नाईंटीन नाईन्टी - सचिन कुंडलकर

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
10 Mar 2021 - 7:15 pm

सध्या सचिन कुंडलकर यांचं नाईंटीन नाईन्टी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं. पुस्तक खूपच छान आहे. मीही त्याच काळातील असल्याने या पुस्तकाशी पटकन नातं जोडलं गेलं. यातल्या बऱ्याच गोष्टी एकदम माझ्या मनातल्या आहेत असच वाटलं. काही गोष्टी निःश्चित खटकल्या. पण सगळ्याच बाबतीतआपलं कुणाशी जमू शकत नाही, तसंच काहीस आहे हे. लेखकाने मांडलेल्या सगळ्याच मतांशी आपण पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. काही गोष्टी फार टोकाच्या वाटल्या तर काही एकदम मनमोकळ्या आणि जुळणाऱ्या वाटल्या. चित्रपट दिग्दर्शक असल्याने बरेचसे संदर्भ चित्रपटाच्या अनुषंगाने येतात. पुस्तकात दिलेल्या काही गोष्टी इतक्या सध्या सरळ आहेत कि आपल्याला पण तेव्हा असेच वाटले होते हे जाणवते. फक्त ते शब्दात मांडता आले नव्हते. किंवा काही बाबतीत सांगायचे धैर्य झाले नव्हते. हेच माझे मत होते किंवा आहे हे जाणवते. बरेच वेळा संदर्भ देताना चित्रपटांचा आधार घेतला जातो. आणि त्यात वावगं पण काही वाटत नाही. हे तर आपल्याला पण माहित आहे कि असच होत. "आम्ही मोठे होताना, साठीच्या आणि सत्तरीच्या दशकाने घडवलेली पण त्या दशकांमधून कधी बाहेर येऊ न शकलेली अनेक माणसे महाराष्ट्रात भेटत राहिली. त्यांना 'दिग्गज' असे म्हणतात, असे आम्हाला लहानपणी कळले. त्यामुळे महाराष्ट्रात इतर कुठेही असतात त्यापेक्षा खूप दिग्गज आहेत असे लक्षात आले." हे खरंच असं झालय हे मान्य करावं लागत. एकदा चित्रपट उत्तम झाला कि तो दिग्गज. पुढे काही करायची गरज नाही. असं नसतं ना. त्या माणसाने तयार केलेली कलाकृती उत्तमच होती. पण त्याने आणखीही चांगल्या कलाकृती देणं आवश्यक आहे. त्याच दर्जाच्या उत्तम नसल्या तरी चांगल्या कलाकृती असा माणूस देऊच शकतो. त्याच्याकडे ती दृष्टी असते. १९९० मध्ये काय घडले तर "अचानक आमच्या शुद्ध मराठी बोलणाऱ्या सदाशिव पेठी शाळेत 'आनी पानी' करणाऱ्या शिक्षकांचे आगमन होणे " हि गोष्टी इतकी प्रचंड मनाला भावते कारण हीच परिस्थिती आमच्याही शाळेत होती. याआधी कोणतेही शिक्षक असे नव्हते. त्यामुळे आम्हा मुलांना ते खटकणे स्वाभाविक होते. "असल्या शिक्षकांचा त्या काळात वाटणारा धक्का पचवून त्या शिक्षकांची चेष्टा करून त्यांना रडवण्याचा घाणेरडा पुणेरी उद्दामपणा करणे हा आमचा दिनक्रम बनला " हे वाक्य म्हणजे तर माझ्याच वर्गाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. शक्यतो असे नवीन शिक्षक आमच्या वर्गांवर पाठवत नसत. पण नाईलाजाने का होईना पाठवलाच एखाद्याला तर पोर शिक्षकांची टेर उडवायचे. चुकीचं असेल तरी दुर्दैवाने ते खरं होत. शिक्षकाचा वर्गावर धाक हवा आणि मुलांमध्ये त्याच्याप्रती आदरही हवा. दुर्दैवाने नवीन शिक्षक यात खूपच कमी पडायचे. त्यामुळं वर्गामध्ये हुल्लडबाजीला ऊत यायचा. याच तर्हेने आपण अजून अनेक बाबींशी जोडले जातो. अगदी आरसा धरावा नि आपल्याच अनुभवांचं प्रतिबिंब त्यात पडाव असं काहीस वाटून जात.

लेखक विजय तेंडुलकरांच्या खूप जवळ असतो त्यामुळे पुस्तकात जागोजागी त्यांचे उल्लेख येतात. त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी, त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, त्यांचे अनुभव, त्यांच्या आजूबाजूची माणसं, अनेक वेळा अनेक प्रसंगात लेखकाला झालेली त्यांची आठवण अशा अनेक तर्हेने तेंडुलकर अधेमधे डोकावत राहतात. परिपूर्ण कुणीच नसतो. त्याप्रमाणे लेखक इतरांचे दोष दाखवतो तसेच त्यांच्याकडून घेण्यासारखे गुणही सांगतो. जसे महेश एलकुंचवार याना भेटायला लेखाला लेखकाला आवडता नाही असे म्हणतो कारण ते प्रचंड खाजगी आणि टोकदार आहेत पण प्रामाणिक, खरे आणि शिस्तिचे सुंदर लिखाण कसे करायचे याचा वस्तुपाठ ते देतात हेही लेखक आवर्जून नमूद करतो. जसे तेंडुलकर तसेच सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचेही संदर्भ पुस्तकात बऱ्याच ठिकाणी येतात. लेखकाची सिनेमा क्षेत्रातील कारकीर्द यांच्या बरोबरच सुरु झाल्याने त्यांचा लेखकाच्या आयुष्यावर चान्गला ठसा उमटलेला आहे.

