मामा ओ मामा

Primary tabs

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
26 Jan 2022 - 10:27 pm

॥मामा ओ मामा ॥
शाळेतअसतानाची गोष्ट. आमच्या शाळेची ट्रिप वेरुळ,अजिंठ्याला गेली होती.औरंगाबादला मुक्काम होता.रवीवार होता.सगळं पाहून झालं होतं.ब-याच शिक्षकाचे नातेवाईक औरंगाबादला होते.त्यांना भेटण्यासाठीच बहुतेक तो दिवस मुद्दाम रीकामा ठेवला होता.माझा जिवलग मित्र पक्याचे मामा औरंगाबादला होते.माझे कुणीच नव्हते.मग मी त्याच्या सोबत,त्या मामांच्या घरी,गेलो.
प्रत्येक मजल्यावर दोन फ्लॅट,असलेल्या तीन मजली इमारतीत मामा राहात होते.इमारतीच्या बाहेर ,कधीकाळी लावलेल्या,व लिहीलेल्या,फलकावरील
अस्पष्ट अक्षरातील,'शासकीय वसाहत' मधील 'सा 'चा रंग उडाल्याने ते 'शासकीय वाताहत'असे,दिसत होते.ते त्या सरकारी इमारतीच्या एकंदरित परिस्थितीला अनुरूपच होते.
मामांचे घर तळमजल्यावर होते.दारावर इंग्रजीत नावाची पाटी होती.त्यावरचे अस्पष्ट नावाखाली ''judge' असे  लिहीले होते.ते वाचून 'जुडगे' म्हणजे काय रे 'असे त्याला विचारले.'जुडगे नाही,जज्ज आहे ते,जज्ज! माझ्या इंग्रजीची कीव करत त्याने सांगितले.'मामा जज्ज आहेत म्हणजे मॅजिस्ट्रेट.'पुन्हा एकवार पक्याने उजळणी केली.
'जज्ज?शिनेमात असतात ते?म्हणजे आपण जज्जसाहेबाच्या घरी आलो आहोत?मी आश्चर्याने विचारले.त्याने अभिमानाने मान हलवली.बापरे! म्हणजेआता तो भव्य हॉल,त्या पाय-या,आणि गाऊन किंवा थ्रीपीस सूट घातलेले ,चिरुट,वा सिगार ओढणारे,गंभीर ,म्हातारे जज्ज प्रत्यक्षात पाहायला मिळणार या विचाराने;उत्सुकता,आश्चर्य,आनंद, भिती इत्यादी अनेक भाव मनात एकदमच दाटून आले.
  पक्याने दारावरची बेल वाजवली.आमच्यापेक्षा वयाने छोट्या असलेल्या एका मुलाने दार उघडले.आणि 'दादा आला ,दादा आला',करत पक्याला ओढत आत नेले.मी ही मागोमाग गेलो.आत सोफ्यावर चाळीशीतले सदरा पायजम्यातले एक गृहस्थ काहीतरी वाचत बसले  होते.
रेडीओ वर क्रिकेटची कॉमेंट्री सुरू होती.भारत आणि वेस्ट इंडिजचा सामना सुरू होता.ते कान देऊन ऐकत होते.
'मामा ओ मामा, मी आ$$लो',नाचत ओरडत,पक्या त्यांच्याकडे
गेला,त्यांना नमस्कार केला.आणि त्यांचे बाजूला बसला.मी पुन्हा एकदा उडालोच.अर्थात शब्दश:.
'मामा? म्हणजे  जज्ज?हे ?आणि असे? तोंडात  चिरूट,नाही की सिगार नाही.पांढरे केस नाही की ,म्हातारे नाही,अंगात गाऊन नाही,की थ्रीपीससुट नाही,सदरा पायजमा अशा साध्या वेषात!आश्चर्याचा धक्का बसला.
हा पहिला होता.पुढे अजून बसायचे  होते.
