दोन किस्से

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
31 Jan 2022 - 7:52 pm

दोन किस्से

१) परवा शनिवारी माझ्याकडे एक २७ वर्षाची गरोदर मुलगी सोनोग्राफीसाठी आली होती. तिला (अंगावर जात होते) रक्तस्त्राव होत होता. सोनोग्राफी केली त्यावेळेस गर्भ ९ आठवड्याचा असायला हवा होता, तो केवळ ६ च आठवड्याचा होता आणि जन्मजात विकलांग( MALFORMED) होता. अर्थात हृदयाचे ठोके चालू नव्हतेच. त्यामुळेच रक्तस्त्राव होत होता. म्हणजेच नैसर्गिक रित्या गर्भपात होणार होता.

मी त्या रडत असलेल्या मुलीला समजावत होतो कि हि एक निसर्गाची करणी आहे. तुम्ही सडका आंबा झाडाला चिकटवू शकत नाही. हा गर्भ व्यंग असलेला असल्यामुळे एका विशिष्ट वाढीनंतर वाढीला असमर्थ असल्याने हृदयावर ताण पडतो आणि हृदय काम करेनासे होते आणि गर्भपात होतो. यासाठी तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडे परत जा. ते आपले गर्भाशय साफ करून घेतील.

अशा मुलींची मनस्थिती नाजूक असते. आपण वजन उचलले किंवा अननस पपई मटण असे काही "उष्ण" खाल्ल्यामुळे असे झाले असेल असा त्या स्वतःला "दोष" देत असतात.

मी त्यांना समजावतो कि लग्न अगोदर गरोदर झालेल्या अनेक मुली आमच्या कडे येत असतात. डॉक्टरांकडे जायच्या अगोदर पपई मटण वगैरे खाऊन त्या गर्भपात करून घेण्याचं प्रयत्न करतात परंतु असा गर्भपात होत नाही म्हणून शेवटी नाईलाजाने त्या डॉक्टरांकडे येतात इ इ.

हे सर्व समजावत असताना तिची सासू मला एकदम विचारती झाली कि "डॉक्टर, हा मुलगा होता कि मुलगी?"

मी अवाकही झालो आणि मला संतापही आला.
मी त्या सासूला थोड्या चढ़या सुरात म्हणालो कि हे असलं तुम्ही माझ्याकडे विचारायचं नाही आणि सध्या तुमच्या सुनेची मानसिक स्थिती काय आहे ते लक्षात घ्या.

त्या सासूला तिचा मुलगा (मुलीचा नवरा) म्हणाला मम्मी तू जरा गप्प बस. आणि ते आपले रिपोर्ट घेऊन गेले.

माझी पत्नी तेथेच होती. तिने मला विचारले कि ज्या गर्भाचे लिंग तयारही झालेले नाही आणि गर्भपात होणाऱ्या( मृत) गर्भाचे लिंग जाणून घेण्याचा हा काय अट्टाहास?

मी तिला थंडपणे म्हणालो कि "मुलगी असती तर हि सासू तिला समजावणार होती कि जाऊ दे गेली तर काय झालं? मुलगीच होती, बरं झालं".

माझी पत्नी हतबुद्धच झाली.

२) एक ५० वर्षाच्या सुस्थितीतील एक बाई माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून डाव्या दंडात दुखतंय म्हणून आल्या होत्या. त्यांच्या डॉक्टरांनी तिला शिरेत गुठळी झाली आहे का हे तपासण्यासाठी डॉपलर सोनोग्राफी करण्यासाठी पाठवलं होतं.
मी त्यांना काय होतंय ते विचारलं तेंव्हा त्या म्हणाल्या कि डॉक्टर मी मागच्या वर्षी एप्रिल मध्ये (एप्रिल २०२१) कोव्हिडची लस घेतली, तेंव्हा पासून माझ्या दंडात दुखत आहे. मी विचारलं दंडात इंजेक्शन नंतर किती दिवसांनी दुखायला लागलं? त्यावर त्या म्हणाल्या कि ऑक्टोबर २१ पासून दुखायला लागलं.

मी त्यांना म्हणालो कि हि गोष्ट असाधारण( UNUSUAL)आहे कारण इंजेक्शन घेतल्यावर पाच सहा महिन्यांनी तेथे दुखायचं काहीच कारण नाही.

त्यांची फाईल पाहायला घेतली तेंव्हा असे लक्षात आले कि डावा हात दुखतो आहे म्हणून त्यांनी हृदयाची तपासणी करून घेतली होती त्यात इ सी जि, इको कार्डिओग्राफी छातीचा आणि दंडाचा एक्स रे इ सर्व तपासणी झालेली होती. ज्यात काहीच नव्हतं. फ्रोझन शोल्डर म्हणून ३ आठवडे फिजियोथेरपी सुद्धा झाली होती त्यानंतर आयुर्वेदिक औषधोपचार सुद्धा झालेला होता.

डॉपलर सोनोग्राफी मध्ये काहीच नव्हतं. दंड जेथे दुखत होता( जिथे इंजेक्शन देतात) तो डेल्टोईड स्नायू सुद्धा व्यवस्थित होता खांद्याच्या सांध्याच्या स्नायू मध्ये सुद्धा काही नव्हते. सांधे सुद्धा व्यवस्थित होते.

यानंतर मी त्यांना हात थोडासा पुढे उचलून वर करायला सांगितला. बरोबर त्याच वेळेस त्यांना दंडाच्या स्नायूमध्ये दुखत असे. मी सोनोग्राफी करून स्नायू मध्ये अशा उचललेल्या अवस्थेत काही नाही हे पाहून घेतले

आणि त्यांना विचारले कि तुम्ही आपला मोबाईल किती वेळ वापरता आहात? त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि अहो तिचा मोबाईल सतत हातात असतो, किती तास ते विचारू नका. का हो काय कारण?

मी त्यांना म्हणालो कि त्यांचा हात दुखतो आहे तो सतत डाव्या हातात मोबाईल धरून वर उचलल्यामुळे स्नायूवर ताण पडतो आहे. मोबाईल वर उचलण्याच्या स्थितीत कायम हात राहिल्यामुळे तो स्नायू थकतो( MUSCLE FATIGUE) आहे.

त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि आमची मुले स्थिरस्थावर झालेली आहेत, मुलांची लग्ने झाली आहेत आणि ते वेगळे राहतात आणि मी गेली दोन वर्षे घरून काम करतो आहे त्यामुळे ती भरपूर वेळ मोबाईलवर असते आणि कायम त्यावर व्हिडीओ पाहणे चालू असते. अगदी स्वयंपाकघरात काम करत असतानासुद्धा.
तिला तुम्ही "मोबाईलचा वेळ" कमी करायला सांगा.

