कौतुकाची थाप!

ॠचा's picture
ॠचा in जनातलं, मनातलं
17 May 2021 - 3:54 pm

आपण करत असलेल्या कामाचे किंवा जोपासत असलेल्या छंदाचे जर कुणी थोडेसे जरी कौतुक केले तरी किती छान वाटते नाही!! एकदम एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला आणि आपल्यात देखील निर्माण होते!!

आपल्याला कामाच्या ठिकाणी देखील बढती/पगारवाढ/बोनस यांपैकी कुठल्या ना कुठल्या स्वरुपात आपल्याला कौतुकाची थाप किती हवीशी वाटते किनही... तसंच आपण घरात, कलाकुसरीच्या एखाद्या गोष्टीत जे काही करतो त्यासाठी देखील ती कौतुकाची थाप तितकीच महत्वाची असते, नाही का!! सध्याच्या घरून काम करण्याच्या काळात तर मी हे खूपच अनुभवले.रोजचा कामावर जाण्या येण्याचा वेळ वाचल्यामुळे एक दोन चित्रे काढली आणि एक दोन लेख लिहिले तर सगळ्या आप्तेष्टांनी आणि मित्रमंडळींनी, "मस्त...अशीच चित्रे काढत राहा,पेंटिंग करत रहा,बंद करू नकोस...असंच सुचेल ते छान लिहीत रहा" असा प्रतिसाद दिला, ही माझ्यासाठी केवढी मोठी कौतुकाची थाप होती!!

यावरूनच कौतुक करणं ही किती महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे हे मला खूप जास्त जाणवलं;आणि हो,तसा विचार केला तर कुणाला कौतुक केलेलं नको असतं सांगा पाहू…याला ना वयाचे बंधन ना इतर कुठले! अगदी ‘मला काही कुणाच्या कौतुकाची गरज नाही ‘ असे टेचात सांगणाऱ्या व्यक्तीला देखील चार कौतुकाच्या शब्दांनी छानच वाटत असणार यात मला मुळीच शंका नाही!!!

आता स्वयंपाकाचच उदाहरण घ्या,बनवणारी व्यक्ती काही इतरांकडून कौतुक करून घेण्यासाठी स्वयंपाक करत नसते; पण ‘ भाजी छान झाली आहे बरका किंवा ‘वा!!चहा एकदम कडक झालाय!!!’ या छोट्याश्या कौतुकाने देखील त्या करणाऱ्या व्यक्तीला एकदम कष्टाचं चीज झल्यासारखं वाटून जातं.
दुसरं उदाहरण घ्यायचं तर …एखाद्या कम करून घर सांभाळणाऱ्या व्यक्तीला जेव्हा घरातली मोठी मंडळी म्हणतात की ‘ तुम्ही तुमचा व्यवसाय आणि घरातला समतोल सांभाळण्याचा उत्तम प्रयत्न करत आहात हं!’ तेव्हा यासारखी कौतुकाची दुसरी थाप काय असू शकते!!! जरी आपण जगावेगळं काही करत नसलो तरी या छोट्याश्या कौतुकाने येणारा हुरूप काही निराळाच!!

जरा गंमतशीर आहे..पण बघा हं…. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणतात त्यानुसार काही व्यक्ती मनमोकळेपणाने इतरांच्या चांगल्या गोष्टींचे मागे पुढे न बघता पटकन कौतुक करतात, तर काही ‘ त्यात काय कौतुक ‘ असा विचार करतात….काही व्यक्ती इतरांचे कौतुक करतात देखील आणि त्यांना आपले कुणी कौतुक केलेले हवेही असते…तर काही व्यक्ती ‘ फक्त माझेच कौतुक झाले पाहिजे,मी काही कुणाचे करत बसणार नाही ‘ अशी वृत्ती असलेल्या पाहायला मिळतात.

तसं बघायला गेलं तर कौतुक करायला लागतं तरी काय हो? ‘फक्त चार गोड शब्द आणि एक मनापासून दिलेलं हास्य ….असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा! आणि परत एकदा विचार करा बरं… तुमच्याही लक्षात येईल कि कुणाचं मनापासून कौतुक करणं हे इतकही सोपं नाही आणि ते सगळ्यांनाच जमतं असंही नाही!!! तर मुळात कुणाचं तरी कौतुक करण्यासाठी लागतं ते मोठं मन…आणि मनमोकळे विचार,…आपल्याला जसं कौतुक हवंसं वाटतं तसंच ते इतरांनाही वाटत असणार ही जाणीव…!!! बरोबर ना?