"अरे वा! छान.शाळा ऊडून गेली काय?"म्हणत पक्याचे  डोक्यावर प्रेमाने टपली मारत,त्याला ओढत ते म्हणाले.   पक्याने ट्रिपसोबत आल्याचे सांगीतले.
'मग ट्रीपमधे काय काय पाहिलेस?बिबी का मकब-यात बिबीला भेटलास की नाही?'मामांनी,पक्याच्या फिरकी घेतली.'नाही बुवा.आम्हाला तर नाही दिसली कुणी बिबी तिथे.पक्या  बावळट पणे म्हणाला.आपले काहीतरी
पाहायचे राहून गेले असा भाव त्याच्या बोलण्यात होता.मामा हसू लागले.'अरे  गम्मत करतोय,'म्हणत त्यांनी ट्रीपची,पक्याच्या घरच्यांची,अभ्यासाची,चौकशी केली.
पक्याने माझी ओळख करून दिली.त्यांनी माझी,माझ्या घरच्यांची,
माझ्याअभ्यासाची पण चौकशी केली.ती पण हसत खेळत,मधून मधून विनोद करत.त्यांच्या बोलण्याचे मला सारखे हसू येत होते.
आमच्याशी गप्पा मारता मारता मामांचे कॉमेंट्री ऐकणेही चालूच होते.आणि  उत्साह एखाद्या  मुलासारखा होता.वा$$$ फो$$र..मस्त !बोर्डे छान खेळतोय.
'अबीद अली असा काय खेळतोय ?'
'अरे  यार आताच कशाला हा रन आऊट झाला.'
'झालं संपलं.'
आता कोण  उरलंय ?
बेदी अन प्रसन्न '.
अशा कॉमेंटस सतत चालू होत्या.
मला फारसं कळत नव्हते.पण त्यांचे बोलणे ,हातवारे ,चेह-यावरचे बदलणारे भाव पाहून मजा वाटत होती.
तेवढ्यात लंचसाठी  खेळ थांबला.कॉमेंट्री पण.लगेच मामांनी स्टेशन बदलून सिनेमाची गाणी  लावली.सोबत गुणगुणूही  लागले. असे गमतीत बोलणारा,थट्टा विनोद करणारा ,माझी पण विचारपूस करणारा ,रेडीओवर कॉमेंट्रीअन सिनेमाची गाणे ऐकणारा ,गाणारा,माणूस जज्ज आहे हे स्विकारायला मन तयार होत नव्हते.
   पक्या सोबत मामाच्या घरात फिरलो.अंदाजे साडेसहाशे /सातशे चौरसफूटाचा,दोन बि.एच.के.फ्लॅट होता.हॉलच नव्हता ,तर हॉल मधल्या पाय-या कुठून असणार?अशा घरात जज्जमामा आपले कुटुंब म्हणजे,पत्नी व दोन मुलासह राहात होते.हा आणखी एक धक्का!आईवडील सोबत असतात ,पण ते सध्या गावी गेले होते,अशी माहीती पक्याने पुरवली.
  मामी एकदम साध्या होत्या.शिनेमातल्या जज्जच्या बायकोसारख्या अजिबात नव्हत्या.त्यांनी आम्हाला आग्रह करून जेवायला बसवले.मामा आणि मुले पण सोबत.मामा,मामींना वाढण्यात मदत ही करत होते.
जेवताना मामांच्या गप्पा सुरू होत्या.सिनेमे पाहता की नाही ?आवडता हिरो कोण?हिरोईन कोण?अशाही चौकशा  करत होते.मामांना सिनेमांची बरीच माहीती  होती असे  दिसले.मग क्रिकेटच्या गप्पा.सोबर्स',कन्हाय, पतौडी  बेदी  प्रसन्ना ,अशा अनेक क्रिकेट पटूची नावे आणि  किस्से  सांगत होते.'क्रिकेट आणि  सिनेमाची गाण्या पूढे काही नको तुम्हाला .जेवण करा आधी'.मामींनी मामाला  चक्क सुनावले.
