मै जागू सारी रैन, सजन तुम सो जाओ

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
9 Nov 2021 - 9:52 pm

तसे हे गाणे, चित्रपट आला होता ('बहुरानी', १९६३) तेव्हाच प्रथम ऐकले होते. अर्थात, सी. रामचंद्रांचे सुंदर संगीत व लताने ते गायलेले, ह्यामुळे गाणे आवडले होते. पण ह्यांतील शब्दांकडे अनेक वर्षे, मी का कोण जाणे, फारसे लक्ष कधी दिले नाही. अगदी ते साहिरचे आहे, हे माहिती असूनही.

पण अलिकडे एकदा माझे लक्ष त्या शब्दांकडे गेले आणि मी - पुन्हा एकदा- साहिरच्या प्रतिभेने थक्क झालो. तर, हा लेख केवळे साहिरच्या ह्या गीताच्या लिखाणावर आहे.

गीताचा मुखडा, नायिकेच्या दु:खद मनस्थितीविषयी व ती तशी का आहे, ह्याविषयी थोडी जुजबी माहिती देतो--

मै जागू सारी रैन, सजन तुम सो जाओ.

पहिल्या अंतर्‍यांत, अजून थोडी कल्पना येते की हे गीत नायिका मिलनाच्या पहिल्या रात्री म्हणते आहे.

सांझ ढले से, भोर भये तक, जागके जब कटती है घडिया,
मधुर मिलन की ओस मे बसकर, खिलती है जब जीवन लडियाँ..

हे खास कुणाच्याही पहिल्या रात्रीचे वर्णन आहे. संध्याकाळपासून, अगदी पहाट होईंतोस्वर, झोप आलेली नसतेच! मधुर मिलन झालेले असते, व त्यामुळे एक प्रकारची तृप्ति आलेली असते. पण नायिकेच्या पहिल्या रात्री, हे काहीच झालेले नाही.

आज नही वो रैन..

दुसर्‍या अंतर्‍यात, ह्याविषयी थोडी अधिक माहिती आलेली आहे. रात्र उलटून गेलेली आहे, व पहाट आलेली आहे,

फीकी पड गयी चॉंद की ज्योति, धुंदले हो गये दीप गगन के,

व आता, पहिल्या रात्रीसाठी मुद्दामहून शय्येवर पसरलेल्या कळ्याही झोपी गेल्या आहेत.

पण नववधूचे, मधुर मिलनाने उजळणार, असे वाटणारे भाग्यही त्या कळ्यांसारखेच झोपी गेलेले आहे.

सो गयी सुंदर सेज की कलियाँ, सो गये खिलते भाग दुल्हन के

मग आता जागे कोण आहे? तर नववधूचे डोळे, जे दु:खाने पाझरताहेत.

खुलकर रोले नैन, सजन तुम सो जाओ

शेवटच्या अंतर्‍यांत, वधू स्प्ष्ट म्हणते की आता, ही रात्र अशी उलटून गेल्यानंतर, शरीराची आग तशीच शमून संपून गेली आहे, आणि मनाची उत्कंठाही तशीच शमून गेली आहे.

जागके सो गयी तन की अग्नि, बढकर थम गयी मन की हलचल

व पुढे ती म्हणते की, शेवटी तिने स्वतःच तिचा घुंघट बाजूस केला व पायांतील छागल (वाळा) तिने स्वतःच उतरवला.

अपना घुंघट आप उलझकर, खोल दी मैने पाँव की छागल

अब है चैन ही चैन...

अगदी निराशेने ती आता उद्गगारते की आता ह्यापुढे जीवनांत आनंदी आनंद आहे!!

हिम्दी चित्रपटगीतांतून, अगदी थोड्या पण अचूक शब्दांत प्रसंगाचे चित्र, तसे॑च भावना व्यक्त करण्याची विलक्षण हातोटी, माझ्या मते तीन चार गीतकारांना वश होती-- साहिर, शैलेद्र, कैफी आजमी व राजेंद्र कृष्ण. हे साहिरचे असेच एक गीत, अनेक दिवस छळत राहिले आहे, तेव्हा आता ते जरा लिहून काढले.

कलाविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2021 - 4:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

गीताचे रसग्रहण आवडले. अशीच हिंदी चित्रपट गीतांची एक रसग्रहण सिरीज करता येईल का?

उदा. मागे लोकसत्ता मध्ये दर रविवारी मृदुला दाढे एक सदर लिहित असत. त्यात एकेका चित्रपटातील गाण्यांचे रागांच्या हिशोबाने रसग्रहण केलेले असे. तसे काहीतरी.

वर उल्लेखलेल्या तुमच्या आवडत्या गीतकारांपासुन सुरुवात होउद्या.

प्राची अश्विनी's picture

10 Nov 2021 - 4:50 pm | प्राची अश्विनी

वाह!
राजसा निजलास का रे .. आठवलं

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Nov 2021 - 5:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

पण तुम्ही म्हणता तसे शब्दांकडे लक्ष गेले नव्हते.
सुंदर शब्द, आणि उत्तम रसग्रहण,
येउद्या अशी अजून अनवट गाणी

पैजारबुवा,