माझा लेक (वय वर्षे 10) याने त्याच्या बाबांसह आमच्या घरापासून वेळणेश्वर पर्यंत सायकल राईड केली. दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्याने परत घरी आले. त्याने केलेले हे प्रवासाचे वर्णन.
वेळणेश्वर राईड
दिनांक १० जानेवारी २०२२ आम्ही वेळणेश्वरला सायकलने जायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस करायला सुरवात केली. आम्ही १५ तारखेला ठरवलं कि उद्या वेळणेश्वरला जाऊया. मग आम्ही अगोदर सायकल रिपेअर करून घेतल्या. आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. सकाळी ५:१५ ला उठलो व तयारी केली. आई आणि आजोबा गाडीने येणार होते व मी आणि बाबा सायकलने. आम्ही सकाळी ६:१५ ला निघालो. आई आणि आजोबा गाडीने येणार असल्यामुळे आमच्या सामानाचा प्रश्न नव्हता. मग आम्ही लाईट लावला व निघालो. निघताना घरातून एक फोटो काढला व जय वेळणेश्वर असं म्हणून राईडला सुरवात केली. अगोदर आम्ही २० ते २५ मिनटात चिपळुणात आलो. आम्ही आता बाजारातून जात होतो. कारण बायपासने आम्हाला पटापट जात आलं नसतं. आम्ही जितकं अंतर कापता येईल तितकं लवकर जात होतो. वाटेत आम्ही मध्येमध्ये थांबून पाणी पित होतो व फोटो काढत होतो. नंतर आम्हाला गणेशखिंडीचा चढ लागला. त्यावेळी मी आणि बाबा पटापट चढून टॉप वर आलो. मग थांबून पाणी प्यायलो. आता उतार लागणार होता. मग बाबाने त्याचा GOPRO कॅमेरा सुरु केलंन आणि आम्ही मस्तपैकी उतार उतरलो.मग आम्हाला तांबी ब्रिज लागणार होता. आम्ही तिथे पोहचल्यावर फोटो काढले. आता रामपूरची घाटी चढायची होती. आम्ही सुरवात केली व हळूहळू चढ चढवला थोड्या वेळाने मार्गताम्हाने येणार होत. आम्ही आरामात सायकल चालवत मार्गताम्हाणे पर्यंत पोहचलो. आम्हाला तिकडे स्नेहांकितच्या दुकानात वडापाव खायचा होता. पण दुकान बंद असल्यामुळे आम्हाला खाता आला नाही. मग आम्ही पुढे मार्गताम्हाण्याच्या फाट्यावर थांबलो. तिथे एक टपरी होती. आम्ही दोघांनी तिकडे थांबून मस्तपैकी वडापाव खाल्ला. आम्ही चीज सँडविच बरोबर आणलं होतं ते व वडापाव खाल्ला. बाबाने चहा घेतलंन. मग झाल्यावर आम्ही पुढे निघालो. आता आम्ही परत आरामात चाललो होतो. या रस्त्यावर छोटेछोटे चढ-उतार होते. नंतर तिथे एक मोठा चढ होता. तो मी अर्धा चढवला अर्धा मात्र मला जमला नाही मग चालत उरलेला चढवला. मग परत एक मोठा चढ होता तोसुद्धा मी अर्धा चढवला व अर्धा चालत. आता वेळणेश्वर १० किलोमीटर राहील होत. परत आरामात सायकल चालवत होतो. मी वाट बघत होतो कि केव्हा एकदा वेळणेश्वर ३किमी असा बोर्ड येतोय. तो शेवटी आला आणि मी लगेच वळल्यावर ओरडलो ये आपण वेळणेश्वरला पोहचलो. मग आम्ही MTDC रिसॉर्टमार्गे वेळणेश्वरच्या घरी पोहोचलो. आम्ही जेव्हा आमच्या सायकलच्या ऍपवर बघितलं तेव्हा आम्हाला ४:४५ तास लागले,स्पीड १६.३ चा आला व ६० किलोमीटर झाले.
संध्याकाळी आम्ही कारुळच्या डोंगरावर गेलो तिथे उन्मेष दादाने आमचे फोटो काढले. आणि आम्ही मस्त सूर्यास्त बघितला आणि घरी परत आलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी निघणार होतो. १२:३०ला जेवून तयारी करून १:३० वाजता आम्ही परत खडपोलीला निघालो. आता सुरवातीलाच चढ लागणार होता. आम्ही हळूहळू चढ चढवला व चढाच्या टॉपला येऊन पोहचलो. आणि मग परत सपाटी आली. मग आता आम्ही मार्गताम्हाणयाच्या फाट्यावर २तासात जायचं हे ठरवलं. मग आता जामसूतचा चढ लागणार होता. मग आम्ही तिथे पोहोचल्यावर हळूहळू चढ चढवायला लागलो. जरी आम्ही दुपारचे निघालो होतो तरी मळभ आल्याने उन्हाचा त्रास नव्हता.मग आता गणेशखिंडीच्या चढ़ाशिवाय दुसरा कोणता चढ नव्हता. कालचा रामपूर चा चढ आज फक्त उतरायचा होता. आम्ही परत आरामात सायकल चालवत होतो.मग फाट्यावर आलो. तिथे रस्त्याच्या कामाचे पाईप होते. आम्ही तिथे त्या पाईपमध्ये फोटो काढले. मग आता रामपूरचा उतार लागणार होता. तो आम्ही सुसाट उतरलो. मी त्या उतारावर हातसुद्धा सोडले. मग तांबी ब्रिज आला. आम्ही फोटो काढणार तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि बघतो तर काय आई आणि आजोबा गाडीने आलो. मग आम्ही फोटो काढले. आता फक्त २५ किमी राहिले होते. मग गणेशखिंडीचा चढ लागणार होता तो आम्ही पटकन चढवला. मग थांबून पाणी प्यायलो व पुढे निघालो. आता उतार होता त्यामुळे तो पटकन उतरलो व चिपळुणात आलो आणि पटापट सायकल चालवत घरी पोचलो .
मी एवढी मस्त राईड केल्याबद्दल आई बाबांनी मला रात्री मला हॉटेल मध्ये जेवायला नेऊन पार्टी दिली.
ईशान श्री गोखले
प्रतिक्रिया
20 Jan 2022 - 12:28 pm | कर्नलतपस्वी
आजकाल मुलं मोबाईल फोन, पबजी सारख्या खेळात चिंब भिजलेले तर आम गोष्ट आहे पण आसा एखादा मैदानी खेळात किंवा अँडव्हेचर स्पोर्ट्स मधला मुलगा बघुन आनंद होतो. इशान श्री गोखलेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुढे जाऊन बापू गोखल्या सारखा इमान राखून पराक्रम गाजव.
20 Jan 2022 - 12:40 pm | सौंदाळा
ईशानचे कौतुक
फोटो मात्र पाहिजे होते.
20 Jan 2022 - 12:50 pm | अमर विश्वास
व्वा ... ईशानचे कौतुक
राईड साठी आणि नंतर हे शब्दबद्ध करण्यासाठीही
पण उन्मेषदादाने काढलेले फोटो मात्र हवेतच
20 Jan 2022 - 4:09 pm | बेकार तरुण
मनापासुन अभिनंदन ईशानचे अन त्याच्या आई बाबांचेही......