प्रेमचंदचे फाटके जोडे (व्यंग्य): हरिशंकर परसाई

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 May 2021 - 6:53 am

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

प्रेमचंदचे फाटके जोडे

प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. त्यांनी पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढलेले दिसतंय. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर. गाल बसले आहेत आणि गालाची हाडे वर आली आहेत पण मिशीमुळे चेहरा जरा तरी भरल्यासारखा वाटतोय.

पायात कॅनव्हासचे जोडे आहेत ज्याच्या नाड्या निष्काळजीपणाने बांधल्या आहेत. नाड्यांच्या टोकाचा पत्रा उलगडल्यावर ती टोके जोड्याच्या भोकात जात नाहीत मग नाड्या कशातरी बांधल्या जातात.

उजव्या पायातील बूट तसा ठीक आहे पण डाव्यापायातील जोडा फाटला आहे आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे.
कितीही प्रयत्न केला तरी माझी दृष्टी या जोड्यावरून हटत नाही. मनात विचार आला, जर फोटो काढण्यासाठी तू हे असे कपडे केले आहेत तर तू नेहमी कसले कपडे घालत असशील ? पण या माणसाचे वेगवेगळे कपडे असणे अशक्य आहे. प्रसंगानुरुप कपडे बदलण्याची कला या माणसाला अवगत नाही. तो जसा आहे तसाच या छायाचित्रात आहे.

मग मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. अरे साहित्यातील बाप माणसा, तुला माहीत आहे का की तुझा जोडा फाटला आहे? आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे? याची तुला लाज वाटत नाही? धोतर जरा खाली खेचले असतेस तर ती बाहेर डोकावणारी करंगळी झाकली गेली असती ना! पण हा जोडा तुझ्या खिजगणतीतही दिसत नाही. तुझ्या चेहऱ्यावर किती प्रचंड आत्मविश्र्वास दिसतोय. जेव्हा छायाचित्रकाराने त्याच्या डोक्यावर झाकलेल्या काळ्या कपड्यातून ‘स्माईल प्लीज’ म्हटले असेल तेव्हा तू हसण्याचा प्रयत्न केला असणार. वेदनांच्या खोल गर्तेतून एखादे स्मित तू वर ओढून काढताना छायाचित्रकाराने थँक यू! म्हटले असणार त्यामुळे हे अर्धेमुर्धे स्मित तुझ्या चेहऱ्यावर उमटले असावे. याला हास्य तरी कसे म्हणावे? यात उपहास आणि बोचरी टीका आहे.

हा कसा माणूस आहे की जो फाटकी पादत्राणे घालून स्वतःचे छायाचित्र काढून घेतोय, तरी पण कोणाला तरी हसतोय.
तुला फोटोच काढायचा होता तर निदान चांगले बूट तरी घालायचे होतेस. मी तर म्हणतो तू फोटो काढून घेतलाच नसता तर असे काय मोठे बिघडले असते? बहुतेक पत्नीने आग्रह केल्यावर ‘‘एवढच ना? चल काढूया फोटो’’ असे म्हणून तू खुर्चीवर बसला असशील. पण फोटो काढण्यासाठी सुद्धा एखाद्या माणसाकडे बूट असू नयेत हे केवढे मोठे दुर्दैव आहे. तुझा फोटो पाहता पाहता मी तुझ्या वेदना माझ्यात सामावून घेतो आणि मग मात्र मला आतून गलबलून येते. मला रडू कोसळणार तेवढ्यात माझे दृष्टी तुझ्या डोळ्याकडे जाते आणि त्यातील वेदना पाहून मी थबकतो. माझे अश्रू आतच सुकतात.

