चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा, नववर्षाचा पहिला दिवस, शालीवाहन शक, या दिवशी आपण गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करतो. गौतमीपुत्र सातकर्णीने याच दिवशी शकांचा पराभव केला असे मानले जाते आणि त्याच विजयाप्रीत्यर्थ हा शक सुरु केला असे मानले जाते. अर्थात हा विवाद्य विषय कारण मुळात गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला ते इसवी सन १२५ ते १३० च्या आसपास असे मानले जाते तर कुशाण वंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली ते इस ७८ मध्ये, साहजिकच हा संवत्सर कनिष्काने सुरु केला असावा आणि नंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी हा प्रचलित केला असे मानता येते. अर्थात ह्या घटनांच्या बाबतीत येथे मी जास्त खोलात जाणार नाही, मला येथे लिहायचे आहे ते गुढीपाडव्याच्या म्हणजे गुढी उभारण्याच्या प्रथेचे प्राचीन साहित्यात आलेल्या वर्णनांबाबत.
हा सण प्राचीन काळात इंद्रोत्सव किंवा शक्रोत्सव ह्या नावाने प्रचलित होता आणि ह्या उत्सवात इंद्राची पूजा केली जात असे. कळकाच्या काठ्या उभारल्या जात आणि त्याला इंद्रध्वज असे म्हणत असत.
महाभारतातल्या आदिपर्वात इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रकारे आले आहे.
उपरिचर नामक एका धर्मनिष्ठ राजा आपल्या तपोबलाने इन्द्रपदासही योग्य झाला असे वाटून देव त्याच्यापुढे प्रकट झाले व त्यास म्हणाले की तू पृथ्वीचे राज्य कर, इंद्राने त्याला चेदी देशाचे राज्य दिले व त्याला एक दिव्य विमान, ज्यातील कमळे कधीच कोमेजत नाहीत व जी परिधान केल्यावर कुठल्याही शस्त्रांपासून भीती नाही अशी एक दिव्य इंद्रमाला त्यास दिली आणि...
यष्टिं च वैणवीं तस्मै ददौ वृत्रनिषूदनः |
इष्टप्रदानमुद्दिश्य शिष्टानां परिपालिनीम् ||
तस्याः शक्रस्य पूजार्थं भूमौ भूमिपतिस्तदा |
प्रवेशं कारयामास गते संवत्सरे तदा ||
ततः प्रभृति चाद्यापि यष्ट्याः क्षितिपसत्तमैः |
प्रवेशः क्रियते राजन्यथा तेन प्रवर्तितः ||
अपरेद्युस्तथा चास्याः क्रियते उच्छ्रयो नृपैः |
अलङ्कृतायाः पिटकैर्गन्धैर्माल्यैश्च भूषणैः ||
माल्यदामपरिक्षिप्ता विधिवत्क्रियतेऽपि च ||
भगवान्पूज्यते चात्र हास्यरूपेण शङ्करः |
स्वयमेव गृहीतेन वसोः प्रीत्या महात्मनः ||
एतां पूजां महेन्द्रस्तु दृष्ट्वा देव कृतां शुभाम् |
वसुना राजमुख्येन प्रीतिमानब्रवीद्विभुः ||
ये पूजयिष्यन्ति नरा राजानश्च महं मम |
कारयिष्यन्ति च मुदा यथा चेदिपतिर्नृपः ||
तेषां श्रीर्विजयश्चैव सराष्ट्राणां भविष्यति |
तथा स्फीतो जनपदो मुदितश्च भविष्यति ||
एवं महात्मना तेन महेन्द्रेण नराधिप |
वसुः प्रीत्या मघवता महाराजोऽभिसत्कृतः ||
उत्सवं कारयिष्यन्ति सदा शक्रस्य ये नराः |
भूमिदानादिभिर्दानैर्यथा पूता भवन्ति वै ||
वरदानमहायज्ञैस्तथा शक्रोत्सवेन ते ||
सम्पूजितो मघवता वसुश्चेदिपतिस्तदा |
पालयामास धर्मेण चेदिस्थः पृथिवीमिमाम् ||
इन्द्रप्रीत्या भूमिपतिश्चकारेन्द्रमहं वसुः ||
(महाभारत भांडारकर संशोधित प्रत १.५७)
...आणि नंतर इंद्राने उपरिचर राजाला आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून एक वेळूची (बांबू/कळक) काठी दिली. इंद्राने प्रदान केलेल्या वस्तूंना स्मरुन राजानेही तो संवत्सर संपण्याच्या दिवशी ती काठी जमिनीत पुरुन ठेवली. ही चाल अद्यापिही राजेलोकांत सुरु आहे. नंतर नवीन वर्षाच्या प्रथम दिवशी त्या काठीला वस्त्रभूषणे, गंधपुष्पे इत्यादिकांनी अलंकृत करुन उंच उभारितात आणि वसुराजाप्रीत्यर्थ धारण केलेल्या हंसरूपी ईश्वराची या यष्टीद्वारा विधीपूर्वक मोठ्या आदराने पूजा करतात. आपला हा उत्सव वसुराजाने प्रचलित केलेला पाहून त्या चक्रवर्ती राजावर इंद्राचा अनुग्रह होऊन त्याने असा वर दिला की "जे नृप व जे लोक चेदीराजाप्रमाणे माझा उत्सव व पूजा करतील त्यांचा सदैव विजय होत जाऊन त्यांचे राज्य अखंड संपन्न होईल व त्यांच्या प्रजाजनांचेही कल्याण होऊन ते नेहमी संतुष्ट राहतील" याप्रमाणे त्या उदार महेन्द्राने चेदीराजाचा उत्तम सत्कार केला.
