भाजी

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
20 Apr 2021 - 11:32 pm

करोनाकाळात श्रमिकांच्या दु:खांच्या अनेक कहाण्या वाचल्या, पाहिल्या. माध्यमांनी मुख्यत: श्रमिकांचे, गरीबांचे हाल ह्यावर स्टोर्‍या केल्या. चित्रपट केले. सुखवस्तू जनतेने लॉकडाऊन च्या काळात रोज नवीन पदार्थ बनवून त्याचे फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध करुन "आठडयातून रविवार येईल का रे तिनदा, भोलानाथ ?" ची मजा देखील लुटली. ही कथा २०२० च्या करोनाकाळात संघर्ष करण्यार्‍या अशाच एका मध्यमवर्गीयाची आहे. (सत्य)कथेत पात्रांची नावे देत नाही. शेवटी मध्यमवर्गीय लाज / अब्रू आड येते म्हणून.....

फेब्रुवारीअखेर त्याच्याकडे एका कंपनीचे काम होते. केबल टाकण्याचे. जुन्या वायर अबाधित ठेऊन चालू कामात अडथळा न आणता नवीन वायर्स टाकायच्या होत्या. दिवसभर कंपनीचे कार्यालय चालू असे त्यामुळे नवीन वायर्स टाकण्याचे काम संध्याकाळी ६ नंतर करावे लागे. सध्या असलेल्या फर्निचर मधून वायर्स टाकताना फर्निचर चे पार्टिशन खोलावे लागे. कर्मचारी वर्ग संगणकावर काम करता करताच खाणेपिणे करत असे. त्याचा कचरा बाजूच्याच केराच्या टोपलीत, डेस्कवर पडलेला असे. सफाई कर्मचारी दिवसातून एकदा सफाई करत. कार्यालय सरकारी कंपनीचे असल्यामुळे सफाई कर्मचारी त्यामुळे मी फक्त एवढेच साफ करेल अशी अटिसह सफाई करत असे. त्याल एकदम मग टिव्हीवर पाहिलेली 'इस कोनेकी सफाई के दो लाख रुपये लुंगी छापाची जाहिरात आठवे'. उरलेली सफाई मग रात्री उंदीर करत. दुसर्‍या दिवशी मॅनेजर ला तो खोललेल्या पार्टीशनचे फोटो दाखवत असे. तुमच्या इथले उंदीर फार खवय्ये आहेत बरकां असा एखादा विनोद देखील करत असे. मात्र मॅनेजर मी फार काही करु शकत नाही असे सांगे.

