माझा देव

Primary tabs

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
27 Nov 2021 - 11:44 pm

हातातल्या चावीचा जुडगा सावरत त्यातली नेहमीची चावी वेगळी केली आणि समोरच्या कुलुपाला लावली. बराचवेळा चावी फिरवूनही कुलूप काही उघडेना. शेवटी कुलुपाला धरून जोरात ओढले. कुजलेल्या बिजागरीने कुलपाची साथ सोडली आणि कुलूप हातात आले. कडीही निघून खाली पडली. आत काय असणार याचा मला पुरेपुर अंदाज होता. तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी आत डोकावून बघितले. दहा रुपयाच्या दोन नोटा एका कोप-यात पडून होत्या. दुस-या कोप-यात एक कोळी आपले जाळे मांडून बसला होता. त्या दोन नोटा बाहेर काढून मी खिशात टाकल्या आणि देव्हा-याकडे निघालो.समोरची गणेशची मुर्ती माझ्याकडे रोखून बघत होती. सवयीप्रमाणे माझा हात उजवीकडे गेला आणि तिथले ताम्हण घेतले. पुजेची गणेशाची मुर्ती त्या ताम्हणात ठेवली आणि पळीने पाणी टाकू लागलो. नेहमीचे मंत्र मात्र मला काही आठवेना. मुर्तीला खाली तसेच ठेवून ताम्हण पाण्याने भरून टाकले. मंदीर उघडेच ठेवून मी बाहेर पडलो.

मी कधी दवाखान्यात पोहचलो ते मला कळालेच नाही. जड पावलांनी जीना चढून वर पोहोचलो आणि तिच्या शेजारी जाऊन थांबलो. तिच्या हाताला हात लावून बघितला तर तो अजूनही गरमच होता. माझ्या स्पर्शाने ती जागी झाली. कालपेक्षा आज डोळे अजून खोल गेले होते. " अहो तुम्ही कधी आलात ? कधी सोडणार आहेत हो मला ? कंटाळा आला मला इथे आता. " तिने खोल गेलेल्या आवाजात विचारले. " झालच आता. थोडी कळ सोस. " मी थरथरत्या आवाजात उद्गारलो. जे मला कळू द्यायचे नव्हते ते तिने माझ्या आवाजावरून ओळखले. " किती सांगितला आहे खर्च ? " तिने विचारले. "तू आराम कर पैशाच काय ते बघतो मी " " पुजा केलीत ना हो मंदिरात ? का थेट आलात इथे ? आता त्याचाच काय तो आधार ! " ती विचारती झाली. " हो. आता मंदिराचा तोच काय तो आधार. " मी उद्गारलो. थोड्यावेळाने तिचा डोळा लागला.तिला तसेच निजलेले ठेवून मी बाहेर पडलो.

हळूहळू चालत एकदाचा बँकेत पोहचलो. डाव्या बाजूला मॅनेजरची खोली होती. "येऊ का आत शिंदे साहेब ? " मी विचारले.शिंदे एकदम उठून उभे राहिले. " अहो विचारता काय ? या आत या. कसे आलात इकडे ? " शिंदेंनी विचारले. "अहो आमच्या हिने अंथरूण धरलय हो. बर होण्याचे नावच घेत नाही. ताप कमी होण्याचे लक्षण नाही. आयुष्यभर चुलीसमोर बसून घेतलीली ऊब आता जणू बाहेर पडत आहे. " " जोशीबुवा मग काही पैसे पाहिजे होते का ? मला जेवढे जमतील तेव्हढे नक्की देईन मी. " शिंदेंनी माझी नस बरोबर पकडली. " पैसे तर हवेत. पण असे उसने नकोत. कर्ज पाहिजे होते मला थोडे. ते होईल का ते विचारण्यास आलो. " "हे बघा बुवा मी थोड स्पष्टच बोलतो लोन मिळणे अवघड आहे. तुमचे आता वय झाले आहे. इनकमचा फिक्स असा सोर्स नाही. तेव्हा अवघड आहे लोन मिळणे. " मॅनेजरने आपली असमर्थता दाखवली. "मंदिराची जमीन माझ्या नावावर आहे. ती गहाण ठेऊन काही मिळेल का ? " " अहो बुबा अशी केवढी जमीन आहे ती ? आणि तुम्हाला ती गहाण ठेवणे जमेल नक्की ? तरी ठीक आहे मी बघतो काय होते ते. निरोप कळवतो मी. " एवढे बोलून मॅनेजर उभा राहिला. अर्थात मी बाहेर जावे याची ती खूण होती.