तर वराहमिहिराच्या बृहदसंहितेत इंद्रध्वजाचे वर्णन पुढीलप्रमाणे आले आहे.
उपरिचरस्यामरपो वसोर्ददौ चेदिपस्य वेणुमर्याम |
यष्टिं तां स नरेन्द्रो विधिवत् सम्पूजयामास ||
(इन्द्रध्वसम्पद् ४३)
एकदा इंद्राने चेदी देशातील राजाला जो उपरिचर वसु या नावाने विख्यात होता त्याला एक कळकाची काठी दिली तो राजा त्या काठीची विधिवत पूजा करत असे.
बृहद्संहितेतील काही श्लोकांचे वर्णन महाभारतातील वर्णनाप्रमाणेच आलेले आहेत. मात्र ह्या व्यतिरिक्त ही यष्टी कशी आणावी ह्याचे अधिकचे वर्णनही बृहद्संहितेत येते.
उद्यान देवतालय पितृवन वल्मीकमार्ग चितिजाताः।कुब्जोर्ध्वशुष्क कण्टकिवल्लीवन्दाक युक्ताश्च ॥
बहुविहगालय कोटरपवनानल पीडिताश्च ये तरवः। ये च स्युः स्त्रीसंज्ञा न ते शुभाः शक्रकेत्वर्थे ॥
एक ज्योतिषी आणि एका सुताराने शुभदिवस, नक्षत्रे पाहून मंगल मुहूर्तावर जंगलात प्रस्थान करावे, जी झाडे उद्यानात, देवळांत, स्मशानांत, वारुळांत, रस्त्यांवर, यज्ञीय स्थळी लावली जातात, जी बुटकी आहेत, माथ्यावर खुडलेली आहेत, काटेरी आहेत, परजीवी वेलींनी ज्यांना वेढा घातलेला आहे, ज्यांच्यावर असंख्य पक्ष्यांचा निवास आहे, त्यांची घरटी आहेत, जी पोकळ आहेत, ज्यांचे वारा आणि आगीमुळे नुकसान झाले आहे आणि ज्यांची नावे स्त्रीसूचक आहेत अशी सर्व झाडे ह्या साठी वर्ज्य समजावीत.
वराहमिहिर पुढे म्हणतो,
अर्जुन, अजाकर्ण (चंद्रुस), प्रियक, धव (धामोरा/धावडा), उंबर ह्या झाडांचे लाकूड ध्वजासाठी उत्तम समजावे. त्या वृक्षाची स्तुती करावी- हे महान वृ़क्षा, तुझ्यात निवास करणार्या सर्व जीवांना नमन असो, राजाने तुला ह्या देवेन्द्राचा ध्वज म्हणून निवडले आहे, कृपया या पूजेचा स्वीकार करावा.
यानंतर भल्या पहाटे सुताराने पूर्व किंवा उत्तर दिशेस सन्मुख होऊन हे झाड कापण्यास आरंभ करावा किरकिर आवाज करत न कापता हळूवार पण एकच वारात हे काम करावे. जर तो वृक्ष एकाच फटक्यात इतर वृक्षांना इजा न देता शिवाय स्वतःचेच नुकसान न होऊ देता पडला तत तो राजाला विजय देईल. याविपरीत वृक्ष पडला तर तो ध्वजासाठी त्याज्य समजावा. हा वृ़क्ष वरील बाजूस चार अंगुळे तर खालील बाजूस आठ अंगुळे इतका ठेवून साफ करावा व त्याचे खोड पाण्यात बुडवून ठेवावे व यांनतर तो मनुष्यांकरवी अथवा रथातून गावाच्या वेशीवर आणावा.