मी त्यांना म्हणालो कि मोबाईल वर किती वेळ घालवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तेंव्हा त्याबद्दल त्यांना सांगायचा मला तसा अधिकार नाही.

मी एकच सांगू शकतो कि तुम्ही मोबाईलचा स्टॅन्ड घेऊन या जो १००-२०० रुपयात मिळेल. आणि हातात धरून ठेवण्यापेक्षा स्टॅण्डवर ठेवून वापरा.

तुम्ही हॅन्ड्स फ्री इअर फोन वापरू शकता. त्यावर यजमान म्हणाले कि अहो तिला व्हर्टिगोचा त्रास सुरु झाला म्हणून कान नाक घसा च्या डॉक्टरांनी इअरफोन वापरू नका सान्गितलंय.

आता मला समजलं कि तिला डावा खांदा का दुखतोय? तुम्ही तिला मोबाईल कमी वापर म्हणून सांगा.

मी त्यांना परत सांगितलं कि हा अधिकार मला नाही.

मी त्यांना म्हणालो कि माझ्याकडे डावा खांदा आणि मान दुखतो म्हणून काही मध्य वयीन महिला सोनोग्राफी साठी आल्या होत्या. त्या काम करताना तेंव्हा डावा खांदा वर करून मोबाईल कान आणि खांदा यात धरून तासन तास मोबाईलवर मैत्रिणीशी गप्पा मारतात असे आढळले. जसे वय वाढते तसे मानेला स्पाँडायलॉसिस चा त्रास सुरु होतो आणि अशी मान वाकडी धरून ठेवली कि मानदुखी चालू होते.

त्यावर यजमान म्हणाले अहो हि सुद्धा पोळ्या करताना डाव्या कानाला मोबाईल लावून अर्धा पाऊण तास मान वाकडी करून बोलत राहते.

एवढा सगळं होऊनही त्या बाई काही मी मोबाईल "कमी वापरेन" असं म्हणत नव्हत्या.

मी काय बोलणार?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

31 Jan 2022 - 8:11 pm | कुमार१

हातात धरून ठेवण्यापेक्षा स्टॅण्डवर ठेवून वापरा.

>>> पटेश +११

राघवेंद्र's picture

31 Jan 2022 - 8:15 pm | राघवेंद्र

पाहिला किस्सा मन्न खिन्न करणारा आणि दुसरा खूपच जवळचा वाटणारा. खूप जण बघितले आहेत.

पहिला प्रसंग अतिशय हृदयद्रावक आणि करुण.

दुसरा प्रसंग: इथेही वाईट वाटते. एक प्रकारची व्यसनाधीनताच.

तुमची प्रसंग समोर मांडण्याची हातोटी अतिशय वस्तुनिष्ठ आणि म्हणूनच विचार करायला भाग पाडणारी आहे. स्वत:चे शब्दबम्बाळ भाष्य न करता नेमके जे घडले त्याचे सार समोर मांडणे. वाचकाचे मन आपोआप योग्य ते टिपते आणि जो इम्पॅक्ट साध्य व्हायला हवा तो होतो.

ता.क. अशी काहीशी मांडणी डॉ. अवचट यांची सुरुवातीच्या काळात असे. कदाचित एक डॉक्टर असल्याने अशी दृष्टी येत असावी.

तुमची प्रसंग समोर मांडण्याची हातोटी अतिशय वस्तुनिष्ठ आणि म्हणूनच विचार करायला भाग पाडणारी आहे १००%

Bhakti's picture

31 Jan 2022 - 8:30 pm | Bhakti

पहिला किस्सा जशासा तसा माझ्याबरोबर घडला . दुसर्‍या वेळेस सुदृढ मुलगी झाल्यावर नणंद म्हणाली ,तुझ पहिल obortion झालं ना तो मुलगाच असणार, आपल्याकडे सगळ्यांना पहिला मुलगाच होतो.असा राग आला होता ना! अडाणीपणाचा कळसच!

मनिम्याऊ's picture

2 Feb 2022 - 8:59 pm | मनिम्याऊ

पहिला किस्सा जशासा तसा माझ्याबरोबर घडला .>>>
माझ्यासोबत पण

Nitin Palkar's picture

31 Jan 2022 - 9:42 pm | Nitin Palkar

पहिला किस्सा वाचल्यावर वाईट वाटलेच पण आजच्या काळातही मुलगा व्हावा अशी मानसिकता बहुसंख्यांची (ज्या मध्ये सुशिक्षित, अशिक्षित, श्रीमंत गरीब असा कोणताही भेदभाव नाही) असते याचे अधिक वाईट वाटले.
दुसरा किस्सा हा प्रातिनिधिक आहे. सध्या सर्वत्र मोबाईल ऍडिक्शन दिसत आहे.

कर्नलतपस्वी's picture

31 Jan 2022 - 9:56 pm | कर्नलतपस्वी

मोबाईल काँम्पयुटर च्या सतत वापराने फ्रोझन शोल्डर एक वाढता रोग आहे.मी पण १९८८ पासुन सतत आँटोमेशन प्रोजेक्ट वर काम करत असताना २००५ मधे एक वर्ष या करता उपचार घ्यावे लागले. आजुनही त्रास होतोय. सोसायटी मधे नाँटिकल व्हिल मुद्दाम बसवून घेतले. बरेच जण याचा फायदा घेतात. जीम ट्रेनर, फिजीयो थेरापीस्ट मुलांना मदत करतात.

मुलगा सिंड्रोम कधी संपेल काही सांगता येत नाही पण बराच कमी सुद्धा झालेला दिसतोय.

सौन्दर्य's picture

31 Jan 2022 - 11:46 pm | सौन्दर्य

दोन्ही किस्से तुम्ही फारच छान शब्दांत सांगितलेत.

पहिला किस्सा वाईटच. असेही मुलींचे प्रमाण कमी होत चाललेय त्यामुळे लग्नाच्या बाजारात, भविष्यात मुलींना चांगलीच मागणी येऊ शकते.

खांदा व मान ह्यात फोन धरून त्याच बरोबर कीबोर्डवर टाईप करत राहिल्याने झालेला स्पॉन्डेलिसिसचा त्रास मी भोगलाय. फरक एव्हढाच होता की फोन मोबाईल नसून डेस्क टॉप फोन होता ज्यात स्पिकरची सुविधा नव्हती.

