प्रिय मैत्रीण,
थोड्या उशिराच पत्र लिहितेय. पण याआधी तू पण बिझी असशील. कोणी ना कोणी तुला भेटायला येत असेल,सारखे फोन चालू असतील. कदाचित एका क्षणी तुला हे नकोस झालं असेल. मला कल्पना आहे. मीही त्यातून गेलेय. म्हणूनच या गदारोळात तुला हाक नाही मारली. सावकाश नि मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला आवडेल मला.
वरती मायना लिहताना पटकन मैत्रीण म्हटलं तुला. खरं सांगू का?, पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली तेव्हा अगदी बरोबरीच्या मैत्रिणीसारखीच वाटलीस मला. वयाचं अंतर चांगलंच आहे आपल्यात. पण पहिल्याच भेटीत तू मला नावाने हाक मारायला सांगितलिस. तेव्हाच जवळची वाटलीस. तुझ्या भाचीने तुझं 'संतूर मॉम' अस अगदी योग्य वर्णन केलं. तू वाटतच नाहीस मोठी. एका लग्नाच्या निमित्ताने झालेली भेट आणि अवघ्या 2 किंवा 3 दिवसांचा सहवास. पण तुम्हा दोघी बहिणींच्या खूप जवळ घेऊन आला मला. नंतर फेसबुक वर एकमेकींचे अपडेट मिळत होते. माझ्या जवळपास कुठल्याही पोस्टला तू लाईक करायचीस, कमेंट करायचीस. खूप छान वाटायचं ते. प्रत्यक्षात नातं नसूनही, भेट नसूनही जवळची वाटलीस तू.
मागच्या वर्षी अचानक कोरोना उगवला आणि सगळ्यांचीच आयुष्य बदलून गेली. पहिली लाट बरी म्हणावी अशी दुसरी लाट जबरदस्त होती. या दुसऱ्या लाटेत मात्र आम्ही देखील काही जवळची माणसं गमावली. यातच एक दिवस तुझ्या घरातली बातमी आली. ऐकून खरच सुन्न झाले. खरं तर तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला मी ओळखत नाही पण तुला ओळखते हे वाईट वाटण्यासाठी पुरेसं आहे की. आपलं माणूस गेलं की कसं वाटतं याची कल्पना आहे. खरच काय झालं असेल तुझं? त्यात कोरोना म्हटल्यावर आपण अस्पृश्य होऊन जातो. ना माणूस बघायला मिळतो ना आजूबाजूचं कोणी जवळ येत. अशा प्रसंगी आपल्या जवळची, प्रेमाची माणसं धीर द्यायला हवी असतात. पण हा रोगचं असा आहे की ती माणसंही मनात असूनसुद्धा येऊ शकत नाहीत आणि त्यांना बोलावायला आपलही मन धजावत नाही. पण एकदा निवळल्यावर मला खात्री आहे ती सगळी जण आली असतील, तुला जवळ घेतलं असेल आणि तुही मोकळी झाली असशील.
प्रसंग कठीण होता पण तू खंबीर आहेस हे जाणवलं होत मला आणि म्हणूनच याही संकटातून तू तरुन गेली असशील. मुलं मोठी आहेत, समजूतदार असतील. अजून कदाचित करियर घडलं नसेल त्यांचं पण मार्ग निश्चित झाले असतील. तुला आधार द्यायला जवळची माणसं आहेतच. पण तू स्वतः स्वतःची ताकद हो. संकट मोठं असलं तरी पुढे जायचंच आहे. नि तू ते नक्की करशील याविषयी खात्री आहे. तुझा स्वतःचा व्यवसाय चालू आहेच. तो आणखी छान रीतीने बहरू दे. तुही स्वतःला दुःखातून बाहेर काढ आणि परत एकदा भरारी घे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या त्या करून घे. आयुष्यात रिकामी झालेली जागा भरून निघणं कठीण आहे पण म्हणून स्वतःला मिटून नको घेऊ. मनसोक्त आनंद घे. जे जे करावसं वाटेल ते बिनधास्त कुणाचाही विचार न करता कर. "जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये" हे कायम लक्षात ठेव.
तुला परत भेटायला, तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला नक्की आवडेल. बघूया कुठे कधी गाठ पडते.
तुझीच लहान मैत्रीण