर कळे. आणि मग गडबड बंद होई नि अभ्यास पूर्ववत चालू होई.

शिक्षण संपल्यावर सगळी मुलं अपल्यापल्या क्षेत्रात कामाला लागली. अण्णांनी पण वयानुसार थकल्यावर क्लास बंद केले. कधी कोणी परत चिपळूणला आले तर क्वचित सरांना भेटत. मी चिपळूणलाच असल्याने बऱ्याच वेळा सरांची भेट होई. कधी आसपास च्या घरी गेले असेन तर आवर्जून सरांना भेटून येत असे. वयानुसार थोडं विस्मरण सुरू झालं होतं. त्यामुळे गेल्यावर जरी मला ओळखल असलं तरी आता कुठे असतेस काय करतेस हे प्रश्न अगदी न चुकता विचारात.माझ्याच बॅचच्या इतर मुलांचीही चौकशी मग होत असे. अण्णा बरीच वर्षे त्याच घरात राहत होते. क्लास चालू असताना संक्रांत असेल तर तिळगुळ किंवा आणखी काही असेल तर त्यानुरूप छोटा खाऊ अण्णा सगळ्यांना द्यायचे. आतादेखील जायचे तर श्रीखंडाची गोळी, लिम्लेटची गोळी हातावर टेकवायचे. आता आम्ही तेव्हढे लहान नाही राहिलो अस हसून म्हणाले की मग म्हणायचे, 'तुझ्यासाठी नाहीच दिली. घरी गेलीस की लेकाला दे माझ्याकडून खाऊ म्हणून.'

खूप प्रेमळ होते अण्णा. मध्यंतरी पुरानंतर एकदाच भेटले त्यांना.पण त्यावेळी खूप थकल्याचे वाटले. आता काहीच दिवसांपूर्वी अण्णा गेल्याच कळलं आणि मन भरून आलं. शेवटची भेट नाही होऊ शकली याच खूप वाईट वाटलं. आम्हाला इंग्रजी शिकवणारे, शांत आणि संयमी असणारे, आपल्या विद्यार्थ्यांवर मुलांसारखं प्रेम करणारे अण्णा कायमच आमच्या समरणात राहतील.

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

23 Feb 2022 - 12:52 pm | चौथा कोनाडा

पटवर्धन सरांचे सुंदर व्यक्तिचित्र !

अण्णाकडे जायचं म्हणजे तयारी करून जावं लागायचं. उद्या काय शिकवणार हे आधीच माहीत असायचं. त्यामुळे आदल्या दिवशी तो धडा वाचून त्यातले अडलेले शब्द डिक्शनरीतून शोधून वहीत टिपून ठेवावे लागत. सर कुणालाही विचारायचे. सरांनी कधी आयतं काही दिल नाही.डिक्शनरी बघायची सवय लागायला हवी म्हणून हे बंधन. वाचताना सर मग शब्दाचा अर्थ विचारायचे. तो सांगितला की मागचा पुढचा शब्द बघितला का? त्याच्या पाठी,पुढे कोणता शब्द होता?, naun, pronaun, verb इत्यादी कोणते प्रकार हे त्या त्या अनुषंगाने समजवायचे. केवळ गरजेपुरता एकच शब्द बघितला हे त्यांना पटत नसे. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी या सगळ्याची गरज पटवून द्यायचे. 10 वी आहे म्हणून उगाच बाऊ करायचे नाहीत. नेहमीची वार्षिक परीक्षा जशी अभ्यास करून देऊ तशीच ही पण. हे सगळे असूनही त्यांचा एकही तास कधीही रटाळ झालेला मला आठवत नाही. कायम हसतमुख. कोणतीही शंका विचारा, चुटकीसरशी सोडवणार. आपण जो विषय शिकवतो तो आधी आपण समजून घेऊन मग मुलांना शिकवला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असायचं.जर आपल्यालाच समजाला नसेल तर मुलांना काय समजावणार?अस त्यांचं मत होत. टवाळ मुलांना देखील ते कधी ओरडले नाहीत. पण हळूच कानपिचक्या मात्र देत. ज्याला बोललं जाई त्याला बरोबर कळे. आणि मग गडबड बंद होई नि अभ्यास पूर्ववत चालू होई.

सुंदर लिहिलं आहे !

त्या पिढीतील बरेच शिक्षक जेवढे कडक तेवढे असे आदरणीय होते !
आमच्या व्ही एस कुलकर्णी सरांची आठवण झाली ! त्यांनी गरीब मुलांना कधी फी मागितल्याचे आठवत नाही.

कर्नलतपस्वी's picture

23 Feb 2022 - 1:48 pm | कर्नलतपस्वी

असेच आमचे दाजी भाऊ दीक्षित, कडक शिस्त, परखड विचार आणि गणित, इंग्रजी विषयाचे . फी बद्दल कधीच विचारले नाही. हे खरे गुरू o

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 Feb 2022 - 2:20 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण आताशा असे "चितळे मास्तर" टाईप गुरु मिळणे फार दुर्मिळ. जिथे टेट सारख्या परीक्षेत पास होण्यासाठी भावी शिक्षकच लाच देतात त्यांच्याकडुन पुढे काय अपेक्षा ठेवणार? आणि आजकालच्या महागाईच्या जमान्यात त्यांनी तरी फीबाबत मागे का रहावे आणि कमी फी का घ्यावी? त्यामुळे पाहिजे तेव्हढी फी घ्या पण उत्तम शिकवा असे म्हणावे लागते.
पण मी म्हणतो तेही चांगलेच म्हणायचे, नाहीतर नाक्यानाक्यावर कोचिंग क्लासेसच्या नावाखाली दुकानदारी करणारेच पुष्कळ भेटतात.कोण नीट्,कोण आय आय टी मेन्स्/अ‍ॅडव्हान्स, कोण सी ई टी, कोण टॉफेल्/जी आर ई सगळ्यांची संस्थाने बनली आहेत. सुपर ३०, कोटा फॅक्टरी सारखे चित्रपट आणि वेब सीरीज बघितल्या तर शिक्षण क्षेत्रातील परिस्थिती बघुन सर्वसामान्य माणसाच्या पोटात गोळाच येईल.

एम .पी. एस. सी /यु. पी .एस .सी ची तर जी काय वाट लावलेय सरकारने ती सर्वांनाच माहितेय. या सगळ्यात विद्यार्थी आणि पालक मात्र भरडले जात आहेत.

सरिता बांदेकर's picture

23 Feb 2022 - 2:39 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलंय. असे शिक्शक तुम्हाला लाभले तुमचे भाग्य.शिकवताना कडक पण प्रेमळ.

मुक्त विहारि's picture

23 Feb 2022 - 4:33 pm | मुक्त विहारि

सुरेख लेख

मालविका's picture

1 Mar 2022 - 5:55 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार!

खूप सुंदर पण थोडक्यात आटपलात असे वाटले.
कळकळीने शिकवणारे शिक्षक अजूनही आहेत पण त्यांचे प्रमाण खूपच कमी झालय असं वाटतं.
काही पण म्हणा पण शाळेत शिकवणारे शिक्षक दिर्घकाळ स्मरणात राहतात. अकरावी पासून ते पुढे शिक्षण पुर्ण होईपर्यंत नंतर असे दोनच शिक्षक मला आठवतात. मात्र शाळेतले अगदी बालवाडी पासून ते दहावी पर्यंत कितीतरी शिक्षक लक्षात आहेत.