अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
या मंडळींचे अशा वागण्याचे बरेच किस्से समाजात प्रचलित असतात. त्यातले काही खरे, काही तिखटमीठ लावून वाढवलेले तर काही असत्यही असतात. अशी व्यक्ती जितकी जास्त प्रसिद्ध, तितकेच तिच्या नावावर खपवल्या जाणाऱ्या किश्शांची संख्याही भरपूर असते. अशा व्यक्तींची जागतिक क्रमवारी लावायची ठरल्यास त्यात बहुदा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा प्रथम क्रमांक लागेल ! त्यांच्या नावावर असलेले किंवा खपवलेले असंख्य किस्से आपण कधी ना कधी ऐकलेले असतात. महाराष्ट्रीय साहित्यिकांपुरते बोलायचे झाल्यास याबाबतीत पु ल देशपांडे यांचा प्रथम क्रमांक नक्की लागेल. कालौघात अशा किश्शांच्या खरे-खोटेपणाची शहानिशा करणेही कठीण होऊन बसते. नामवंत व्यक्तींच्या संदर्भात प्रचलित असलेल्या गमतीशीर, तऱ्हेवाईक किश्शांचे किंवा त्यांच्या जगावेगळ्या कृतींचे संकलन करण्यासाठी हा धागा आहे.
माझ्या वाचनात आलेल्या काही साहित्यिकांच्या किश्शांपासून सुरुवात करतो.
१.दुर्गा भागवत : त्यांच्या भरीव साहित्य सेवेबद्दल त्यांना ज्ञानपीठ आणि पद्मश्री असे दोन्ही पुरस्कार सरकारतर्फे जाहीर झालेले होते. परंतु हे दोन्ही पुरस्कार कणखर दुर्गाबाईंनी पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या निषेधार्थ नाकारले होते.
जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळाले तेव्हा सर्वांनाच आनंद झालेला होता; अपवाद फक्त दुर्गाबाई ! त्यांनी एका माणसाला सांगितले,
“नाशिकला जा आणि कुसुमाग्रजांना विचार की, तुम्हाला ज्ञानपीठ मिळालं ते ठीक आहे. परंतु आणीबाणीच्या काळात तुम्ही काय करीत होतात ?”
त्या माणसाने हा निरोप खरंच कुसुमाग्रजांना पोचवला. त्यावर ते हसत उत्तरले,
“हे पहा, दुर्गाबाईंचे प्रश्न दुर्गाबाईंना विचारू देत, तुमचे प्रश्न तुम्ही विचारा !” असे हे बेरकी प्रत्युत्तर.
२. जी ए कुलकर्णी : त्यांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांची कुठलीही कथा अथवा लेख जेव्हा एखाद्या नियतकालिकात प्रकाशित होई, त्यानंतर तो छापील लेख ते स्वतः बिलकुल वाचत नसत. ते म्हणायचे, “जेव्हा लेख हस्तलिखित स्वरूपात माझ्याजवळ असतो तोपर्यंतच तो माझा. एकदा का तो छापून झाला की तो आता वाचकांचा झालेला असतो. त्याचे भवितव्य त्यांच्या हाती’.
जीएंची बरीच पुस्तके एका प्रकाशकांनी प्रसिद्ध केली होती. जीएंनी संबंधित प्रकाशकांशी पत्रव्यवहार भरपूर केला परंतु आयुष्यात भेट घेण्याचे मात्र टाळले. त्यांच्या काजळमाया या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तो त्यांनी स्वीकारला देखील होता. परंतु पुढे या घटनेवर साहित्य क्षेत्रातून टीका झाली. त्याने व्यथित होऊन त्यांनी (प्रवासखर्चासह) तो पुरस्कार सरकारला परत केला होता.
३. विजय तेंडुलकर मुख्यतः नाटककार म्हणून खूप गाजले. त्यांचा एक शिरस्ता होता. स्वतःच्या नाटकाचा प्रयोग जेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर प्रदर्शित व्हायचा तेव्हा ते स्वतः बघायला अजिबात उत्सुक नसत. अगदी अपवादात्मक परिस्थितीत त्यांनी तसा प्रयोग पाहिला होता. या वागण्याचे त्यांनी कारणही दिले होते. लेखक जे नाटक लिहितो त्याचे पुढे दिग्दर्शक जे काही करतो त्यात नाटकाचा आत्मा बरेचदा हरवलेला असतो. म्हणून तो प्रयोग बघणे नकोच असे त्यांचे मत होते. त्यांच्या घाशीराम कोतवाल नाटकात संगीताचा वापर भरपूर आहे. किंबहुना ते नाटक आहे की संगितिका अशीही चर्चा त्या काळी झाली होती. पुढे मात्र तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकात अशा प्रकारे संगीताचा वापर जाणीवपूर्वक करू दिला नाही. त्यातून नाटकाच्या गाभ्याला धोका पोचतो असे त्यांचे मत झाले होते.
आता पाहू काही विदेशी साहित्यिकांचे नमुने.