  जेवणानंतर आम्ही पत्ते खेळत बसलो.लाल पान सात!मामाही आमच्यात सामिल झाले. रेडीओ वर कॉमेंट्री चालूच होती.
  काही वेळात बेल वाजली.मामानी रेडीओ बंद केला.व उठून  दरवाजा उघडला.बाहेर दोन तीन साधेपोलीस आणि एक पोलीस साहेब,एका फाटक्या पण बेरकी दिसणा-या इसमाला घेऊन आले होते.
दरवाजा लगत छोटी खोली होती. मामा तिथलूया खुर्चीवर जाऊन बसले.ती खोली म्हणजेच घरचे कोर्ट आहे आणि सुट्टीच्या दिवशी 'रीमांडचे 'काम तिथे चालते अशी माहीती मामाच्या मुलाने पुरवली.आणि पुष्टी साठी आईला ,'हो ना गं आई' असे विचारले.
  पोलीसानी एखाद्या ला पकडले की  तपास करण्यासाठी पोलीसचे ताब्यात द्यायचे की,तुरुंगात ठेवायचे हे  मॅजिस्ट्रेट म्हणजेच जज्ज ठरवतात.त्यासाठी पोलीस त्याला जज्जसमोर आणतात.त्याला 'रीमांड'म्हणतात.एरवी हे  कोर्टात  असते.पण आज सुटी असल्याने घरी.मामींनी आमचे चेहरे पाहून सविस्तर माहीती सांगीतली . बरीच माहीती होती त्यांना !तरीही  हे रीमांड प्रकरण नक्की काय आहे ते नीट कळले नाही.पण ते कळले असे दर्शवून आम्ही माना हलवल्या.
आमच्या पत्याच्या खेळात व्यत्यय आला.पण हा वेगळा  खेळ समोर आला होता.आम्ही कुतूहलाने  खिडकीतून तो प्रकार पाहू लागलो.
खुर्चीत बसलेले मामा गंभीर दिसत  होते. सगळ्या पोलीसांनी मामांना सॅलूट केला.पोलीस साहेब खोलीत उभे राहिले.बाकीचे दरवाजात.'
सगळेच पोलीस आणि पोलीस साहेब सॅलूट करताहेत, उभे राहून अदबीने  बोलताहेत  म्हणजेच मामा खूपच  पावरबाज असले  पाहिजेत असा  विचार डोक्यात आला. पक्याची पण कॉलर टाईट झाली होती.
'आरोपीची रीमांड पाहिजे साहेब ',पोलीसाहेबाने,मामांपुढे कागद ठेवून सांगितले.'चोरीची केस आहे.खूप चो-या केलेल्या आहेत.आरोपी सराईत गुन्हेगार आहे.चोरीचा माल जप्त करायचाय,'असे काहीतरी पोलीससाहेब म्हणाले.किरकोळ दिसणा-या त्या इसमाला हातकड्या घातलेल्या होत्या.तो चोर होता म्हणे.पण वाटत नव्हता.पोलीस साहेब सोडले तर बाकीचे पोलीस पण ,साधेपोलीस ही वाटत नव्हते.'मुख्य म्हणजे जज्जमामा जज्ज वाटत नव्हते.
जज्जमामांनी पोलीससाहेबानी समोर ठेवलेले कागद नीट वाचून,चोरावर नजर फिरवली व काही तक्रार आहे का असे विचारले,त्याने खाली मान घालून नकारार्थी मुंडी हलवली .मग जज्जमामांनी समोरच्या कागदावर कार्बन पेपर ठेवून हातातील पेनने काहीतरी लिहिले.सही केली.
'दोन दिवस पोलीस कस्टडी'असे म्हणत कार्बनपेपरच्या खालचा कागद,पोलिसाना परत दिला,वरचा कागद, टेबलाचे ड्रावर मधे ठेवला.सगळ्या पोलीसांनी जज्ज मामांना परत एकवार,कडक सॅलूट मारला व चोराला घेऊन बाहेर गेले.आम्ही पण हळूच त्यांचे मागे  बाहेर गेलो.आता आम्हाला पोलीसाची भिती वाटत नव्हती.