नचिकेत जवखेडकर's picture

1 Feb 2022 - 7:27 am | नचिकेत जवखेडकर

पहिला किस्सा खरोखर चीड आणणारा आहे. आमच्या ओळखीच्या एकांनी सांगितलं होतं की, ज्यांना मुलगा नसेल त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळत नाही. म्हणून ४ मुली असल्या तरी मुलगा हा व्हायलाच हवा. हसावं का रडावं हेच कळत नव्हतं ते ऐकल्यावर. लोकं लाख सांगतील मुलगा असण्याचं(च) महत्त्व पण बाकीचे का अक्कल गहाण ठेवतात हे आजवर न उलगडलेलं कोडं आहे !

अहो हि सुद्धा पोळ्या करताना डाव्या कानाला मोबाईल लावून अर्धा पाऊण तास मान वाकडी करून बोलत राहते.
कोणी जर नेहमीचा टेलेफोन वापरात असेल तर एक मानेला आधार देणारे उपकरण मिळते त्यामुळे मान वाकडी करावी लागत नाही ते वापरावे

निनाद's picture

1 Feb 2022 - 7:43 am | निनाद

सतत डाव्या हातात मोबाईल धरून वर उचलल्यामुळे स्नायूवर ताण पडतो आहे. मोबाईल वर उचलण्याच्या स्थितीत कायम हात राहिल्यामुळे तो स्नायू थकतो( MUSCLE FATIGUE) आहे. असा त्रास सर्वत्र आहे. मला ही माऊस वापरामुळे झाला होता/आहे. पण रोज वेगवेगळे हाताचे व्यायाम केले तर सर्व स्नायूंना काम मिळून हा त्रास दूर होतो असे दिसून आले आहे. हे व्यायाम म्हणजे चक्क शाळेत असतांना जे करायचो तेच करतो. पण त्यामुळे वेदना जाते!

निनाद's picture

1 Feb 2022 - 7:44 am | निनाद

पहिला किस्सा खरोखर चीड आणणारा आहे. - सहमत! फटके द्यायला पाहिजे यांना. तरी डॉक्टरांनी संयमित उत्तर दिले.

दोन्ही किस्से उद्बोधक आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Feb 2022 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

मुलगा का मुलगी हे विचारण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. इतकी वर्षे कानीकपाळी ओरडल्यानंतर सुध्दा ही मानसिकता बदलत नसेल तर काय करायचे?

मोबाईलचे वाढते व्यसनही घातकच. या व्यसनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे.

दोनतीन दिवसांपूर्वी असाच कानाला मोबाईल लावून एकजण बाईक चालवत चालला होता. त्याला बहुतेक समोरचा खड्डा उशीरा दिसला, ब्रेक लावताच त्याने जमिनीवर लोटांगण घातले आणि आठ दहा फुट फरपटत गेला. लोकं धावत मदतीला गेली, त्यांनी उचलल्यावर त्याने पहिला मोबाईल शोधला आणि कॉल परत चालु केला "काही नाही रे जरा पडलो बाईक वरुन... नाही फार लागले नाही..." इत्यादी रिपोर्टींग सुरु केले. मदत करणार्‍या लोकांचे आभार काय त्याने साधे त्यांच्या कडे वळूनही पाहिले नाही. तसाच फुटपाथच्या कडेवर बसून मोबाईलवर गप्पा मारत होता तो पठ्ठ्या.

पैजारबुवा,

धर्मराजमुटके's picture

1 Feb 2022 - 9:22 am | धर्मराजमुटके

मोबाईल वापराचा अतिरेक जरा जास्तच होत चाललाय. अनलिमिटेड कॉलींग चे प्लान बंद करुन परत प्रति सेकंद काहितरी पैसे असे प्लान कंपन्यांनी आणले पाहिजे.
असे माझे वैयक्तिक मत आहे..

हे सगळे किस्से ऐकले की मला
काय बोलावं, ते सुचेना....

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Feb 2022 - 9:49 am | रावसाहेब चिंगभूतकर

त्याही पुढे जाऊन जनसामान्यांना स्मार्ट फोन वापरायला बंदी केली पाहिले असे माझे मत आहे. लायकीप्रमाणे technology ला ऍक्सेस मिळायला हवा.

सुबोध खरे's picture

1 Feb 2022 - 10:02 am | सुबोध खरे

हा टोकाचा विचार आहे आणि वैफल्यातून( frustration) आला आहे असेच मी समजतो.

अन्यथा स्मार्टफोन चे असंख्य उपयोग आहेत.

यातील एक उपयोग माझ्या रोजच्या वापरातील आहे.

अनेक मित्र नातेवाईक आपला पॅथॉलॉजी एक्स रे सीटी स्कॅनचे रिपोर्ट मला/ आपल्या डॉक्टरांना पाठवून मानसिक शांतता मिळवत असतात. छातीत दुखत आहे इ सी जी झाला पण त्यावर डॉक्टरांचा अहवाल मिळेपर्यंत मानसिक तणाव असतो किंवा कर्करोगाचे निदान / उपचार झाल्यावर येणाऱ्या पॅथॉलॉजीच्या रिपोर्टचे तात्काळ विश्लेषण तुम्हाला आपल्या माहितीतील डॉक्टरांकडून मिळू शकते

सुरीचा वापर रोजच्या स्वयंपाकघरात होतो पण त्याने खून केला गेला म्हणून सुरीच्या वापरावर बंदी घालणे अव्यवहार्य ठरेल.

कॉमी's picture

1 Feb 2022 - 4:15 pm | कॉमी

बाष्कळ विचार.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 4:21 pm | मुक्त विहारि

आमच बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, जशी बुद्धी तसा वस्तूचा वापर ....

सोनोग्राफीमुळे स्त्रीभृणहत्या पण होतात आणि शरीरातील रोगराई पण समजते...

असो,

श्रीगणेशा's picture

1 Feb 2022 - 9:24 am | श्रीगणेशा

मुद्दामहून तटस्थपणे लिहून वाचकाला विचार करायला लावणारी लिखाणशैली आवडली.
डॉक्टरांना समाजाचं मानसिक आरोग्यही तपासता येतं / तपासावं लागतं _/\_

प्रसाद गोडबोले's picture

1 Feb 2022 - 9:46 am | प्रसाद गोडबोले

अफलातुन अनुभव !

आमचेही काही डॉक्टर मित्र आहेत , त्यांच्याबरोबर बैठकीला बसल्यावर असेच "नाविन्यपुर्ण" अनुभव ऐकायला मिळतात =)))) मला ह्या तुन एकच कळलं आहे की माणसांविषयी आपण कधीच "ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज" टर्म्स मध्ये बोलु शकत नाही , प्रत्येक जण भिन्न , रादर विचित्र आहे. आम्ही फायनान्स क्षेत्रातील असल्याने आमचा जगाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच पुर्ण भिन्न असल्याने हे असले अनुभव ऐकायला मजा येते ! इथं साध्या एखाद्या लीगसी कोड मधील काही चंक डीलीट / मॉडीफाय करताना आम्ही शंभर वेळा विचार करतो अन लोकं कॅज्युअली प्रेगन्सी , अ‍ॅबोर्शन वगैरेचा विचार करतात हे पाहुन फार आश्चर्य वाटते . seriously , Is humanity really worth saving ? असा प्रश्न पडतो .