४. सॉमरसेट मॉम हे विख्यात इंग्लिश लेखक. त्यांच्या लेखनाची कठोर शिस्त होती. रोज सकाळी नऊ ते दुपारी एक पर्यंत ते त्यांच्या लेखनाच्या टेबलाशी असत आणि रोज काही ना काही लिहित. त्यामध्ये रविवार असो वा सण, किंवा अगदी स्वतःचा वाढदिवस, लेखनात कधीही खंड पडला नाही. त्यांना एका मुलाखतकाराने विचारले होते की रोज नवे लेखन खरच सुचते का ? त्यावर ते म्हणाले,
“नाही, रोज नवे सुचत नाही. तरीसुद्धा मी लेखनाच्या टेबलापाशी ४ तास बसतोच. कित्येकदा काहीतरी विचार करत माझ्या स्वतःच्याच सह्या असंख्य वेळा गिरवत बसतो. पण नित्यक्रम चुकवत नाही”.
५. झोरान झिवकोविच या सर्बिअन लेखकाचे एक मत अजब आहे. तो म्हणतो, की ५० वर्ष हे वय लेखक होण्यासाठी आदर्श आहे. आयुष्यातील त्या आधीची वर्षे सखोल वाचनात घालवावीत. कारण आपण लिहायला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या हजारो वर्षातल्या आपल्या आधीच्या लोकांनी काय लिहून ठेवले आहे ते वाचणे आवश्यक आहे !
६. जे डी सालिंजर हे अमेरिकी लेखक त्यांच्या कॅचर इन द राय या कादंबरीमुळे गाजले. या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर एक अतिशय जिवंत असे चित्र छापले होते. परंतु पुढे त्यांनी मुखपृष्ठावरील चित्र या प्रकाराचाच धसका घेतला. पुढे त्यांच्या सर्व पुस्तकांसाठी त्यांनी मुखपृष्ठावर कोणतेही चित्र अथवा छायाचित्र छापायचे नाही असा आग्रह धरला. लेखकाच्या शब्दांमधून जो काही आशय व्यक्त होतोय तीच त्या पुस्तकाची वाचकावर उमटणारी एकमेव ओळख असली पाहिजे हे त्यांचे मत. लेखकाला काय सांगायचय त्यासाठी एखाद्या चित्रकाराची मध्यस्थी नसावी यावर ते ठाम राहिले.
याच धर्तीवर एका व्यंगचित्रकारांची अशीच भूमिका आहे. त्यांचे नाव आता आठवत नाही. ते देखील त्यांच्या व्यंगचित्रांमध्ये किंवा चित्राखाली शब्दांचा अजिबात वापर करीत नसत. चित्रकाराच्या चित्रातूनच् प्रेक्षकाला जे काही समजायचं आहे ते समजले तरच ते उत्कृष्ट चित्र, असे त्यांचे ठाम मत होते. या निमित्ताने लेखन आणि चित्रकला या दोन्ही कला समांतर चालाव्यात की एकमेकांना पूरक म्हणून त्यांचा वापर करावा हा एक चर्चेचा विषय उपस्थित होतो.
आता एक किस्सा राजकारणी व्यक्तीचा...
७. हा अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलचा असून ते पंतप्रधान होण्यापूर्वीच्या काळातला आहे. ते जेव्हा विविध दौऱ्यांवर निघत तेव्हा बरोबर स्वतःचा एक छोटा ट्रांजिस्टर ठेवत. तो नियमित ऐकणे हा त्यांचा छंद होता. निघण्यापूर्वी ते बरोबरच्या सचिवांना विचारत,
“आपण जिथे चाललो आहोत तिथे जर या ट्रांजिस्टरच्या बॅटरीज संपल्या तर त्या विकत मिळतील ना?”
त्यावर त्यांचे सचिव फक्त मंद स्मित करीत.
असे गमतीशीर किंवा तऱ्हेवाईक किस्से सांगण्यासाठी मी प्रामुख्याने काही साहित्यिक निवडले आहेत. हे किस्से मी कुठल्या ना कुठल्या पुस्तक/नियतकालिकात अथवा आंतरजालावर वाचलेले आहेत.
प्रतिसादांमध्ये वाचकांनी कुठल्याही क्षेत्रातील नामवंतांचे असे किस्से लिहायला हरकत नाही. तुम्ही लिहिलेला किस्सा हा स्वतः वाचलेला आहे की ऐकीव आहे याचा सुद्धा उल्लेख करावा.
**********************************************************************************
....................................................................................................................
प्रतिक्रिया
18 Jan 2022 - 11:40 am | अनिंद्य
छान संकलन.
बरेचदा पुस्तकांच्या मुखपृष्ठावरची चित्रे आशयभंग करणारी असतात. त्यामुळे लेखकाला चित्रकाराची मध्यस्ती नको वाटली तर ते योग्यच.
18 Jan 2022 - 12:16 pm | कुमार१
+१ धन्यवाद
पुस्तकाच्या आशयाला अनुरूप चित्र काढणे ही एक वेगळीच कला आहे.
18 Jan 2022 - 8:30 pm | विजुभाऊ
पुलंच्या पुस्तकांतील वसंत सरवटेंची किंवा शिद फडणीसांचे चित्रे हा दुग्ध शर्करा योग असतो
18 Jan 2022 - 12:55 pm | नचिकेत जवखेडकर
छान लेख. बऱ्याच वेळेला उच्च प्रतिभासामर्थ्य असलेली लोकं थोडी विचित्र वागतात असं वाटतं. no offences :)
18 Jan 2022 - 2:11 pm | कुमार१
धन्स.