बाहेर पोलीस जीप उभी होती.पोलीस साहेबाना वाटेत कुणी ओळखीचे भेटले होते.त्याच्याशी गप्पा मारत ते उभे राहिले.साधे पोलीस चोराला घेऊन जीप जवळ गेले. आणि पोलीस साहेबाची वाट पाहू लागले.
जज्जसाहेबासमोर अतिशय दीनवाण्या चेहर्‍याने उभ्या राहिलेला चोराने रस्त्यावर गेल्यावर,एका साध्या पोलीसा कडून बिडी मागून घेतली,मग काडेपेटी.बेडी घातलेल्या हातानाचे बिडी पेटविली व धूर सोडत पोलीसांशी जुने मैत्र असल्यागत हास्यविनोद सुरू केला.तेवढ्यातपोलीस साहेब आले आणि पोलीसावर खेकसत जीपमधे बसले. साध्या पोलीसाने चोराला ओढले.तोंडातली बिडी  रस्त्यावर फेकत तोही जीपमधे मागील भागात चढला .साधे पोलीस ही चढले. जीप भर्रकन निघून गेली.धूर सोडत ,धूर उडवत.
आतापर्यंत पाहिलेला सगळा प्रसंग पाहून मनात अतिशय गोंधळ उडाला होता .एवढा तरुण,एवढ्या साध्या कपड्यातील,एवढ्या छोट्या घरात राहणारा,माणूस जज्ज असू शकतो? कोर्टाचे काम असे घरात चालते?चोर,पोलीसांची अशी बिड्या काड्याची मैत्री असू शकते? असे  प्रश्न सारखे मनात येत होते.
  खरे काय? सिनेमातले जज्ज की प्रत्यक्ष पाहिलेले? सिनेमातले पोलीस की पाहिलेले पोलीस?सिनेमातले आरोपी की पाहिलेला आरोपी? सिनेमातलं खरं,की हे खरं?काही कळतच नव्हते.ह्या विचारात,आमचा मुक्काम होता त्या शाळेत पोहचलो.पण डोक्यातला गोंधळ थांबता थांबत नव्हता.माझाच मामा झाला होता.
शाळेजवळ एक थेटर होते.त्यावर "जस्टीस कुणीतरी किंवा कुठलातरी कानून" अशा नावाच्या शिनेमाचे,थ्रीपीस सूट घातलेल्या तोंडात चिरुट धरलेल्या जज्जसाहेबाचे चित्र'असलेले मोठ्ठे पोस्टर लागले होते. थेटर बाहेर गर्दी होती.ट्रीपला आलेले बहुतेक सगळीच मुले आणि शिक्षक त्यात होतो.मी आणि पक्या त्या गर्दीत घुसलो.आणि तिकीटे कसीबशी मिळवून थेटरात!शिनेमा  सुरू झाला.आणि ,शिनेमातले कोर्टं,शिनेमातल्या कोर्टातले व कोर्टाबाहेर,म्हणजे घर,क्लब इ.ठिकाणी असणारे जज्जसाहेब,
सरकारीवकील, बिनसरकारी,म्हणजे साधेवकील,त्याच बरोबर साधेपोलीस, साहेबपोलीस,खरे साक्षीदार,खोटेसाक्षीदार,सज्जनआरोपी,
बदमाशआरोपी,हे सगळे सगळी नेहमीची मंडळी दिसली.आणि शिनेमातल्या कोर्टात चालणारा खटलाही दिसला.एकदम शांत वाटले.आणि जज्ज मामाच्या घरातून बाहेर पडल्यावर डोक्यात उडालेला गोंधळ निवाला.
शेवटी,'शिनेमा सत्यं जगन्मिथ्या' हेच खरेआणि आवडणारे होते.
बालबुध्दी शिनेप्रेमींसाठी!  
                          नीलकंठ देशमुख

