ध्रांगध्रा - १
"आता हे झाड दिसतय ना त्याच्या बाजूने पुढे गेलो की दिसेलच आपल्याला."
"आरे असं सांगून दाखवलेलं हे पाचवं झाड."
"नाही रे, या वेळेला अगदी खरं. माझे गट फिलींग सांगतंय मला. यावेळेला अगदी खरं दिसेल ते आपल्याला. मला तर मनातून आत्ता ते दिसायलाही लागलंय."
"काय?"
"काय म्हणजे? आपण जे शोधतोय ते. ते मोठे देऊळ. त्याच्या त्या दगडी भक्कम भिंती... त्याचा भव्य दिंडी दरवाजा..... देवळाशेजारी उभे असलेलं पिंपळाचं झाड, झाडाखाली प्रशस्त पार. सगळं दिसतंय बघ मला अगदी मनात."
"बघ बघ नीट बघ. पारावर माणसे पण बसली असतील तिथे.
पाराशेजारच्या दत्ताच्या देवळात कीर्तनपण चालले असेल"
"ए शिवा... कर चेष्टा कर चेष्टा आता तू पण. पण एकदा तू ते देऊळ बघितलंस ना, की मानशील मला."
महेशचं हे नेहमीचेच. मला आत्तापर्यंत त्याच्या या बोलण्याची सवय झाली आहे म्हणाना. कुठल्यातरी पुस्तकात काहीतरी वाचायचं आणि ते शोधायला जायचं.
खरं तर महेश आणि मी, आम्ही लहानपणापासूनचे मित्र नाही. कधीतरी अकरावीत टेक्निकल घेतल्यामुळे तो आणि मी एका वर्गात आलो. समानशीले व्यसनेषु सख्यम् म्हणजे समान आवडी निवडी असणारांची मैत्री होते म्हणे. आमच्या दोघांत माझे नाव शिवा आणि त्याचे महेश ही दोन्ही नावे शंकराची इतकंच काय ते समान. मी दादर मधे वाढलेलो. बालमोहनचा विद्यार्थी. तो जुन्नरचा. त्याचं लहानपण शेतात, नदीवर, खेळण्यात गेलं. माझं शिवाजी पार्कवर.
विटीदांडू खोखो कबड्डी हे त्याचे खेळ. बॅडमिंटन, टेबलटेनिस हे माझे खेळ. काहीच समान नाही. पप्पांची बदली झाली म्हणून मी नाशिकला आलो. तो देखील नाशिकला काकांकडे शिकायला राहिला. बीवायके कॉलेजच्या अकरावीच्या वर्गात त्याची माझी गाठ पडली. वर्गात सगळेच अनोळखी. जे नाशिकचे होते ते एकमेकांना ओळखत होते. त्यांचा प्रश्न नव्हता. आम्ही सातआठ नवे होतो. ज्याच्याशी ओळख असते त्याला आपण बाकावर शेजारी सहज बसू देतो. हा नैसर्गिक नियम.
हा बाकावर एकटाच होता. मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो. हे निमित्त ओळख व्हायचं.
आमचे छंद, आवडीनिवडी सगळंच वेगळं. वाचायला दोघानाही आवडतं, आवडायचं. पण मी एनीड ब्लीटन, पेरी मेसन यांचा फॅन, हा गो.नी. दांडेकर, जी.ए. वाचणार.
गप्पांचे विषयही वेगळे. माझे ड्रॉईंग चांगलं, याचं मराठी. स्टेफी ग्राफ, बोरीस बेकर, मार्टिना नवरातिलोवा, जॉन मेकॅनरो हे त्याला फक्त ऐकून माहीत. क्रिकेटमधे गावसकर, कपिलदेव तेंडुलकर फार फार तर कुंबळे इतपतच उडी. स्पोर्टसच्या गप्पा सुरू झाल्या की हा मौनीबाबा होणार. पण एक आहे. त्याला इतिहासाची, त्यातही महाराष्ट्राच्या इतिहासाची खडा न खडा माहिती पाठ. महाराजांचे सगळे गड किल्ले तिथल्या लढाया सगळं माहीत. मला तर शिवनेरी हा किल्ला जुन्नरमधे आहे हेच नव्याने माहीत पडत होते.
अकरावी बारावी नंतर वाटा बदलल्या. मी ठरवल्याप्रमाणे इंजिनीयरिंगला गेलो. मॅथ्स अवघड गेल्यामुळे महेशने एक वर्ष ड्रॉप घेतला. पुढच्या वर्षी मॅथ्समधे वाताहात झाल्यानंतर त्याने सायन्सला रामराम करत आर्टसकडे गाडी वळवली.
शिक्षणाच्या वाटा बदलल्या तरी आमच्या दोस्तीच्या वाटा बदलल्या नाहीत.
कसं कोण जाणे पण तो नेहमी सोबत असणार. जर्नलच्या कॉप्या मार, ड्रॉईंग शीटच्या जीट्या मार ही, असली वर्षअखेरची कामे करताना माझ्यासोबत तो इमाने इतबारे जागणार.