डिसेंबर पासून तो करोनाच्या बातम्या ऐकत होता, पाहत होता. जसजसे साथीचे संकट घोंघावू लागले तसतसे कामावर /प्रवासावर निर्बंध येत गेले. प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर ची सक्ती होऊ लागली, मास्क लावणे सक्तीचे होत गेले. मास्क / सॅनिटायझर न वापरणार्‍यावर लोक ओरडू लागले. त्याला वर्षा दोन वर्षा पासुनच रात्री सर्दीचा फार त्रास होई. त्यामुळे तो साधारण नोव्हेंबर महिन्यापासूनच बाहेर प्रवास करताना रुमालाने नाक तोंड बांधून प्रवास करत असे. आता अचानक प्रत्येकजण तोंड बांधून फिरु लागला तेव्हा त्याला मौज वाटु लागली. तोपर्यंत बाजारात मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले नव्हते त्यामुळे रुमालाने तोंड बांधून वावरणे सर्वमान्य होते. मात्र जसजसे मास्क बाजारात दिसू लागले तसतसा रुमालाने तोंड बांधण्याला विरोध होऊ लागला. एक दोन कंपन्यांमधे त्याला रुमालाने तोंड बांधल्यामुळे आत घ्यायला नकार दिला. मास्कच हवा अशी सक्ती होऊ लागली. शेवटी त्याने मास्क विकत घेतला. सॅनिटायझर हा देखील त्याच्या नावडीचा विषय. असाही त्याला पहिल्यापासूनच कोठेही वॉशरुम दिसले की हात स्वच्छ धुवायची सवय होती मात्र सुरक्षारक्षक सॅनिटायझरचे तीर्थ घेतल्याशिवाय आत सोडतच नव्हते. फेब्रुवारीमधे त्याने आणि त्याच्या टिम ने पार्टिशन मधून अनेक किलो कचरा हाताने उचलला मात्र मार्चमधे त्या घाणीत हात घालायची हिंम्मत होत नव्हती. शिवाय कंपनी व्यवस्थापन आता बाहेरच्यांना कार्यालयात घेण्यासाठी नाखुश होते. त्याने काम लवकरात लवकर संपवावे म्हणून खुप दबाव होता मात्र जुन्या वायर्सवर कारभार चालवायचा होता त्यामुळे जुने आणि नवे यांचा मेळ घालण्यात वेळ जात असे. मार्चमधे तो रेल्वे ने कामावरुन परतत असताना कुर्ला, दादर, सीएसटी मधे बाहेर गावी जाणार्‍या गाड्या बघत होता. लोक अक्षरशः एकमेकाच्या बोकांडी बसून जात होते. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल कडे जाणार्‍या गाड्यांना तुफान गर्दी होत असे. ज्यांना येणार्‍या संकटाची चाहूल लवकर लागली ते लवकर पळाले. ज्यांना परिस्थितीचे भान उशीरा आले ते अगदी ३०-४० हजार देऊन देखील गावी गेले. त्याच्याकडे काम करणारा एकजण देखील ३० हजार देऊन कोकणात गेला. आता काम शेवटच्या टप्प्यात आले होते मात्र कामगार कमी झाले, कंपनीने कार्यालयात यायला मज्जाव केला त्यामुळे ते काम अडकून पडले आणि लॉकडाऊन ची घोषणा झाली. पर्चेस ऑर्डरमधे काम झाल्यावर १००% पैसे मिळतील असे ठरवलेले असल्यामुळे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही असे सांगून कंपनीने नकार दिला. लॉकडाऊन मधे देखील आम्ही आमच्या जबाबदारीवर ये जा करुन काम करु असे सांगीतले मात्र कंपनीवर सरकारी कारवाई होईल म्हणून त्यालादेखील नकार मिळाला. त्याचे घराचे, क्रेडीट कार्डचे हप्ते, मुलांची फी असे सगळे खर्च होतेच जे थांबणार नव्हते. लॉकडाऊन लागल्यावर गावावरुन आईवडीलांचा गावी निघून ये, पैशाची चिंता करु नको म्हणून फोनवर फोन येऊ लागले मात्र या वयात त्यांच्यावर भार होणे त्याला पटत नव्हते. शाळेने त्याही वर्षी आणि ह्या ही वर्षी मे महिन्याची देखील फी वसूल केलीच.

लॉकडाऊनचे पहिले काहि दिवस मजेत गेले. उशीरा उठणे, रात्री उशीरापर्यंत जागत चित्रपट पाहणे यात दिवस कसे गेले कळलेच नाही. मात्र सगळे घरात असल्यामुळे खाण्यापिण्याचा खर्च, वीजबिलाचा खर्च वाढला. काही दिवस बचत केलेले पैसे पुरले मात्र मग पुढे काय हा प्रश्न त्याला चिंतीत करत गेला. काम करायची तयारी मात्र घरात बसायची सक्ती यामुळे काय करावे त्याला कळेना.