तुला फोटोचे महत्व कधीच कळले नाही हेच खरं. जर कळले असते तर कोणाकडून तरी जोडे उसने आणले असतेस. लोक तर कपडे उसने आणून सण साजरा करतात आणि उसन्या मोटारीतून वरात काढतात. फोटो काढण्यासाठी बायकोही उसनी आणली जाते आणि तुला साधे जोडे उसने मागता आले नाहीत. काय म्हणावे तुला. म्हणूनच म्हटले की तुला फोटोचे महत्व कळलेच नाही. काही लोक तर फोटोला वास यावा म्हणून अत्तरे चोपडून फोटोला उभे राहातात. अट्टल बदमाशांच्या फोटोलाही त्यामुळे आजकाल सुवास येतो. आजकाल टोपी आठ आण्याला मिळते तर जोडे पाच रुपयाला. जोड्याची किंमत नेहमीच टोपीपेक्षा जास्त असते. आजकाल तर जोडे खूपच महाग झाले आहेत. कधी कधी तर एका बूटाच्या जोडीवर पन्नास टोप्या फुकटही देतात म्हणे. तू ही जोड्यांच्या आणि टोप्यांच्या किंमतीच्या ओझ्याखाली दबला गेला होतास. ही विडंबना मला आजवर कधी एवढी बोचली नव्हती जी आज तुझा फाटका बूट पाहताना बोचते आहे. तुला भले लोक थोर कथाकार, नाटककार, कादंबरीकार, युग प्रवर्तक असे काय काय म्हणतात पण फोटोतही तुझा बूट फाटकाच आहे. माझा जोडा फार चांगला आहे असे मला म्हणता येत नाही. फक्त तो वरून मात्र चांगला दिसतो. बोटे बाहेर येत नाहीत व दिसतही नाहीत पण अंगठ्याखाली त्याचा तळ फाटला आहे. चालताना अंगठा खाली जमिनीवर घासला जातो आणि हुळहुळा होतो. माझ्या जोड्याचा तळ पूर्ण झिजेल, पूर्ण तळवा सोलला जाईल पण बोट बाहेर आलेले दिसणार नाही. तुझी करंगळी दिसते आहे पण पाय सुरक्षित आहेत. माझी करंगळी दिसत नाही पण तळवा मात्र सोलला गेला आहे. तुला लाज कशी झाकावी याची काहीच माहिती नाही आम्ही मात्र लाज झाकण्यासाठी मरणही पत्करू शकतो. तू ऐटीत फाटके जोडे घालून बसला आहेस पण आम्ही मात्र असे बसू शकत नाही. असा फोटो तर मी या आयुष्यात काढून घेणार नाही मग माझे चरित्र कोणी फोटोविना छापले तरी बेहत्तर.

तुझे हे उपरोधिक हास्य माझ्या उत्साहावर पाणी ओतते. काय अर्थ आहे तुझ्या या हास्याचा? कसले म्हणायचे हे हास्य?

होरीचे गोदान झाले म्हणून हे हास्य? का

पौषाच्या रात्री नीलगाय हलकूचे शेत चरून गेली?

का डॉक्टर क्लब सोडून आले नाहीत म्हणून सुजान भगतचा मुलगा मेला म्हणून?

नाही! बहुतेक माधोने बायकोच्या अंत्यविधीसाठी ठेवलेल्या पैशाने दारू झोकली म्हणून असावे.

मी परत तुझ्या फाटक्या बूटाकडे पाहातो. सामान्य जनतेच्या लेखका, कसा काय फाटला हा?

काय वणवण फिरत होतास की काय ?

वाण्याचा तगादा चुकविण्यासाठी दोन चार मैलाचा फेरफटका मारून मग घरी परतायचास की काय?

पण फिरून बूट फाटत नाहीत झिजतात. कुंभनदासचे जोडे नाही का फतेहपूरसिक्रीचे फेरे मारून मारून झिजले? त्याला नंतर खूपच पश्र्चात्ताप झाला म्हणे. शेवटी बिचारा म्हणाला, ‘‘आवत जात पन्हैया घिस गई, बिसर गयो हरि नाम!’’
आणि देणाऱ्यांना म्हणायचा, ‘‘जिनके देखे दुख उपजत है, तिनको करबो परै सलाम!’’

चालून चालून जोडे झिजतात फाटत नाहीत. तुझा कसा फाटला?