नाही म्हणजे, माझं म्हणणं असं मुळीच नाही की सगळ्यांनी फक्त एकमेकांची कौतुकं करत राहूया; पण चांगल्या गोष्टीला पटकन् चांगलं म्हणुया…एखाद्याची कविता, चित्रं, रंगकाम,विणकाम, छायाचित्र,स्वभावगुण,छानशी रांगोळी,एखादा पदार्थ आवडल्यास मनात नं ठेवता त्याच्यापर्यंत पोहोचवूयात लगेच…आणि नात्यांमध्ये नव्याने निर्माण होणारी सकारात्मकता अनुभवुयात!! काय म्हणता??

मांडणीविचार

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

17 May 2021 - 5:15 pm | चौथा कोनाडा

कौतुक हे दैनंदिन जीवनाचे टॉनिक आहे !

ॠचा's picture

20 May 2021 - 10:14 am | ॠचा

आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद!

दिगोचि's picture

18 May 2021 - 7:08 am | दिगोचि

कौतुक हे दैनंदिन जीवनाचे टॉनिक आहे !>>> एक उत्तम वाक्य व सल्ला. रोज हे पाळल्याने घरात सुखाचे वातावरण सतत राहील.

चौथा कोनाडा's picture

18 May 2021 - 12:13 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद दिगोचि. पण काही लोक टॉनिक एका मर्यादे पर्यंतच उपयुक्त असते याकडे डोळेझाक करतात, उठसूट टॉनिक मागतात आणि ढोसत राहतात.
स्वत: मात्र कुणाचे कौतुक करणार नाहीत पण स्वत:ला मात्र कौतुक हवे.
इथे मिपावर पण काही महाभाग असे आहेत फक्त धागे प्रसावतात, दुसऱ्या कुणाच्या धाग्यावर प्रतिसाद, अभिप्राय देत नाहीत !

कंजूस's picture

19 May 2021 - 5:53 am | कंजूस

संस्थळावर तर हे आवश्यक आहेच. प्रतिसाद दिले पाहिजेत. काही आइडींंची अपेक्षा असते की सभासदांनी त्यांचे लेखन वाचावेत. पण ते कधी इतरांच्या लेखांवर प्रतिसाद देत नाहीत. कौतूक राहिले दूर. किंवा मीही असा लेख लिहिला आहे असा जाहिरातीचा प्रतिसाद देतात.
आइडीच्या अकाउंटमध्ये Track वर टिचकी मारल्यास कळते की कुठे कधी प्रतिसाद दिले आहेत.

चौथा कोनाडा's picture

19 May 2021 - 12:34 pm | चौथा कोनाडा

आणखी म्हणजे मिपा सभासद होऊन दोनचार दिवस झाले की धागे प्रसवणे सुरु. बघा मी धागा टाकला, करा माझं माझं कौतुक (पण मी मात्र कुणाचं कौतुक करणार नाही) असा सुक्ष्मवास येत असतोच !

प्रकाश घाटपांडे's picture

19 May 2021 - 9:28 am | प्रकाश घाटपांडे

अतिलाडाने बिघडतात तसे अतिकौतुकाने ही बिघडतात. कौतुकास्पद कामगिरी केली कि लोक स्वत:हून उस्फूर्तपणे कौतुक करतातच की! कौतुक करवून घेण्यासाठी सतत लक्ष वेधत राहणे देखील मानसिक आरोग्य धोक्यात आणते. कौतुकाची अपेक्षा असली आणि कौतुक झाले नाही तर अपेक्षाभंगाचे दु:ख जास्त होते.

गॉडजिला's picture

19 May 2021 - 9:54 am | गॉडजिला

:)

सौन्दर्य's picture

19 May 2021 - 11:14 pm | सौन्दर्य

लेखिकेचे विचार पटले आणि आवडले देखील.
संकेस्थळावर लिहिताना प्रत्येक वेळी कौतुक होईलच असे नाही व त्यात चुकीचे असे काहीच नाही. परंतु संकेतस्थळावरील लेखांना प्रतिसाद अवश्य द्यावा ह्या मताचा मी आहे. प्रतिसादात चांगल्या बरोबरच काही चुका राहिल्या असतील, विचार भरकटले असतील तर ते ध्यानात आणून दिल्याने लेखकाचे लिखाण सुधारू शकते व वाचकांना बरीच माहिती मिळू शकते. मिपावर विविध विषयावर अधिकार वाणीने बोलू, लिहू शकतील अशी अनेक मंडळी आहेत, त्यांच्या लिखाणाद्वारे ज्ञानात मौल्यवान भर पडते. मिपावरचे लिखाण वाचण्याचे हे माझे मुख्य कारण आहे.

ॠचा's picture

20 May 2021 - 10:12 am | ॠचा

आपल्या मौल्यवान प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपण प्रतिसादामध्ये लिहिलेले विचार मनापासून पटले.