सोसायटीच्या ग्रुपवर शिकले सवरलेले लोक आज याला करोना झाला, उद्या त्याला करोना झाला अश्या बातम्या नावागावा सकट आणि काही केसमधे फोटोसहित फिरवू लागले. मे महिन्यात त्याच्या भावाचे कुटुंब गावी गेले तर गावच्या लोकांनी त्याच्या कुटुंबाचे फोटो व्हॉटसप ग्रुपवर आजुबाजूच्या दोन -चार गावामधे प्रसिद्ध केले. त्यामुळे गावच्या नातेवाईकांनी, तुम्ही आता गावी येऊ नका असे त्याला कळविले त्यामुळे तो मार्ग देखील बंद झाला. काय करायचे कळेना. त्यातच त्याचा एक नाशिकचा मित्र होता त्याने कांद्याचा व्यापार चालू केला. तो नाशिक मधून कांद्याच्या १० किलोच्या गोण्या पिकअप मधे भरुन मुंबईत आणून विकू लागला. तुझ्या सोसायटीत तू कांदे विक, मी तुला स्वस्तात कांदा उपलब्ध करुन देतो असे त्याच्या मित्राने त्याला सांगीतले. त्याप्रमाणे त्याने ओळखीच्यांना सांगीतले, मेसेज केले. सोसायटीच्या व्हॉटसअप ग्रुपवर जाहिरात केली. दोन चार लोकांनी घेतले बहुतेकांनी नाही घेतले. एकंदर हे आपण करु शकणार नाही अशी त्याची खात्री पटली. एक दिवस सहज तो बायकोला म्हणाला की तु ही जाहिरात तुमच्या बायकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर टाकून बघ. तिने सुरुवातीला आढेवेढे घेतले पण शेवटी जाहिरात टाकली. मात्र इथे यश मिळाले. बायकांना स्वयंपाकघराची चिंता जितकी तितकी पुरुषांना नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यानंतर त्याने १५ दिवसात जवळजवळ ५०० किलो कांदा विकला. आता त्याच्या मित्राने भाजीपाला देखील आणायला सुरुवात केली. हा ही प्रयत्न करुन बघ म्हणाला. मात्र अगोदरच सोसायटीच्या ग्रुपवर दिवसाला १० ते १५ ऑनलाईन भाजी विकणार्‍यांचे फॉरवर्डेड मेसेज येत. बहुतेक विक्रेते ३०० ते ५०० रुपयाचे एक पॅकेज बनवून विकत. काहिंनी जैन पॅकेज ( कांदा, लसूण व कंदमुळे नसलेले) पॅकेज देखील दिले. त्यामुळे त्याला कितपत यश मिळेल हा प्रश्नच होता मात्र त्याने प्रयत्न करायचे ठरविले. इथे परत त्याला बायकोच मदतीस आली. बायकांचे नेटवर्क जीओ/ एअरटेल पेक्षा पण भारी असते याचा त्याला प्रत्यय आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बायका स्वतःहून फोन करु लागल्या. भाजी मिळेल काय प्लीज अशी आर्जवे होऊ लागली. काही लोकांनी तर त्याला अगदी देवादिकांच्या रांगेत नेऊन बसविले. तुम्ही नसता तर आम्ही काय खाले असते असे संवाद त्याच्या कानी पडू लागले. अशातच त्याच्या मित्राच्या मुंबईच्या फेर्‍या अनियमित होत गेल्या. ग्राहकांना भाजी उद्या येणार असे सांगून गाडी न आल्यामुळे तोंडावर पडायला होत असे. मित्राला दोष देण्यात अर्थ नव्हता. तो बिचारा रोज पहाटे तीन ला उठून मार्केट ला जाई, भाजी खरेदी करे, गाडी चालवत मुंबईला येई आणि रात्री ११-१२ पर्यंत परत घरी जाई. एवढा संघर्ष केल्यावर त्याच्या शरीराने हार मानली. अर्थात मित्राकडे अर्थाजनाचे दुसरे पर्याय होते त्यामुळे त्याने हे काम बंद केले मात्र याच्यापुढे अर्थाजनाचा पर्याय नव्हता.

