बगूमामा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
8 Feb 2021 - 2:50 pm

बगूमामा खर तर आईचा मामा आणि माझे मामाआजोबा. पण अगदी लहान वयात त्यांना आजोबा म्हणणं जीवावर यायचं. मी आईसारखचं बगूमामा म्हणायचे. यथावकाश समज आल्यावर मी आमचं नातं समजून घेऊन त्यांना आजोबा म्हणायला लागले. परवा आजोबा गेल्याच कळलं आणि डोळे भरून आले. कितीतरी आठवणी उचंबळून आल्या.

आजोबांना कोकण भारी प्रिय. इकडे यायचं म्हणजे आजोबा केव्हाही तयार. अगदी कितीतरी वर्ष आजोबा २ व्हिलर घेऊन पार्ल्यातून चिपळूणला यायचे. शेवटी आता तुम्ही २ व्हिलर वरून एवढा प्रवास करायचा नाही अशी बंदी घातली तेव्हा ते थांबले. कुठलंही काम करायला घ्या आजोबा उत्साहाने तयार. माझी आजी तर त्यांची लाडकी. भावंडांमधली शेवटची २ भावंडं त्यामुळे एकमेकांवर अतोनात जीव. कोकणात येण्यासाठी आवडता ऋतू कोणता तर पावसाळा. पावसाळ्यात धबधबे कोसळायला लागले कि आजोबांची हमखास फेरी व्हायची. कोसळणाऱ्या धबधबाच्या थेट धारेखाली उभं राह्यला त्यांना आवडायचं. "घाबरताय काय ?या इकडे " असं म्हणून आमची भीती घालावयाचे. भिजून झाल्यावर मस्त भजी किंवा वडापाव वर ताव मारताना मजा यायची. मुंबईत राहूनही टिपिकल मुंबईकरासारखं न वागणं त्यांना सहज जमे. कोकणात यायचं तर तिकडच्यासारखं जगायचं आणि त्यांना ते मनापासून आवडे. अगदी अंगण सारवण्यापासून पाणी भरण्यापर्यंत कोणताही काम करायला तयार. माझ्या बाबांशी त्यांचं चांगलंच जमे. दोघांनाही पंप, त्याची दुरुस्ती इत्यादी सगळी काम आवडत त्यामुळे इकडे आले कि बाबांबरोबर कामाला तयार. "केळकर, तो पंप बंद पडलाय ना चला मग ","केळकर तुमच्यासाठी अमेरिकेहून येताना अमक्या प्रकारचा नवीन पाना घेऊन आलोय "हे नेहमीचे संवाद .

मी मुंबईला असताना ठाण्याला राहायचे. पण माझा ओढा मात्र पार्ल्याकडे असायचा. एक आतेच मुलांनी भरलेले घर आणि दुसरं म्हणजे आजोबांचं भरपूर अगत्य करणारं घर.आजोबांचं घर पार्ला कॉलेज आणि डहाणूकर कॉलेजच्या मध्ये होत. तिथे गेलं कि मस्त मुंबईत राहून माहेरपण अनुभवायची. आजोबा मुद्दाम जाऊन बिल्डिंगच्या आवारातल्या केळीची पान आणून पानग्या लावत. कालच्या उरलेल्या पोळ्यांचा लाडू करताना नुस्तं तूप गुळ नाही तर बरोबर वेलची , बेदाणे वगैरे घालून त्याला सुद्धा शाही चव आणायचे. आजीची आणि त्यांची लुटुपुटीची भांडण मजा आणायची. दोघंही जण बऱ्याच वेळा खिडकीत बसून रस्ता न्याहाळत बसायचे. मी दुरून येताना दिसले कि मला ऐकू जाईल एवढ्या आवाजात हाक मारायचे. बिल्डिंग खाली एक भैय्या याचा भेळपुरीवाला. क्वचित त्यांचा ओरडा खाऊन देखील मी नि आजीने त्याच्याकडची भेळ खाल्ली आहे.मी मुंबईत पेयिंग गेस्ट म्हणून राहायचे. त्यामुळे तिकडे गेले कि दोघंही भरपूर गप्पा मारायचे. आजोबा चहा करायचे. मला आईसारखी भाकरी कशी येत नाही म्हणून आश्चर्य बोलून दाखवायचे. त्या खिडकीत बसून वरून जाणारी विमानं बघणं खूप आवडायचं . अगदी पहिल्यांदा तर आजोबा गच्चीवर घेऊन गेले होते विमान दाखवायला, मी ७/८ वर्षाची असताना. मी परदेशात जाताना त्या सोसायटीतल्या आंब्याच्या ४ कैऱ्या तोडून बॅगेत भरून दिल्या न्यायला. पार्ल्यात ते सोमणकाका म्हणून प्रसिद्ध होते. कुठल्याही सोसायटीचा पंप बंद पडला कि सोमणकाकांना हाक मारायची. कि चालले सोमणकाका नवीन मिशन वर. मग अगदी काय असेल ते काम सगळं पूर्ण केल्याशिवाय घरी परतणार नाहीत.