+११ ते त्यांना शोभून दिसते. 😀
18 Jan 2022 - 2:17 pm | सर टोबी
हा एक चांगला तत्ववेत्ता समजला जातो. मी स्वतः एकेकाळी खूप न्युनगंडामुळे पछाडलेलो होतो आणि रसेलच्या एका छोट्या वाक्यामुळे स्वतःला सावरू शकलो. तर अशा या रसेलने जे काही लिखाण केले त्याची मुळ प्रेरणा म्हणजे त्याची अगतिकता होती. रसेलने बरीच लग्ने केली आणि आपल्या घटस्फोटित पत्नीला द्याव्या लागणाऱ्या पोटगिसाठी त्याला लिखाण करावं लागलं.
18 Jan 2022 - 2:51 pm | कुमार१
सर,
रसेल यांचे कुठले वाक्य तुम्हाला भावले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहेच.
अगदी मोडून पडलेल्या व्यक्तीस उभारी देणारी दोन वाक्ये माझी पण खूप आवडती आहेत :
१. कुसुमाग्रजांची ‘पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा’ ही कवितेची ओळ आणि
२. अर्नेस्ट हेमिंग्वे यांचे हे वाक्य :
The world breaks everyone and afterwards, some are strong at the broken places !
( हे बहुधा आत्मचरित्रात्मक आहे).
18 Jan 2022 - 6:16 pm | सर टोबी
तंतोतंत आठवत नाहीय परंतु आपलं आयुष्य इतरांच्या तुलनेत कसही असलं तरी ते जगण्यालायक असतं असे काहीसे शब्द होते.
19 Jan 2022 - 7:59 am | नचिकेत जवखेडकर
+१
अशाच अर्थाचं एक जपानी गाणं आहे. त्याचा साधारण अर्थं असा आहे की, ज्याप्रमाणे आपण फुलांची तुलना करू शकत नाही की कुठलं फूल चांगलं तर माणसांची का करावी. जसं प्रत्येक फुलाला स्वतःची वैशिष्ट्ये आहेत तशीच माणसांची पण आहेत. फक्त आपल्यातल्या strengths (मराठी?) ओळखून त्याच्यावर काम करा. प्रत्येक क्षेत्रात आपण पहिल्या क्रमांकावर नसू तरी चालेल कारण प्रत्येकजण आपापल्या परीने विशेषच असतो :)
19 Jan 2022 - 1:09 pm | Trump
strengths = सामर्थ्य, शक्तीस्थाने, बल
20 Jan 2022 - 12:50 pm | नचिकेत जवखेडकर
धन्यवाद
18 Jan 2022 - 2:37 pm | मुक्त विहारि
लेख आवडला
18 Jan 2022 - 4:13 pm | कुमार१
मुवि
धन्स.
५ आवडले >> अ-ग-दी !
अंतर्मुख करणारे आहे आपल्याला ....
पण या विधानाला छेद देणाऱ्या बऱ्याच घटना जगात घडलेल्या आहेत.
कितीतरी प्रतिभावंतांनी त्यांच्या अजरामर कलाकृती/ मूलभूत संशोधन ऐन तारुण्यात केलेले आहे.
18 Jan 2022 - 5:01 pm | तर्कवादी
पण यात टीका करण्यासारखं काय होतं ते नाही समजलं.
18 Jan 2022 - 5:28 pm | कुमार१
चांगला प्रश्न. माझ्या आठवणीनुसार लिहितोय, चुभु देघे. साहित्य अकादमीचा एखाद्या वर्षी पुस्तकाला पुरस्कार देण्यात एक निकष असतो. त्यात ते अमुक एका वर्षात/कालावधीत प्रसिद्ध झालेले पाहिजे असे काहीतरी आहे. बहुतेक काजळमाया अन्य कुठल्या तरी वर्षात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून कोणीतरी तांत्रिक हरकत घेतली.
हे सगळे होईपर्यंत जीए आनंदाने हरखून गेले होते आणि त्यांनी कधी नव्हे ते त्या रोख रकमेतून दिल्लीमध्ये छानपैकी हिंडून ‘जिवाची दिल्ली’ केली होती. नंतर उद्वेगाने त्यांनी पुरस्कार परत केला.
18 Jan 2022 - 5:13 pm | मित्रहो
लेख आवडला
विजय तेंडुलकर यांचा किस्सा वाचला होता. त्यांच्या मते घाशीराम नाटकात संगीतामुळे ते नाटक त्यांना हवे तसे राहिले नाही.
जी ए कुलकर्णी फारसे कुणाशी बोलत नसत असेही वाचले होते.
18 Jan 2022 - 5:34 pm | कर्नलतपस्वी
यांनी मांजर आणि त्याचे पिल्ला करता भिंती मधे दोन ,एक मोठे आणी एक छोटे आसे दोन रस्ते बनवले आसा किस्सा ऐकला होता. खरे खोटे आईनस्टाईन व त्याची माजंरेच सांगू शकतील.
