आज काय घडले... मार्गशीर्ष व. ८ पं. मालवीय यांचा जन्म !

Ashutosh badave's picture
Ashutosh badave in जनातलं, मनातलं
6 Jan 2021 - 11:36 am

आज काय घडले...

मार्गशीर्ष व. ८

पं. मालवीय यांचा जन्म !पंडित मालवीय

शके १७८३ च्या मार्गशीर्ष व. ८ रोजी प्रसिद्ध हिंदु विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांचा जन्म झाला.

यांचे मूळ घराणे मालव प्रांतांतील. माळवा सोडल्यानंतर प्रयाग क्षेत्री या धराण्याने आपले आस्तित्व कायम केलें. मालवीयांच्या घराण्यांतील सर्वच पुरुष विद्वान् व उदारचरित असे होते. पं. प्रेमधर मालवीय हे मदनमोहनांचे आजे. संस्कृत विद्येतील यांची कीर्ति त्या वेळी अत्यंत मोठी होती. यांचे चिरंजीव व्रजनाथ मालवीय हेहि विद्वान् म्हणून प्रसिद्ध होते. भागवतावर लिहिला गेलेला यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. याच भाग्यशाली पित्यास मार्गशीर्ष व.८ या दिवशी जो मुलगा झाला तो म्हणजे मदनमोहन. पित्याने यांच्या शिक्षणाची फारच काळजी घेतली. धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार घरच्या घरीच होत असल्यामुळे मदनमोहन मालवीयांचा विकास चांगला होत होता. प्राथमिक शिक्षण घरीच घेतल्यानंतर धर्मज्ञानोपदेश पाठशाळा व विद्याधर्मवर्धिनी सभा या संस्थातून यांचे शिक्षण सुरू झाले. अलाहाबाद जिल्हा स्कूल मधून प्रवेश परीक्षा व म्यूर सेंट्रल कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे लक्ष सार्वजनिक कार्याकडे वळले. धर्मकारण व शिक्षण हे यांचे आवडते विषय होते. अलाहाबाद लिटररी इन्स्टिटयूट व हिंदु समाज या संस्थांतून ते काम पाहूं लागले. आणि हळूहळू यांच्या कार्याचा विस्तार होऊन जगप्रसिद्ध अशा बनारस येथील विश्वविद्यालयाची निर्मिति यांच्याकडून झाली. यांच्यासंबंधी कै. तात्यासाहेब केळकर यांनी एके ठिकाणी म्हटले होते : " हिंदुत्वाचा आर्दश कोण? असा मला कोणी प्रश्न केला तर मी हिंदुस्थानांतील एकाच विभूतीकडे बोट दाखवीन. ती म्हणजे पंडित मदनमोहन मालवीयजी. जुन्या व नव्या संस्कृतीचा सुंदर मिलाफ कसा घालावा हे पंडितजींइतके कोणीच जाणीत नाही. हिंदु विश्वविद्यालय हे या सुंदर मिलाफाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवाजवळील नंदादीपाने जी चित्ताला एक प्रकारची प्रसन्नता वाटते ती पंडितजी आहेत.” हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृति यांचा अभिमान पंडित मालवीय यांना फार असे.
-२५ डिसेंबर १८६१

इतिहासमाहिती