आजोबाना २ गोष्टी प्रचन्ड आवडत. एक नाट्यसंगीत आणि दुसरी पत्ते. पार्ल्याला गेलं कि पत्त्यांचा अड्डा बसे. सुरवातीला ३०७(कि ३०५?) खेळायचो. मग गाडी कॅनिस्टा वर आली. हे दोन्ही डाव आजोबानी शिकवले आणि आम्ही मन लावून शिकलो. आम्हला देखील पत्ते खेळायला आधीपासून आवडत असत त्यात या नवीन डावांची भर पडली. मामीआजी,आजोबा , मी असें तेव्हा मी आणि शेजारच्या फडके आजी असा आमचा डाव बसायचा. आणि किती वेळ त्याला काही सीमा नसायची. समोरच्या भिडूकडून छोटीशी जरी चूक झाली तरी आजोबा खवळून उठायचे. कॅनिस्टा खेळताना मोजायला लागायचे. ५० ची एन्ट्री, १२० ची एन्ट्री. हे मोजताना चुकले कि आजोबा भडकायचे. "एवढे साधे मार्क मोजताना नाही येत. कुठल्या मास्तराने शिकवलंन तुला?" आमच्यामुळे मास्तरांचा उद्धार व्हायचा. दोन भिडू एकमेकांशी बोललेले त्यांना चालत नसे. एरवी आम्हा सगळ्यांना बगुमामा म्हणून परिचित असणारे आजोबा या डावात स्वतःच नाव उच्चारायचे. "चला वसंत गोविंद सोमण उतरले ",असं म्हणून पत्ते पसरावायचे. "ए पोरी नीट लक्ष ठेव , मी काय लावतोय बघ " अशी धमकी द्यायचे. समोरच्या टीम ने क्लोज केला डाव कि झालंच ,संपलंच . इथे त्यांना राग आवरता यायचा नाही.पण मजा मात्र खूप यायची.अगदी तास तास आम्ही घालावायचो. हे मार्क लिहायला सुद्धा आजोबांकडे एक डायरी होती. उगाच चिटोरे शोधात त्यावर मार्क लिहीण त्यांना मान्य नव्हतं. ते कोकणात यायचे तेव्हा त्यांच्या बॅग मध्ये ३/४तरी पत्त्यांचे कॅट असायचे. ते पत्ते देखील गुळगुळीत असे प्लस्टिकचे असायचे. बहुतेक दर अमेरिका वारीत ते नवीन खरेदी करत. माझ्या लेकाने तर त्यांना कॅनिस्टावाले पणजोबा असंच नाव दिलं.