19 Jan 2022 - 11:50 am | अनन्त्_यात्री
न्यूटनबद्दल ही दंतकथा वाचली होती
20 Jan 2022 - 7:34 am | कर्नलतपस्वी
असेल असेल
18 Jan 2022 - 6:00 pm | सौंदाळा
बर्नाड शॉ चा एक किस्सा वाचला होता.
एक इंग्रजी शिक्षक त्यांना भेटायला आला होता आणि गर्विष्ठपणे स्वतःचे इंग्रजी भाषेतील योगदान सांगत होता.
तो म्हणाला इंग्रजी भाषेत su ने सुरु होऊन उच्चार 'शु' होणारा एकच शब्द आहे 'sugar'
बर्नाड शॉ पटकन म्हणाले 'are you sure?'
18 Jan 2022 - 6:30 pm | कुमार१
रसेल, जीए, आईन्स्टाईन आणि बर्नार्ड शॉ या सर्वांसंबंधीची माहिती / किस्सेआवडले.
बर्नाड यांचा अन्य किस्सा मी नुकताच इथे लिहिला होता.
इंग्लिश स्पेलिंग आणि उच्चार त्यांच्यातील विसंगती बाबत तर शॉनी अनेक मजेशीर नमुने व त्यावर मल्लीनाथी केलेली आहे.
18 Jan 2022 - 8:12 pm | सुबोध खरे
श्री पु ल देशपांडे यांच्या लेखनाच्या पुढच्या प्रक्रिया त्यांच्या पत्नी सौ सुनीता करत असत.
एकदा पुस्तक छपाई च्या सुरुवातीची प्रत त्यांच्या हातात आली तेंव्हा त्यात असंख्य चुका होत्या
सुनीता बाईंनी विचारलं कि याचं प्रूफ रिडींग कुणी केलं त्यावर छापखान्याच्या कर्मचाऱ्याने सांगितलं कि साहेबानी केलं आहे. सुनीता बाईंनी ते पाहायला मागितलं
तेंव्हा त्याच्या पहिल्याच पानात प्रचंड चुका होत्या.
ते पाहून श्री पु ल इतके वैतागले होते कि
त्यांनी प्रूफ रीडरचे आडनाव "वाघ" होते त्यावर काट मारून "डुक्कर" लिहून प्रूफ परत केले होते.
अर्थात सुनीता बाईंनी पुस्तकाच्या छपाईच्या अगोदर प्रूफ रिडींग परत करून घेतले हे सांगायला नकोच.
18 Jan 2022 - 8:40 pm | Bhakti
छान धागा ,
वाचत आहे.
18 Jan 2022 - 8:55 pm | कुमार१
सर्वांचे किस्से छानच !
...........................
साहित्य-चित्रपट क्षेत्राशी संबंधित दोन दिग्गजांसंबंधी हा एक किस्सा.
टागोरांची नष्टनीड नावाची एक कादंबरी आहे. त्यावर सत्यजित राय यांनी चारुलता चित्रपट काढला.
त्याचा विषय : नवरा-बायकोच्या जोडीमध्ये बायको वयाने बरीच लहान आहे. त्यामुळे ती तिच्या समवयस्क दिराच्या प्रेमात पडते. अशा तऱ्हेने हा प्रेमाचा त्रिकोण होतो.
आता त्यांच्या वास्तव आयुष्याशी कसा योगायोग ते पहा :
र. टागोरांचे भाऊ जतींद्रनाथ हे त्यांची बायको कादंबरीपेक्षा तेरा वर्षांनी मोठे असतात. इथे दोन भाऊ आणि कादंबरी असा त्रिकोण होतो. पुढे कादंबरी आत्महत्या करतात.
२. राय यांनी जेव्हा अभिनेत्री माधवीला घेऊन चित्रपटाचे चित्रीकरण चालू केले तेव्हा ते तिच्या प्रेमात पडतात ! ते तिच्या पेक्षा 21 वर्षांनी मोठे असतात. इथे राय, त्यांची बायको आणि माधवी असा त्रिकोण होतो.
या प्रकाराची कुजबुज खूप वाढल्याने माधवी राय यांच्यापासून दूर होते व त्यांच्या पुढील चित्रपटांत काम करीत नाही.
19 Jan 2022 - 10:19 am | कानडाऊ योगेशु
असामान्यांनी नेहेमी असामान्यांसारखेच वागावे ही अपेक्षा असल्याने अशी असामान्य व्यक्ती जेव्हा सामन्य तर्हेने वागते तेव्हा त्याला तर्हेवाईक पणा म्हणत असावे.
सचिन तेंडुलकर चहात पूर्ण बुडवुन बिस्किट खातो आता ह्यात तर्हेवाईकपणा काय आहे हे समजत नाही पण बर्याच जणांनी तो तसा वाटतो हे खरे.
19 Jan 2022 - 10:52 am | कुमार१
का यो +१ 😀
.......................
.हा किस्सा गिर्यारोहकाचा ...
