‘लॉटरी'.......अरे बाप रे (कथा परिचय: ७)

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
4 Aug 2021 - 5:32 pm

विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?
४. ‘भेट’ तिची त्याची

५. नकोसा पांढरा हत्ती

६. ती सुंदर? मीही सुंदर !
..................................................................................................

आतापर्यंत वाचकांच्या मनमोकळ्या व उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे या लेखमालेचे ६ भाग सादर केले. ७वा भाग सादर करताना आनंद होत आहे.
या भागासाठी Shirley Hardie Jackson यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी नामवंत अमेरिकी लेखिका होत्या. भयकथा व गूढकथा हा त्यांच्या लेखनाचा विशेष प्रांत. याव्यतिरिक्त त्यांनी कादंबऱ्या व आत्मचरित्रही लिहिलेले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुतांश स्त्रिया चूल व मूलमध्ये अडकलेल्या होत्या आणि त्यांना घराबाहेर काम करण्याची मोकळीक नव्हती. त्याकाळी शर्ली यांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली आणि त्यांच्या अपत्यांचे संगोपन केले. त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यात त्यांनी ‘द लॉटरी’ ही कथा लिहिल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या. प्रस्तुत लेखासाठी याच कथेची निवड केलेली आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या या लेखिकेने स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडीत सुरेख व्यंगचित्रेही रेखाटली होती. सुमारे वीस वर्षे त्यांनी लेखन केले. १९६५ मध्ये त्यांचा हृदयविकारामुळे वयाच्या ४८व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या सशक्त लेखनाचा प्रभाव पुढच्या पिढीतील अनेक लेखकांवर पडला, ज्यामध्ये स्टीफन किंग यांचा समावेश आहे.

द लॉटरी : कथानक

ही कथा १९४८ मध्ये प्रकाशित झालेली असून एका अमेरिकी खेड्यात घडते.

जून महिन्यातील एका सकाळी तिथले ग्रामस्थ चावडीवर जमू लागले. निमित्त होते गावच्या वार्षिक ‘लॉटरी’ कार्यक्रमाचे. मुलांना शालेय सुट्ट्या लागलेल्या असल्याने ती आधी जमा झाली. त्यांनी विविध आकारांचे गुळगुळीत दगड व्यवस्थित रचून एका कोपऱ्यात जमा केले होते. जरा वेळाने पुरुष मंडळी जमा झाली. त्यांच्या शेतीविषयक गप्पा चालू झाल्या. त्यांच्या पाठोपाठ स्त्रीवर्गही तिथे जमला आणि गप्पाटप्पा व कुचाळ्यांत रमला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. समर्स या गृहस्थांवर होती. त्यांची स्वतःची कोळशाची वखार होती आणि ते सार्वजनिक कामांमध्ये हिरीरीने भाग घेत.

आता ते एक काळी लाकडी पेटी घेऊन समूहाच्या मध्यभागी आले. त्यांच्या मागोमाग गावचे पोस्टमास्तर त्या पेटीसाठी एक स्टूल घेऊन आले. पेटीमध्ये लॉटरीच्या चिठ्ठ्या होत्या. त्या एक दोघांनी मिळून एकत्र मिसळल्या.
पेटीतील चिठ्ठ्यांमध्ये एक सोडून सर्व कोऱ्या होत्या. फक्त त्या एकीवर काळा ठिपका काढलेला होता. त्यानंतर समर्सनी गावातील सर्व कुटुंबांच्या प्रमुखांची यादी केली. आता प्रत्येक प्रमुखाने पुढे येऊन पेटीतील एकेक चिठ्ठी उचलायची असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान ग्रामस्थांत थोडी कुजबुज झाली. एक जण म्हणाला की ही लॉटरीची प्रथा आता आजूबाजूच्या गावांनी बंद केलीय. त्यावर एक म्हातारे गृहस्थ म्हणाले की ही आपली खूप जुनी परंपरा आहे आणि ती महत्त्वाची आहे. त्या गृहस्थांनी गेले ७७ वर्ष त्या लॉटरीत भाग घेतलेला होता. या लॉटरी कार्यक्रमाबद्दल गावकऱ्यांची अशी समजूत होती, की दरसाल जून मध्ये लॉटरी झाली की पुढे शेतामध्ये छानपैकी पीक येते (Lottery in June, corn be heavy soon). त्यामुळे अन्य गावांकडे किंवा इथल्या नवमतवाद्यांकडे दुर्लक्ष करून इथली प्रथा चालूच ठेवली पाहिजे, असे त्या म्हाताऱ्या गृहस्थांनी मत दिले.