भाद्रपदाच्या शुक्ल पक्षात राजाने नगरजन, सचिव, पुरोहित यांसह नवे कपडे धारण करुन शंख आणि वाद्ये वाजवत ध्वजास सामोरे जावे. सर्व नगर स्वच्छ करुन ध्वज, पताका, तोरणे, पानाफुलांच्या माळा यांनी सजवावे. यष्टी आणताना ती जर हत्तीं किंवा इतर प्राण्यांद्वारे पडल्यास तो अपशकुन समजावा. मुलांनी टाळ्या वाजवल्यास किंवा प्राणी एकमेकांशी भांडू लागल्यास भविष्यात युद्ध होईल असा अपशकुन मानावा. नंतर राजसुताराने ती यष्टी एखाद्या चौथर्यावर आडवी ठेवावी व राजाने अकराव्या दिवशी रात्री तिचे निरिक्षण करावे. नंतर बाराव्या दिवशी ब्राह्मणांना गूळ, दूध दक्षिणा देऊन ध्वज उभारावा. ध्वजाला विविध रंगांतील अलंकारांनी अलंकृत करावे यातले काही अलंकार पुढीलप्रमाणे- अशोकाचे रक्तवर्णी फूल, विविध रंगांचे पट्ट, मसूरक, मोराची पिसे, कमलपुष्प इत्यादी. हा ध्वज ४ दिवस तसाच ठेवून विविध सूक्तांद्वारे त्याची पूजा करावी. पाचव्या दिवशी हा इंद्रध्वज राजाने त्याच्या अमात्यांसह येऊन उतरवावा.
उपरिचर वसुने प्रचलित केलेल्या व इतर राजांद्वारे अनुसरण केल्या गेलेल्या ह्या प्रथेचे जो राजा यथाविधी पालन करेल त्याला शत्रूंकडून कुठलेही भय राहणार नाही.
अर्थात बृहद्संहितेत शक्रोत्सवाच्या वर्णनात चैत्र महिन्याचा उल्लेख न येता भाद्रपद महिन्याचा उल्लेख आलेला आहे शिवाय सुरुवातीला कळकाचा (बांबूचा) उल्लेख असला तरी नंतर इतरही वृ़क्ष काठीसाठी योग्य समजले आहेत. जंगलात जाऊन लाकूड आणणार्या प्रथेचे आजही येथील बगाड यात्रेत पालन होताना दिसते. बगाडासाठीचे लाकूड आणायला लोक जंगलांत जातात. हिंजवडीतल्या बगाडाचे लाकूड मुळशी खोर्यातल्या बार्पे ह्या दुर्गम गावी जंगलात जाऊन वाजतगाजत आणले जाते. बगाडाच्या यात्रा चैत्र महिन्यात होतात हे उल्लेखनीय आहे.
महाभारतातील खिलपर्वात -हरिवंशात (खिलपर्व मूळ महाभारताचा भाग समजले जात नाही) इंद्रोत्सव न करता गोवर्धन पर्वताची पूजा करावी असे गोकुळातल्या लोकांना सांगतांना कृष्ण म्हणतो की "सांप्रत शरद ऋतूचा काल प्राप्त झालेला आहे.हा ऋतू लागला म्हणजे मेघ कमी होऊन जलाशयातील पाणी कमी होऊ लागते. तुम्ही ह्या गोवर्धन गिरीचे पूजन करुन त्याला संतुष्ट करा."
त्यानंतरची कथा सर्वांना माहिती आहेच. इंद्राचे गर्वहरण झाल्यावर तो श्रीकृष्णाला म्हणतो, "पावसाळ्याचे माझे चार महिने आहेत. ते त्यातील शेवटचे शरदऋतूचे दोन महिने मी तुला अर्पण करेन अर्धा पावसाळा झाल्यावर माझी कालमर्यादा व पूजा समाप्त करुन लोक तुझी पूजा करतील, आकाश निर्मल होऊन मेघ नाहीसे होतील, धान्य उत्पादन वाढेल, ध्वजाकार यष्ट्या उभ्या करुन अखिल लोक तुझे व माझे महेन्द्र आणि उपेन्द्र या नावांनी पूजन करतील"
रामायणात मात्र मला इंद्रध्वजाचा उल्लेख मिळाला नाही, रावणाचा वध करुन राम अयोध्येस परत येतो तेव्हा देखील तिथीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात नाही, इतर कुठल्या प्रतींत आहे का ते बघायला हवे.
वराहमिहिराची बृहद्संहिता व खिलपर्वातील ह्या उल्लेखांमुळे इंद्रध्वजाची पूजा भाद्रपद महिन्यात प्रचलित होती हे सहज लक्षात यावे मात्र महाभारतातील त्याचा उल्लेख मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीस काठीची/इंद्रध्वजाची पूजा करावी असा येतो. आदिपर्वात इंद्रध्वजपूजेचे संक्षिप्त वर्णन आलेले असून वराहमिहिराने मात्र ते अगदी तपशील्वार नोंदवले आहे. महाभारत काळात इंद्रोत्सव हाच नववर्षाचा दिन मानला जात असे की नाही ते कळत नाही. भाद्रपदातील हा शक्रोत्सव नंतर कधीतरी कुशाण कालखंडात कनिष्काच्या राज्यारोहणसमयी चैत्र महिन्यात परिवर्तीत झाला असावा व मूळ इंद्राच्या उत्सवाचे त्याचे रूप लयास जाऊन केवळ नवीन संवत्सराचे स्वागत करुन त्याच्या आगमनाप्रीत्यर्थ ध्वजरुपी काठ्या अर्थात गुढी उभारण्यात सुरु झाले असावे असा माझा तर्क.
गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा.
(चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालिवाहन शक १९४३, प्लव संवत्सर)
प्रतिक्रिया
13 Apr 2021 - 6:42 am | कंजूस
लेख आवडला. ही काठी आणि बगाडाची माहिती आवडली.
