आमचा Valentine Week - मोठी तिची साऊली

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
13 Feb 2021 - 11:48 pm

तीरगी की अपनी ज़िद है जुगनुओं की अपनी ज़िद |
ठोकरों की अपनी ज़िद है हौसलों की अपनी ज़िद ||

- प्रबुद्ध सौरभ

महान व्यक्तीला चांगल्या व्यक्तीपासून वेगळं करणारा हा एकमेव गुण - जि़द! एखादी गोष्ट मिळवण्यासाठीचा हट्टीपणा. यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करण्याचा चिवटपणा. यश मिळवण्यासाठी वाटेल ते आव्हान स्वीकारण्याचं धाडस. महान लोकांची एक जमात असते ती संकटांच्या नजरेला नजर भिडवून त्याच्याशी दोन हात करणार्‍यांची. पण काही लोकं तर त्याही पुढे जाऊन आव्हानांसमोर, संकटांसमोर धैर्यानी सोडा.... उर्मटपणानी, माजात उभी राहतात. आणि त्यामागे केवळ त्यांची बेफिकिरी नसते तर असतो त्यांचा प्रचंड आत्मविश्वास.

त्रिपुरासारख्या "मागास" राज्यातून आलेली - मग काय झालं?
मुलगी असून स्पोर्ट्समध्ये? - मग काय झालं?
जिमनॅस्टिक्सला भारतात कोणी विचारतं का? - मग काय झालं?
floor exercise चं मॅट असमान आहे - मग काय झालं?
uneven bars च्या मधलं अंतर standard ८० सेंमी नाहिये - मग काय झालं?
Vaulting table च्या जागी कोचच्या स्कूटरचं मागचं सीट वापरावं लागतंय - मग काय झालं?

आणि अंगावर काटा आणणारं म्हणजे

Produnova Vault ला - vault of death म्हणतात - जीवही जाऊ शकतो -------- मग काय झालं??

फेडररची नजाकत आणि विश्वनाथन आनंदची गहराई जर आमचा क्रश असेल तर आमचा हा क्रश म्हणजे मूर्तिमंत जिद्द, हट्टीपणा आणि धैर्य आहे. ४ फूट ११ इंच उंचीची मोठ्या सावलीची लहान बाहुली - दीपा दुलाल कर्माकर!
Dipa

अडचणींचा सामना करणं सोडा - त्यांना भीकच घालायची नाही हा काय दर्जाचा उर्मटपणा म्हणायचा? कुठल्या मुशीतून ही बाहुली घडली आहे हे तिचा कर्ताचं जाणे. वयाच्या १४व्या वर्षी "तुम्ही माझ्याकडून नीट प्रॅक्टिस करून घेत नाही" म्हणून आपल्या प्रशिक्षकानाच फैलावर धरणारी दीपा २००७ च्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण आणि २ रौप्य पदकं जिंकली. २०११ च्या सीनियर नॅशनल्समध्ये तब्बल ५ सुवर्णपदकं मिळवून निर्विवादपणे भारताची सर्वोत्तम जिमनॅस्ट ठरली.

२०१४ च्या कॉमनवेल्थ खेळांमध्ये ब्रॉन्झ जिंकणारी दीपा पहिली भारतीय महिला जिमनॅस्ट. एशियन गेम्सला चौथी आली आणि त्याच वर्षी हिरोशिमा एशियन चॅम्पियनशिप्समध्ये तिने पुन्हा ब्रॉन्झ जिंकलं. २०१५ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरलेली दीपा पाचवी आली.

२०१६ रियो ऑलिम्पिक्सच्या पात्रता फेरीत ती राखीव खेळाडू होती. २४ खेळाडू पात्र ठरलेले आणि दीपा २६ वी. पण मार्चमध्ये कळालं की एका रशियन आणि एका कोरियन जिमनॅस्टनी माघार घेतल्यामुळे तिला रियोसाठी टेस्ट देण्याची संधी होती. आता तर ही मूर्तिमंत जिद्द इरेलाच पेटली. २३ दिवस आगरतळाच्या गैरसोयींकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करत रात्रीचा दिवस करून तिने मेहनत घेतली आणि टेस्ट साठी रियोत दाखल झाली. तिथे ती केवळ क्वालिफाय झाली असं नाही तर २४ जिमनॅस्ट्समध्ये ७ वी आली.

७ ऑगस्ट २०१६ ला खुद्द ऑलिम्पिक्सच्या पहिल्या फेरीत ती ८ व्या क्रमांकावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. आणि १४ ऑगस्ट २०१६ रोजी रियो - दि - जानेरो मध्ये घडला तो इतिहास!

रियोमध्ये अजूनही भारताचं पदकांचं खातं उघडलं नव्हतं. आपले शूटर्स, बॉक्सर्स, कुस्तिगीर, बॅडमिंटनपटू - सगळ्यांनाच ते ऑलिम्पिक पदक हुलकावणी देत होतं. आपली मदार होती आपल्या मुलींवर - पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि ऑलिम्पिक्समध्ये खेळणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट दीपा कर्माकर. १४ ऑगस्टच्या रात्री पूर्ण भारत जागा होता - आणि कुठल्या क्रिकेटपटूसाठी नाही तर जिमनॅस्टिक्ससारख्या खेळात भारताचा तिरंगा फडकवणार्‍याअ दीपासाठी. "अभी नहीं तो कभी नहीं" म्हणत दीपाने जीवघेण्या Produnova Vault ला हात घातला. Produnova - दीपाच्या आधी मोजून ४ जिमनॅस्ट्सनी यशस्वी केलेला एक अत्यंत थरारक व्हॉल्ट. ६.४ चा difficulty score असलेला अत्यंत अवघड, धोकादायक आणि जोखमीचा प्रकार.