शेवटी एक दिवस तो देखील पहाटे ३ वाजता उठला. स्वत:ची गाडी होती ती घेऊन वाशी मार्केट ला गेला. मुंबईत आयुष्य घालवून एपीएमसी मार्केट त्याने फक्त बाहेरुनच पाहिले होते आणि रोज करोनाच्या बातम्यांत मार्केट मधे इतके रुग्ण सापडले अशा बातम्या ऐकण्यापलिकडे त्याचा या जगाशी संबंध नव्हता. त्या वेळी भाजी आणायला गेलेल्यांना करोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो अशा बातम्या जोरात होत्या. त्यामुळे भाजीबाजारात पाय टाकायचे आणि करोनाला निमंत्रण द्यायचे का याबद्द्ल त्याच्या मनात संभ्रम होता मात्र आर्थिक चिंतांनी त्या भयावर मात करायला प्रवृत्त केले. घरात रोज लागणारी भाजी आणण्यापलीकडे भाजीच्या व्यवसायाचा त्याच्याकडे काहिही अनुभव नव्हता. मात्र वेळ माणसाला सर्व काही शिकविते हे त्याला माहित होते.

साधारण ८० च्या दशकात भायखळा, दादर इथला भाजी व्यवसाय वाशी बाजारात स्थलांतरीत झाला. या बाजारावर मराठी माणसांचे (प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, पुणे) इथल्या व्यापार्‍यांचे प्राबल्य होते. वाशी मार्केट मधील अनेक गाळे मराठी माणसांचे असले तरी ते त्यांनी परप्रांतियांना भाड्याने देऊन गावी जाऊन राहणे पसंत केले.

लॉकडाऊन लागताच सर्वप्रथम मुंबईतील भय्ये, बिहारी आपापल्या गावी पळाले. मराठी माणसाने आता मुंबईत रोजगार उपलब्ध होईल अशा स्वरुपाच्या चर्चा केल्या. मात्र परप्रांतिय आपापली कुटुंबे गावी सोडून महिन्याभरातच मुंबईत परतले. त्याच्याकडील दोन मराठी कामगार लॉकडाऊन मधे गावी गेले ते आज येतो, उद्या येतो, गणपती झाल्यावर येतो, दसरा, दिवाळी झाल्यावर येतो अशा सबबी काढत गावीच थांबले. त्याला त्याच्या १५ वर्षाच्या व्यवसायात अनेक गुजराती व्यापारी भेटले. त्यातील बरेच जणांनी त्याला सांगीतले की मराठी कामगार प्रामाणिक असतो. पण तु एक तरी भय्या कामावर ठेव. त्याने १५ वर्षे त्यांच्या विचारसरणीला विरोध केला मात्र या लॉकडाऊन ने त्याला त्याचे विचार मुळापासून बदलावयास भाग पाडले. सध्या तो एका पंजाबी कामगारासोबत कामाचा गाडा ओढतो आहे.