दरम्यान सर्व कुटुंबप्रमुखांच्या चिठ्ठ्या उचलून झाल्या. आता त्या प्रत्येकाने उलगडून पाहिल्या. वातावरण कमालीचे तणावपूर्ण होते. अखेर काळ्या ठिपक्याची चिठ्ठी हचिन्सन यांच्याकडे आढळली. ते सुन्नपणे त्याकडे बघत राहिले. तेवढ्यात त्यांची बायको टेसीने तक्रार केली, की समर्सनी तिच्या नवऱ्याला गठ्ठ्यातून घुसळून चिठ्ठी उचलण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. म्हणून ही फसवणूक आहे. पण हचिन्सननी तिला गप्प बसवले.

लॉटरीची पुढची फेरी अशी होती. आता हचिन्सन यांच्या सर्व कुटुंबीयांनी पुन्हा एकदा नव्या चिठ्ठ्या उचलायच्या. ते एकूण पाच जण होते. नव्या चिठ्ठ्यांमध्ये चार कोऱ्या व एक काळा टिपक्याची ठेवली होती. अजूनही टेसी धुसफूसतच होत्या. आता समर्सनी दुसरी फेरी चालू केली. हचिन्सनच्या सर्व कुटुंबीयांनी पुन्हा चिठ्ठ्या उचलल्या व उलगडून पाहिल्या. प्रथम मुलांच्या चिठ्ठ्या कोऱ्या निघाल्या. सर्वांना हायसे वाटले. मग खुद्द हचिन्सनचीही कोरी निघाली. त्यामुळे टेसीकडेच काळा ठिपकावाली चिठ्ठी असल्याचे स्पष्ट झाले व त्याची खात्री करून घेतली गेली.

आता लॉटरी चा निकाल स्वच्छ आणि स्पष्ट होता – टेसी हचिन्सन बळीचा बकरा ठरली होती !

आता समर्सनी घोषणा केली, “चला, सर्वांनी हातात दगड घेऊन या. आपण पुढचा ‘कार्यक्रम’ लवकरात लवकर उरकून टाकू !” मग सर्व ग्रामस्थांनी ढीगातील दगड आपल्या हातात घेतले. टेसीला मैदानाच्या मध्यभागी उभे केले गेले. तिने दुःखाने अस्वस्थ हातवारे केले.
“ही फसवणूक आहे, असे ती म्हणाली.

मग (तिच्या कुटुंबियांसह) लोकांनी तिच्यावर दगड मारायला सुरुवात केली. दगड अनेक आकारांचे होते. काही तर वजनदार होते. दरम्यान “हे सगळे काही न्याय्य नाही” असा कंठशोष ती करीत राहिली. लोक वेगाने तिच्यावर दगड मारत होते आणि तिच्या किंकाळ्या आसमंतात घुमत राहिल्या.
...
विवेचन
कथांत झाल्यावर बराच वेळ आपण सुन्न होतो. अगदी डोके गच्च धरून बसावेसे वाटते आणि अतीव दुःख होते. ‘बळीचा बकरा’ म्हणजे काय, ते लेखिकेने थेट स्वच्छपणे चितारले आहे. वार्षिक नरबळी दिला की गाव सर्व वाईटांपासून मुक्त होते व पुढे इतरांचे भले होते, अशी ही भीषण अंधश्रद्धा. वर्षानुवर्षे तिथे चालत आलेली. कथेच्या पूर्वार्धात सर्व गावकरी एकत्र जमलेले असून खेळीमेळीने वागताना दाखवले आहेत. परंतु जेव्हा लॉटरीचा निकाल लागून टेसीची बळीसाठी निवड होते, त्या क्षणी ती व्यक्ती सर्व गावकऱ्यांच्या दृष्टीने पूर्णपणे परकी ठरते. मानवी समूहाचे हे बदलते रंग कथेत प्रभावीपणे चितारले आहेत.