हताश होऊन मी बाहेर पडलो. मनात विचारांचे काहूर माजले होते. हिच्या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली नव्हती.
पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचे धैर्य माझ्याकडे उरले नव्हते. बरे वाटावे म्हणून मंदिराकडे निघालो. मंदिराच्या पायरीवर भिकारी बसला होता. आजही बहुधा मंदिराकडे कोणी फिरकलेले दिसत नव्हते. त्या भिका-याने माझ्यापुढे अपेक्षेने हात पसरले. माझ्या खिशात सकाळी दानपेटीतून काढलेले केवळ वीस रुपये होते. ते त्याच्या हातावर टेकवले आणि आत देव्हा-यात गेलो. सकाळी बुडवून ठेवलेली मुर्ती अजूनही माझ्याकडे रोखून बघत होती. बाजूचा पाट घेऊन मी त्यावर बसून राहिलो. मनात विचारांचा गोंधळ आता पुन्हा वाढला होता.

काय करणार होतो मी पुढे ? मदतीसाठी येणारे असे कोणीच नाहीये का ? सगळा भार आता देवावर टाकावा. आयुष्यभर त्याची पुजाअर्चना केली. कधीतरी फळ देईलच ना ! पण ..पण.. हा तर व्यवहार झाला. देवाला ते मान्य असेल ? खरेतर आयुष्यात देवावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्या-या असंख्य लोकांशी मी भेटलो होतो. मंदिरात येऊन कान पकडून उड्या मारणारे , लोटांगणे घालणारे , न चुकता उदबत्ती लावून जाणारे , प्रदक्षिणा घालताना आठ झाले की नऊ असे घोळ घालणारे , काही मंदिराबाहेरच अर्धी चप्पल सोडुन नमस्कार करणारे तर काही देव कसा नाही , त्यावरचे राजकारण यावर गप्पा झोडणारे , बायकोला आत पाठवून स्वताः बाहेर थांबणारे असे असंख्य नमूने. पण यात नेमका मी कोण ? माझ्या मते देव तरी आहे का ?

माझ्या या विचारांवर मी एकदम दचकलो. आता या वयात असले विचार ? तेही सगळे आयुष्य देवपुजेत घालवून ? पण मुळात देवपुजा हा काही मी निवडलेला मार्ग नव्हताच. माझे वडिल मात्र मनापासून पुजा करत होते. त्यांच्यावेळेस ही गर्दी जमायची मंदिरात.
लहानपणापासून मी जे बघत आलो तेच मी करत आलो. त्यात भक्ती होती की केवळ एक यांत्रिकपणा आला होता ? जर त्यात काहीही भक्तीच नव्हती तर आता देव हिला वाचवेल ? मी डोळे गच्च मिटून घेतले.

बाहेर दरवाज्याचा कुरकुरण्याचा आवाज आला आणि माझी तंद्री मोडली. एक लहानसा मुलगा हातात चिठ्ठी घेऊन उभा होता. " बाबांनी दिली आहे " एवढेच बोलून तो मुलगा चिठ्ठी देऊन निघून गेला. चिठ्ठी शिंदे साहेबांची होती. 'बुवा नमस्कार. मला तुमच्या परिस्थितीचा अंदाज आहे. तुमच्या बायकोच्या आजाराचा खर्च मी आणि गावातील काही लोकांनी उचलला आहे. त्याचे पैसेही भरून झाले आहे. काळजी घ्यावी. ' मी सगळी चिठ्ठी एका दमात वाचून काढली. समोरची गणेशाची मुर्ती पाण्यातून काढली आणि पुन्हा देव्हा-यात ठेवली. कदाचित देवाने माझी इच्छा ऐकली होती.
.
.

मागचे दोन दिवस अतिशय धावपळीत गेले आणि आज तर ऑपरेशनचा दिवस आहे. " धीर धर , देव सगळ भले करेल." मी कसाबसा उद्गारलो. आता पुढचे तीन तास वाट बघणे कर्मप्राप्त होते. एकदाचे ते जिवघेणे तीन तास संपले आणि मी धावत जाऊन तिला भेटलो. ती थकलेली दिसत होती. "परवा सोडता येईल यांना. पण पुढे महिनाभर तरी काळजी घ्यावी लागेल " डॉक्टर मला समाजावून सांगत होते. मी मात्र माझ्या बायकोकडे मन भरून बघत होतो.

ऑपरेशनच्या तिस-या दिवशी एकदाचे तिला घरी सोडण्यात आले. " अहो आधी मंदिरात जावू. त्याच्याचमूळे तर मी बरी झाले. " ती उद्गारली. " हो नक्की जाऊ. त्याचाच आता आधार आहे. " एकदाचे आम्ही मंदिरात पोहचलो. "अहो कडी मोडली आहे दानपेटीची, बघितले नाही का ? " तिने विचारले. " अग हो माझ्याकडूनच तुटली ती. आता बसवतो पुन्हा " पण माझे बोलणे संपायच्या आत ती देव्हा-यात पोहचलीसुद्धा होती. तीने हात जोडले आणि दुस-याच क्षणी ती खाली कोसळली. तुटलेली कडी हातात घेऊन मी तसाच उभा राहिलो.
.
.