मला वाटते, तू कशालातरी ठोकर मारत असावास. अशा गोष्टींवर ज्या युगेन युगे एकावर एक जमून दगड झाल्या आहेत. त्यावर ठोकरा मारून मारून बहुतेक तू तुझा जोडा फाडून घेतलास. तुझ्या आयुष्याच्या रस्त्यावर निर्माण झालेल्या उंचवट्यावर बहुधा तू आपले जोडे अजमावले होतेस! पण तू त्याला टाळूनही पुढे जाऊ शकला असतास. अशा विरोधांशी तह करता येतो हे तू विसरलास. सगळ्या नद्या पर्वतांना थोड्याच तासतात? कित्येक नद्या रस्ता बदलून, वळसे घालून वाहातातच ना !
पण तू तह करू शकला नाहीस. मला वाटते तुझ्या पायाचे हे बोट मला काहीतरी सांगते आहे. ज्याची तुला घृणा वाटते त्याकडे तू हाताच्या बोटाने नाही तर पायाच्या बोटाने इशारा तर करत नाहीस ना?

ज्याच्यावर पाय आपटून आपटून तुझे जोडे फाटले ते तर तू दाखवत नाहीस ना?

पण मला आता समजते आहे आणि उमगतेही आहे. तुझ्या ओठावरील हे उपहासाने भरलेले हास्य आणि तुझ्या पायाच्या बोटाचा रोखही मला समजतोय.
तू माझ्यावर नाही! नाही! आम्हा सगळ्यांवर हसतो आहेस. आम्ही, जे बोटे झाकून पण तळवे घासून चालत आहोत. आम्ही, जे सत्याला वळसे मारून निघून जात आहोत.
मला क्षणभर तू बोलतो आहेस असा भास झाला.
‘‘मी तरी सत्यासाठी माझे जोडे फाडले. माझी करंगळी फाटलेल्या जोड्यातून बाहेर आली. पण माझ्या पायाचे तळवे सुरक्षित राहिले आणि मी चालत राहिलो. पण करंगळी झाकण्याच्या नादात तुम्ही तुमचे तळवे सोलवटून घेतलेत. आता तुम्ही भविष्यात चालणार कसे ?

- अनुवाद : जयंत कुलकर्णी

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

आपण आपल्या जोड्यांचे तळवे झिजले आणि बोटांना, तळव्यांना, जमीन घासू लागली तरी ते घालत राहतो. कारण जगाला कुठे ते दिसतं?
प्रेमचंद यांचे जोडे कदाचित खालून सुद्धा झिजले असतील. कुणास ठाउक?

चित्रगुप्त's picture

6 May 2021 - 8:55 am | चित्रगुप्त

"साध्याही विषयात आशय मोठा आढळे" चे सुंदर उदहरण. व्हॅन गॉग चे जोड्यांचे चित्र आठवले.
मर्मस्पर्शी लेखन आणि त्याचा तितकाच सुंदर अनुवाद. अनेक आभार.

चांदणे संदीप's picture

6 May 2021 - 9:59 am | चांदणे संदीप

अनुवाद आवडला.

सं - दी - प

मुक्त विहारि's picture

6 May 2021 - 10:34 am | मुक्त विहारि

फोटो वरून लिहिलेला लेख आवडला...

प्रचेतस's picture

6 May 2021 - 11:12 am | प्रचेतस

एकदम तरल, सुंदर.

Bhakti's picture

6 May 2021 - 11:15 am | Bhakti

भावपूर्ण !व्यंग कथा हा नवीन प्रकार समजला.

रांचो's picture

6 May 2021 - 8:40 pm | रांचो

अतिशय हृदयस्पर्शी! काकांच्यामुळे इतर भाषांमधील मोती वाचायला मिळतात. अनेकानेक धन्यवाद. मिपावर अजुन असेच अशा मोत्यांची उधळण करा. आम्ही वेचायला असुसलो आहोतच.

स्वलिखित's picture

6 May 2021 - 8:53 pm | स्वलिखित

आवडल्या गेले आहे

जेम्स वांड's picture

7 May 2021 - 11:39 am | जेम्स वांड

मुन्शी प्रेमचंद हे जबरदस्त बेंचमार्क झालेलं नाव, गोदान माझी आवडती कादंबरी त्यांची.

फारच छान लेखन अतिशय आवडले

चौथा कोनाडा's picture

7 May 2021 - 11:55 am | चौथा कोनाडा

एकदम तरल, सुंदर अनुवाद !