अजून एक मुद्दा. सर्व गावकऱ्यांना या लॉटरीचा अर्थ आणि त्याचा परिणाम काय असतो ते चांगलेच माहित आहे. जर का टेसीऐवजी अन्य कुणावर ती वेळ आली असती, तर टेसी देखील त्या दगडफेकीत सहभागी झाली असतीच. आता स्वतःवर वेळ आली म्हटल्यावर हा सगळा प्रकार तिला अन्याय वाटतो, हे अजब आहे ! माणसांची दांभिकता बाहेर काढण्याचे हे काम लेखिकेने सुरेख केले आहे.

या कथेतून समूह मानसिकता व झुंडशाही याचे विदारक चित्रण आपल्यासमोर येते. अशा वेळेस लोकांची सारासार विचार किंवा विवेकबुद्धी कुठे जाते कुणास ठाऊक ? शेतीत उत्तम पीक येणे हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे हे जाणण्याचीही त्यांची कुवत नसावी? की नरबळी हा त्यांच्या वार्षिक मनोरंजनाचा कार्यक्रम होता? त्या गावच्या आसपासच्या गावात ही दुष्ट प्रथा बंद केल्याचे समजूनही तिथले बुजुर्ग तिचे आंधळे समर्थन करीत राहतात. अशी खोलवर मुरलेली अंधश्रद्धा पाहून कोणीही सुजाण व्यक्ती अस्वस्थ होईल व पेटून उठेल.

अमेरिकेच्या इतिहासात अ‍ॅन हचिन्सन या नावाची धर्मसुधारक स्त्री होऊन गेलेली आहे. तिचे सुधारणावादी विचार न पटल्याने तिला तत्कालीन समाजाने बहिष्कृत केले होते. या व्यक्तीवरून लेखिकेने कथाप्रेरणा घेतलेली असावी. आजही आपण समाजात अधून-मधून एखाद्या व्यक्तीस झुंडीने जमलेले काही लोक निव्वळ संशयावरून देखील क्रूरपणे मारताना पाहतो. त्यात काही प्रसंगी संबंधित व्यक्तीचा मृत्यूही होतो. यावरून मानवी मनात हिंसा किती खोलवर मुरलेली आहे हे दिसून येते. ही आदिम प्रेरणा या कल्पित कथेचा गाभा आहे.

कथाप्रवास आणि माध्यम रुपांतरे
ही कथा १९४८ मध्ये ‘द न्यूयॉर्कर’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तेव्हा तिच्यावर प्रतिसाद देणाऱ्या वाचकांच्या पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला होता. काही मोजके वाचक वगळता बहुसंख्यांनी आपला तीव्र रोष पत्रांतून व्यक्त केला होता. कित्येकांनी, लेखिकेने असल्या भयानक कथेचे स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी केली होती. खुद्द लेखिकेच्या आईवडिलांनी देखील या कथेवर आपली तीव्र नापसंती दर्शवली होती. यथावकाश लेखिकेने तिचे स्पष्टीकरण जाहीर केले. मानवी मनातील क्रूरता व हिंसा अगदी आपल्या आसपास सतत वावरत असते, हे कथेद्वारे दाखवण्याचा हेतू तिने स्पष्ट केला.

ही कथा बरीच गाजल्याने पुढे ती अनेक नियतकालिकांत प्रकाशित तसेच पाठ्यपुस्तकातही समाविष्ट झाली. याखेरीज तिची अनेक माध्यम रूपांतरे झालेली आहेत. त्यामध्ये रेडिओ कार्यक्रम, टीव्हीवरील चित्रपट, एक अंकी प्रयोग, संगीत व नृत्य नाटिका आणि लघुपट यांचा समावेश आहे. संबंधित चित्रपट ‘द लॉटरी’ या नावानेच निघालेले आहेत.