पूर्ण देश श्वास रोखून बघत होता.... देशाला जिमनॅस्टिक्समधल पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देण्यासाठी जीव धोक्यात घालून दीपाने व्हॉल्टिंग टेबलकडे धाव घेतली. अक्षरशः जिवावर उदार होऊन तिने Produnova यशस्वीपणे पूर्ण केला. थोडे गुण लेग स्विंगमध्ये गेले... थोडे डीप लॅन्डिंग झाल्यामुळे. तिचं ऑलिम्पिक पदक अवघ्या ०.१५ गुणांनी हुकलं! ज्यासाठी आजवर रक्त आटवलं होतं ते स्वप्न थोडक्यासाठी अपूर्ण राहिलं होतं. दीपा जवळपास पाऊण - एक तास धाय मोकलून रडली. आणि मग कोच बिस्वेस्वर नंदीना म्हणाली "मला भूक लागलीये - मॅक्डोनल्ड्समध्ये जाऊया?"

इथे अवघा भारत - आणि भारतच का... जिमनॅस्टिक्सचा अजिबात इतिहास नसताना भारतासारख्या सोयी-सुविधा, मार्गदर्शन आणि त्याहीपेक्षा जिमनॅस्टिक्सचं बिलकुल आकर्षण नसलेल्या देशातल्या एका उगवत्या तारकेकडे खूप आशेने डोळे लावून बसलेला जगातला प्रत्येक क्रीडारसिक हळहळला. तिचं पदक हे कित्येक देशांमधल्या कित्येक मुला-मुलींना अपार प्रेरणा देऊन गेलं असतं.

पण अपयशाला भीक घालेल तर ती दीपा कर्माकर कुठली? तिने ह्या अपयशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला जी ती कायमच अडचणींना आणि प्रतिकूल परिस्थितीला विचारत आली आहे - मग काय झालं? आणि भारतीय मुलीने ऑलिम्पिक्स जिमनॅस्टिक्समध्ये चौथं येणं हे अपयश थोडीच होतं? आज भारतातली कित्येक चिमुरडी मुलं-मुली एक दिवस दीपा कर्माकरसारखं व्हायचं स्वप्न बघायला लागली असतील हे यश कुठल्याही मेडलपेक्षा कितीतरी मोठं आहे.

दीपा आज २७ वर्षांची आहे. आंतरराष्ट्रीय जिमनॅस्टिक्समध्ये जिथे मुलींची जेमतेम ५-६ वर्षांची कारकीर्द वयाच्या १८-१९ व्या वर्षी संपते - तिथे २७ व्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिक्सच्या मेडल पोडियमवर नजर ठेऊन मेहनत करणं बाकी लोकांसाठी अद्भुत, असामान्य, अशक्य गोष्ट असेल - पण आमच्या ह्या क्रश साठी एक साधा सोपा प्रश्न आहे - मग काय झालं?

जे.पी.मॉर्गन

क्रीडासद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2021 - 12:02 am | श्रीगुरुजी

तिची अंतिम फेरी श्वास रोखून पाहिली होती. दुर्दैवाने ती चौथी आल्याने पदक हुकल्याचे खूप वाईट वाटले होते.

सौंदाळा's picture

14 Feb 2021 - 8:37 am | सौंदाळा

दिपाबद्दल इतकी तपशीलवार माहिती नव्हती.
लेख नेहमीप्रमाणे मस्तच.
पुढचा लेख कोणावर असेल याचा विचार आतापासूनच करतोय.

तुषार काळभोर's picture

14 Feb 2021 - 8:38 am | तुषार काळभोर

जिमनॅस्टिक मध्ये प्रवेशिका आहे, हेच धक्कादायक होतं.

टोक्यो ऑलिम्पिक साठी दीपाला शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

14 Feb 2021 - 9:04 am | मुक्त विहारि

व्यायामशाळा नाहीत ...

अशा राष्ट्रात, हिरे दुर्लक्षितच राहणार...

माझी चुलतबहिण, नॅशनल लेव्हलला, जिमनॅशियम होती.. तिला योग्य त्या सुखसोई तेंव्हा पण मिळाल्या नाहीत आणि आत्ता पण हेच आहे ...

बाबाला 2-4 कोटीचे मंदिर, पण उत्तम जिमनॅशियम नाही... ही डोंबिवली येथील वस्तुस्थिति आहे. जे जे डोंबिवली येथे, ते ते भारतात...

अमरावती येथील, हनुमान व्यायाम शाळा, हा अपवाद ...

चौथा कोनाडा's picture

14 Feb 2021 - 5:21 pm | चौथा कोनाडा

व्यायामशाळा नाहीत ... मंदिरे अपार ....

अगदी सहमत !

असं मत वाचलं, ऐकलं की हमखास देऊळ सिनेमा आठवतो.
रुग्णालयाच्या जागी दत्त मंदिर उभा राहतं अन दिखाऊ भरभराट होते.

Bhakti's picture

14 Feb 2021 - 1:35 pm | Bhakti

दिल ये जिद्दी है!
मस्त लिहिलंय!

सुखी's picture

14 Feb 2021 - 5:16 pm | सुखी

मस्त लिहिलंय

सुविधा नाहीत हे जरी खरे असले तरी जे आहे त्यातून काहीतरी एकमेकांच्या मदतीने करायची प्रवृत्ती पण नाहीये, आपल्या लोकांना मध्ये
हे सगळे जवळून पहिले आहे मी जिम्नॅस्टिक मध्येच

कपिलमुनी's picture

14 Feb 2021 - 10:19 pm | कपिलमुनी

असा प्रश्न नवीन भारतात कृपया विचारू नये.