पुढच्या दोन प्रकरणात लेखक आपल्याला इस्तंबूल आणि पॅरिस मध्ये नेऊन आणतो. अर्थात हे प्रवास वर्णन नाही. तर तिथे गेल्यावर आलेले अनुभव लेखकाने लिहिले आहेत. पॅरिस मध्ये स्कॉलरशिप दळून मिळून गेल्याने २/३ महिने मुक्काम असतो आणि या वेळात त्याचे इतर मित्र मैत्रिणींशी आलेले संबंध, त्यातून त्याला वाटणाऱ्या भावना, त्यांचे मोकळे राहणीमान, त्याविषयीचे आकर्षण, इस्तंबूल मध्ये निवांत फिरत घालवलेली सुट्टी, त्यावेळी इतर कोणतेही विचार न करता मनात येईल ते लिहीत राहणे हे सगळं लेखक मनापासून एन्जॉय करतो आणि तसं मोकळेपणाने मांडून ठेवतो.

मला आवडलेला त्यातले प्रकरण म्हणजे एकट्या माणसाचे स्वयंपाकघर आणि एकट्या माणसाला घर हवे. मला स्वतःला एकटेपणा आवडतो. मी घोळक्यामध्येही रमते तशीच एकटेपणी पण रमते. वेळ कसा घालवावा असा प्रश्न मला कधीच पडत नाही. अगदी शॉपिंगला जायचं, प्रवास करायचा मला एकटीने जमतो. आणि आवडतो देखील. मुंबईला राहून एकट्याने अशा बऱ्याच गोष्टी करायला येऊ लागल्या. हॉटेलमध्ये जाऊन एकटीने खाणे, खरेदीला एकटीने जाणे अशा गोष्टी सहज जमायला आणि आवडायला लागल्या. लेखकदेखील या एकटेपणाची समर्थन करतो. तो एकटाच राहतो, पण म्हणून त्याला समाज कुटुंब म्हणून समजत नाही. कुटुंब म्हणजे आई, वडील, बायको, मुलं अश्या सगळ्या माणसांमुळे कुटुंब तयार होते हि समाजाची मानसिकता. त्यामुळे एकटा माणूस हा एकटाच असतो.
पण लेखक मात्र एकटा असला तरी बॅचलरवाला एकटा नाही. त्याच घर येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांचं आहे. घरात स्वयंपाकघर आहे जिथे स्वतः लेखक बराच काही करत असतो. जेवण बनवणे त्याला आवडते, त्यात विविध प्रयोग करणे, आलेल्या माणसांना जेवण करून खायला घालणेदेखील त्याला आवडते. शिवाय नीटनेटके घर असणे त्याला चांगल्या मनाचे लक्षण वाटते नि म्हणूनच त्याचे घर देखील तसेच आहे. टीव्ही वर दाखवण्यात येणारे रेसिपी शोज मध्ये आणि प्रत्यक्ष जेवण बनवण्यात काय तफावत आहे यात लेखक छान भाष्य करतो.

पुस्तकांचे वेड नावाच्या प्रकरणात लेखक पुस्तकांविषयी भरभरून बोलतो. त्याला वाचनाची आवड कशी लागली, कोणी लावली, पुस्तकाकडे, लेखकाकडे बघण्याचा दृष्टिकोन इत्यादी विस्ताराने सांगतो .या गोष्टी देखील आला मिळत्याजुळत्या वाटल्या. माझी पुस्तक कुणाला देताना मी फारच निवडक असते. कुणाला द्यायची, कुणाला नाही यावर माझी ठाम मत असतात. दिलेलं पुस्तक कोणी परत करतय कि नाही?,कस वापरताय? त्याच्या घरात कशी ठेवलेली आहेत पुस्तकं?, इत्यादी गोष्टी मी मनात नोंदवत असते नि त्यावरच माझी पुस्तक मी देते. तशीच दुसऱ्याची पुस्तक आणली तर ती नीट वापरली जावीत, त्यावर कसलेही डाग पडू नयेत, माझ्या हातून त्यांचं कोणताही नुकसान होऊ नये याची मी खबरदारी घेते. हे पुस्तक देखील मी उधार मागून आणलाय. :)

असाच कुणाला 'नाही ' म्हणणं किती महत्वाचं आहे यावर देखील एक प्रकरण आहे. आपल्याला शक्य नसेल तर, आवडत नसेल तर मनाविरुद्ध काही करायचं नाही. समोरच्याने कितीही गळ घातली तरी ठामपणे नाही म्हणायला शिकावं. हे देखील अगदी माझ्या मनातलं असल्यासारखं वाटतं. मी कधीतरी पडते फशी. नाही चटकन नाही म्हणता येत. पण काही गोष्टीत ठाम असते. तिथे कोणतीही तडजोड नाही.