त्याने बाजारात पहिले पाऊल टाकले आणि लगेच ते मागे घ्यावे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. सरकार वारंवार सोशल डिस्टंसींग चे उपदेश देत होते, सॅनिटायजर, मास्क वापराचे धडे देत होते मात्र इथे परिस्थिती संपूर्ण वेगळी होती. माणसाला समोरच्याला धक्का मारल्याशिवाय पुढे जाताच येऊ नये अशी तुफान गर्दी होती. हमालांना मास्क वापरुन ओझे वाहताना श्वासोच्छवासाला त्रास व्हायचा त्यामुळे बहुतेकांचे मास्क हनुवटीवर होते. त्याच्यासारखे रोजगार हिरावलेले अनेक नवीन भाजीवाले चार पैसे कमविण्यासाठी भाजी विकत होते. मार्केट यार्डात नॅनो, ओम्नी व्हॅन पासून अगदी डिजायर, इनोव्हा सारख्या खाजगी नंबर प्लेट असलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. शेवटी भीड चेपून तो त्या गर्दित शिरलाच. पहिल्या दिवशी त्या चक्रव्युहातून बाहेर पडल्यावर त्याने मोकळा श्वास घेतला. दोन तीन दिवसांनी त्याची पण भीड चेपली. मात्र त्याने सुरक्षिततेचे नियम मोडले नाहीत. मास्क हनुवटीवर घेतला नाही, भाजी खरेदी झाल्यावर गाडीत बसल्या बसल्या लगेच सॅनिटायजर ने हात स्वच्छ करणे सोडले नाही, घरी आल्याआल्या आंघोळ करणे सोडले नाही, जेवढा काळ तो भाजी विकत होता तेवढा काळ तो घराच्या बेडरुम मधे बायको मुलांसोबत झोपला नाही. तो एक मधुमेही होता त्याला स्वतःच्या जीवाची काळजी होती, त्याच्या बायको मुलांची काळजी होती. पण सर्वात जास्त काळजी होती ती ही की जर त्याला करोना झाला तर लोक त्याच्याकडून भाजी खरेदी करणार नाहीत, त्याच्या रोजगार बुडेल, त्याला पैसे मिळणार नाहित. त्याने कोणासमोर कबूल केले नाही पण त्याला जीवापेक्षा पण आर्थिक दुरावस्थेची चिंता जास्त भेडसावत होती.

भाजीने त्याला अनेक नवीन अनुभव दिले. माणसांची विविध रुपे दाखविली. करोनाची इतकी प्रचंड धास्ती जनमानसात होती. लोकांना भाजी हवी होती पण भाजीवाला नको होता. त्याने भाजी व्यवसायाबाबत स्वतःच एक सर्वे केला. तो अनेक भाजीवाल्यांशी बोलला. करोना काळात ऑनलाईन भाजीवाल्यांनी ठेले/ गाड्या लावणार्‍या भाजीवाल्यांवर व्यवसायाच्या बाबतीत मात केली. एक नवीनच जग त्याच्यापुढे खुले झाले.

शेतकरी / व्यापारी गोणीत वर चांगले कांदे / बटाटे भरत मात्र घरी येऊन गोणी खोलली की त्यात बराचसा माल खराब निघत असे. काही व्यापारी मधून गोणी फाडून दाखवायचे मात्र त्यात वर किंवा खाली खराब माल निघायचाच.

बाजारात गेल्यावर काही व्यापारी आमच्याकडून भाजी घ्या म्हणून मागे लागत पण जे जास्त आग्रह करत त्यांच्या आग्रहाला बळी पडून माल घेतला की तो हमखास खराब निघत असे. दुसर्‍या दिवशी त्याचे स्पष्टीकरण विचारले तर घ्यायची तर घ्या नाहीतर दुसरीकडे जा हे ऐकावे लागायचे. कारण गिर्‍हाईकांना तोटा नव्हता.

काही व्यापार्‍यांचा विक्रीदर हा दुसर्‍या काही विक्रेत्यांपेक्षा जास्त असे. काही विक्रेते भावात घासाघीस करत मात्र काही विक्रेते १ रुपयादेखील कमी करत नसत. घासाघीस करुन घेतलेल्या मालात बर्‍याचवेळेस कमअस्स्ल माल निघे. भाव पाडून न विकणार्‍या विक्रेत्यांचा माल सहसा चांगला निघत असे.

काल ज्या भावात माल घेतला तोच माल दुसर्‍या दिवशी त्याच व्यापार्‍याकडे त्याच भावात मिळेल याची खात्री नसे. रात गयी बात गयी हे बाजाराचे मुख्य तत्त्व आहे.

बाजर तळावर गाडी न्यायची असेल तर पावती फाडावी लागत असे मात्र २० रु ची पावती असेल तरी ३० रु द्यावे लागत. यावर भांडता यायचे नाही कारण दुसरे लोक ३० काय ५० पण द्यायला तयार असायचे. गाडी बाहेर काढताना द्वारपालांना परत १०/२० चा नैवेद्य द्यावा लागे.

