AI आणि मी

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
14 Jan 2021 - 11:30 am

फेसबुक आपल्यावर लक्ष ठेवतंय, व्हॉट्स ऍप आता आपला डेटा स्टोअर करणार, मग आपल्या इंटरेस्टनुसार आपल्यावर जाहिरातींचा भडिमार होणार... हे सगळं ठीक आहे.

पण,
एखाद्या वेबसाईटवरून एखादा शर्ट घेतल्यावर परत परत तोच शर्ट समोर दिसावा ही आर्टीफिशियल इंटिलीजन्सची कोणती पातळी म्हणावी? कोण बसलंय तिथं प्रोजेक्टरच्या मागे? अरे वांग्या, बायकोसाठी एखादी साडी किंवा कुर्ता घेतल्यावर महिन्याभराने परत तीच साडी किंवा कुर्ता घेतला तर त्याचे परिणाम कळतात का तूला? त्या झुक्याला म्हणा, स्वतः च्या बायकोसोबत असं करून दाखव एकदा! मला सांगतोय..!

पुरुष मूर्ख असतात पण इतके नाहीत रे. काहीतरी व्हेरायटी दाखव लेका! निदान त्या फोटोतली बाई तरी बदल. एखाद्यावेळी त्याला भुलून परत तीच साडी घेऊ आम्ही. नाहीतर निदान नेत्रसुख तरी मिळेल.

बरं ते 'स्टॉप सीईंग धिस ऍड' केलं तर गूगल आपल्यालाच विचारतंय ऑलरेडी पर्चेस्ड का म्हणून!! रताळ्या, तूच बिल पाठवलंस ना मेलवर? गूगल पे वापरलं तर वीस रुपये कॅशबॅक हे गाजर पण तूच दाखवलं ना?

आणि हे म्हणे इंटेलिजंट!!

क्या इंटेलिजंट बनेगा रे तू ?

मला तर त्या ओला,उबेर अन झोमॅटोच्या जाहिराती सुद्धा कळत नाहीत. महिन्यातून जास्तीत जास्त एकदा मी ओलाकॅब वापरतो ही माहिती तर ओलाच्या त्या डेटाबेस का काय म्हणतात त्यात असेल ना! मग ट्वेन्टी परसेन्ट डिस्काउंटवाले मॅसेज दिवसातून चारवेळा मला पाठवण्यात काय हशील? ओला डिस्काउंट देतंय म्हणून कोणी गावभर भटकतं का? म्हणजे असे पण लोकं आहेत का जगात? असतील तर, कौन हैं ये लोग? कहा से आते है ये लोग?

एकदा पनीर टिक्का खाल्ल्यावर दुसऱ्यादिवशी परत पनीर कोण खातं? मग बेस्ट पनीर इन दी टाऊन वालं नोटिफिकेशन आज कश्यासाठी? आणि हे जर बेष्ट होतं तर काल का नाही खाऊ घातलंस रे झोमाट्या? की एकदा ह्या जोश्याच्या नरड्यात रबरासारखं पनीर कोंबल्याशिवाय हा काही सुधारणार नाही अशी काही सुपारी घेतलीये ह्यांनी?

रेड बस ह्या ऍपवरून समजा उद्याचं तिकीट बुक केलं तर बसमध्ये बसेपर्यंत दर एक तासाने रिमायन्डर येते. 'हॅव यु पॅक्ड युअर बॅग्स. डोन्ट फरगेट टू टेक वॉटर' असे मॅसेजेस येतात. अरे तुला काय करायचंय सोन्या? नसत्या चौकश्या! बरं समजा 'नो' असा रिप्लाय केला तर तू काय घरी येणार आहेस का कपड्यांच्या घड्या घालून द्यायला?

ही अजिबात अतिशयोक्ती नाहीये. याहून कहर म्हणजे 'चॅट विथ युअर को-पॅसेंजर' असे मॅसेजसुद्धा येतात. त्यात एक लिंक दिलेली असते. आयुष्यात कधीच न भेटलेल्या आणि परत कधीच भेटण्याची शक्यता नसलेल्या माणसाशी नेमक्या कोणत्या विषयावर बोलणं अपेक्षित आहे? "बाबा रे मी डब्ब्यात थालीपीठ घेतलंय. तू मेतकूट- भात घेऊन ये बरं का", हे बोलायचं का? मला एवढंच सुचू शकतं.बरं एखादी 'सुबक ठेंगणी' असती तर बोललोही असतो पण ती जमात आजकाल नामशेष झालीये.

असो. तर हे सगळं कस्टमरबेस मजबूत करण्यासाठी असतं असं कळलंय.