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

26 Jan 2022 - 10:38 pm | विजुभाऊ

छान लिहीलंय

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 10:59 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

श्रीगणेशा's picture

27 Jan 2022 - 12:18 am | श्रीगणेशा

खूप छान!
कोर्टाची एक वेगळी बाजू समजली, घरातून काम करण्याची _/\_
पोलिसांची बिडी काडीची बाजू अपेक्षितच होती :-)

-----------

सिव्हिल कोर्ट पाहण्यात आलं खूप वर्षांपूर्वी.
आदर म्हणून ठीक आहे पण सर्वजण गुन्हेगार असल्यासारखे घाबरलेले वाटत होते, सिव्हिल कोर्टातही.
ते टायपिस्टला dictation देणंही एवढं पटलं नाही बुध्दीला, अगदी बऱ्याच वेळा स्पेलिंगही सांगण्यात आपला बहुमूल्य वेळ खर्च करत होते जज साहेब.
तरीही काय सांगावं टायपिस्ट ने मनानेच बदल करून लिहिलं तर? असा विनोदी पण गंभीर प्रश्नही मनात येऊन गेला :-)

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:08 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. पुरावा नोंदविताना तो अचूक नोंदविला जातोय नं हे पाहाणे न्यायाधीशाचे कर्तव्य असते. कारण अनेकदा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण जाते.तेव्हा साक्षीदाराने नक्की काय सागितले हे त्या लिखीत नोदीवरंनच कळते. शब्द वा वाक्य चुकीचे असेल, स्पेलींग चुकीचे असेल तर,गैर अर्थ निघून प्रकरणाचे निकालाशर विपरीत परिणाम होतो.अन्याय होउशकतो. स्पेलींग चूक असेल तर अनर्थ होतो.त्याचे खूप किस्से आहेत.त्यामुळेच न्यायाधीश पुरावा नोदीवर सह्या करण्या पूर्वी तो काळजीपूर्वक वाचतात पण.मीतरी वाचत असे. मेडीकल, टेक्निकल टर्म्स विषयी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते.इतराना ते कंटाळवाणे होते. पण त्याला इलाज नसतो.
मुद्दाम सविस्तर खुलासा केलाय.

सौन्दर्य's picture

27 Jan 2022 - 12:44 am | सौन्दर्य

बडोद्याला राहत असताना आमच्या घरासमोर एका मामलेतदाराचे घर होते. रविवारी, सुट्टीच्या दिवशी तेथे पोलिसांची जाळी लावलेली मोठी गाडी रिमांड घेण्यासाठी यायची. त्यात पंधरा-वीस आरोपी असायचे, ते जाळीतून बाहेर पाहत बसलेले दिसायचे. क्वचितच एखाद-दोघांना गाडीतून खाली उतरवून मामलेतदार साहेबांच्या घरी नेले जायचे व थोड्याच वेळात परत गाडीत आणले जायचे. सगळेच आरोपी काटकुळे, मळके किंवा फाटके कपडे घातलेले आणि अगदी बापुडवाणे चेहरे करून असायचे. ती गाडी आली की गल्लीतील घरातील पालक, मुलांना आपापल्या घरातच बसून ठेवायची. त्या आरोपींचा एक प्रकारचा तो धाकच होता म्हणायला हरकत नाही.

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:10 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

नचिकेत जवखेडकर's picture

27 Jan 2022 - 8:30 am | नचिकेत जवखेडकर

छान लिहिलय! मजा आली :)

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:11 am | नीलकंठ देशमुख

छान वाटले वाचून. धन्यवाद

Bhakti's picture

27 Jan 2022 - 9:10 am | Bhakti

मस्त लिहिलंय.