जगातील पहिले एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी यांनी त्यांच्या पर्वतचढाईचे अनुभव ‘व्ह्यू फ्रॉम द समिट’ या पुस्तकात लिहिले आहेत. कालांतराने हिलरी भारतातील न्यूझीलंडचे उच्चायुक्त होते. त्यांच्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘शिखरावरुन’ या नावाने श्रीकांत लागू यांनी केलेला आहे. त्या अनुवादासाठी लागू यांनी हिलरी यांची परवानगी मागितली होती. त्यावर हिलरींना ती लगेच दिली. मग लागूंनी विचारले की मानधन किती द्यावे लागेल ? त्यावर हसून हिलरी म्हणाले,
“मला पैसे नकोत, फक्त तुमची पिठलं-भाकरी एकदा खाऊ घाला !”
अशी ही दिलदार वृत्ती.
19 Jan 2022 - 11:23 am | कंजूस
माधवी पुरंदरे यांनी मराठीत पुस्तक लिहिलं आहे . ते संपूर्ण वाचावे.
19 Jan 2022 - 11:33 am | कंजूस
गावाबाहेर दूर. कारण लोकांना, शेजाऱ्यांना त्यांच्या गाण्याचा व्यत्यय त्रास नको.
---------
यावरून आठवलं एक प्रतिभावान पेटीवादक ( त्यांचा एक मुलगाही तीन वर्षांचा पेटी वाजवे. तोही आता प्रसिद्ध आहे) आमचे शेजारीच होते. रोज नाट्यसंगीत सराव करायचे,पेटी ऐकू यायची पण इमारतीमधील फक्त एक रहिवासी दाद देत, आदर बाळगत. पण आम्ही धरून बाकीच्यांच्या मते ते पटी 'बडवत.'
म्हणजे कुमार गंधर्वांना शेजाऱ्यांची किती काळजी वाटत होती हे समजेल.
19 Jan 2022 - 11:46 am | अनन्त्_यात्री
रिचर्ड फाईनमन हे एक बहुआयामी क्षमता असलेले प्रतिभावान नोबेल पुरस्कार विजेते क्वांटम भौतिकशास्त्रज्ञ होते.
या माणसाला अनेक छंद होते.मॅनहॅटन अणुबाॅम्ब प्रकल्पावर काम करताना तर या हरफनमौलाने चक्क तिजोर्या फोडण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळविले होते व आपल्या या "कौशल्या"चा प्रसाद आपल्या परिचितांना दिला होता!
19 Jan 2022 - 12:36 pm | कुमार१
वरील चर्चेत आलेले कुमार गंधर्व, पिकासो, न्यूटन व फाइनमन हे सर्व किस्से छान !
..
>>>
यावरून एक हिंदी चित्रपट अंधुकसा आठवतो आहे. त्यात एक अट्टल कुलूपफोड्या दाखवला आहे(बहुतेक या भूमिकेत अजय देओल असावा). त्या चोराच्या घरात एक मोठा कुटुंबफोटो आहे. त्यात श्री. गोदरेज सुद्धा दाखवलेले आहेत ! चोराचा मित्र विचारतो, “तुझ्या कुटुंबात हे गोदरेज कसे काय बुवा?”
यावर चोर म्हणतो, “गोदरेज हे माझे प्रेरणास्थान आहेत. ते जितकी अत्याधुनिक कुलपे तयार करत जातात, तितकाच मी ती कुलपे उघडण्याच्या युक्त्या विकसित करीत जातो ! म्हणून मी त्यांचा ऋणी आहे”
....ऑस्कर वाइल्ड म्हणून गेलेच आहेत,
“चोर हा कलाकार असतो, तर पोलिस फक्त टीकाकार”.
27 Jan 2022 - 11:17 am | कुमार१
आज ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांचे निधन झाल्याची बातमी वाचली आणि दुःख झाले. त्यांच्या दोन आठवणी लिहितो.
एकदा आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका परिसंवादात त्यांना बोलावले होते. व्यासपीठावर अन्य काही मान्यवर डॉक्टर बसलेले होते. त्यापैकी एकाने प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार करून स्वतःच्या मुलाला कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता. अवचटांनी त्यांच्या भाषणात या गृहस्थांचे नाव न घेता त्यांच्या गैर कृतीचा जाहीरपणे उल्लेख केला. तेव्हा व्यासपीठावरील काहीजण चपापले होते. परंतु या प्रसंगात अवचटांचे धाडस सर्वांना दिसून आले.
..
दुसऱ्या एका प्रसंगात त्यांनी स्वतः वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या पीडित महिलांची दुःख कशी समजावून घेतली याचा वृत्तांत आम्हाला सांगितला होता. तेव्हा त्या शोषित जगाची आम्हाला अगदी जवळून ओळख झाली.
...
विनम्र आदरांजली!
27 Jan 2022 - 1:44 pm | सर टोबी
याचं खूप लिखाण मी वाचलं आहे. आपलं वाचन खूप असण्यापेक्षा वाचनाचा आपल्या जीवनात खूप उपयोग व्हावा असा दृषटीकोण असतो. त्या अर्थाने त्यांचा संगोपन हा लेख मला खूप आवडला. माझ्या मुलाला देखील मी अनवट पध्द्तीने शिक्षण दिले. त्याला कधीही शिक्षा किंवा मारहाण केली नाही.
त्यांना विनम्र प्रणाम.