हे आणि असे कितीतरी टॉपिक अगदी जवळचे वाटतात. तर काही गोष्टी मात्र खटकतात. जसे कि साने गुरुजींचं श्यामची आई लेखकाला अजिबात आवडत नाही. ते फारच बाळबोध वाटत लेखकाला. पण लहान मुलांसाठी ते खरोखरच चांगल पुस्तक आहे. छोट्या छोट्या सोप्या गोष्टी मुलांना कळतात. आताच्या काळाशी विसंगत जरी वाटल्या तरी त्या समजणं महत्वाचं आहे असं मला वाटत. तसाच लेखकाचा आत्महत्या करण्याचा प्रयन्त. हा देखील चीड आणणारा वाटतो. एकटं राहणं आवडतं इथपर्यंत ठीक आहे, पण माणसाला मन मोकळं करायला जवळची माणसं असू नयेत, जिवाभावाचे मित्र मैत्रिणी असू नयेत याची खंत वाटते. मग एकटेपणाचा गर्व कशासाठी? हे आणि असे काही मुद्दे येतात जिथे लेखकाचं नि माझं मत अगदीच एकदम टोकाला आहे. "पूर्वीच पुणं राहील नाही "हे जाणवून एखाद्या चित्रपटासाठी तो तसा आभास निर्माण करतो देखील पण त्याचवेळी त्या सदाशिव पेठी जगण्याला टोकाची नाव ठेवतो. असं का व्हावं? जी गोष्ट आवडत नाही ती तशीच राहावी असं का बरं वाटत ?कारण मग त्याला नाव ठेवायला जागाच राहणार नाही. असं कस चालेल?

पुस्तक छान आहे. वाचायला आवडलं. कधीही कुठलंही प्रकरण काढून वाचता येत. क्रमानेच वाचायला हवं असं काही नाही. पुस्तकातले फोटो रंगीत असते तर पाहायला,वाचायला आणखी मजा आली असती. आपल्याला जुन्या काळात पुस्तक घेऊन जात म्हणून पुस्तकाशी आपलं नातं जुळत. एकूणच एक मस्त अनुभव पुस्तक देत म्हणून नक्की वाचायला हवं.

--- धनश्रीनिवास

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

10 Mar 2021 - 7:34 pm | उपयोजक

आवडली. वाचले पाहिजे.

मुक्त विहारि's picture

10 Mar 2021 - 7:42 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

तुषार काळभोर's picture

11 Mar 2021 - 6:56 am | तुषार काळभोर

सचिन कुंडलकरांची लेखमाला दोन तीन वर्षांपूर्वी लोकसत्ता की अक्षरनामा मध्ये वाचली होती. तुम्ही उल्लेख केलेल्या काही गोष्टी त्यात होत्या. पॅरिस मधील वास्तव्य, लहानपणीच्या पेठेतील आठवणी, इत्यादी
बहुधा त्याच लेखमालेचे संकलन आणि काही जास्त लेखन करून हे पुस्तक लिहिले असावे.
आणि त्यांची काही मते टोकदार आणि वादग्रस्त असू शकतात. उदाहरणार्थ पेठेतील आयुष्यावर टीका, श्यामची आई (या त्यांच्या मताशी मी सहमत आहे), २०१८ मध्ये विजय चव्हाण यांचं निधन झाल्यावर त्यांची वादग्रस्त पोस्ट आणि त्याला आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी यांनी दिलेली उत्तरे.

तुम्ही छान रीतीने पुस्तकाची ओळख करून दिलात.

सिरुसेरि's picture

18 Mar 2021 - 1:08 pm | सिरुसेरि

छान ओळख . सचिन कुंडलकर यांचे गंध , रेस्टोरंट , हॅपी जर्नी , राजवाडे अ‍ॅन्ड सन्स , गुलाबजाम हे चित्रपट लक्षात राहिले आहेत . त्यांच्या अनेक चित्रपटांतुन पुण्यामधील विविध ठिकाणे पाहायला मिळतात .

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Mar 2021 - 6:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

सचिन कुंडलकर हुशार दिग्दर्शक आहेत हे नक्की. त्यांचे चित्रपट बघताना मनात काहितरी ढवळुन वर येते. किम्बहुना ते बघतानाच सचिनचा चित्रपट असल्याचे समजते. निरोप नावाचा असाच एक आवडता चित्रपट

चौथा कोनाडा's picture

21 Mar 2021 - 1:31 pm | चौथा कोनाडा

सुंदर पुस्तक ओळख करून दिली आहे !
+१
यातले काही भाग लोकसत्तामध्ये वाचल्याचे आठवते. त्यावेळी मी उत्सुकतेने हे भाग वाचत असे.
त्यांची बरीच मते पटायची. या धाग्यामुळे आता हे पुस्तक वाचायची इच्छा झालीय !

मालविका's picture

26 Apr 2021 - 12:24 pm | मालविका

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद !