नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

१ अप ४ डाऊन

Primary tabs

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
22 Feb 2021 - 9:50 pm

२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता. मी आणि श्रीनिवास ने २००,३०० BRM टॅनडेम सायकल केल्या होत्या. याही वेळी तोच विचार होता. पण अगदी २ दिवस आधी प्रॅक्टिस करताना जाणवला कि आपण सायकलला प्रमाणाबाहेर त्रास देतोय. म्हणून निघायच्या आदल्या दिवशी निर्णय बदलून एकेकट्याने आपल्या आपल्या सायकलवर स्पर्धेला उतरण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादला श्री चे(आणि आता आमचेही ) मित्र असल्याने राहण्याचा मोठा प्रश्न सुटला. डॉ बर्दापूरकर स्वतः घरात नसला तरी त्याने त्याच घर उघडून देऊन सगळी व्यवस्था बघितली. केदार आणि श्रेयस आमच्या दिमतीला असल्यासारखेच आसपास होते .१८ ला सकाळी निघालो तोच पावसाने हजेरी लावली. धुवांधार पावसाने आम्हाला झोडपून काढलं. सातारा सोडून नगरच्या दिशेने गेलो आणि पाऊस गायब. आधी आलेलं थोडं टेन्शन गेलं कि चला इकडे तरी वातावरण चांगलं आहे .पण संध्याकाळी औरंगाबादला देखील ढगाळ वातावरण झालं आणि रात्री पाऊस पडला.हवा चांगलीच थंड झाली. उद्या रात्री काय हालत होईल यावर चर्चा व्हायला लागली.
मस्तपैकी जेवून उद्या चांगलं हवामान असू दे अशी आशा करत झोपलो. सकाळी उठून सगळे तयार झालो. पावसाचा हलका शिडकावा चालूच होता. स्पर्धा सुरु होण्याचं ठिकाण घरापासून २/३ किमी लांब होत. श्रेयस सकाळी घरी हजर झाला. आम्हाला रस्ता दाखवत नियोजित ठिकाणी घेऊन गेला. फॉर्मलिटीज पूर्ण होऊन ६ वाजून १० मिनिटांनी स्पर्धा सुरु झाली. सुरवातीला नेहमीप्रमाणे पुढे पाठी करत सगळे एकत्र होते. साधारण १० किमी नंतर एकेकाने स्पीड पकडला आणि सायकली हाकायला सुरवात झाली. पण आज निसर्ग आमच्यावर अजिबात प्रसन्न नव्हता. प्रचंड वारं सुरु झालं. समोरुन येणाऱ्या अश्या वाऱ्याने साहजिकच स्पीड कमी झाला. थोडा वेळ काही वाटलं नाही. कारण इथेदेखील समुद्रकिनारी असे हेडविंड्स असतात. पण जवळपास ५० किमी झाले तरी वारा काही कमी होईना. आम्ही आपले सायकली रेटतोय पण साध्या सरळ रस्त्याला पण स्पीड येईना. एरवी आमच्या कोकणातल्या चढ उतारांवर देखील साधारण २० च्या ऍव्हरेज जाणाऱ्या माझा स्पीड १३ च्या खाली आला. पेडल मारून दमायला व्हायला लागलं पण अंतर पारच होईना. मी नि श्रीनिवास,रोशन अन तेजानंद असे आम्ही जोडीने चाललो होतो. स्वप्नील केव्हाच सगळ्यांच्या पुढे गेला होता. मध्येच साधारण ३५ किमी ला तेजानंदची सायकल पंक्चर झाली. श्रीनिवास त्याच्या मदतीला थांबला मी नि रोशन पुढे निघालो. पहिला चेक पॉईंट १०० किमी ला होता. रस्ता इतका साधा सरळ दिसत होता कि १०० किमी ५ तासाच्या आत करू शकलो असतो. पण वाऱ्याने वाट लावली. कसे बसे करत १०० च्या चेक पॉईंटला पोहोचलो. मला वाटलं आम्हीच शेवटी पण बघितलं तर अनेक जण अगदी थोड्याच वेळ आधी पोचले होते. आणि आमच्या नंतरही काही जण आले. आपण शेवट नाही हे जाणवून बरं वाटलं. श्रेयस तिथे मदतीला होताच. तिथून पुढे निघालो. इथे पोहोचायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याने पुढचे अंतर आणखी कमी वेळात कापणे आवश्यक होते. पण दुर्दैवाने वारा जराही कमी झाला नव्हता.अजूनही सायकल रेटायला जोर लावावा लागत होता. पुढचा चेक पॉईंट २०० किमीला होता. आणि ७.३० हि शेवटची वेळ होती. आम्ही १२. ३० ला निघून जोशात निघालो तर होतो पण काही केल्या स्पीड येत नव्हता. एरो पोझिशन घेऊन स्प्रिंट मारावे तरीही शक्य होत नव्हतं. परत साधारण ७५/८० किमी च्या दरम्यान तेजानंदच्या सायकलचा दुसरा टायर पंक्चर झाला. आता अंधार पडत चालला होता. अनोळखी शहरात एकटीने जायची रिस्क घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे यावेळी श्रीनिवास त्याच्याबरोबर थांबला नाही. तेजानंदने रोशनला देखील पुढे पाठवले. कारण उशीर झाला तर त्याची वेळ चुकेल. त्यामुळे तेजानंद एकटाच थांबला आणि आम्ही पुढे निघालो . ७. १५ ला श्रेयसचा फोन आला कि घाई करा,चेक पॉईंट बंद व्हायला फक्त १५ मिनिट बाकी आहेत. आम्ही भराभर पेडल मारायला सुरवात केली. कसेबसे ७. ३५ ला चेक पॉईंटला पोहोचलो. त्यांनी थोडा वेळ वाढवून दिला पण या अटीवर कि पुढच्या चेक पॉईंट वेळेत पोहोचायला हवा. आम्ही तिघे पोहोचलो पण तेजानंद अजून पाठी होता. सुदैवाने तोही ५ मिनिटात पोहोचला. त्यालाही सेम अटीवर चेक पॉईंटचा शिक्का मिळाला. या वाऱ्यामुळे जोर लावण्याच्या नादात माझा डावा गुढघा दुखायला लागला होता. पेन किलर घेऊन इथवर तर आले होते पण अजून ४०० किमी जायचं बाकी होते. मला टेन्शन आलं. अशी पेन किलर खात मी किती अंतर जाऊ शकेन आणि तेही वेळेच्या आधी. मला खूपच कठीण वाटलं ते. त्यात रात्र झालेली. आदल्या रात्री पाऊस पडून गेल्याने हवा प्रचंड थंड झालेली, आधी नुसता असलेला वारा आता गार होऊन बोचत होता. अश्या परिस्थितीत २०० किमी अंतर गाठून चेक पॉईंटला पोहोचणं अवघड होत. वाटेत कुठं थांबायचं तर अनोळखी प्रदेश, बऱ्यापैकी हॉटेल सुद्धा नाही रस्त्याला, ८.३० वाजून गेलेले. मी आणि श्रीनिवासने स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मला खूप दुःख झालं. पण श्रीनिवासने धीर दिला कि वाटेत कुठेतरी थांबण्यापेक्षा आणि पायावर जोर देऊन रेटत जाण्यापेक्षा इथेच थांबू . गाव आहे निदान राहण्याची सोय होईल. तेजानंद आणि रोशनने पुढे जायचं ठरवलं.