बरं झालं , मी डॉक्टर झालो नाही.

=))))

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Feb 2022 - 9:52 am | रावसाहेब चिंगभूतकर

Is humanity really worth saving

खरं तर ज्या जनतेची आवश्यकताच नाही त्यांना पोसण्यात पृथ्वीचे रिसोर्सेस का वाया घालवावेत बरे? उदाहरणार्थ ही पहिल्या उदाहरणातली सासू मानवजातीचे काय भले करणार आहे? पण उगीच मरेपर्यंत ऑक्सिजन, पाणी, धान्य वापरणार. तुरुंगातले जन्मठेपेचे कैदी पोसण्यात काय भलाई आहे? मानवजातीला सिलेक्टिव्ह ब्रिडिंग आणि सेलेक्टिव्ह survival बद्दल विचार करायला हवा. असो.

> मानवजातीला सिलेक्टिव्ह ब्रिडिंग आणि सेलेक्टिव्ह survival बद्दल विचार करायला हवा.

मुलगाच पाहिजे हा हट्ट सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आहे.

माझ्या मते आई वडिलांना नको असलेली मुलगी जन्माला येऊन तिची हेटाळणी होण्यापेक्षा गर्भपात बरा.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

1 Feb 2022 - 2:27 pm | रावसाहेब चिंगभूतकर

आणि चुकीच्या सिलेक्शन मुळे मानव जात नामशेष होईल ही कदाचित. पण त्यामुळे ती कल्पना चुकीची ठरत नाही. इतक्या मानव प्राण्यांची आणि त्यातले बरेच जे शासनावर भार आहेत किंवा असतील त्यांची पृथ्वीवर गरज आहे का? शासनाने प्रत्येक आळशी, अन्स्कील्ड आणि अनप्रॉडकटिव्ह व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी का घ्यावी? हा विचार कधीतरी प्रत्यक्षात विचारला जाईलच.

sunil kachure's picture

1 Feb 2022 - 2:33 pm | sunil kachure

इथे प्रत्येक प्राणी ,जीव,जंतू,विषाणू ,जिवाणू ह्यांना जगण्याचा अधिकार आहे
कोण कोणावर भार आहे हे तुम्ही ठरवणारे कोण
तुम्ही कोणाला सांभाळत आहात का?..
Covid व्हायरस पण त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहे तो त्याचा अधिकार च आहे.
मानव जातीचा पूर्ण विनाश होईल इतका अधिकार निसर्ग covid व्हायरस ल पण देणार नाही ..
कोणी जगावे आणि कोणी करावे हे सर्व शक्तिमान निसर्ग ठरवतो.

विजुभाऊ's picture

1 Feb 2022 - 3:49 pm | विजुभाऊ

कालच एके ठिकाणी वाचलं की कोवीड सारख्या मानवनिर्मीत विषाणूमुळे मानव जात २०३० पर्यंत नामषेश होणार आहे म्हणून

sunil kachure's picture

1 Feb 2022 - 3:11 pm | sunil kachure

संयमी शब्दात खरी स्थिती सांगितली आणि निर्णय घेण्याचे स्वतंत्र त्या स्त्री ला दिले
.
. पुर्ण वाढ न झालेले मुल जन्माला घालायचं की नाही तो अधिकार त्यांच्या आई वडिलांचा आहे
हे डॉक्टर पण समजले.
ते मुल समाजावर बोजा होईल,सरकार वर बोजा होईल .
हे दिव्य ज्ञान डॉक्टर नी पण दिले नाही.

साहना's picture

2 Feb 2022 - 12:57 pm | साहना

आपल्या विचारांत अत्यंत तर्कदूषिता आहे.

> आणि चुकीच्या सिलेक्शन मुळे मानव जात नामशेष होईल ही कदाचित.

नाही होणार. लोकांनी मुलींचे ऍबॉर्शन करत राहिले तर हळू हळू मुलींचा भाव वाढत जाईल.

> इतक्या मानव प्राण्यांची आणि त्यातले बरेच जे शासनावर भार आहेत किंवा असतील त्यांची पृथ्वीवर गरज आहे का?

शासन कसला डोंबलाचा भार घेते ? आणि कुणी सांगितलेय ह्यांना भार घ्यायला ? शासनाने ह्यांचा भार घेऊ नये असे आपले म्हणणे असेल तर १००% बरोबर आहे. पण लोकांना आधीच मारावे ह्याला काहीही अर्थ नाही.

> सनाने प्रत्येक आळशी, अन्स्कील्ड आणि अनप्रॉडकटिव्ह व्यक्तीला जगवण्याची जबाबदारी का घ्यावी?

घेऊ नये. सरकारने कुठल्याही फुकटयाला पोसू नये पण तो फुकटा आपल्याला पाहिजे ते काम करू इच्छित असेल तर त्याच्या कामांत आडकाठी सुद्धा करू नये. लोक शासनाचे गुलाम नाहीत. शासनाने लोकांची कुठलीच जबाबर्दारी घेऊ नये आणि शासन ती आपण घेऊन घेतोय म्हटल्यावर लोकसुद्धा शासनाची प्रॉपर्टी ठरत नाही.

सिलेक्टिव्ह ब्रीडिंग नावाचा प्रोग्रॅम आणला तर आपल्या सारख्यांचे काय होईल असे तुम्हाला वाटते ? आणि समाज उद्या तुम्ही वृद्ध झाला निरुपयोगी झाला तर सरकार किंवा तुमची मुळेच तुम्हाला कदाचित मृत्यूकेंद्रांत नेवून टाकतील.

> हा विचार कधीतरी प्रत्यक्षात विचारला जाईलच.

हा विचार पुरातन ग्रीक तसेच अमेरिकेत सुद्धा युजेनिक्स नावाने प्रत्यक्षांत आणला गेला होता. चालला नाही आणि सपशेल फेल झाला.

आता भारताचेच उदाहरण घ्या. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जे मूर्खपणाचे कायदे सरकारने काढले आहेत ते अत्यंत नीच प्रकारचे आहेत. मागे एकदा स्त्री कल्याण मंत्रालयाने स्त्री भ्रूण हत्येविषयी पत्रक काढले होते. त्यात माहिती दिली होती. "हे असेच चालू राहिले तर तुमच्या मुलांना लग्न करण्यासाठी स्त्री आणि मुले निर्माण करण्यासाठी आई मिळणार नाही" थोडक्यांत काय तर एका बाजूने स्त्री चे वस्तूकरण करू नका म्हणून बोंब मारायची तर दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणजे तुमच्या पोरांसाठी बायको आणि नातवंडा साठी गर्भाशय असे दाखवून खूपच खालच्या प्रकारचे वस्तूकरण करायचे.