आता एखाद्या कस्टमरने ऑनलाइन मजबूत बत्ता मागवून स्वतः चा मोबाईल भुगा होईपर्यंत कुटला नाही म्हणजे मिळवलं!

समाप्त

©चिनार शशिकांत जोशी

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

14 Jan 2021 - 11:47 am | राजाभाउ

लै भारी. विनोद म्हणुन नव्हे तर असा अनुभव मी बर्‍याच वेळेला घेतला आहे. काय खाउन AI अल्गोरीदम लिहीतात कुणास ठाउक

गोरगावलेकर's picture

14 Jan 2021 - 12:07 pm | गोरगावलेकर
राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jan 2021 - 12:21 pm | राजेंद्र मेहेंदळे

खरच ह्या ए.आय. आणि काय काय प्रकारांनी आजकाल जगणे हराम होत चालले आहे. गुगलवर काही सर्च केले चेपुवर लगेच त्याच्याच जाहिराती दिसणार्,तुनळी बघताना तेच मधे मधे येणार, गुगल मॅपवर कहि शोधले की अजुन आपली जाहिरात की आपण कुठे चाल्लोय.

हे कमी की काय म्हणुन आमेझॉन प्राईम घेतले तर हे फ्री, नेटफ्लिक्स घेतले तर ते फ्री, एअरटेल मोबाईल बरोबर एअरटेल टि.व्ही. घेतला तर ही ऑफर, आय सी आय सी आय कार्ड्ने पेमेंट केले तर ५% कॅशबॅक आयला आता हे सगळे लक्षात ठेवायला एक सेक्रेटरीच नेमावा म्हणतोय. फक्त महिन्याच्या शेवटी खिशाला पडणारे भोक मोठे होत चलले आहे या सगळ्यापायी.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 12:22 pm | मुक्त विहारि

विचार करण्या लायक आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

14 Jan 2021 - 12:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

या पेक्षा आमचा पानवाला कितीतरी हुशार आहे, मी समोरुन (एकटा) येताना दिसलो की लगेच चुना आणि पुडी हातात तयार ठेवतो आणि ही बरोबर असेल तेव्हा मसाला पान ना साहेब? असे विचारतो.
पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

14 Jan 2021 - 12:56 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

चलत मुसाफिर's picture

14 Jan 2021 - 12:26 pm | चलत मुसाफिर

कृत्रिम बुद्धिमत्ता ही 'अनुभवावरून शिकणे' या तत्त्वावर बेतलेली असते. तिला जितकी अधिक माहिती पुरवाल तितकी ती अधिक तल्लख व नेमकी होत जाते. ही माहिती आपण आपल्या जालीय व संगणकीय वर्तनातून पुरवतो.

उदा. तुम्ही ओला-उबेरच्या जाहिरातींकडे दुर्लक्ष करत गेलात तर कृबु त्यातून धडा घेऊन तुम्हाला दाखवायच्या जाहिराती बदलेल.

मिसळपाव's picture

14 Jan 2021 - 12:54 pm | मिसळपाव

तू म्हणतोस त्याप्रमाणे बथ्थड असतो हा प्रकार. आमच्याकडे नुकताच कुत्र्याचं आगमन झालं. त्याचा पट्टा वगैरे घेतला पहिल्या दिवसात. आता त्याचाच भडीमार चालू! अरे मी काय गुरूवारी एक, पौर्णिमा असली तर एक पेश्शल असे दहा-बारा घेणारे का? आता मी कुत्रा आणलाय कळलं ना तुम्हाला? मग त्याच्या खाण्याच्या, "बाहेरगावी गेलात तर कुत्र्याला आमच्याकडे सोपवा" छाप काहीतरी दाखवा ना. मुळात ई-मेल वाचताना, एखाद्या वेब साईटवर बातम्या वाचताना जो जाहिरातींचा सुळसुळाट चालू असतो त्याला बळी पडून किती लोकं रँडमली खरेदी करतात? छ्या......

चिनार's picture

14 Jan 2021 - 1:26 pm | चिनार

हो.. तेच म्हणतोय मी..
चष्मा घेतला तर रोज त्याच्याच जाहिराती..
अरे ती काय शाम्पूची पुडी आहे का दर आठवडयाला एक घ्यायला..