"पुण्यवान हो तुमची बायको. एवढे पवित्र स्थान निवडले त्यांनी देहत्याग करायला .." भेटण्यासाठी आलेले लोग माझी समजून काढत होते. पण त्यांचे कुठलेही शब्द मेंदूपर्यंत पोहचत नव्हते. मी माझ्या घरातून समोरच्या मंदिराकडे एकटक पहात होतो. हळूहळू लोक निघून गेले. आता मी एकटाच या घरात राहिलो होतो. कोप-यात पडलेली कडी उचलली आणि मंदिरात गेलो. ती कडी पुन्हा नीट केली. आणि आत समोर देव्हा-याकडे पाहिले. कदाचित देवत्वाला समजून घेणे अजुन बाकी होते. किंबहुना त्याचा शोध आता चालू झाला होता.

समाप्त

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

भागो's picture

28 Nov 2021 - 8:08 am | भागो

कथा अगदी मनाला भिडली.
छान आहे.

तुषार काळभोर's picture

2 Dec 2021 - 3:42 pm | तुषार काळभोर

आवडली आहे, हे नक्की!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Dec 2021 - 3:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

कदाचित देवत्वाला समजून घेणे अजुन बाकी होते. किंबहुना त्याचा शोध आता चालू झाला होता.

हे वाक्य विषेश आवडले

पैजारबुवा,

तर्कवादी's picture

2 Dec 2021 - 4:45 pm | तर्कवादी

ऑपरेशन वगैरे व्यवस्थित पार पडूनही बाईंचा मृत्यू कशामुळे झाला ? आजार काय होता ? तपशील नीट समजले नाही ..

माझ्यामते या कथेत पुजा-याची बदलणारी मानसिकता हा मुख्य गाभा आहे. पत्नीच्या आजारामुळे केवळ त्याला चालना मिळाली. त्यामूळे त्या आजारपणाच्या खोलात कथेला फारसे नोंदवले गेलेले नाही.

जेम्स वांड's picture

2 Dec 2021 - 4:59 pm | जेम्स वांड

दुःखांती झाली, पण त्यातूनही कथानायक देवत्वाच्या शोधाला लागला, अजून काय बोलणार, असंघटित गटांत पुजारी भिक्षुक मंडळींचे एकंदरीत कठीण असते, अश्या लोकांना फायनान्स प्लॅन करणे, सेविंग, वेल्थ क्रियेशन समजवून सांगता येईल किमान फुल न फुलांची पाकळी जाणकार लोकांकडून

स्वधर्म's picture

2 Dec 2021 - 5:48 pm | स्वधर्म

आवडली. मदीरातल्या देवाबद्दल बरंच लिहीलेलं आहे, पण नायकाला देव बॅंक मॅनेजर शिंदे यांच्या रूपात भेटला, हे नायकाच्या लक्षात आले असते, तर काही वेगळाच शेवट झाला असता.

तसा शेवट केला असता तर तो खुपच अपेक्षित असा झाला असता. तसे पाहता पत्नीच्या मरणानंतर देवावर राग काढणे , डूख धरून बसणे अशा नैसर्गिक प्रतिक्रिया पुजा-यांकडून अपेक्षित आहेत त्याऐवजी पुजारी आपली दैवत्वाची व्याख्या बदलू पाहत आहे.

मुख्य म्हणजे कथेमद्धे दैवत्वाला कोणत्याही साच्यात बसवलेले नाही. ना मंदिराच्या , ना मदतिला धावून येणा-या माणसांमद्धे. !

देव मदतीला धावून येईल , वा कोणत्यातरी रुपात येऊन मदत करेलच या साच्यात ही कथा बसत नाही. पुजारी देवाच्या जास्त जवळ असतात या कथित समजूतीमुळे पुजा-याचे पात्र उभे केले आहे.मंदिराचा उल्लेख केवळ पात्र पुजारी असल्यामुळे आला आहे

तुषार काळभोर's picture

2 Dec 2021 - 9:02 pm | तुषार काळभोर

लेखकाने कथा लिहावी आणि सोडून द्यावी. स्पष्टीकरण देत बसू नये. कथेतील अर्थ अनर्थ विश्लेषण वाचकांनी करावे.

जेम्स वांड's picture

3 Dec 2021 - 9:57 am | जेम्स वांड

+१०,०००००००००० वेळा

चौथा कोनाडा's picture

3 Dec 2021 - 5:10 pm | चौथा कोनाडा

सुंदर कथा. भावनेला हात घातला.
लेखनशैलीमुळे कथेबरोबर वहात गेलो.
शेवट धक्कादायक झाला.
बाई वाचल्या असत्या तर जीवाला बरे वाटले असते.

Nitin Palkar's picture

3 Dec 2021 - 8:23 pm | Nitin Palkar

मनाला भिडणारी सुंदर कथा.