बाजारात एखाद्या दिवशी खुप गर्दी झाली की मग खासगी गाड्यांना प्रवेश नाकारला जाई. मग तो माल स्वतः बाहेर वाहून नेणे किंवा हमालाला पैसे देणे हाच पर्याय उरत असे.

कांदा / कोथींबीर / टोंमॅटो हे भाजीबाजारातील नायक / खलनायक आहेत. लाखाचे बारा हजार आणि बारा हजाराचे लाख करण्याची क्षमता असलेली पिके आहेत.

अनेक चित्रपटात पोलीस खलनायक असतात मात्र ह्या संकटाच्या काळात त्याला एकही खलनायक पोलीस दिसला नाही. कोणीही अडवणूक केली नाही, कोणी पैसे मागीतले नाहीत. खाजगी गाड्यांमधून मालवाहतूकीची परवानगी नसते मात्र माणूसकीची जाणीव ठेऊन बर्‍याच वेळी त्यांनी अशा वाहतुकीकडे काणाडोळा केला असण्याची दाट शक्यता आहे.

ग्राहकांचे अनेकविध नमुने बघावयास मिळाले.
कोणाला छोटे कांदे / बटाटे हवे असत, कोणाला मोठे, कोणाला मध्यम तर कोणाला मिक्स आकाराचे. ग्राहकांच्या वैयक्तीक आवडी निवडी लक्षात ठेऊन व्यवसाय करणे त्याला सुरुवातीला फार अवघड गेले. मात्र"साईझ मॅटर्स" हे तत्त्व त्याला लक्षात ठेवावेच लागले.

काही ग्राहकांनी लॉकडाऊनमधे त्याला अगदी देवदूताचा दर्जा दिला, तुम्ही समाजाची फार मोठी सेवा केली आहे असे सांगीतले. मात्र बाहेर माकेट खुले होताच ह्याच ग्राहकांनी भाजी घेणे थांबविले.

काही ग्राहक अगदी १ कांदा / बटाटा / फळ खराब निघाले तरी त्याचा फोटो काढून पाठवत आणि तो त्यांना पुढील खेपेस त्याच्या बदल्यात दुसरा माल देत असे किंवा त्याचे पैसे वजा करुन देत असे. बाहेर भाजी घेताना हे ग्राहक इतका चोखंदळपणा करत असतील काय असा प्रश्न त्याच्या मनाला भेडसावत असे. मात्र लवकरच त्याने तसा विचार करणे बंद केले.

काही ग्राहक मात्र विनातक्रार सहकार्य करायचे. समजूतदारपणा दाखवायचे. अनेक ग्राहक त्याच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. अर्थात त्याने देखील त्याने उत्तमोत्तम सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला.

काही लोकांना भाजी सॅनिटाईझ करुन हवी असायची. सॅनिटाईज करुन भाजी कशी विकायची हे त्याला शेवटपर्यंत नक्की कळाले नाही.

काही लोकांना भाजी हवी असायची पण ते भाजीवाल्याला भेटायला घाबरायचे. असे लोक भाजी घराबाहेर ठेवायला लावत आणि ४/५ तासाने भाजी घरात घेत.

जसजसा लॉकडाऊन उठत गेला तसतसे लोक भाजी खरेदी साठी पुन्हा बाहेर पडू लागले. त्यामुळे त्याच्या धंद्यावर पुन्हा परिणाम होत गेला. लॉकडाऊनच्या काळात तो आणि त्याची बायको पहाटे ३ ते रात्री ११ पर्यंत मेहनत करुन चांगले पैसे कमवत होता. मात्र तीच मेहनत करुन आता दोघांना मिळून दिवसाचे ५०० रुपये देखील मिळत नाहीत. त्याच्यासारखेच अनेक छोटे मोठे होम डिलिव्हरी करणारे भाजीविक्रेते परत नामशेष झाले आहेत. शेवटी मनावर दगड ठेऊन त्याने भाजीविक्रिचा व्यवसाय आता बंद केला आहे. त्याचा जुना व्यवसाय हळूहळू चालू झाला होता पण या नवीन लॉकडाऊन ने त्याला परत ब्रेक लावला. कारण तो अत्यावश्यक सेवेत नाही.