माझ्या मते एखादा समाज "पुरुष" प्रेमी असेल तर त्याचे चांगले वाईट परिणाम सुद्धा त्याच समाजाने भोगले पाहिजेत. समजा मुलींची संख्या कमी झाली आणि त्यामुळे समाजाला खूप वाईट परिणाम भोगावे लागले तर कदाचित त्यातून लोक योग्य तो धडा घेतील.

बरे कायदा केला म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. आज अनेक जोडप्याना मुलाच्या लिंगाचा फरक पडत नाही. पण तरी सुद्धा ह्या घाणेरड्या कायद्याने मुलाला गर्भांत हलताना पाहायची सोपी सुविधा मिळत नाही. आपल्याच शरीराचे रिपोर्ट्स पाहायला मिळत नाही. पण तुम्ही गरीब असाल तर ! माझ्या माहितीचे अनेक लोक सध्या UAE मध्ये जाऊन लिंग निदान करून घेतात. भारतीय डॉक्टरांनीच तिथे दुकाने थाटली आहेत. नाहीतर काही लोक IVF करून घेतात आणि पाहिजे ते लिंग निवडतात, गर्भपातापेक्षा हे जास्त सुरक्षित.

ह्यांत दुसरी भर पडली आहे ती अंधश्रद्धा वाल्यांची. आम्ही लिंग निदान करून देतो. नाडी परीक्षा पासून पोटाला हात लावून सांगतो पर्यंत चे अनेक खोटे एक्सपर्ट निर्माण झाले आहेत. अमुक खावेसे वाटले तर मुलगीच आहे. तमुक खाऊन उलटी झाली तर मुलगा वगैरे वगैरे.

> मी त्यांना परत सांगितलं कि हा अधिकार मला नाही.

हे आवडले. असे डॉक्टर फारच कमी असतात.

मुक्त विहारि's picture

1 Feb 2022 - 2:50 pm | मुक्त विहारि

1. सुदृढ आणि मानसिक दृष्टीने योग्य असे अपत्य असेल तर, मुलगा की मुलगी, हा भेद नको, इति बाबासाहेब डोंबोलीकर महाराज, यांची शिकवण आहे...

2. मोबाईल बाबतीत, जास्तीत जास्त, 2 तास... आठवड्यातून एक दिवस, नो मोबाईल ...

सस्नेह's picture

1 Feb 2022 - 3:50 pm | सस्नेह

रोचक अनुभव !

उपयोजक's picture

1 Feb 2022 - 7:19 pm | उपयोजक

शेअर करतो

चौथा कोनाडा's picture

2 Feb 2022 - 5:49 pm | चौथा कोनाडा

दोन्ही किस्से खतरनाक आहेत !

साहना,

.... तर हळू हळू मुलींचा भाव वाढत जाईल.

यांत मला एक भीती दिसते आहे. मुलींचा भाव वाढला तरी शेवटी मुलींचाच सौदा होईल. इथे इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात लग्नाळू मुलाने मुलीस हुंडा द्यायची पद्धत होती. त्यापायी सुदृढ बालिकेशी तिच्या लहान वयात लग्न करून ती वयात आल्यावर भरपूर हुंडा घेऊन घटस्फोट द्यायचा धंदा फोफावला होता. रूपवान बालिकेचा भाव जास्ती असे. संदर्भ ( इंग्रजी दुवा ) : https://www.history.com/news/england-divorce-18th-century-wife-auction

सांगायचा मुद्दा काये की लग्नाच्या बाजारात मुलीचीच विक्री होते. तिचा जो काही भावबिव वाढंत असतो, त्यातनं तिला कसलाही लाभ होत नाही. स्त्रीभ्रूणहत्या वाईटंच हे वेगळे सांगणे नलगे.

आ.न.,
-गा.पै.

Trump's picture

2 Feb 2022 - 9:16 pm | Trump

धन्यवाद

> लग्नाच्या बाजारात मुलीचीच विक्री होते

माझ्या मते उलट आहे. सध्या तरी मुलांची विक्री होते असे दिसत आहे कारण वधू प्रसंगी हुंडा देऊन चांगल्या मुलाशी लग्न करू पहाते. मुलगी चांगली दिसत नाही ह्याचा अर्थ तिला जास्त हुंडा द्यावा लागतो कारण वर तिच्या रुपाला शून्य किमंत देतो. सुंदर असेल तर कमी हुंडा कारण तिच्या सौंदर्याला वर काही रूपकात्मक किमंत देतो इत्यादी.

शेवटी लग्न हा बाजारच आहे (आणि त्यांत काहीही गैर नाही), अगदीच वेडपट प्रेमविवाह सोडले तर बहुतेक ठिकाणी शिक्षण, संपत्ती, आर्थिक स्थिती, साधय डोक्यावर असलेले कर्ज, भविष्यांत जबाबदाऱ्या, पैतृक संपत्ती अश्या शेकडो गोष्टी लक्षांत घेऊन मंडळी लग्न करतात. वधूपिता बहुतेक वेळा आपल्या मुलीला एका चलना प्रमाणे वापरून आपल्या पेक्षा वरचढ फॅमिलीत तिला लग्न करू पाहतात.

भविष्यांत हे बदलून वधूला हुंडा मिळायला लागला तर गैर काय आहे ?

भ्रूण हत्या ह्या विषयावर माझे मत दुर्दैवाने निर्माण नाही झाले आहे. अर्थानं भ्रूणाचे लिंग हा मुद्दा त्याच्या नैतिकेत गौण ठरतो.

sunil kachure's picture

2 Feb 2022 - 9:10 pm | sunil kachure

स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मधील दरी रुंदावत चालली आहे.
स्त्री आणि पुरुष ह्यांच्या त समाजातील समस्या बाबत एक मत असावे अशी अपेक्षा असते .
पण दोघात वादाचे मुद्दे च जास्त असतात
पुढे ह्याचे गंभीर परिणाम दिसायला लागतील.

साहना's picture

3 Feb 2022 - 3:38 am | साहना

गरज नाही. काही दशके आधी स्त्रियांना बहुतेक विषयावर मत सुद्धा ठेवण्याचा अधिकार असा नव्हता.

हल्लीच एका व्यक्तीचा फेसबुक पोस्ट वाटला. ओपन किचन हा प्रकार किती चुकीचा आहे आणि ह्यामुळे आपल्या आया बहिणी सुना स्वयंपाक करत असताना घरांतील पाहुणे पाहू शकतात म्हणून सादर व्यक्ती खेद व्यक्त करत होती.