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2021 - 1:17 pm | चौथा कोनाडा

माई म्हणतात तसं " एआयची लै हौस ना, मग भोगा त्याची फळं"

टवाळ कार्टा's picture

14 Jan 2021 - 2:57 pm | टवाळ कार्टा

खि खि खि

Bhakti's picture

14 Jan 2021 - 3:41 pm | Bhakti

हा हा हा ! मस्तच!
बर ह्या झुक्याला कोणी कपड्यांच्या​ जाहिराती दाखवा रे! :)

nanaba's picture

14 Jan 2021 - 4:13 pm | nanaba

लय भारी

उपयोजक's picture

14 Jan 2021 - 6:58 pm | उपयोजक

तुम्ही मिपाकर आहात हे माहित नव्हते! :)
तुमचा लेख तुमच्या नावासकट माझ्या धाग्यावर प्रतिसादात दिला आहे.

चिनार's picture

14 Jan 2021 - 9:42 pm | चिनार

कोणता धागा?
आम्ही मिपाचे जुने साधक आहोत...

उपयोजक's picture

14 Jan 2021 - 6:59 pm | उपयोजक

यांचा एआय जर असा मातीखाऊ असेल तर WhatsApp च्या पॉलिसी चेंजला घाबरावे का? :)))

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jan 2021 - 7:16 pm | राजेंद्र मेहेंदळे

अति तेथे माती हे सगळ्या गोष्टीप्रमाणे सोशल मिडियालाही लागु पडतेच. फायदा असेल तोवर आणि जपुन वापरा.
आता अमेझॉन,स्विगि,झोमॅटो ने लावलेल्या सवयी आणि फुकटात चेपु,तुनळी,कायप्पा किवा जी पे, पेटीएम ही अ‍ॅप वापरणे सोडायच्या म्हणजे जंगलातच जाउन रहावे लागेल.

खेडूत's picture

14 Jan 2021 - 7:18 pm | खेडूत

आवडला.
सकाळी सोमी वर आधी वाचलं, मग इथे आला. :))

आता तुमच्या स्पेशल भाषेत परत एकदा येऊद्या. तोही आवडेल!

चिनार's picture

14 Jan 2021 - 9:43 pm | चिनार

सोमी म्हणजे?
अजून कुठे पोस्ट झालाय का हा लेख..
मी फेसबुकवर पोस्ट केला होता

खेडूत's picture

14 Jan 2021 - 9:47 pm | खेडूत

वात्सप.
सोशल मीडिया म्हणजे सोमि

चिनार's picture

14 Jan 2021 - 9:55 pm | चिनार

ओके..मीच लिहीलंय हे..
whats app व्हायरल झालंय हे माहिती नव्हतं..

सोत्रि's picture

14 Jan 2021 - 8:18 pm | सोत्रि

मस्त आणि खुसखुशीत!

- (डीप लर्नर) सोकाजी

मूकवाचक's picture

14 Jan 2021 - 10:02 pm | मूकवाचक

+1

मराठी_माणूस's picture

15 Jan 2021 - 11:14 am | मराठी_माणूस

मस्त.
साधारण पणे एआय येत आहे अशी भिती घातली जाते पण अशा बिनडोक एआय ला घाबरण्याची खरच काही गरज नाही.

मित्रहो's picture

15 Jan 2021 - 12:43 pm | मित्रहो

मजा आली
असे अनुभव येतात. आता AI वाल्यांना सांगायला हवे अल्गो बदला. कुणी एकदा एक वस्तू परत घेतली तर तो ती महिनाभर तरी घेत नाही. त्यातही गंमत आहे कुणी जुलाबाची गोळी घेतली तर महिनाभरा नंतर त्याला जुलाबाची गोळी घ्यायची गरज असते असे नाही. ते चिडायचा. कॉमन सेन्स पासून AI खूप दूर आहे असेच म्हणावे लागेल.

सुबोध खरे's picture

15 Jan 2021 - 7:36 pm | सुबोध खरे

In the United Kingdom, it is estimated that at any time there are over 300,000 radiographs waiting over 30 days for reporting.

an artificial intelligence system which could cut the time it takes to assess critical chest x-rays from 11 days to less than three.

https://www.digitalhealth.net/2019/01/artificial-intelligence-cuts-delay...

कृत्रिम बुद्धिमत्ता जर व्यवस्थित वापरली तर त्याचा किती उपयोग होऊ शकतो याचे एक उदाहरण.

अर्थात हीच गोष्ट नैसर्गिक बुद्धिमत्तेबद्दल सुद्धा सांगता येईल.

अक्कल वापरायचीच नाही असे ठरवलेल्या लोकांचे तुम्ही काहीही करू शकत नाही हेच खरे.

दवाखान्याच्या लँडलाईन वर फोन करून तुम्हीआत्ता दवाखान्यात आहात का असे विचारणारे लोक काही कमी नाहीत