मामीआजी,आजोबानी त्यांच्या तिन्ही मुलींना मस्त वाढवलं. बाईक चालवताना त्यांना बघताना मला एकदम सॉलिड वाटायचं. आणि मी पण अशीच बाईक चालवायला शिकणार असं स्वप्न तेव्हा मनाशी बाळगलं होत. सगळ्या जणी स्वतःच्या पायावर एकदम मस्त उभ्या आहेत. आपल्या आपल्या संसारात रमल्या आहेत. एक अमेरिकेला तर एक ऑस्ट्रेलियाला आहे . तिसरी पुण्याला त्याच्याजवळ होती .त्या नात्याने माझ्या मावश्या असल्या तरीही मी त्यांना ताईच म्हणते. आजी आजोबा तिन्ही ठिकाणी येऊन जाऊन असायचे. रिटायर झाले म्हणून कधी स्वस्थ बसलेले आजोबा बघितलेच नाहीत. मामीआजीवर खूप जीव होता. पार्ल्यातील बिल्डिंगच रेडेव्हलोपमेंट काम मामीआजी असताना पूर्ण झालं नाही त्यामुळे तिथे जायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती . "जिथे ती नाही तिथे मी जाणार नाही "अस एकदा स्पष्ट सांगितलं होत. पुण्याला असताना त्यांच्याकडे कामाला वैशाली यायची. तिच्यावर देखील पोरीसारखी माया करायचे. आजी गेल्यानंतर एकट्याच काम ते किती असणार? एका खोलीत राहायचे. पण वैशाली येऊन भांडीकुंडी, स्वयंपाक करून जायची. स्वतःच्यातला मऊभात तिच्यासाठी वाटीभर काढून ठेवायचे. ती एकटीला चहा करून घेणार नाही म्हणून स्वतःसाठी चहा करायला सांगायचे. मग आपसूक ती देखील घ्यायची. फोन मध्ये भरपूर नाट्यगीते भरून ठेवलेली होती. सकाळी जोरदार आवाजात चालू असायची.

उत्साहाचा खळाळता धबधबा होते माझे आजोबा. गेले वर्षभर अमेरिकेत होते. तिथून विडिओ कॉल करायचे. आता समोरच्या शेतात काय लावलायस विचारायचे. आम्ही छोट्याश्या तुकड्यात भातशेती करतोय याचच त्यांना किती कौतुक होत. माझ्या सासर्यांना "सांगा मला, आजपासून तंबाकू खाणार नाही " असं म्हणायला लावणारे ते एकटेच होते. अगदी फोनवरून पण चौकशी करायचे ,"तंबाखू खाणं सोडलं कि नाही ?" उत्तर त्यांना माहित होत पण तेही हट्टी होते. मागच्या वेळी आलेले तेव्हा कशावरून तरी म्हटलं "आजोबा , नका खाऊ त्रास होईल " यावर लगेच "झाली आता पंच्याहत्तरी. किती वर्ष अजून जगायचं ?बस झालं " म्हणाले होते. यावेळी मात्र त्यांची भेट झालीच नाही.अटॅक आल्याचं समजताच काळजी वाटली. पाहिलं जाणवलं ते म्हणजे 'मामा काय आता यावेळी कोकणात येत नाही '. पण दुसऱ्याच दिवशी मामा गेल्याची बातमीची आली आणि मन सुन्न झालं. मनात खूप आठवणींची गर्दी झाली आणि डोळे आपोआप पाझरायला लागले.

----धनश्रीनिवास

व्यक्तिचित्रप्रकटन

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2021 - 4:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

ते जिकडे असतिल तिथे आनंदात असतिल.
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 4:43 pm | मुक्त विहारि

वाईट वाटले

प्रदीप's picture

8 Feb 2021 - 4:51 pm | प्रदीप

आवडले.

सरिता बांदेकर's picture

8 Feb 2021 - 5:31 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे.

भावस्पर्शी लेख, व्यक्तीचित्र
तो खेळ ३०७, ३०५ नाही तर ३०४ आहे.
गुलाम ३०, नव्वी २० अशी सगळ्या पत्यांची बेरीज ३०४ होते. भन्नाट खेळ आहे. माझ्या आजीला पण खूप आवडायचा.

मुक्त विहारि's picture

8 Feb 2021 - 10:53 pm | मुक्त विहारि

कधी कधी, 304, तिघांत पण खेळलो आहे ... ब्रिज सारखा ...

रमेश आठवले's picture

9 Feb 2021 - 6:58 am | रमेश आठवले

खुप हृद्य आणि चटका लावणारा लेख. अभिनंदन.

चौथा कोनाडा's picture

9 Feb 2021 - 12:24 pm | चौथा कोनाडा

सुंदर व्यक्तीचित्र.
शेवटाला कातर व्हायला झालं !