त्यांना गरजेच्या वस्तू देऊन सगळे गेल्यावर आम्ही येरमाळा गावात एस टी स्टॅन्ड वर गेलो. एक बस आली पण तिच्या वर कॅरिअर नसल्याने सायकल नेणं शक्य नव्हतं. तो पर्याय संपला. बाबाना औरंगाबादहून गाडी बोलावू घेणं सुद्धा चुकीचा पर्याय होता. आम्ही तिथल्याच एक बऱ्याश्या दिसणाऱ्या लॉज मध्ये चौकशी केली. एक रात्र तिथंच काढू नि सकाळी मग हात दाखवून ट्रकने वगैरे जाऊ औरंगाबादला असं ठरवलं. एका लॉज मध्ये रात्र घालवून सकाळी ६.30 च्या दरम्यान बाहेर पडलो. हाय वे लागल्यावर दिसेल त्या कंटेनरला, ट्रकला, पिक अपला हात दाखवत होतो. कोणीही थांबायला तयार नव्हतं. थोड्या पुढे जाऊ करत २० किमी आलो. पेट्रोल पंप वर पण थांबलेल्या ट्रक ना विचारलं कोणीच आम्हाला न्यायला तयार होईना, रस्त्यावरचे ट्रक थांबायला तयार होईना. काय करायचं? मध्ये कुठेतरी टोल आहे माहित होत पण किती किमी वर ते आठवत नव्हतं. एके ठिकाणी नाश्ता करायला थांबलो. जवळच बस स्टॉप होता पण २/३ बस पैकी एकही औरंगाबादला जाणारी नव्हती. परत सायकल चालवायला लागलो.