आर्टसला असल्यामुळे की काय पण महेशचे अभ्यासेतर उपक्रम वाढत गेले. यात प्रमुख्याने नाशिकच्या आसपासची अनवट माहीत नसलेली मंदीरे शोधणे, आणि ट्रेकिंग. त्यासाठी तो कुठेही जायला तयार असतो. कुठल्याही गावाला जायला लागलं तरी चालेल.
कधी कधी दोन्ही कामे एकत्र असणे ही पर्वणीच. एकदा कळसूबाईचा ट्रेक करताना येताना घोटीजवळच्या एका गावात जाऊन बसला. तिथे म्हणे शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट इकडे आणताना केलेल्या मदतीबद्दल घोटीच्या देशमुखांना हातातले कडे बक्षीस दिले होते, ते पहायला गेला होता.
टीवायचे वर्ष, आर्टसच्या बहुतेक मुलांसारखे याला एमपीएससी, यूपीएससीची स्वप्ने पडायला लागली. पण हे साहेब इतिहासातून बाहेरच पडायला तयार नाहीत. त्यातून नाशिक म्हणजे रामायण काळापासूनचे. इतिहास म्हणाल तर रामायण, महाभारत, पुढे सातवाहन, राष्ट्रकूट, शिलाहार भोज, अभिर, त्रैकुटक, विष्णूकुंद्री, कालचुरी, चालुक्य, यादव, मराठा या सगळ्या राजवटींचे अवशेष खाणाखुणा इथे कुठे ना कुठे सापडत रहातात. नशीब शूर्पणखेचे नाक इथे कापले होते असे ठिकाण अजून तरी कुणी दाखवत नाही.
या सगळ्यात महेशची शनिवार रविवार सोडाच पण अधल्यामधल्या दिवशीही शोधमोहिमेची भटकंती चालू असते.
आता पहा ना, मोजून चार दिवसच झाले असतील. त्याने सांगितलं की वणीच्या मागच्या डोंगरात एक कसलेसे दगडी बांधकाम सापडलंय म्हणून.
खरं तर मी इथपर्यंत येणारच नव्हतो. पण महेश एकटाच आहे म्हटल्यावर सोबत म्हणून आलोय. त्यानेही मला थेट कुठे जाणार आहोत हे सांगितलेले नाहिय्ये.
पण काय करणार. दोस्त पडला ना. कुणीतरी म्हटलय की शाळेत स्वतःला लागली नसतानाही मित्राला सोबत म्हणून मुतारीपर्यंत येतो तो तुमचा खरा दोस्त.
लोक ना कायच्या काय संबंध जोडतात....
क्रमश:
प्रतिक्रिया
28 Dec 2021 - 8:05 pm | कंजूस
वाचणार.
28 Dec 2021 - 9:26 pm | अनन्त्_यात्री
.
29 Dec 2021 - 10:07 am | रंगीला रतन
वाचतोय
पुभाप्र
29 Dec 2021 - 12:05 pm | अनिंद्य
पुढे वाचण्याची उत्सुकता आहे.
शीर्षक आणि लेखाचा संबंध लागला नाही मला. गुजरातमध्ये ध्रांगध्रा नावाचे झालावंशीय राजपुतांचे संस्थान आहे खूप जुना इतिहास असणारे.
30 Dec 2021 - 1:17 pm | शित्रेउमेश
कडक सुरवात.... वाचनार आहे....
30 Dec 2021 - 1:39 pm | ज्ञानोबाचे पैजार
शेवटची मैत्रिची व्याख्याही जबरा आवडली
पैजारबुवा,
30 Dec 2021 - 1:40 pm | तुषार काळभोर
पुढील भागाची उत्सुकता लागलीये.
30 Dec 2021 - 1:44 pm | टर्मीनेटर
रोचक सुरुवात 👍
येऊ द्यात पुढचे भाग लवकर.
30 Dec 2021 - 2:13 pm | श्वेता२४
पुढील भागाची उत्सुकता वाढली.
31 Dec 2021 - 8:33 am | विजुभाऊ
धन्यवाद
31 Dec 2021 - 11:59 am | प्राची अश्विनी
छानच. पुढील भाग लवकर टाका हो.
1 Jan 2022 - 6:35 am | विजुभाऊ
ध्रांगध्रा-२ http://misalpav.com/node/49721
7 Jan 2022 - 11:52 am | चौथा कोनाडा
झकासच ! उत्सुकता निर्माण झालीय !
विजुभाऊ म्हणजे असल्या नॉस्टेल्जिक लेखनात हातखण्डा ! +१
पण,
"ओ विजुभाऊ, मराठी लेखनातील विरामचिन्हे लेखात वापरल्यास लई उपकार होतील मिपाकरांवर !"
7 Jan 2022 - 2:21 pm | विजुभाऊ
नोटेड मिलॉर्ड
30 Jan 2022 - 11:32 am | सुखी
इंटरेस्टिंग