आणि ओपन किचन ,म्हणजे त्या महान व्यक्ती च्या मता नुसार किचन हे बंदिस्त नसून मोकळे आहे.
ज्यांना वेगळे किचन आर्थिक कारणाने परवडत नाही तिथे अशी अवस्था असेल.

गामा पैलवान's picture

3 Feb 2022 - 6:56 pm | गामा पैलवान

साहना,

भविष्यांत हे बदलून वधूला हुंडा मिळायला लागला तर गैर काय आहे ?

आजिबात गैर नाही. स्त्रीस पैसा मिळण्यात काहीही अडचण नसावी. फक्त त्यातनं तिला समाधान मिळणार का, इतकाच प्रश्न आहे. तुम्ही एक सजग स्त्री आहात. तुम्हांस कॉर्पोरेट बाजारात स्वत:च्या कौशल्यांची किंमत वाजवून मिळाली तर ते अभिमानास्पद व आनंदाचं वाटतं. मात्र बहुसंख्य स्त्रियांची जडणघडण तुमच्यासारखी स्वावलंबनशील नसते. शिवाय बाजारही कॉर्पोरेट नसून लग्नाचा आहे. लग्नाच्या बाजारात स्वावलंबन असलेलं चांगलं की वाईट ते मला नाही सांगता येणार, कारण की मी स्त्री नाही. म्हणून ते एक त्रयस्थ निरीक्षण म्हणून नोंदवून थांबतो.

तुमच्याशी झालेली चर्चा नेहमीच रोचक व उद्बोधक असते. त्याबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

10 Feb 2022 - 6:40 pm | जेम्स वांड

कदाचित माझं बोलणं आगाऊ वाटेल म्हणून आगाऊ माफी मागतो पण मला वाटतं की वैद्यकीय पेशात शिक्षण जितकं समृद्ध करतं त्याच्या तिप्पट तर ते शिक्षण वापरून प्रॅक्टिस करताना आलेले अनुभव करत असतील. मी चूक असलो तर मिपाकर वैद्यकीय तज्ञानी कृपया राग न मानता दुरुस्त करावे.

खरे डॉक्टरांच्या अनुभवाबद्दल बोलता.

मला वाटतं प्रसंग क्रमांक एक जास्त अमानवीय वाटत असला तरी तो प्रचलित आहे, मुलगा मुलगी भेद, गर्भजल तपासणी, गर्भार माता स्वास्थ्य इत्यादी विषयात सरकार ते स्वयंसेवी संस्था अन शैक्षणिक संस्था पण काम करतात, तो प्रॉब्लेम आहे हे एकनॉलेज होऊन त्यावर काम सुरू आहे

पण दुसरा प्रॉब्लेम....

मुळात अतिरेकी मोबाईल वापरणे हे एकलकोंडेपणा लपवायला किंवा क्लिनिकल डिप्रेशनची प्राथमिक चिन्हे दाबायला उपाय म्हणून केले जात असावे का ?

मोबाईल ऍडीक्शन हे मानसिक रोगांचे लक्षण असू शकते, मानसिक रोग असू शकतो, व्यसन असू शकते, किंवा मानसिक स्वास्थ्य ढासळवणारा एक कारक (कॅटलिस्ट) असू शकतो का ? असे असले तर हे किती डेंजर आहे ! मुळात कोणाला जर "अतिरेकी मोबाईल वापरणे हे ढासळत्या मानसिक शांतता आणि स्वास्थ्याचे लक्षण आहे" असे म्हणले तर अतिरेकी मोबाईल वापरणारे लोक असे सांगणाऱ्यालाच गाढवात काढतील किंवा सहृद असले तर त्यालाच मनोविकारतज्ञांकडे भर्ती करतील, अतिशय क्षुल्लक अन अंगळवणी पडलेली एक निरुपद्रवी वाटणारी सवय वैयक्तिक अन सामाजिक मानसिक आरोग्याला किती बरं अपायकारक असेल ?

सुबोध खरे's picture

10 Feb 2022 - 7:18 pm | सुबोध खरे

वैद्यकीय पेशात शिक्षण जितकं समृद्ध करतं त्याच्या तिप्पट तर ते शिक्षण वापरून प्रॅक्टिस करताना आलेले अनुभव करत असतील

१०० % सत्य

त्यात माफी कसली मागताय?

अनेक गोष्टी पुस्तकात शिकलेल्या असतात त्या तशा का असतात आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय अजिबात समजत नाही.

प्रसंग क्रमांक एक जास्त अमानवीय वाटत असला तरी तो प्रचलित आहे.

दुर्दैवाने त्या ठिकाणी सासूबाई सुनेचे सान्त्वन करण्याऐवजी मृत अर्भकाच्या लिंगाची जास्त चिंता करत होत्या म्हणून मला राग आला.

खरं तर आता या प्रश्नाबद्दल मला राग येणे बंद झाले आहे.

कारण काही ( स्वतःला सुंदर समजणाऱ्या) मुली लाडिकपणे मुलगा कि मुलगी विचारतात किंवा सॉफिस्टिकेटेड मुली पिंक का ब्ल्यू विचारतात. आणि वर आम्हाला काहीही चालेल पण बाळाचे कपडे खरेदी करायचे आहेत ना अशी मल्लिनाथी असते. मी थंडपणे म्हणतो मुंबईत रात्री ११ पर्यंत दुकाने उघडी असतात प्रसूती झाली कि एक तासात सगळी खरेदी करता येईल.

अशा सर्व गोष्टींची मला सवय झाली आहे. माझ्या दवाखान्यात स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे कि मुलगा कि मुलगी हे विचारणे हा गुन्हा आहे. याशिवाय गरोदर स्त्री मी गर्भलिंगतपासणी करणार नाही हे लिहून देत असते. तरीही त्या "हॅ हॅ हॅ" करत विचारतात.

प्रदीप's picture

10 Feb 2022 - 8:16 pm | प्रदीप

माझ्या दवाखान्यात स्पष्ट शब्दात लिहिलेले आहे कि मुलगा कि मुलगी हे विचारणे हा गुन्हा आहे. याशिवाय गरोदर स्त्री मी गर्भलिंगतपासणी करणार नाही हे लिहून देत असते. तरीही त्या "हॅ हॅ हॅ" करत विचारतात.