मध्येच तेजानंदशी बोलणं झालं. साधारण ३९० किमी झाले आणि त्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला धक्काच होता. फक्त १० किमी वर चेक पॉईंट असताना हा का सोड्तोय असं वाटलं. पण चेक पॉईंटची वेळ संपत आली होती, शिवाय अजून पुढे २०० किमी उन्हातून करायचे होते. झोप न घेता ते शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला. स्वप्नील आधीपासूनच सर्वांच्या पुढे होता, तो ७ वाजताच पुढच्या २०० किमी साठी निघाला होता. रोशनने ४०० किमी केले पण चेक पॉईंट वर उशिरा पोहोचला. त्यामुळे तोही स्पर्धेतून बाहेर पडला. आम्हाला फारच वाईट वाटलं.

इकडे आम्ही सायकल चालवत होतो. शेवटी ३८ किमी सायकल चालवून झाल्यावर टोल नाका आला. परत ३/४ ट्रक ना विचारलं पण नाहीच उत्तर शेवटी कंटाळून बाबाना फोन केला कि या गाडी घेऊन. तेव्हढयात एक ट्रक थांबला. औरंगाबाद पर्यंत न्यायला तयार झाला. सायकली पाठी हौद्यात टाकून आम्ही ड्राइवर शेजारी बसलो. माझा पहिलाच ट्रक प्रवास. मज्जा वाटत होती. यादव नावाचा ड्राइवर होता. श्रीनिवास त्याच्याशी गप्पा मारायला लागला. मूळचा राजस्थानचा असलेला हा माणूस बंगलोरहुन दिल्लीला चालला होता.रोज जवळपास ४०० ते ५०० किमी अंतर कापीत होता. आम्ही मनात विचार केला, आम्ही एका दिवसात चिपळूण औरंगाबाद ४८० किमी अंतर पार केलं तर कंटाळलो होतो. त्यांचं तर हे रोजच रुटीन होत. मानलं बाबा त्यांना. मिळेल त्या धाब्यावर खायचं, वाटेल तेव्हा विश्रांती घ्यायची नि पुढे चालू पडायचं. यादव साहेब होते एकदम भारी. राजकारण तर भारीच. मोदी किती भारी नि बाकी लोक कसे वाईट याच्यावर भरभरून बोलत होता. जवळपास प्रत्येक ५व्या वाक्याला भकाराने सुरु होणारी शिवी हासडत होता. पण ते इतकं नैसर्गिक होत कि थोड्या वेळाने मला काहीच वाटेनासं झालं. पु लं च्या रावसाहेबांच्या तोंडून जश्या शिव्या बोलण्यात आलेल्या कळत नसत तसाच काहीसा प्रकार याचाही होता. ट्रक मध्ये बसल्यावर एकदम उंचावर बसल्याचं फीलिंग आलं. आजूबाजूच्या गाड्या अगदीच लहान वाटायला लागल्या. औरंगाबाद २० किमी वर असताना तो जेवायला थांबला. आम्ही पण तिथेच उतरलो. पैसे किती विचारल्यावर "जो चाहे वो दे दो" म्हणाला. आम्ही पैसे दिलेच वर त्यांचे हॉटेलचे बिल देखील भरले. बाबाना फोन करून बोलावून घेतलं. तोवर परत एकदा सायकल हाकीत निघालो. साधारण ८ किमी गेल्यावर बाबाना बोलावून घेतलं. सायकल गाडीत टाकून एकदाचे ३ वाजायच्या दरम्यान घरी पोहोचलो. तोवर रोशन आणि तेजानंद रात्रभराच्या जागरणाने गाढ झोपलेले. आता फक्त एकटा स्वप्नील तेव्हढा बाकी होता. पण सुरवातीपासूनच स्ट्रॉंग रायडर असलेला स्वप्नील हि स्पर्धा नक्की पूर्ण करणार या बद्दल काहीच शंका नव्हती. आम्ही देखील आवरून घेतलं, जेवलो आणि स्वप्नीलच्या स्वागतासाठी सज्ज झालो.

