माझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Dec 2020 - 5:36 pm

सर्वांना नमस्कार!

नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं. काही जणांचं अनुमान होतं की, अतिशय कमी कोनीय अंतरामुळे ते दोन वेगळे दिसणार नाहीत व बघताना एकच डबल प्लॅनेट दिसेल. तसं काही झालं नाही. पण अगदी चिकटून असे छान दिसले! Two legands in the same frame असं ते दृश्य होतं! इतके महाकाय ग्रह असूनही ते आपल्या बघण्याच्या स्थानाच्या संदर्भात आकाशात असे जवळ येतात ही मोठी गोष्ट आहे! शक्यतो मोठ्यांचा अहंकारही मोठा असतो! पण हे दोघे महाकाय व हवेचे गोळे असलेले ग्रह अनेक दिवसांसाठी जवळ जवळ आलेले दिसत आहेत! आणि अजूनही किमान तीन- चार दिवस ते डोळ्यांनी खूपच जवळ दिसतील.


.

आता ह्या मागची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. लॉकडाउन आणि कोरोनामुळे सगळ्यांचं खूप मोठं नुकसान झालं. जग इकडचं तिकडे किंवा "तिकडचं" इकडे झालं! पण माझ्या बाबतीत मात्र लॉकडाउनने काही गोष्टी मला दिल्या. त्यातली पहिली म्हणजे रनिंग. इन्डोअर रनिंगच्या माध्यमातून रनिंगमधली खूप वेगळी बाजू मला बघता आली, शिकता आली व एंजॉयही करता आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझा आकाश दर्शनाचा छंदही नव्याने सापडला. लॉकडाउनच्या काळात खूप गोष्टींची नव्याने उजळणी व आखणी करण्य़ाची संधी मिळाली. त्यामध्ये माझ्या मित्राने घेतलेल्या टेलिस्कोपच्या निमित्ताने माझा सगळा छंद रिबूट झाला. लहानपणी १० व्या वर्षापासून मला आकाशाची खूप आवड होती. तेव्हा खगोलावर एक पाक्षिकही एक वर्षं चालवलं होतं, ते आयुकाच्या लायब्ररीपर्यंत गेलं होतं व डॉ. नारळीकरांची पत्रही मला आली होती. माझ्या मामाने मला ही आवड लावली होती आणि त्याने एक छोटा टेलिस्कोपही‌ घेऊन दिला होता. तो आज २५ वर्षांनंतरही तितकाच टिकून आहे व old is gold सिद्ध करतो आहे!

पण इतकं "एक्स्पोजर" मिळूनही नंतर शिक्षण, करीअर आणि नंतर संसाराच्या चक्रामध्ये हे मागे पडत गेलं. कधी ग्रहण असेल तर तेव्हा किंवा कधी मोठी आकाशीय घटना असेल तेव्हाच हा विषय समोर यायचा. पण जेव्हा मित्राने टेलिस्कोप घेतला व मग त्यातून काय काय बघता येईल असा विचार मनात आला तेव्हा उजळणी सुरू झाली. आणि आता एका अर्थाने सगळे सॉफ्टवेअर्स, अद्ययावत माहिती, आकाशातल्या स्थितींचे रोजचे अपडेटस हे ज्ञान खूप सहजपणे उपलब्ध आहे. माझ्या लहानपणी व गेली १० वर्षं सोडली तर आधी‌ ते तसं उपलब्ध नव्हतं. मग त्यातून मित्रासोबत शेअरिंग करता करता कळालं की माझ्या टेलिस्कोपमधूनच माझं खूप आकाश बघायचं राहून गेलं आहे! अगदी "गेले द्यायचे राहूनी तुझे नक्षत्रांचे देणे!" मग झाली रिबूट व रिस्टार्ट प्रक्रिया सुरू. त्या जुन्या 8-24 X 40 मोनोक्युलरमधून पण आजचे साधनं व अद्ययावत apps वापरून एक एक गोष्टी बघायला सुरुवात केली. आणि काही महिन्यांमध्ये जवळजवळ पंचवीस वर्षं मागे गेलो आणि तीच मजा, तोच आनंद आणि तीच रंगत परत मिळाली! त्या टेलिस्कोपच्या "कक्षेमध्ये" असलेले पण बघायचे राहूनच गेलेले अनेक ऑब्जेक्टस बघितले (युरेनस- नेपच्यून, काही लघुग्रह, काही तारकागुच्छ इ.)! त्यातही अनेकदा अपयश येत होतं. पण ती आवड होती, आजचं तंत्रज्ञान होतं. आज आकाशात कोणता ऑब्जेक्ट कुठे आहे ही माहिती अगदी मोबाईलच्या स्क्रीनवर उपलब्ध असते. ती वापरून ती राहून गेलेली कसर भरून काढली!