…………………………………..
मूळ कथा इथे : https://fullreads.com/literature/the-lottery/

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 6:02 pm | गॉडजिला

कथेच्या पूर्वार्धात सर्व गावकरी एकत्र जमलेले असून खेळीमेळीने वागताना दाखवले आहेत. परंतु जेव्हा लॉटरीचा निकाल लागून टेसीची बळीसाठी निवड होते, त्या क्षणी ती व्यक्ती सर्व गावकऱ्यांच्या दृष्टीने पूर्णपणे परकी ठरते. मानवी समूहाचे हे बदलते रंग कथेत प्रभावीपणे चितारले आहेत.

खरे आहे. खरे तर टेसी ऐवजी कोणीही तिथं बकरा ठरले असते प्रत्यकेजन भावी victim होता तरीही त्यांनी लॉटरी काढली हा कलंकित विरोधाभास आहे...

जे वाचले ते लॉटरी चे गुण पुढल्या वर्षी परत गाणार....

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Aug 2021 - 6:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

वाचताना सुध्दा शहारे आले अंगावर.
पण कितीही नकोसे असले तरी हेच सत्य आहे की झुंडीतला प्रत्येक माणूस हा नेहमीच कृर आणि निर्दय असतो.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

4 Aug 2021 - 6:19 pm | टर्मीनेटर

सुन्न करणारे कथानक!
कथा परिचय आवडला 👍

सौंदाळा's picture

4 Aug 2021 - 6:27 pm | सौंदाळा

चटका लावणारी कथा
अगदी अशीच कथा जी. ए. कुलकर्णी यांच्या डोहकाळीमा या कथासंग्रहात आहे.
गावात आलेल्या भटक्या लोकांपैकी एकीला गावच्या पाटलापासून एक मुलगी होते. ती मुलगी गावतच ठेऊन भटके लोक निघुन जातात. गावात ती मुलगी अशीच इकडे तिकडे राहून थोडी मोठी होते. ही मुलगी पाटलाच्या अनैतिक संबंधातुन जन्माला आली आहे हे गावात (कदचित) कोणालाच माहिती नसते. एक वर्ष गावात दुष्काळ पडतो आणि ज्या बाईच्याअंगात देवी येत असते ती बाई सांगते की देवीला मनुष्य बळी दिला तरच पाऊस पडेल. सगळ्यांची नजर आपसुकच या मुलीवर पडते. पाटलाचा जीव पिळवटुन निघतो पण तो काही करु शकत नाही आणि शेवटी दगड मारुन सगळे त्या मुलीचा जीव घेतात.
खूपच अंगावर येणारी कथा आहे.

कुमार१'s picture

4 Aug 2021 - 6:39 pm | कुमार१

दर्दी वाचक असलेल्या वरील सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभ
सर्वांचे अभिप्राय व पूरक माहिती अगदी योग्यच.

ही कथा गाजलेली असल्याने मी निवडली खरी, पण नंतर ती वाचताना आणि त्यावर लिहिताना देखील मी खूप अस्वस्थ होतो.
लिहून पूर्ण झाल्यावर असे वाटले, की अरे बापरे , हा भयानक विषय आपण निवडतो आहोत, ते कितपत बरोबर आहे ?

शेवटी असा विचार केला, की खुद्द लेखिकेने हा विषय त्यावर टीका करावी आणि समाजाचे डोळे उघडावेत यासाठीच निवडला असणार.
आणि मग मीही हा लेख प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

कॉमी's picture

4 Aug 2021 - 7:39 pm | कॉमी

मस्त कथा!
शर्ले जॅक्सन ह्यांच्या कादंबरयांबद्दल ऐकून होतो, पण लघुकथा पण आहेत म्हणजे बहारच. स्टीफन किंगची एक आवडती लेखिका म्हणून लक्षात आहेत.

