आज काय घडले ...
मार्गशीर्ष व. ९
कोरेगांव येथील इंग्रज-मराठे यांचे युद्ध !
शके १७३९ च्या मार्गशीर्ष व. ९ रोजी कोरेगांव येथे इंग्रज आणि मराठे यांचा संग्राम झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठेशााहिस अनिष्ट अशी ग्रहदशा सुरू झाली होती. याच काळाच्या आगेमागे महाराष्ट्राच्या भाग्यसूर्यास ग्रहण लागले होते. "राष्ट्रैक्याला अवश्य अशा तडजोडीचे मुत्सद्दीपण हरिपंत फडक्यांबरोबरच गेले. स्वकीयांना-परकीयांना चळचळा कापावयास लाविणारा पराक्रम महादजी शिंदे यांचेबरोबर गेला, मराठ्यांच्या वैभवाने सवाई माधवरावाबरोबर उडी घातली, मराठेशाहीच्या पुण्याईने अहिल्याबाईवरोवर नर्मदेत बुडी मारली व मराठ्यांची शारदादेवी मोरोपंतांबरोबर पंढरीत पांडुरंगाच्या चरणांशी दडी मारून राहिली." मग उरले काय ? दुसऱ्याची धन करून 'स्व' त्वाला पारवे होणारे रावबाजी. त्यांच्या धरसोडीच्या धोरणामुळे आणि कचखाऊ स्वभावामुळे खडकी, येरवडा येथे इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव झाला; आणि १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशी मराठ्यांच्या राजधानीमध्ये शनिवारवाड्यावरील ध्वज उतरवून त्या स्थानी यूनियन जॅक फडकविण्यांत आले. मराठेशाहीचा सौभाग्यतिलक पुसला गेला. या समयी धनी बाजीरावसाहेब पर्वतीवरून आपले सामान आटोपून पुरंदर, सासवड या मार्गाने पलायन करीत होते. अनेक गांवें करीत ३० डिसेंबर रोजी ते चाकण येथे आले. ही बातमी इंग्रजांस समजताच त्यांनी कोरेगांवजवळ १ जानेवारीस त्यास गांठलेच. श्रीमंतांनी बापू गोखले यास आज्ञा दिली की, आज लढाई करून पुढे जाण्यास मार्ग काढून द्या. तेव्हां मराठ्यांचा तोफांचा मारा सुरू झाला. संगिनींचे आणि तरवारींचे मोठे युद्ध झाले. रात्री नऊ वाजेपर्यंत लढाई होऊन शेवटी पेशव्यांचे सैन्य छावणीत आले. इंग्रजांचे एकशेंपंचाहत्तर जखमी झाले. मराठयांचे पांचशे लोक पडले. त्याचे अगोदरच बाजीराव जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघून गेला होता.
-१ जानेवारी १८१७
प्रतिक्रिया
7 Jan 2021 - 12:49 pm | चौथा कोनाडा
सुंदर लिहिलंय ! डोळ्यापुढे तंतोतंत चित्र उभे राहिले !
मराठ्यांचे साम्राजाचा उदय आणि अस्त हा आपणा सर्वांसाठीचा महत्वाचा विषय आहे, त्यातील हे एक महत्वाचे पान !
7 Jan 2021 - 1:48 pm | प्रसाद_१९८२
आम्ही तर असे ऐकलेय की,
महार रेजिमेंटच्या पाचशे सैनिकांनी, माजलेल्या पेशव्यांना व त्यांच्या वीस हजार सैन्याला या युद्धात धूळ चारली होती म्हणे. पेशव्यांना पाणी पाजले यासाठी तिथे दरवर्षी विजय दिवस देखील साजरा केला जातो व या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यंत्री देखील उपस्थित असतात.
7 Jan 2021 - 2:12 pm | मदनबाण
तिथे दरवर्षी विजय दिवस देखील साजरा केला जातो व या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यंत्री देखील उपस्थित असतात.
एकमेकांची डोकी फोडुन त्याचे कौतुक करण्यातच बहुधा मोठेपणा समजला जात असावा, कधी कधी वाटते इंग्रजां पेक्षा आपल्याच काही लोकांनी / भ्रष्ट राजकारण्यांनी देशाचे वाटोळे अधिक करुन ठेवले आहे ! असाच प्रकार टीपू सुल्तान जयंतीचा चालायचा, त्यावर आता अंकुष लावला गेला आहे असे वाटते.
असो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जवानी जानेमन हसीन दिलरुबा... [ नमक हलाल (1982) ]