अशा लोकांशी बोलणे स्वतःचाच मनस्ताप अतिशय वाढवणारे असावे. म्हणून, मी पुणेरी उपाय सुचवतो आहे (हे विनोदाने नव्हे, तर खरोखरीच सांगतो आहे). असे काही विचारल्यावर निव्वळ त्या पाटीकडे बोट दाखवा. काहीच बोलू नका. अनेकदा, प्रश्नास उत्तर न देता, नुसतेच मख्खपणे, विचारणार्‍या व्यक्तिकडे बघत बसले की ती व्यक्ति त्या प्रश्नापुरती हतबल होते, असा माझा अनुभव आहे.

तुमचे सर्वच अनुभव माणसाच्या विचारप्रवृत्तिवर बराच प्रकाशझोत टाकतात, तसेच हेही.

सुबोध खरे's picture

10 Feb 2022 - 7:34 pm | सुबोध खरे

मोबाईल ऍडीक्शन हे मानसिक रोगांचे लक्षण असू शकते, मानसिक रोग असू शकतो, व्यसन असू शकते,

Here’s what smartphone addiction does to your brain

Upon examination, the MRI scans revealed that the brains of those with smartphone addiction have a lower grey matter volume in certain key parts of the brain as opposed to the non-addicts.

physical evidence showing smartphone addiction doing considerable damage to the brain.

https://www.republicworld.com/technology-news/science/mri-scans-reveal-t...'s%20what%20smartphone%20addiction%20does%20to%20your%20brain&text=Upon%20examination%2C%20the%20MRI%20scans,opposed%20to%20the%20non%2Daddicts.

मोबाईलचे व्यसन आपल्या मेंदूवर कायमचा परिणाम करू शकतो.

मोबाईलचा वापर करण्यात स्त्रियांचे प्रमाण थोडे जास्त आहे. पूर्वी स्त्रिया आरशासमोर आपला बराच काळ घालवत असत. आता आरशाच्या ऐवजी सध्या मोबाईल वापरून स्वतःची प्रतिमा बघत बसणे यात स्त्रिया बराच काळ घालवतात असे आढळून आलेले आहे. ( याला नार्सिसिझम म्हणावे का हा प्रश्न आहे). यामुळेच आपले फोटो/ सेल्फी काढणे आणि ते पाहत बसणे आणि त्यावर प्रक्रिया करून ते फोटो अधिक सुंदर करून स्वतःचे समाधान करणे यात त्यांचा बराच वेळ जातो.

याशिवाय आपले फोटो मैत्रिणींना फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्स अँप वर पाठवणे आणि त्यांच्याकडून लाईक्स मिळवणे आणि "वाऊ, गॉर्जियस, प्रेटी" अशा तर्हेचे खोटे स्तुतीचे प्रतिसाद मिळवणे हे फार वाढलेले आहे. जेंव्हा हे व्यसनात बदलते तेंव्हा असे प्रतिसाद आले नाही तर मुलींना नैराश्य वैफल्य येते.

दर चार मिनिटांनी किती प्रतिसाद आले आहेत हे पाहणे हि इति कर्तव्यता झाली आहे. यामुळे मन एकाग्र होणे किंवा एखादी गोष्ट मन लावून करणे हे अशा मुलींना अशक्य होते. रात्री काही प्रतिमा टाकल्या तर सकाळी उठून सर्व प्रथम किती लाईक्स आले आहेत हेच पाहताना या मुली दिसतात.

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2022 - 6:07 pm | चौथा कोनाडा

आणि आजकाल, लहानग्यांचे लाडि़क व्हिडो टाकून लाइक्स मिळवण्याच्या व्यसनाला बळी पडत आहेत.
माझ्या ओळखीतली नुकतीच आई झालेली मुलगी प्रचंड प्रमाणात असे रील्स. शॉर्ट्स व्हिडो पोस्टत असते !

सुबोध खरे's picture

10 Feb 2022 - 8:12 pm | सुबोध खरे

माझ्याकडे आजकाल असे अनेक लोक रुग्णासोबत आलेले असतात. सोनोग्राफी करत असताना मी काय सांगतो आहे यापेक्षा त्यांचे आपल्या मोबाईल मध्येच लक्ष असते. काही लोक व्हाट्स अँप वर टाईप करत असतात. आणि मध्ये मध्ये डोकं वर करून पाहतात काय चाललं आहे?

आणि मग मध्येच तुम्ही काय म्हणालात डॉक्टर? म्हणून पृच्छा करतात.

अशा वेळेस मी त्यांना सांगतो कि मला जे सांगायचं आहे ते मी रुग्णाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मोबाईल पाहायचा असेल तर पहा.

काही लोकांना राग येतो. काही लोक मोबाईल ठेवून देतात. एका महाशयांनी एक इम्पॉर्टन्ट मिटिंग चालू आहे म्हणून सांगितले.

मी त्यांना विचारले तुम्ही संडासात पण मोबाईल घेऊन जाता काय? त्यावर त्यांचा चेहरा वाकडा झाला.

आताशा मला काहीच वाटेनासे झाले आहे.

पाच मिनिटे सुद्धा लोकांना मोबाईल पासून दूर राहता येत नाही हे फार चान्गले लक्षण नाही.

https://timesofindia.indiatimes.com/city/kochi/kerala-teen-kills-self-af...

girl commits suicide as parent take away mobile हे गुगलून पहा.

असे भरपूर दुवे मिळतील.

ठेस लागली आणि बोट फुटली की माणूस बरोबर सांभाळून चालतो.
बाबा बाईक हळू चालव असे सांगून कोणी सुधारत नाही.
गाडी वरून पडला आणि दोन्ही पाय मोडले, मणका सरकला की आयुष्य त परत तो काही गाडी ला हात पण लावत नाही.
अती मोबाईल वापर आणि फालतू जीवन शैली ची शिक्षा संबधित लोकांना मिळत आहे.
नजर अधू होणे,मधुमेह पासून , पाइल्स पर्यंत आणि हाई bp पासून हार्ट attac पर्यंत सर्व काही त्यांना भोगावे लागत आहे.
आपण त्यांना समजावत बसायचे नाही.
उलट फुकट मोबाईल आणि जन्म भर इंटरनेट फ्री ह्या लोकांना दिले पाहिजे.

गामा पैलवान's picture

14 Feb 2022 - 6:51 pm | गामा पैलवान

लोकहो,

माझा एक मित्र आहे. त्याला मुलगीच हवी होती. त्याच्या मते मुलगी झाली की नंतर जावई मिळतो. तो मुलासारखाच असतो. अशा रीतीने मुलगा व मुलगी दोन्ही मिळतात. आपल्या तरुणपणी मुलगा असो वा मुलगी दोघंही एकसारखेच. म्हातारपणी मात्र मुलगी व जावई ज्या प्रकारे सांभाळतात त्या प्रकारे मुलगा व सून सांभाळेलंच याची शाश्वती नसते.

मुद्द्यात निश्चितंच दम आहे.

आ.न.,
-गा.पै.