13 Apr 2021 - 7:11 am | मुक्त विहारि
माहिती बद्दल धन्यवाद
13 Apr 2021 - 7:12 am | गवि
उत्तम लेख.
13 Apr 2021 - 7:15 am | मुक्त विहारि
हिंदू नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
13 Apr 2021 - 9:41 am | कुमार१
उत्तम लेख.
13 Apr 2021 - 10:18 am | मदनबाण
माहिती आवडली.
उपरिचर वसु :- जितके मला स्मरते त्यानुसार नवनाथ भक्तिसार मध्ये उपरिचर वसु चा उल्लेख २-३ ठिकाणी आहे बहुतेक. उर्वशीला पाहुन उपरिचर वसु चे स्खलन होउन मछिंद्रनाथांचा जन्म असे काहीसे आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taal
13 Apr 2021 - 11:32 am | सौंदाळा
माहितीपूर्ण लेख
गुढीपाडवा इंद्रपूजेशी संबंधित आहे हे अजिबातच माहिती नव्हते.
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
13 Apr 2021 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाह ! माहितीपूर्ण आणि प्रासंगिक लेखन आवडले. शालिवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पानी शिंपडले व त्यांना सजीव केले त्या सर्व सैन्याच्या मदतीने शत्रुंचा पराभव केला, त्या विजयाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरु झाला. शालिवाहन शकाची सुरुवात आजच्या दिवसापासून होते, असे म्हटल्य जाते.
कथा नंबर दोन. आजच्या दिवशी प्रभूश्रीरामचंद्रांनी वालीच्या जुलूमातून प्रजेला मुक्त केले. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघर जावून गुढ्या (ध्वज) उभारल्या होत्या. विजयाचा संदेश गुढीतून दिल्या जातो असे वाटते.
कथा नंबर तीन. आजच्या दिवशी कडुनिंबाचे पान आणि साखर देण्याचा प्रघात पूर्वी होता म्हणे, निंब कडू आहे पण आरोग्यदायक आहे, अगोदर कडवटपणा आणि नंतर कल्याण होते असा एक अर्थही आपण घेऊ शकतो असे वाटते. कटू विचार पण त्याचा फायदा होतो याही अर्थाने त्याकडे पाहिले पाहिजे असे वाटते.
आज आपण अन्याय करणा-या व्यवस्थेविरुद्ध बोलत नाही, लढत नाही, अन्यायाविरुद्ध दाद मागत नाही. मला वाटतं, अशा लोकांमधे प्रेरणा भरली पाहिजे, हे एका अर्थाने 'मातीचे सैन्यच'आहे, त्यात जीव ओतला पाहिजे, तरच आपण असे सण उत्सव नव्याने समजून घेऊ असे वाटते.
घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नका. मास्कचा वापर करा, सॅनिटाइजरचा वापर करा, दुर अंतरावरुन संवाद करा, इथे तिथे हात लावून बघू नका. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
13 Apr 2021 - 1:28 pm | तुषार काळभोर
भाद्रपदातील हा शक्रोत्सव नंतर कधीतरी कुशाण कालखंडात कनिष्काच्या राज्यारोहणसमयी चैत्र महिन्यात परिवर्तीत झाला असावा व मूळ इंद्राच्या उत्सवाचे त्याचे रूप लयास जाऊन केवळ नवीन संवत्सराचे स्वागत करुन त्याच्या आगमनाप्रीत्यर्थ ध्वजरुपी काठ्या अर्थात गुढी उभारण्यात सुरु झाले असावे असा माझा तर्क.
>>
चैत्र पाडवा हा नववर्षाचा प्रथम दिन, हे केव्हा स्थापित झाले असावे?
सैन्य / राजा मोहिमेवरून विजयी होऊन परतल्यावर राज्यात / राजधानीत गुढ्या, तोरणे उभारली जात, हे आधीपासून होते की मध्ययुगीन परंपरा आहे?
13 Apr 2021 - 3:04 pm | प्रचेतस
चैत्र पाडवा वर्षाचा प्रथम दिन म्हणून कधी स्थापित झाला ते आज सांगता येणे कठीण आहे, अगदी लेखाच्या सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे कनिष्काने हे संवत सुरू केले व शकांनी त्याचे पालन केले त्यामुळे शक हेच संवताचे नाव पडले.
राजा मोहिमेवरून विजयी होऊन आला की गुढया तोरणे उभारली जात हे प्राचीन साहित्यात आहेच मात्र ह्यात गुढ्यांचा उल्लेख नसून तोरणे पताकांचा उल्लेख येतो. राम अयोध्येला परत आल्यावर नागरिकांनी घरोघरी तोरणे, पताका लावले असे उल्लेख आहेत.
13 Apr 2021 - 4:29 pm | तुषार काळभोर
त्याआधी नववर्ष अशी काही कल्पना होती का?
