श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान!
श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर!
सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली. मग तासाभरानं अर्धी इडली खाऊन ती उठली. आई म्हणाली, अगं संपव की सगळं - तर तोंड वेंगाडून ती म्हणाली - "आई, गार आहेत."
आईने इडल्या गरम करून दिल्या. दोन घास कसेबसे खाऊन वेदिका पुन्हा उठली. आईने खा म्हटले, तर आईवरच चिडली. म्हणाली " चान्गली नाहिये आई इडली."
आईचं न ऐकता इडली तशीच टाकून ती निघून गेली.
आता मात्र आई चिडली, पण तिला वेदिकाच्या भावाला आणायचं होतं. जाता जाता तिनं वेदिकाला सांगितलं "हे रोज रोज नाही चालणार वेदिका. आपलं परवाच ठरलेलं, पहिलं संपल्याशिवाय नवीन मिळणार नाही आणि ताट नीट उचलून आणि झाकून ठेव.
आणि एका वेळेस एकच खेळ काढायचाय, तो झाल्या वर आवरल्याशिवाय दुसरा काढायचा नाहिये, लक्षात आहे ना?"
वेदिकानं आईकडे मुळीच लक्ष दिल नाही. ती म्हणाली चल ग श्रुतिका, आपण खेळू आणि आपल्या खोलीत निघून गेली. श्रुतिकाला वेदिकाचं हे रूप फारच नवीन वाटलं. इतकी गोड आपली मैत्रिण अशी कशी वागतेय, तिला कळेचना. थोडा वेळ खेळून झाल्यावर वेदिकाला कंटाळा आला, ती म्हणाली, चल आपण आता लेगो खेळू. श्रुतिकाला खरतर अजून घर घरच खेळायचं होता, पण वेदिका ऐकेचना, म्हणताना ती तयार झाली. वेदिकानं लेगो काढताना, इतर अनेक खेळणी उपसून टाकली. बघता बघता खोलीत खेळण्यांचा पसाराच पसारा झाला.
मग वेदिका म्हणाली, मला भूक लागलीये, चल आपण चॉकलेट्स खाऊ. ती खुर्ची वर चढली आणि चॉकलेट्स काढताना तिच्या हातातून शेजारची चटणी ची बरणी पण पडली. मोठे मोठे तुकडे उडाले, चटणी सांडली.
श्रुतिका पटकन तुकडे उचलायला गेली. वेदिकानं तिला बाजूला ओढलं, म्हणाली, राहु दे ग, आई उचलेल, आपण चॉकलेट खाऊ - आणि ती श्रुतिकाला घेऊन खोलीत गेली. श्रुतिकाला खोलीतला पसारा बघून खोलीत यायलाही नको वाटत होतं आणि काचा? त्या उचलायला हव्यात ना!
ती वेदिकाला समजावयला गेली, "अग आपल्याकडनं तुटलय तर आपण उचलायला हवं ना, कुणाला लागलं तर?"
आता मात्र वेदिका श्रुतिकावरही चिडली, तिच्या अंगावर जोर जोरात ओरडायला लाग ली. म्हणाली, "आई सारखं बोलू नकोस. मोठी आलीये मला सांगणारी." श्रुतिकाला रडायलाच यायला लागलं. कधी एकदा घरी जातोय असं झालं तिला.
ह्या सगळ्या आवाजानं, झोपलेली आजी उठून बघायला आली. तिनं श्रुतिकाला जवळ घेतलं, वेदिकाला म्हणाली, "अग, ओरडू नकोस तिच्यावर आणि खोलीचं काय करून ठेवलयस हे!"
वेदिकाला आता आजीचाही राग आला. ती आजीच्या अंगावर पण ओरडली आणि जोरजोरात रडायला लागली. आजी तिला "सॉरी सॉरी" म्हणायला लागली. श्रुतिकाला आता फार धक्का बसला. ती आई, बाबा, आजी कुणाच्याच अंगावर ओरडायची नाही. कधी पटलं नाही, तर आपलं म्हणणं नीट सांगायचा प्रयत्न करायची, पण असं ओरडल तर तिच्या आईला अजिबात आवडायचं नाही आणि चालायचं ही नाही. मुळात श्रुतिकाला ही आईच पटलेलं की असं ओरडणं चुकीचं आहे.
तितक्यात दार वाजलं, आई लॅच उघडत होती. म्हणजे ती दिगंतला घेऊन परत आली होती, आता कधी एकदा आजीचं नाव आईला सांगतोय असं वेदिकाला झालं. ती पळत पळत गेली दाराकडे. पण वाटेत काच पायात घुसली, रक्त यायला लागलं, आता मात्र वेदिका घाबरली, रडायला लागली.
आई आत आल,, तर डायनिंग टेबल वर ताट तसच आणि त्यावर माशी बसलेली. सगळीकडे चटणी सांडलीये. खाली जमिनीवर वेदिका बसून रडतेय, तिच्या पायातून रक्त येतय आणि श्रुतिका घाबरलीये.
आईने दिगंतला आजी कडे दिलं. वेदिकाच्या पायाला हळद लावली. तिला पाणी दिलं. जवळ घेतलं आणि नक्की काय झालय विचारलं.
वेदिकाला आता फारच लाज वाटायला लागली. आई इतकी माया करते, पण आपण मात्र तिचं काहीच ऐकत नाहियोत, तिला उलट बोलतोय.
ती श्रुतिकाला हळूच म्हणाली "सॉरी श्रुतिका, मी तुझं ऐकायला हवं होतं. तू मला चांगलं सांगितलेलस की आपलं आपण आवरून टाकुयात. तेव्हाच काच उचलली अस ती तर मला लागलं नसतं. नशीब छोट्याशा दिगूला लागलं नाही".
तिला चांगलच रडू येत होतं.
आईन तिला आणि श्रुतिकाला जवळ घेतलं. मग खोलीत पाठवलं, काचा भरल्या.
आई खोलीत येईपर्यंत, वेदिका आणि श्रुतिकानं खेळणी इतक्या वेगात आवरली की इथे पसारा होता हे आईला सांगूनही खरं वाटलं नसतं. :)
मग मात्र उरलेला वेळ मात्र फार मजेत गेला. वेदिकाला आपली चूक कळली होती. आई पण नियमित तिच्याशी बोलायची.
वेदिका सुधारली, पण एकदम नाही हं, हळूहळू. तशीही ती मुळात गोडच मुलगी होती, मनानं प्रेमळ पण होती. पण वागण्यात हट्टीपणा करण्याचं, उलट आणि ओरडून बोलण्याचं भूत तिच्यात शिरलेलं. ते हळूहळू कमी झालं.
आता ती एकदमच शहाणी झालीये. म्हणजे मस्ती करते हां! दंगाही करते, पण आपल्या गोष्टींची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकलीये आणि ओरडणंही एकदम कमी झालंय. बंदही होईल.
इतकच काय, वेदिका आणि श्रुतिका आता एकदम बेस्ट फ्रेंडस झाल्यात.
~ शिरीष
प्रतिक्रिया
10 Jan 2021 - 12:41 pm | चौथा कोनाडा
व्वा, खुप छान !
साधी सरळ संस्कार कथा आवडली.
काल माझ्या पुतणीला रंगवून सांगितली, तिला तर बेहद्द आवडली !
12 Jan 2021 - 7:47 pm | nanaba
थँक्यू चौथा कोनाडा!
12 Jan 2021 - 8:01 pm | मुक्त विहारि
बालकथा आवडतात...
13 Jan 2021 - 8:28 am | nanaba
Thank you Mukta Vihari!