12 Feb 2022 - 12:54 pm | कुमार१
मंगेश पाडगावकरांनी तरुणपणी कविता लिहायला सुरुवात केली होती. बीए झाल्यानंतर ते नोकरी करू लागले पुढे नोकरीतील बढतीसाठी त्यांनी उशिराने एम ए करण्याचा निर्णय घेतला. एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्यांना त्यांचीच एक कविता अभ्यासात होती !
परीक्षेत, त्या कवितेत ‘कवीला काय सुचवायचे आहे', या प्रश्नावरील उत्तर त्यांनी स्वतःच्या मनाने न लिहिता गाइडमधले लिहिले होते. असे केल्यानेच त्या प्रश्नाला चांगले गुण मिळतील अशी त्यांची धारणा होती !
(यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्रातून)
13 Feb 2022 - 7:17 pm | श्रीगणेशा
विनोदी विसंगती!
----
खूप माहितीपूर्ण लेख व चर्चा _/\_
12 Feb 2023 - 4:16 pm | कुमार१
अशोक शहाणे नावाचा तरुण : नाबाद ८८
13 Feb 2023 - 1:22 am | रामचंद्र
अमेरिकेचे अध्यक्ष जॉन्सन तसेच रेगन हे काही प्रतिभावंत म्हणून गणले जात नाहीत. पण त्यांचा एक किस्सा पत्रकार वॉल्टर क्रॉन्काइट यांनी सांगितला आहे. एकदा व्हाईट हाऊसमध्ये मेजवानीप्रसंगी क्रॉन्काइट निमंत्रित होते. जॉन्सन यांनी त्यांना आवर्जून आपल्या शेजारी बसवून घेतलं. नंतर क्रॉन्काइट यांच्या लक्षात आलं की जॉन्सन बोलता बोलता आपल्याला मनाई असलेला पदार्थ क्रॉन्काइटच्या पानातून सफाईने बोलण्याच्या नादात घेतल्याचे भासवत खात आहेत. (कारण त्यांच्यावर पत्नी लेडी बर्ड यांची नजर होती.)
13 Feb 2023 - 2:34 pm | कुमार१
हा किस्सा भारी असून तो भालचंद्र नेमाडे यांनी कोसलाच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच्या प्रस्तावनेत तपशीलवार लिहिला आहे. तो थोडक्यात लिहितो.
रा. ज. देशमुख हे तत्कालीन मराठी साहित्यातील मोठे प्रकाशक. त्यांच्याकडे नेमाडे व शहाणे ही दुक्कल गप्पांसाठी जमत असे. देशमुख त्याकाळी खांडेकर, पु ल देशपांडे आणि रणजीत देसाई यासारख्या मातब्बर लेखकांचे साहित्य प्रकाशित करीत होते. परंतु ही दुक्कल मात्र त्या लेखकांवर वैतागलेली होती. या प्रस्थापित लेखकांचे सगळं कसं कृत्रिम, जुनाट आहे असे मत हे दोघे व्यक्त करीत.
हे वारंवार ऐकल्यावर देशमुख एकदा त्यांना म्हणाले,
“मोठ्या लेखकांची टिंगलटवाळी करणं सोपं आहे. तुम्ही असे एक तरी लिहून दाखवा बरं !” त्यावर नेमाडे म्हणाले,
“खांडेकरांसारखी कादंबरी आठेक दिवसात सहज लिहिता येईल”. त्यावर देशमुख म्हणाले, “लिहून दाखवा, बकवास पुरे”
नेमाडे म्हणाले की आम्ही लिहू सुद्धा पण आमचं कोण छापणार ?
मग देशमुख यांनी शेवटचे सांगितले,
“लिहून दाखवा, मी छापतो”.
यानंतर मग इरेला पेटून नेमाडेंनी 18 दिवस सलग बसून कोसला लिहिली.
असा तो इतिहास !
28 Mar 2023 - 1:39 pm | सुधीर कांदळकर
आवडला. जी एंच्या विक्षिप्तपणाबद्दल सुनीताबाईंच्या आणि त्यांच्या प्रकाशित पुस्तकरूपातील पत्रव्यवहारात वाचनीय गमती आहेत. ते नेहमीं रशियन बुद्धिबळपटूंसारखा काळा चष्मा घालीत असे मी ऐकले होते.
बाबुराव अर्नाळकर लेखन करतांना रसिकांचा उपद्रव टाळण्यासाठी स्वत:च्या ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळच्या निवासस्थानी न करतां परळ्च्या आईमाई मेरवानजी स्ट्रीटवरील एका चाळीत तिसर्या मजल्यावरील एका खोलीत करीत.
नटश्रेष्ठ डॉ. लागूंना एकदा एका गणेशोत्सवात सत्कारासाठी बोलावले होते. तेव्हा त्यांनी गणपतीची मूर्ती आणणे आणि त्याची पूजा करणे ही कशी अंधश्रद्धा आहे यावर बोलायला सुरुवात केली. आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माईक सोडला नव्हता. शेवटी भाविकांचा जनक्षोभ टाळण्यासाठी हडेलहप्पी करून त्यांचे भाषण थांबवले गेले आणि कार्यकर्त्यांच्या संरक्षणात त्यांना बाहेर नेले होते.
छान लेखाबद्दल लेखकांचे आणि विविध मनोरंजक किश्शांबद्दल प्रतिसादकांना खूपखूप धन्यवाद.