दुसरी अवांतर शंका: व्यवहारात शालिवाहन शक कालगणना कितपत वापरली जात होती? सतराव्या शतकातील मराठी कागदपत्रात मुस्लिम कालगणना दिसून येते. ( माहितीचा स्रोत शिवाजी सावंत, रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या - हा स्रोत चुकीचा असू शकतो.) की हे सद्य कालीन परिस्थिती सारखं असावं? म्हणजे आपण व्यवहारात पाश्चात्य कालगणना वापरतो आणि परंपरा, उत्सव हिंदू कालगणनेनुसार करतो, तसं?
13 Apr 2021 - 5:08 pm | प्रचेतस
नववर्ष ही संकल्पना होती की नाही हे निश्चित सांगता येणार नाही, राजेलोक जास्त करून त्यांच्या राज्यारोहण प्रसंगी नवीन संवत सुरू करायचे. मात्र प्राचीन काळात चैत्र महिन्याला विशेष महत्व होतेच, अनेक यात्रा आजही चैत्रात असतात पण तेव्हा चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच नववर्षाचा पहिला दिवस मानला जात असे हे नाही सांगता येणार, किंबहुना कनिष्काने हे संवत या दिवशी सुरू केले असे मानल्यास शकांनी हेच संवत प्रचलित केले व ते आजही सुरू आहे.
इस्लामपूर्व काळात शालिवाहन शक महाराष्ट्रात निरपवादपणे वापरली जात होती, कित्येक शिलालेखात शकु, सकु, शकु संवतु, सालहण शके असे शालिवाहन शकाचे विविध प्रकारे उल्लेख आलेले आहेत, विक्रम संवताचे उल्लेख जवळपास नाहीत, तो जास्त करून उत्तरेत प्रचलित होते. एकदोन तुरळक लेखात चालुक्य विक्रम संवताचा उल्लेख आहे, विक्रम संवत आणि चालुक्य विक्रम हे दोन भिन्न संवत, चालुक्य विक्रम हा चालुक्य विक्रमादित्याने ११ व्या शतकात सुरू केला व तो फक्त त्याच्या मृत्यूपर्यंतच सुरू राहिला. त्याचे मांडलिक असणाऱ्या इकडील दक्षिणेकडील एक दोन ठिकाणीच याचा उल्लेख दिसतो, तुलनेत शालिवाहन शकाचे उल्लेख विपुल आहेत. यादवांच्या अस्तानंतर इकडील प्रांती इस्लामचे वर्चस्व वाढले, राज्यकारभाराची, प्रशासनाची भाषा फारसी झाली व हिजरी कालगणना ही अधिकृत कालगणना बनली, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातही हिजरी कालगणना वापरलेली दिसते, महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केल्यावर याचे प्रमाण काहीसे कमी झाले व परत शालिवाहन शकच जास्तकरून मानण्यात येऊ लागला, नंतर मात्र ब्रिटिशांच्या आगमनानंतर ग्रेगोरीयन कालपद्धत्ती सुरू झाली जी आपण आजही पाळतो.
13 Apr 2021 - 5:13 pm | तुषार काळभोर
म्हणजे दिवाळी पाडव्याला सुरू होतो तो ना?
13 Apr 2021 - 5:19 pm | प्रचेतस
हो, तोच.
हा विक्रम संवत पण विवाद्य आहे. इसपू ५७ मध्ये हा संवत सुरू झाला. विक्रमादित्याच्या नावावरून हे संवत्सर सुरू झाले असे मानतात मात्र हा उज्जैनचा पराक्रमी राजा विक्रमादित्य म्हणजेच गुप्त राजवटीतील सर्वात महान राजा चंद्रगुप्त दुसरा. ह्याचा काळ येतो तो साधारण ४ थ्या शतकात. शिवाय इसपू ५७ च्या आसपास इतर कुठलाही विक्रमादित्य नामक राजा असल्याचे पुरावे नाहीत, मग ह्या संवत्सराला विक्रम संवत हे नाव कसे पडले? ह्याचा एक तर्क असा की मुळात हे संवत इंडोग्रीक राजा एझेस दुसरा (Azes II) ह्याने त्याच्या राज्यारोहणप्रसंगी सुरू केले, ह्याचेच क्षत्रप असलेल्या शकांनी माळवा, राजस्थानात हे संवत प्रचलित ठेवले, त्यानंतर चौथ्या शतकात चंद्रगुप्त दुसरा अर्थात विक्रमादित्याने गुजरात, काठेवाड, माळवा हा प्रांत जिंकला, भरूकच्छ (भडोच) वर स्वारी करून रुद्रसिंह (तृतीय)क्षत्रप याचा संपूर्ण पराभव करून क्षत्रपांचे उरलेसुरले राज्यही संपवले. विक्रमादित्याच्या ह्या पराक्रमाने माळवा, गुजरात, राजस्थान इत्यादी प्रांतात प्रचलित असणारे हे संवत विक्रमामदित्याच्या नावाने ओळखले जायला लागून विक्रम संवत ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
13 Apr 2021 - 10:41 pm | तुषार काळभोर
इतकी माहिती उपलब्ध आहे, इस्लाम पूर्व भारताची. मला वाटायचं बाराव्या शतकाआधीचा इतिहास नष्ट झाला आहे किंवा फार तुटक उपलब्ध आहे.