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:11 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

निनाद's picture

27 Jan 2022 - 9:25 am | निनाद

खूप छान अनुभव लेखन. मजा आली वाचायला. खुसखूशीत!

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:12 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. उत्साह वर्धक प्रतिसाद.

सरिता बांदेकर's picture

27 Jan 2022 - 10:23 am | सरिता बांदेकर

छान लिहीले आहे.
माझी कोर्टाची आठवण म्हणजे बी.कॅाम् झाल्यावर परिक्शा द्यायचा सपाटा लावला होता.
मग एजी च्या ॲाफिसमध्ये अपॅाइंटमेंट साठी मला मॅजिस्ट्रेटची सही पाहिजे होती.
मग एका ओळखीच्या वकीलांनी कोर्टात नेलं आणि मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं.
आमचं बावळट त्यांनी चष्म्याच्या वरून न्याहाळलं आणि विचारलं
“ बाळा सरकारी नोकरी प्रामाणिकपणे करशील ना?“
मी पण त्याच प्रमाणिकपणे बावळट उत्तर दिलं.
“हे फक्त बॅंकेची परिक्शा दिलीय त्याचा रिझल्ट येईपर्यंत करणार आहे.”
त्यावर ते हसले आणि सही करून दिली.
मग सहा महिने तिकडे नोकरी केली.आणि मग बॅंकेत जॅाईन झाले.

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 11:13 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल.

बेकार तरुण's picture

27 Jan 2022 - 2:20 pm | बेकार तरुण

मस्त लिहिलं आहे... खूप मजा आली..

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 3:18 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

सिरुसेरि's picture

27 Jan 2022 - 2:54 pm | सिरुसेरि

सुरेख आठवणी . नवीन माहिती मिळाली .

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 3:18 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. पण आठवण नाही. काल्पनिक आहे कथा.

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2022 - 5:24 pm | चौथा कोनाडा

झकास, फर्मास !
मजा आली वाचायला !

नीलकंठ देशमुख's picture

27 Jan 2022 - 7:32 pm | नीलकंठ देशमुख

मनापासून आभारी आहे, आपल्या प्रतिसादाबद्दल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jan 2022 - 10:44 pm | अनिरुद्ध.वैद्य

लेख फर्मास!!

बाकी असं असत खरच? अजूनही मोठंमोठ्या बंगल्यात राहणारे जज लोकच समोर येतात!

नीलकंठ देशमुख's picture

28 Jan 2022 - 1:11 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. अशाप्रकारचंच असतं साधारण पणे वातावरण. निदान माझ्या व माझ्या सहकारी मंडळीकडे तरी होते.
आता परिस्थितीत चांगला बदल आहे निवास व्यवस्था तुलनेने चांगली असते. अनेक ठिकाणी बंगले हीअसतात पण तसे सिनेमात दाखवतात तसे बंगले नसतात.

योगी९००'s picture

29 Jan 2022 - 12:50 am | योगी९००

फार छान शब्दात अनुभव लिहीला आहे. वाचून एकदम मजा आली. असे जजसाहेब लहानपणी पाहूनही तुम्ही नंतर जजच झालात हे विशेष..!!