अ.मा. : त्याला हवी होती तशी मुलगीच झाली. एकुलती एक आहे.

सौंदाळा's picture

14 Feb 2022 - 7:20 pm | सौंदाळा

एक्झाटली
माझा मित्र पण असेच म्हणाला होता.
मुलगा असेल की त्याला घर, गाडी वगैरे मदत करा. ('सेटल करुन द्या' हे त्याचे वाक्य)
इतके करुन नोकरीला बाहेर गेला, दुसर्‍या देशात सेटल झाला तर काय.
लग्न झाले तर सून कशी मिळेल, आपल्याला कशी वागवेल वगैरे वगैरे
यापेक्षा मुलीचे लग्न करताना (अ‍ॅरेंज असेल तर) चांगला जावई बघून देणे.
या मित्राला एक मुलगा, एक मुलगी आहे तरी त्याचे असेच मत आहे.
त्याचेच अजून एक मतः
१ मुलगा, १मुलगी असे दोघे, किंवा फक्त १ मुलगी किंवा फक्त १ मुलगा असे असावे.
दोन मुलगे म्हणजे लई डेंजर

सुबोध खरे's picture

14 Feb 2022 - 7:31 pm | सुबोध खरे

मुलगा काय किंवा मुलगी हि आपली मुदत ठेव नाही कि काही काळानंतर ती परिपकव होऊन आपल्याला उत्तम परतावा देईल.

म्हातारपणी मात्र मुलगी व जावई ज्या प्रकारे सांभाळतात त्या प्रकारे मुलगा व सून सांभाळेलंच याची शाश्वती नसते.

याला कोणताही आधार नाही.

माझ्या माहितीत चार मुली असलेला एक शास्त्रज्ञ काही कोटीची मालमत्ता असूनही शेवटी वृद्धाश्रमात कालवश झाला.

केवळ एक मुलगी असलेली माणसे सुद्धा अनेक माणसे परावलंबी झालेली पाहतो आहे.

तेंव्हा मला मुलगी आहे म्हणून मला म्हातारपणात काळजी नाही असे म्हणणे चूक आहे.

आणि केवळ मुलगे आहेत म्हणून वृद्धापकाळात ते आपलीकडे दुर्लक्ष करतील असे म्हणणे चूक आहे.

मिपावर असलेल्या प्रत्येक पुरुषाने आपण आईवडिलांची (आणि स्त्रियांनी सासू सासऱ्यांची ) उत्तम काळजी घेतो आहोत का याचे आत्म परीक्षण करावे

वृद्धापकाळात तुम्ही परावलंबी होणार नाही याची काळजी घ्या.

शारीरिक शक्य नसले(ते आपल्या हातात असेलच असे नाही) तरी शक्यतो आर्थिक परावलंबन होणार नाही याची जरूर काळजी घ्या एवढेच मी म्हणेन.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2022 - 10:29 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

धाग्यापेक्षा, प्रतिसाद जास्त आवडला

गामा पैलवान's picture

15 Feb 2022 - 9:59 pm | गामा पैलवान

सुबोध खरे,

सदर माहितीकडे अंतिम सत्य म्हणून न बघता आयुष्यातली एक खेळी ( = स्ट्राटेजी ) म्हणून बघावं असं सुचवेन. बाकी, मुदतठेवीतही पैसे गुंतवतांना जोखीम असतेच.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

17 Feb 2022 - 7:45 pm | सुबोध खरे

योगायोग

आजच दोन्ही किस्से परत घडले.

१) एक महाशय सकाळी आपल्या पत्नीला घेऊन आले होते दीड महिना गरोदर आहे म्हणून. त्यांची मुलगी आता सव्वा वर्षाची झाली आहे.

त्यामुळे साधारण अशा लोकांना लगेच मूल नको असते म्हणून गर्भपात करण्यापूर्वी त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञ सोनोग्राफीसाठी पाठवतात. म्हणून मी त्यांना विचारले कि तुम्हाला लगेच मूल हवं आहे का?

त्यावर या महाशयांचे म्हणणे होते कि माझ्या भावाला दोन मुली आहेत आणि भाऊ मागच्या वर्षी निवर्तले. मला एक बहीण आहे आणि तिची जबाबदारी माझ्यावर आहे. घरी आई, बहीण, बायको, मुलगी, वहिनी आणि दोन पुतण्या अशा सात बायका आहेत तेंव्हा हा गर्भ जर मुलगा असेल तर हवा आहे नाही तर नको.

मला संताप आला पण मी संयम ठेवला आणि त्याला म्हणालो तुमची घरची जबाबदारी काय आहे याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. मुल्गीम्हणून तुम्ही गर्भपात करणार असाल तर ती हत्या आहे आणि या पापात मला भागीदार करू नका

आणि हा प्रश्न मला परत विचारायचाही नाही.

२) आताच २६ वर्षांची मुलगी डावीकडे मान दुखते म्हणून आली होती. माझी पत्नी एका रुग्णाकडे होम व्हिजिटला गेली होती म्हणून मीच तिला पाहिले. तपासले आणि शांतपणे तिला सांगितले कि एकतर तुम्ही डाव्या कानाला मोबाईल लावून फार वेळ बसला किंवा फार वेळ डाव्या हातात मोबाईल ठेवून पाहत आहेत म्हणून डाव्या मानेच्या स्नायूला दुखापत झाली आहे. तेंव्हा मोबाईल फार वेळ वापरायचा असेल तर मोबाईल स्टॅन्ड विकत घ्या असे सांगितले.
तिच्या आईने सुचकतेने माझ्याकडे आणि रागाने मुलीकडे पाहिले. दोघीनी माझी फी दिली आणि बाहेर गेल्या.

अर्थात बाहेर त्यांचे प्रेमपूर्वक संभाषण चालू होते. ते मी कानाआड टाकले आणि आता हा प्रतिसाद टंकला.

मुक्त विहारि's picture

19 Feb 2022 - 8:55 pm | मुक्त विहारि

मोबाईल फार वेळ वापरायचा असेल तर मोबाईल स्टॅन्ड विकत घ्या असे सांगितले.

ह्या उपयुक्त सल्ल्या बद्दल धन्यवाद

रावसाहेब चिंगभूतकर's picture

20 Feb 2022 - 8:54 am | रावसाहेब चिंगभूतकर

माझ्या मते तुम्ही प्रत्येक पेशंट बरोबर चे संभाषण रेकॉर्ड करायला सुरुवात करावी (त्यांना कल्पना देऊन). कधी कुठे तुम्ही स्वतः अडकणार नाही यासाठी.

टर्मीनेटर's picture

18 Feb 2022 - 11:18 am | टर्मीनेटर

लेख आवडला 👍