28 Mar 2023 - 2:31 pm | कुमार१
तुम्ही पण अगदी झकास किस्से सांगितलेत. सर्व आवडले!
28 Mar 2023 - 3:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
काय एकेक किस्से, मजा आली वाचुन, माझ्याकडचे अजुन काही
--एका कार्यक्रमात पं.ह्रदयनाथ मंगेशकरांनी सांगितलेला-- उंबरठा चित्रपटातील "सुन्या सुन्या मैफलीत माझ्या" गाण्याचे रेकॉर्डिंग चालु होते. तेव्हा "पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे" ही ओळ जब्बार पटेलांना खटकली. एक विवाहीत स्त्री असे म्हणते याचा अर्थ वेगळा निघतोय असे त्याना वाटत होते. कविता सुरेश भटांची असल्याने त्याना नागपूर ला फोन करावा असे ठरले. तितक्यात मंगेशकर कुटूंबाच्या स्नेही शांताबाई शेळके तिथे आल्या. त्यानी विचारले की काय अडचण आहे? प्रकार कळल्यावर त्यानी थोडा विचार केला अणि पटकन म्हणाल्या "अहो सोपे आहे, कुणीतरी ऐवजी तुझे हसु" असे करा.
हा बदल ईतका सोपा होता, तरीही गाण्याचा अर्थ सुधारत होता आणि मीटरमध्येही चपखल बसत होता की सगळे अवाक झाले. फोनवर सुरेश भटांनीही लगेच परवानगी दिली आणि रेकॉर्डिंग पार पडले. याला म्हणतात प्रतिभा.
असाच दुसरा किस्सा माडगुळकरांचा प्रसिद्ध आहे. त्यांच्या एका गाण्याची ओळ बदलायची वेळ आली आणि थोडा बदल सुचवला गेला तेव्हा ते संगीतकारावर कडाडले "उगीच माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावु नका" आणि स्वतः ओळ सुधारुन दिली.
तिसरा किस्सा प्रसिद्ध तबलावादक थिरकवा साहेबांचा. ते वयस्कर झाले होते आणि उ. हबीबुद्दीन खां साहेबांच्या एका कार्यक्रमाला गेले होते. हबीबुद्दीन खां साहेबांचे "मुठिने धिर धिर वाजवणे" फार लोकप्रिय होते. त्यांचे तबलावादन झाले आणि त्यानी स्टेजवरुनच थिरकवाना विनंती केली की "आप कुछ बजावो" आता थिरकवा खरेतर प्रेक्षक म्हणुन आले होते आणि त्यांचा बहराचा काळ संपला होता. तेव्हा असे म्हणणे रिवाजाला धरुन नव्हते. पण आव्हान स्वीकारुन ते स्टेजवर गेले. लेहरा साथ करणार्या सारंगियाने आदराने विचारले "खान साब क्या चलन रखु?" म्हणजे किती वेगाने वाजवु? त्यावर बाणेदार थिरकवा म्हणाले "जहासे छोडा उधरसेही लेलो" असे म्हणुन त्यानी त्याच वेगात पुढचे तबलावादन करुन उपस्थिताना बोटे तोंडात घालायला लावली.
अवांतर-- हे ज्ञान भांडार लुटण्यासाठीच अल्लारखांनी आपला मुलगा असुन झाकीर भाईना थिरकवा साहेबांकडे गंडाबंधन करुन तबला शिकायला पाठवले.
माझ्या गुरुंचे गुरु दाउदखां साहेब एकदा अल्लारखां कडे गेले होते. अल्लारखांचे तेव्हा पुर्ण देशात नाव गाजत होते. आजुबाजुला बरीच मंडळी होती. अर्थात तबला वाजविण्याची फर्माईश झालीच. दाउदखांनी आव्हान देउन २५ गती अशा वाजवुन दाखविल्या की ज्या पुर्ण हिन्दुस्तानात फक्त तेच वाजवत. त्यांच्या पोतडीतील ज्ञान बघुन थक्क झालेले अल्लारखां म्हणाले" खान साब, मै तो सिर्फ पेट के लिये बजाता हुं"
28 Mar 2023 - 3:21 pm | कुमार१
तुम्ही लिहिलेले किसे खरोखरच अद्भुत आणि अद्वितीय आहेत.
हा प्रतिसाद जणू एका संगीताच्या मैफिलीचा आनंद देऊन गेला !!
29 Mar 2023 - 7:40 pm | सुबोध खरे
उस्ताद अल्लारखां साहेब आणि उस्ताद झाकीर हुसेन यांची जुगलबंदी मी स्वतः मुंबईत षण्मुखानंद हॉल मध्ये पाहिली.
त्यात उस्ताद झाकीर हुसेन साहेब एक गत वाजवत मग तीच गत उस्ताद अल्लारखां साहेब वाजवत. यानंतर हि गत दोघे दुप्पट वेगाने वाजवत असे तीन वेळेस झाल्यावर उस्ताद झाकीर हुसेन यांची सीमा झाल्यावर त्यांच्या दुप्पट नंतर चौपट वेगाने उस्ताद अल्लारखां साहेब यांनी वाजवली.