अशोकाविषयीसुद्धा एकोणिसाव्या शतकापर्यंत माहिती नव्हती ना?
मी ऐकलंय की सम्राट अशोक ही केवळ अख्यायिका आहे असं मानलं जायचं.
असो. फारच अवांतर होतंय.
14 Apr 2021 - 10:23 am | प्रचेतस
इस्लामपूर्व भारताचा इतिहासही विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र तो बहुतांशी तुटक स्वरूपात कारण त्याचे नीट डॉक्युमेंटेशन असे झालेच नाही, जी काही माहिती मिळते ती ताम्रपट, शिलालेख, ऐतिहासिक पत्रे अशा अस्सल साधनात तर बरेच वेळा पुराणांत आलेल्या अतिशयोक्त वर्णनांचा आधार घ्यावा लागतो.
जेम्स प्रिन्सेपने ब्राह्मी लिपी डिकोड केल्यापासून बराच इतिहास उलगडला गेला. अशोकाच्या शिलालेखात देवानाम प्रिय प्रियदर्शी असा उल्लेख असल्याने हा प्रियदर्शी म्हणजेच अशोक असे सिद्ध होत नव्हते मात्र नंतर एका नाण्यामुळे प्रियदर्शी हाच अशोक हे सिद्ध झाले.
14 Apr 2021 - 8:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. धन्स.
-दिलीप बिरुटे
29 Mar 2023 - 5:12 pm | सामान्यनागरिक
https://www.youtube.com/watch?v=r0ahfBtWxWg&t=2098s
या नुसार गुढीपाडव्याच्या दिवशी जिथुन सूर्य उगवतो ती पक्की पूर्व दिशा असते. नंतर पुढे पृथ्वीच्या कललेल्या अक्षाने तसेच ईतर खगोलीय परिणामांमुळे तो सरकायला लागतो.
३१ डिसें ला तो एकदम दक्षिणेकडे असतो. आणी नंतर उत्तरेकडे सरकायला लागतो. त्याचे उत्तरायण-दक्षिणायन चालु असते.
वर दिलेला व्हिडीओ पूर्ण पहा. श्रीमती दीपाली पट्वाडकर या मराठी बाईने बनवलेला आहे.
या विषयाबद्दल जी पांडित्यपूर्ण चर्चा चालु आहे त्यात माझाही एक ढब्बु पैसा.
13 Apr 2021 - 1:53 pm | Bhakti
गुढीपाडव्याला नाविन्यपूर्ण माहिती समजली.
इंद्रोत्सव आणि इंद्रध्वज सुरेख आणि मंगल!!
13 Apr 2021 - 2:02 pm | प्रसाद गोडबोले
शेटजी भडजींच्या संस्कृतीचा त्याग करा !
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ब्राह्मणांनी मनुस्मृती नुसार केली अन राजांच्या हत्येचा आनंदात ब्राह्मणांनी गुढ्या उभारल्या. त्यामुळे गुढीपाडवा हा बामणांचा सण असुन तो साजरा करु नये ! बहुजनांसाठी हा एक दु:खद दिवस आहे . असे संभाजी ब्रिगेड सांगते तेच सत्य आहे !
बामणांचा धर्म , सभ्यता अन परंपरा , रितीरीवाज सण , उत्सव , विधी , उपासना , संतसाहित्य , वगैरे सगळ्यांवर बहुजनांनी बहिष्कार टाकावा अन ही साडेतीन टक्केव्याल्या टरबुजांची संस्कृती त्यांच्या करता सोडुन द्यावी !
.
13 Apr 2021 - 3:04 pm | प्रचेतस
=))
23 Mar 2023 - 9:00 pm | प्रसाद गोडबोले
काहीही करु पण आम्ही कदापि तुमचा हा बामणी कावा गुढीपाडवा साजरा करणार नाही
>>>
सोलापुरात पुस्तकांचे पूजन करून संभाजी ब्रिगेडने उभारली परिवर्तनवादी शिवगुढी
https://www.lokmat.com/solapur/sambhaji-brigade-built-a-transformational...
24 Mar 2023 - 6:57 am | चौकस२१२
हे असे जातीयवादी लिहिलेले मिपावर चालते ?
13 Apr 2021 - 3:41 pm | अनिंद्य
समयोचित सुंदर लेख.
पाडव्याच्या शुभेच्छा !
14 Apr 2021 - 9:45 am | परिंदा
इंद्रध्वजाचे लाकुड गावात आणण्याची पद्धत आणि कोकणात शिमग्यात होळीचे झाड तोडून आणण्याच्या प्रथेत बरेच साम्य आहे.
14 Apr 2021 - 10:24 am | प्रचेतस
सर्व वाचकांना धन्यवाद. :)
14 Apr 2021 - 12:54 pm | चौथा कोनाडा
खुपच माहितीपूर्ण लेख !