तुषार काळभोर's picture

4 Aug 2021 - 7:54 pm | तुषार काळभोर

जर का टेसीऐवजी अन्य कुणावर ती वेळ आली असती, तर टेसी देखील त्या दगडफेकीत सहभागी झाली असतीच.
>> वाचताना शेवटी शेवटी असच मनात आलं.

बाकी झुंडशाही व झुंडबळी विषयी काय बोलावे! अशा गोष्टी कमी व्हाव्यात वा होऊ नयेत, यासाठी श्री समर्थ आहेत...

खुप उत्तम विवेचन आहे.
पैजारबुवा म्हणतात ते पटतय,झुंडीतला प्रत्येक माणूस हा नेहमीच कृर आणि निर्दय असतो.
आणि सौंदाळा यांनी सांगितलेली कथाही विचित्र हतबलता दाखवते.
लेखिकेने नक्कीच मूठभरांची दांभिकता आणि असंवेदनशीलता अधोरेखित केली आहे.

कुमार१'s picture

4 Aug 2021 - 8:30 pm | कुमार१

अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !

कथेवर आधारित लघुपट इथे पाहता येईल

कुमार१'s picture

4 Aug 2021 - 8:30 pm | कुमार१

अभिप्राय व उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल वरील सर्वांचे आभार !

कथेवर आधारित लघुपट इथे पाहता येईल

तुषार काळभोर's picture

4 Aug 2021 - 10:11 pm | तुषार काळभोर

शेवटी सगळे कॅमऱ्याकडे (आपल्याकडे) दगड मारतात, तेव्हा अंगावर काटा येतो.
फॅन्ड्रीचा शेवट असाच आहे. भिरकवलेला दगड आपल्या अंगावर येतो नि तो आत कुठेतरी लागतो.

गॉडजिला's picture

4 Aug 2021 - 10:45 pm | गॉडजिला

अगदी लहान मुलालाही परंपरेचे (दगड भिरकावायचे) पद्धतशीर बाळकडू दिले जाते आहे... का तर फक्त लॉटरीमधे नावं आले म्हणुन...

उद्या जो कोणी लॉटरीमधे नावं न येताही मानवतेच्या दृ्टीकोनातून केवळ जुना नालायकपणा म्हणुन या विरुद्ध आवाज उठावेल त्यालाही लोकं गुन्हेगारच मानणार.

माझे आजोबांच्या बाळपणी आमचे घरी कोकणातून एक बालविधवा लहानपणीच रहायला आली होती व तीचे उभे आयुष्य आमच्याकडेच गेले होते... ती आमची नातेवाईक सुध्दा न्हवती त्यामूळे घरातील स्त्रियांनी देखील तिला बराच त्रास दीला होता... तिची लॉटरी लागली :(

श्रीगणेशा's picture

4 Aug 2021 - 11:02 pm | श्रीगणेशा

आता समर्सनी घोषणा केली, “चला, सर्वांनी हातात दगड घेऊन या. आपण पुढचा ‘कार्यक्रम’ लवकरात लवकर उरकून टाकू !”

या वाक्यानंतर वाचकाला "लॉटरी" चा खरा अर्थ समजतो!
तोपर्यंत हलकी-फुलकी वाटणारी कथा अचानक गंभीर वळण घेते.
त्यामुळे कथा अधिकच परिणामकारक होते.

सैराट चित्रपटातील शेवटच्या प्रसंगातही असेच धक्का तंत्र वापरले आहे.

सौन्दर्य's picture

4 Aug 2021 - 11:05 pm | सौन्दर्य

लॉटरीची प्रथा त्या गावात ७७ वर्षे चालू होती म्हणजेच त्या गावातील कमीतकमी ७७ व्यक्ती बळी गेल्या, त्यात आई,वडील,मुलगा,मुलगी,मित्र-मैत्रीण, इतर नातेवाईक असणारच. ज्यांच्या घरावर अशी संक्रात आली ते त्यावेळी नक्कीच दुःखी झाले असणार. ७७ वर्षाच्या काळात दरवर्षी मक्याचे पीक मुबलक आले नसणारच. शक्यता ५०-५० असू शकते. त्यामुळे ह्या प्रथेची उपयुक्तता (efficacy ) पडताळून तर नक्कीच बघितली गेली असणार.