तेथे असलेले सर्व लोक उभे राहून अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन टाळ्या वाजवत होते आणि उस्ताद झाकीर हुसेन यांनी उस्ताद अल्लारखां साहेब यांचे अक्षरशः पाय धरले.
हा अविस्मरणीय प्रसंग पाहताना आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.
28 Mar 2023 - 4:23 pm | सुधीर कांदळकर
केवळ अद्भुत रामेसाहेब. तीनही व्यक्ती हृदयात जपलेल्या असल्यामुळे फारच वाचायला मजा आली.
28 Mar 2023 - 4:34 pm | कुमार१
इंग्लंडचे ‘क्रिकेटचे पितामह’ डब्ल्यू जी ग्रेस यांचा एक भारी किसा इथे वाचला.
क्रिकेट रसिकांनी जरूर वाचावा !
त्या लेखाचा विषय पूर्ण वेगळा आहे. परंतु एक उदाहरण म्हणून हा किस्सा दिलेला आहे.
29 Mar 2023 - 7:50 pm | सुबोध खरे
कविवर्य मंगेश पाडगावकर हे सहसा आपल्या गीतात कोणताही बदल करायला तयार नसत .
त्यांचे एक गीत आहे दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झूलायचे. यात एक ओळ अशी आहे.
माझ्या या घराच्या पाशी
थांब तू गडे जराशी.
ते मूळ काव्य थांब ना गडे जराशी असे होते.
त्यात बदल करण्यास श्री पाडगावकर तयार नव्हते. कारण थांब ना हे शब्द आर्जवी आहेत असे त्यांचे म्हणणे होते.
त्या अर्थाचा विपर्यास होईल असे श्री अरुण दाते यांनी नम्रपणे सांगितल्यामुळे नाखुशीने का होईना पण त्यांनी हे थांब तू गडे जराशी असा बदल करून दिला.
30 Mar 2023 - 10:54 am | कुमार१
घटना 2005 मधील आहे. त्यावर्षीच्या ‘अंतर्नाद’ मासिकाच्या दिवाळी अंकात ‘सफाई’ ही कादंबरी प्रकाशित झाली होती. त्यावर लेखकाचे नाव कार्तिक कौंडिण्य असे लिहिले होते. कादंबरी सफाई कामगार स्त्री या संवेदनलशील विषयावर असून ती सुंदर आहे. त्या कादंबरीच्या लेखकाचे कधी न ऐकलेले हे नाव पाहून अनेकांना संशय आला होता, की हा काय कोणी नवोदित लेखक असणार नाही; हा तर मुरलेला लेखक दिसतोय ! कादंबरीच्या शेवटी त्या लेखकाचा मुंबईतील पत्ताही दिला होता. मग एक वाचक प्रत्यक्ष त्या पत्त्यावर गेले तेव्हा तिथे कोणीही कौंडिण्य नावाचे राहत नसल्याचे त्यांना समजले.
दरम्यान मी देखील त्या लेखकांना कादंबरी आवडल्याचे पत्र लिहून ठेवले होते. तेवढ्यात त्या वरील वाचकांनी मासिकाच्या पुढच्या अंकात लिहिले, की कौंडिण्य नावाचे कोणी लेखक तिथे अस्तित्वात नाहीत: ही काहीतरी थापाथापी आहे. हे वाचल्यानंतर मी ते लिहिलेले आंतरदेशीय पत्र फाडून टाकले. या विषयावर मासिकात काथ्याकूट झाल्यावर संपादकांनी खुलासा केला. त्यात म्हटले होते की या कादंबरीचे लेखक त्याच पत्त्यावर राहतात. परंतु काही कारणास्तव त्यांना खरी ओळख जाहीर करायची नाहीये, तरी वाचकांनी त्याचा आदर करावा आणि साहित्यबाह्य संशोधनात रस घेऊ नये.
इथे हा विषय संपला होता. पण माझ्या बाबतीत खरी गंमत पुढे घडणार होती...
2015 मध्ये माझा एक लेख ‘अंतर्नाद’मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो वाचकप्रिय ठरला. त्याबद्दल मला अनेकांचे फोन, पत्रे वगैरे येत होती. एके दिवशी एक असाच अनोळखी फोन आला. तो एका मान्यवर लेखकांचा होता. मग आमच्या गप्पा झाल्या. त्या ओघात ते मला बोलून गेले, की 2005 मधील सफाई कादंबरी त्यांनीच लिहिलेली आहे ! मग मी त्यांना विचारले की फक्त त्या वेळेसच तुम्ही खरे नाव का लपवलेत? तेव्हा ते म्हणाले,
“एखाद्या लेखनाचे मूल्यमापन, ते कोणी लिहिले आहे यापेक्षा ते काय लिहिले आहे यावरून व्हावे ही इच्छा होती. मला यानिमित्ताने बघायचे होते, की एका अनोळखी नावाने लिहून पाहिल्यानंतर वाचकांना कादंबरी कशी वाटते ते, आणि तो प्रयोग यशस्वी झाला”.
हे लेखक म्हणजे सुमेध वडावाला (रिसबूड).
कालांतराने ही कादंबरी त्यांच्या खऱ्या नावाने प्रसिद्ध झालेली दिसते आहे