गुढीपाडव्याचे मुळ इंद्रध्वज, इंद्रपूजेशी नातं सांगतं ही नविन माहिती समजली.
बगाडाच्या प्रथेचे मुळ माहित नव्हते.
परिंदा म्हणतात त्यानुसार शिमग्यात होळीचे झाड तोडून आणण्याच्या प्रथेतले साम्यही विशेष आहे.
14 Apr 2021 - 1:27 pm | रश्मिन
सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !
आणि वल्ली साहेबांचे या माहितीपूर्ण लेखाबद्दल अभिनंदन !
वल्ली साहेब, एक लेखमालिका ह्या सर्व राजवटींवर, तत्कालीन समाज, कला, संस्कृती , भाषा, आर्थिक स्थिती ह्यांचा परामर्श घेत लिहावी हि विनंती करतो. म्हणजे किमान इ स पु. २ रे शतक ते खिलजी ची देवगिरीवर स्वारी ह्या कालखंडावर यावी. कारण १३ वे शतक ते स्वातंत्र्यलढा ह्यावर बरीच साधने उपलब्ध आहेत किंवा हि माहिती सहजगत्या होऊ शकते.
रच्याक , "The India They Saw" ही परकीय प्रवासी किंवा इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेली इसपू. ५ ते इस. १९व्या शतकापर्यन्त आधारलेली चार पुस्तकांची मालिका किंडल वर नाममात्र शुल्कात उपलब्ध आहे. अगदी त्रोटक स्वरूपात असली तरी उत्तम संदर्भ पुस्तिका म्हणून ह्याचा वापर होऊ शकतो.
तरी वल्लीनी हे मनावर घ्यावे आणि त्यांच्या बहारदार लेखनाने आम्हास उपकृत करावे !
14 Apr 2021 - 5:14 pm | प्रचेतस
धन्यवाद.
पण ह्या विषयाचा आवाका प्रचंड आहे. चौथ्या/पाचव्या शतकातल्या गुप्तांच्या एकछत्री साम्राज्यानंतर अनेक वेगवेगळ्या राजवटी प्रस्थापित झाल्या.वाकाटक, गुर्जर, पाल, प्रतिहार, चालुक्य, राष्ट्रकुट, कदंब, शिलाहार, यादव इत्यादी. पैकी महाराष्ट्रावर मुख्यतः चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव यांनी राज्य केले.
कधीतरी ह्या विषयावर अवश्य लिहीन पण त्यासाठी बराच अभ्यास करावा लागेल.
14 Apr 2021 - 3:13 pm | रांचो
वल्लींचे लेख जितके माहितीपूर्ण आहेत / असतात तितकेच त्यांचे प्रतिसाद सुध्दा. अनेकानेक धन्यवाद !
14 Apr 2021 - 8:37 pm | गॉडजिला
क्या बात है.
15 Apr 2021 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार
गुढीची अजून एक कथा ऐकली होती, ती अशी की, रावणाचा पराभव करुन रामाने चैत्र शुध्दप्रतिपदेला आयोध्येत प्रवेश केला व त्याच्या स्वागता करता गुढ्या उभारण्यात आल्या व नंतर त्या दिवसाचे स्मरण म्हणून ही प्रथा सुरु झाली.
दुसरी कथा म्हणाजे ब्रम्ह्याने याच दिवशी विश्व सुरु केले होते
पैजारबुवा,
15 Apr 2021 - 10:17 am | प्रचेतस
धन्यवाद माऊली.
रामायणातील हाच संदर्भ मलाही माहीत होता, मात्र ह्या लेखासाठी वाल्मिकी रामायण चाळूनही मला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा उल्लेख मिळाला नाही. शिवाय रामाच्या स्वागतासाठी अयोध्येच्या नगरजनांनी रस्त्यांवर रांगोळ्या तोरणे, पताका लावून सजवल्याचे उल्लेख आहेत मात्र गुढीचे नाहीत.
15 Apr 2021 - 12:09 pm | तुषार काळभोर
विजयादशमीला रावणाला मारून नंतर लंका स्थिर स्थावर करून, वानरांचा निरोप वगैरे घेऊन अयोध्येत परत यायला किती काळ लागला असावा?
15 Apr 2021 - 1:37 pm | परिंदा
राम अयोध्येत दिवाळीला पोहचला होता. त्याच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी करतात असे देखील वाचनात आले होते.
15 Apr 2021 - 1:39 pm | परिंदा
अयोध्येत परत येताना पुष्पक विमानाने आला होता. रावणाला मारुन, विभिषणाचा राज्याभिषेक करुन, रामेश्वर स्थापना, सुग्रीवाला किष्किंधेत ड्रोप करुन अयोध्येत यायला त्याला १५ दिवस लागले असावेत.