८ वीत म्हणजे तसा लहानच असताना माझ्या मामाबरोबरच एकदा कोर्टात काम कसे चालते ते पहायला गेलो होतो. माझा मामा कोल्हापुरातील नावाजलेल्या वकिलांपैकी एक होता. त्यामुळे त्याचा बर्‍यापैकी वट होता. कोर्टात आत प्रवेश करताना किंवा उठून जाताना जज साहेबांना नमस्कार करून जायचे असे मामाच्या असिस्टंटने चार चार वेळा मला सांगितले होते. नाहीतर जज साहेब तुलाच शिक्षा देतील असे सांगून घाबरवलेही होते. जिथे खटल्याची सुनावणी चालू होती त्या खोलीत जाताना नमस्कार करून आत शिरलो. मामाची केस चालू असल्याने तो आधीच आत मध्ये होता. कोणीतरी उत्पात म्हणून जज आहेत हे असे कळले होते. त्या आधी उत्पात म्हणजे पंढरपुरच्या रखूमाबाईच्या पुजार्‍यांना म्हणतात हे ऐकून होतो. त्यामुळे पुजारी माणूस कसा काय जज असणार हा प्रश्न पडला होता. पण उत्पात हे आडनावही असते हे त्यावेळी कळले. उत्पात साहेब एकदम धीरगंभीर चेहरा करून समोरच्या वकिलांचे व अशिलाचे बोलणे ऐकत होते. नंतर बोलणे संपले की टायपिस्टला काहीतरी टाईप करायला सांगत होते. वकील एखादा प्रश्न विचारायचा, मग अशिल उत्तर द्यायचे मग जजसाहेब ते ऐकून प्रश्न व उत्तर टायपिस्टला सांगायचे असा प्रकार होता. मध्ये शंका आली तर परत अशिलाने दिलेल्या उत्तरावर स्वतःच एखादा प्रश्न अशिलाला विचारून टायपिस्टला काय टाईप करायचे ते सांगत होते. तसा कंटाळवाणा प्रकार होता. चित्रपटात दिसते तसा कोठलाही प्रकार नव्हता. वकील व अशिल हे दोघे जजसाहेबांच्या इतक्या जवळ जवळ उभे होते की थोड्या लांबवरच्या लोकांना काय बोलणे चालले आहे तेच कळत नव्हते. फक्त जजसाहेब काहीतरी बोलून टायपिस्टला टाईप करायला लावत आहेत हेच कळत होते. तासभर थांबून मग जजसाहेबांना नमस्कार केला व बाहेर येऊन बसलो. नंतर मामा आल्यावर त्याच्या बरोबर घरी आलो. निघायच्याआधी उत्पात साहेब व मामा कोर्टाच्या आवातातच भेटले होते. त्यावेळी साहेब एकदम हसून खेळून मामाशी बोलत होते. यावेळी साहेब एकदम प्रसन्न दिसत होते. आधीचा कोर्टातला धीरगंभीरपणा कुठेच दिसत नव्हता. (जॉली एल एल बी चित्रपटात सुरूवातीला प्रसिद्द वकील बोमन इराणी व जज सौरभ शुक्ला एकमेकांशी आदराने बोलतात हा प्रसंग पाहिला तेव्हा वरील मामा व उत्पात साहेबांची भेट आठवली होती).

योगी९००'s picture

29 Jan 2022 - 12:51 am | योगी९००

तुमचा हा अनुभव नाही तर कथा आहे.. ही कॉमेंट नंतर वाचली.

योगी९००'s picture

29 Jan 2022 - 12:51 am | योगी९००

तुमचा हा अनुभव नाही तर कथा आहे.. ही कॉमेंट नंतर वाचली.

नीलकंठ देशमुख's picture

29 Jan 2022 - 3:47 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
जज्जेस सुध्दा माणसंच असतात. तुमच्याआमच्या सारखीच. नोकरीत असताना काही संकेत नियम पाळावे लागतात एवढेच. ते किती आणि कसे याचे तारतम्य बाळगावे लागते. बाकी न्यायालयातील काम इतरांसाठी कंटाळवाणे असतेहे खरे.

नीलकंठ देशमुख's picture

29 Jan 2022 - 3:47 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
जज्जेस सुध्दा माणसंच असतात. तुमच्याआमच्या सारखीच. नोकरीत असताना काही संकेत नियम पाळावे लागतात एवढेच. ते किती आणि कसे याचे तारतम्य बाळगावे लागते. बाकी न्यायालयातील काम इतरांसाठी कंटाळवाणे असतेहे खरे.