स्पर्धा संपण्याच्या ठिकाणी सगळे गेलो. अर्ध्या तासात स्वप्नील आलाच. टाळ्यांनी त्याच स्वागत केलं. फोटो काढून झाले. घरी येऊन पिझ्झा खाल्ला. केदार हि सहकुटूंब आलेला होता. भरपूर गप्पा झाल्या. स्वप्नीलने त्याचा अनुभव शेअर केला.तो सतत श्रेयसच्या संपर्कात होता. श्रेयस औरंगाबादवाला असल्याने तो स्वप्नीलला नीट सांगत होता. किती वेळ लागेल, साधारण रस्ता कसा आहे, कुठे थांबू शकतोस, किती ब्रेक घेऊ शकतोस आणि स्वप्नील पण त्याचे सल्ले मानत गेला. स्वप्नील साठी हि स्पर्धा महत्वाची होती. यामुळे त्याच SR होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

साधारणपणे अशा स्पर्धांना आयोजक फिनिशरचा बोर्ड करून घेतात आणि स्पर्धा पूर्ण झाल्यावर तो बोर्ड घेऊन स्पर्धा पूर्ण करणारे फोटो काढतात. दुर्दैवाने या क्लबने असं काहीच केलं नव्हतं.हा अनुभव नवीन होता. त्याशिवाय स्पर्धेत ३ महिलांनी भाग घेतलेला माहितअसूनदेखील चेक पॉईंट असलेल्या ठिकाणी स्वच्छतागृह असावं अशी देखील काळजी घेतलेली नव्हती. रात्रीच्या वेळी २०० किमी झाल्यावर अधे मध्ये कुठेही चेक पॉईंट नव्हता. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आवश्यक होते. तसेच या रस्त्याला खूप कमी चांगल्या दर्जाची हॉटेल्स होती. त्यात ११ नंतर तर हॉटेल्स बंद झाली. साधी पाण्याची बाटली मिळणं कठीण झालं. सेल्फ सपोर्टेड राईड असली तरी निदान ज्या रस्त्याला खाण्या पिण्याच्या वस्तू मिळतील असा रूट तरी बघावा असं मला वाटलं. तेव्हा या काही गोष्टी मला तरी पटल्या नाहीत.

आम्ही ५ जण या स्पर्धेत उतरलो. पण ४ जण स्पर्धेतून बाहेर पडलो तर १ जण स्पर्धा पूर्ण करून यशस्वी झाला.आम्हाला आमच्या चुका कळल्या. निसर्गाने आमहाला साथ दिली नाही हे जरी खरं असलं तरी आमचे प्रयत्नहि कमी पडले होते. कारण त्याच वातावरणात स्वप्नीलने स्पर्धा पूर्ण केली होती. ४० तासात ६००किमी अंतर पूर्ण करायचं असत. इथे अंतर ६१५ किमी होत जे स्वप्नील ने ते ३६ तास ५४ मिनटात पूर्ण केलं. आम्हाला सर्वाना आनंद झाला. आम्हीही यातून बरंच काही शिकलो.श्रीहास, केदार, श्रेयस यांनी खूप मदत केली. या औरंगाबादकर मित्रांचे मनःपूर्वक आभार.

एकूणच हा एक वेगळा अनुभव होता. माझ्यासाठी मी जवळपास अगदीच नवख्या प्रदेशात गेले होते. प्रवास जाताना येताना दोन्ही वेळा मस्त झाला. नवीन ओळखी झाल्या. काही वेगळेच अनुभव आले. अशा मोठ्या इव्हेंट्समध्ये देखील लोक चीटिंग करतात हे कळून, क्वचित दिसून देखील आलं. आणि आश्चर्य देखील वाटलं. एकूणच हा अनुभव खूप काही शिकवून गेला.

--धनश्रीनिवास

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

22 Feb 2021 - 10:15 pm | सौंदाळा

छान लिखाण.
पुढील BRM साठी शुभेच्छा

विंजिनेर's picture

22 Feb 2021 - 10:50 pm | विंजिनेर

डीएनफ (डिड नॉट फिनिश)चा प्रा़ंजळ आढावा आवडला.

तुषार काळभोर's picture

23 Feb 2021 - 6:55 am | तुषार काळभोर

एवढं अंतर सायकल सलग चालवणं.
प्रचंड कौतुक सगळ्यांचं.

अवांतर : देव आम्हाला २-३-४-५-६ किमी सायकल चालवायची प्रेरणा देवो!

मित्रहो's picture

24 Feb 2021 - 6:30 pm | मित्रहो

६०० किमी पुढे नक्की पूर्ण कराल.
शुभेच्छा

चौथा कोनाडा's picture

25 Feb 2021 - 9:03 pm | चौथा कोनाडा

ज-ब-र-द-स्त !