15 Apr 2021 - 1:50 pm | प्रचेतस
विजयादशमीस रावणास मारले हे गृहित धरल्यास (तसे संदर्भ तपासून पाहावे लागतील) रामाने दुसर्याच दिवशी पुष्पक विमानातून प्रयाण केले. विमानातून जाताना किष्किंधेस एक दिवस थांबून (येथे वानरस्त्रियांसही अयोध्येस नेण्यासाठी सोबत घेतले होते). वानरस्त्रियांना सोबत घेतल्यावर श्रीरामांनी भरद्वाज आश्रमात प्रवेश केला. येथे मात्र १४ वर्ष पूर्ण झाल्याचा आणि तिथीच सुस्पष्ट उल्लेख येतो.
पूर्णे चतुर्दशे वर्षे पञ्चम्यां लक्ष्मणाग्रजः ।
भरद्वाजश्रमं प्राप्य ववन्दे नियतो मुनिम् ॥
१४ वर्षे पूर्ण झाल्यावर पंचमीच्या दिवशी लक्ष्मणाच्या ज्येष्ठ बंधूंनी भरद्वाज मुनींच्या आश्रमात प्रवेश करुन मुनींना वंदन केले.
आता विजयादशमीस म्हणजे अश्विन शुद्ध दशमी, एकादशीला त्यांनी पुष्पक विमानातून प्रयाण केले. इथे मात्र तिथींची गडबड होते. भरद्वाज आश्रमात पोहोचण्यापूर्वी किष्किंधेस थांबले असतील तर ते आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीस असावे. इथे शुक्ल किंवा वद्य हा उल्लेख येत नाही. आपण अश्विनातला वद्य पक्ष मानू. भरद्वाज आश्रमातून प्रयाणानंतर लगेच शृंगवेरपुरास निषादराज गुह्यकाची भेट व नंतर नंदीग्रामास भरताला भेटून त्यासह श्रीराम अयोध्येस आले. ह्याला साधारण २ दिवस लागले असावेत असा माझा तर्क. पण पुष्पक विमान वगैरे अतिशयोक्त वर्णन वाटल्यास लंका ते अयोध्या हा प्रवास पायी केल्यास ५ ते ६ महिने सहज लागावेत. ह्या हिशेबाने पाहिल्यास विजयादशमीस रावणाचा मृत्यू ते चैत्र शुद्ध प्रतिपदेस अयोध्येस आगमन ह्या तर्काची संगती लागते.
मात्र तिथींचा बराच घोळ असल्याने शिवाय बर्याच ठिकाणी तिथींचा उल्लेख नसल्याने निर्विवादपणे काहीच सांगता येणार नाही.
17 Apr 2021 - 8:53 pm | llपुण्याचे पेशवेll
सदर लेख आणि लेखक यांच्या लेखांवरून असे वाटत आहे की आपल्या देशातील सर्वच राजे हे अट्टल झंडू आणि भुक्कड होते आणि ते सगळे ग्रीकांचे उष्टे खरकतेच पुढे चालवत राहिले आणि आपण त्याला अभिमामने मिरवत आहोत. असो, आर्य बाहेरून आले हा सिद्धांत जसा पुसला जातो आहे तसेच अश्या असावे नसावे वाल्या विद्वानांची मतेही काळाच्या ओघात पुसली जाऊन योग्य मत स्थापित होईल अशी आशा आहे.
17 Apr 2021 - 9:19 pm | प्रचेतस
आपल्या मताचा आदर आहेच, आपण नेमकी वस्तुस्थिती समोर आणल्यास निश्चित आवडेल. :)
22 Mar 2023 - 7:55 am | ज्ञानोबाचे पैजार
पुन्हा एकदा लेख आणि प्रतिक्रिया वाचताना मजा आली,
एक उत्तम लेख पुन्हा वर काढल्या बद्दल सं मं चे आभार आणि वल्लीदांचे सुद्धा
समस्त मिपा परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
पैजारबुवा,
22 Mar 2023 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रचू लेख पुन्हा वाचला छान. लिहिते राहा.
सर्वांना मराठी नव-वर्षाच्या शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
22 Mar 2023 - 11:19 am | टर्मीनेटर
सर्व मिपाकरांना गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा!
कसा कोण जाणे, पण हा छान लेख वाचनातून निसटला होता!!
22 Mar 2023 - 1:23 pm | अनिंद्य
आज पुन्हा वाचला लेख :-)
22 Mar 2023 - 3:57 pm | Bhakti
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
संवत्सर शोभन ,शके१९४५...
काय सुंदर लेख आहे.
संवत्सरचा विचार करत होते,तर हा मिपाचा लेख सापडला :)
https://www.misalpav.com/node/21106
एक एक थोर रत्न आहेत इथे :)_/\_
22 Mar 2023 - 4:27 pm | तुषार काळभोर
समयोचित आणि पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा लेख!
मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
23 Mar 2023 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
23 Mar 2023 - 2:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
23 Mar 2023 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
24 Mar 2023 - 6:41 am | प्रचेतस
लेख आवडल्याबद्दल सर्वांना अनेकानेक धन्यवाद.
24 Mar 2023 - 6:09 pm | राघव
खूप छान माहिती!
वल्लीशेठ, तुमचा व्यासंग खरंच मोठा आहे! _/\_
(अचंबित) राघव
10 Apr 2024 - 11:29 am | अहिरावण
सहमत आहे