अश्या परिस्थितीत ही प्रथा पुढे कशी चालू राहू शकते ते एक अगम्य कोडे आहे. माझ्या मते ही एक उगाचच ताणलेली कथा आहे.

कुमार१'s picture

5 Aug 2021 - 8:26 am | कुमार१

वरील सर्व प्रतिसादकांचे साधकबाधक चर्चेबद्दल मनापासून आभार !

कथेतील घटना भयानकच आहे. त्यानुसार लघुपट अधिक अंगावर येतो हे स्वाभाविक आहे. लेखिकेने कथाप्रेरणा ज्या व्यक्तीवरून घेतलेली आहे, तिला समाजाने बहिष्कृत केले होते. या कथेत लेखिकेने पीडित स्त्रीला थेट मृत्यूस पाठवले आहे. 1948 मध्येसुद्धा यावर वाचकांनी तीव्र रोष व्यक्त केल्याचे लेखात दिलेच आहे.
आता जरा आजच्या काळाशी तुलना करू. नरबळी हे तसे प्राचीन प्रकरण आहे. परंतु काही दशकांपूर्वीच, आपले इच्छित साध्य करण्यासाठी अनेक लहान मुलींचे बळी दिल्याचे मोठे हत्याकांड खुद्द (प्रगतीशील) महाराष्ट्रात घडले होते.

झुंडीने एखाद्याला मारण्याच्या घटना तर आजही थांबलेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षात मी वाचलेली एक घटना अंगावर शहारा आणणारी होती.

एका दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात गाडीतील बहुतेक डब्यांमधील स्वच्छतेचे पाणी संपलेले होते. रेल्वेकडून योग्य त्या स्थानकांवर कदाचित भरले गेले नसावे. गाडीतील प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला यावरून फैलावर घेतले होते. या व्यक्तीकडे चौकशी करणे इतपत ठीक होते. परंतु गाडीतील पाणीपुरवठा आणि तपासनीस यांचा थेट संबंध नाही. परंतु डब्यातील लोकांनी त्या तपासनीसांना मध्यभागी घेऊन प्रचंड मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

हे पाहता माणसातील खुनशी वृत्ती हा विषय कधीच कालबाह्य होणार नाही.

Nitin Palkar's picture

5 Aug 2021 - 7:25 pm | Nitin Palkar

अतिशय प्रातिनिधिक कथा. ही कथा जरी १९४८ साली प्रसिद्ध झाली असली तरी आजही या प्रकारच्या घटना वाचनात येतात. या अनुचित प्रथेस शब्दरूप देऊन समाजात विचारमंथन घडवून आणण्याचा लेखिकेचा प्रयत्न असावा.
जुन्या काळातील कथांचे अनुवाद तुमच्या रासग्रहणासह सादर करण्याचा हा प्रयास आणि प्रवास अतिशय स्तुत्य आहे.
पुलेशु
_/\_

कुमार१'s picture

12 Aug 2021 - 4:14 pm | कुमार१

निपा, धन्यवाद.

या कथेवर आधारित एक छान चलत-व्यंगचित्र इथे पाहता येईल :

कुमार१'s picture

5 Oct 2021 - 2:18 pm | कुमार१

अतिशय लांच्छनास्पद :

कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?; हळद कुंकू लावून फेकून देण्यात आला मृतदेह

https://www.loksatta.com/maharashtra/a-dead-body-of-seven-year-old-found...

धिक्कार असो असे कृत्य करणाऱ्या नराधमांचा.

कुमार१'s picture

11 Jun 2022 - 12:14 pm | कुमार१

Shirley Hardie Jackson या दिवंगत गूढकथा लेखिकेच्या दोन लघुकथा ९ जून २०२२ रोजी प्रथमच प्रकाशित झाल्यात.
या कथा फक्त पाचशे व चारशे शब्दांच्या आहेत.