गाडीवाल्या भाजीवाल्यांना पुन्हा पहिले दिवस मिळाले. वाशी मार्केट मधील प्रायव्हेट गाड्यांची गर्दी कमी कमी होत गेली. त्याने भाजीची गाडी लावणार्‍यांबरोबर स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला पण तिथे त्याला अपयश आले. त्याचे कारण म्हणजे ग्राहक जेव्हा गाडीवर जाऊन भाजी घेतो तेव्हा तो ती स्वतः निवडून घेतो. त्यामुळे त्याला खराब मालाची जबाबदारी विक्रेत्याला घ्यावी लागत नाही. उरलेला शिळा माल दुसर्‍या दिवशीच्या ताज्या मालात मिक्स करुन विकता येतो. माल उरला तरी संध्याकाळी कमी भावात विकण्याची सोय गाडीवर असते. तो जेव्हा होम डिलीवरी देतो तेव्हा त्याला अशा प्रकारची सोय नाही.

आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. त्याला त्याचे जुने भाजीचे दिवस आठवत आहेत. त्याचे काही जुने ग्राहक त्याला पुन्हा साद घालत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात भाजीने त्याला केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक पण आधार दिला. त्याला त्याची ही कहाणी कोणाला सांगायची नव्हती. त्याला कोणाला दोष पण द्यायचा नाही. ज्यांनी त्याला मदत केली त्यांचा तो आभारी आहे. ज्यांनी नाही केली त्यांचा तो द्वेष करत नाही. तो कोणत्याही सरकारच्या बाजूने भांडत नाही.

दुसर्‍या लॉकडाऊन च्या निमित्ताने त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा उचंबळून आल्या इतकेच... त्याचे विचार विस्कळीत स्वरुपात मांडले आहेत. पण लॉकडाऊन मधे जनजीवनच विस्कळीत झाले तर लेखाची काय कथा !!

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 Apr 2021 - 4:23 am | कंजूस

आपला रोजगार आपणच शोधायचा.
पण नुकसानी/ फायद्याबरोबर बोलणीही खावी लागतात.
अत्यावश्यक सेवा फक्त चालू म्हटल्यावर बरीच इतर दुकाने बंद ठेवावी लागली. त्यांनी दुकानाबाहेर दूध, पाव, केळी,भाजी विकून कमाई चालू ठेवली.
मिठाईवाल्यांना सगळं बंद ठेवावं लागलं. अधुनमधून बंद झाले की बनवलेले पदार्थ वाया.

सौंदाळा's picture

23 Apr 2021 - 1:07 am | सौंदाळा

विदारक वास्तव
लेख खरच विस्कळीत झाला आहे पण परिणामकारक सुद्धा आहे

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 4:11 am | मुक्त विहारि

आमच्या डोंबोलीत, भाजीवाले चांगला धंदा करतात...

कल्याण मार्केटला भाजी चांगली मिळते. डोंबिवली पेक्षा निम्मा रेट असतो..

घरपोच डबा देणारे पण उत्तम कमवत आहेत...

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Apr 2021 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार

"महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाकती" सध्याच्या काळात याचा प्रत्यय पावलोपावली येतो आहे.

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

23 Apr 2021 - 10:33 am | मुक्त विहारि

वाचती

गॉडजिला's picture

23 Apr 2021 - 1:26 pm | गॉडजिला

:( ज्याची ही कथा आहे त्याचे दुख्खः नक्किच समजु शकतो