 

आणि हा आनंद व ही मजा परत अनुभवताना वाटत होतं की, इतका वेळ गेला ठीक आहे. पण आता इतरांसोबतही हे शेअर करायला पाहिजे. त्यातली मजा, त्यातून कळणा-या एक एक गोष्टी व त्यातून येणारी एक व्हिजन व वैज्ञानिक समज लोकांसोबत शेअर करायला पाहिजे. आणि म्हणून मग त्यातून नवीन टेलिस्कोप घेण्याची इच्छा झाली. जुन्या छोट्या टेलिस्कोपच्या क्षमतेचा पूर्ण नाही तरी ब-यापैकी वापर झाला व आता इतरांना दाखवण्यासाठी म्हणून नवीन टेलिस्कोप घ्यावासा वाटला खूप "रि-व्ह्यू" करून ठरवला आणि तो गुरू- शनीच्या महायुतीच्या थोडेच दिवस आधी मिळाला! पण देर आए, दुरुस्त आए! त्यामुळे ह्या Startracker 114/500 reflector पोर्टेबल टेबलटॉप टेलिस्कोपमधून लोकांना गुरू शनी व इतरही अनेक ऑब्जेक्टस दाखवता आले! आणि इतरांनाही त्यातला थरार किती छान वाटतो ते बघता आलं! चंद्र बघतानाच्या लोकांच्या प्रतिक्रिया तर Oh My god, अरे बाप रे! अशा असायच्या!


.
मी घेतलेला अजून एक व्हिडिओ इथे बघता येईल.

परभणीमध्ये इथल्या खगोलप्रेमींसोबत दोन छोटी सेशन्स घेतली. आता इथून पुढे अशी सेशन्स इतरही घेण्याचा विचार आहे. आकाशामध्ये एक घटना होऊन गेली तरी दुसरी घटना सुरूच असते. किंबहुना आपल्या इतक्या चिमुकल्या डोळ्यांनी आपल्याला इतके कोट्यवधी- अब्जावधी किलोमीटर दूरचे तारे- आकाशगंगा दिसतात हाच मोठा चमत्कार आहे. आपण त्या ता-यांपेक्षा जवळ जवळ अनंत पट छोटे असूनही त्यांना बघू शकतो, त्यांचे आकृतीबंध व त्यांच्या गमती समजू शकतो, हा मोठा चमत्कार आहे! आणि टेलिस्कोपशिवाय नुसत्या डोळ्यांनीही आकाशातल्या किती तरी गमती दिसू शकतात; किती गोष्टी बघता येतात; हेही तितकंच खरं. तेव्हा माझ्या प्रोफेशनल कामाचं (online consultancy) मोबाईल स्वरूप लक्षात घेता जिथे आकाश बघण्यास उत्सुक लोक असतील तिथे जाऊनही असे सेशन घेऊ शकेन. त्यासाठी योग्य तो पोर्टेबल टेलिस्कोप आहेच, त्याबरोबर आकाशात काय व कुठे बघायचं ही समजही नव्याने मिळालेली आहे. आणि हे फक्त आकाश दर्शन नाही तर त्यामध्ये विज्ञान आहे, एकाग्रता आहे, निसर्गातल्या गमती जमती समजून घेणं आहे, शांतपणे परत परत प्रयत्न करण्याचं धैर्य आहे आणि खूप मनोरंजनही आहे, infotainment ही आहे!

मी घेतलेला चंद्राचा व्हिडिओ इथे बघता येईल.

आपल्या माहितीत कोणाला छोट्या ग्रूपने आकाश बघायचं असेल तर संपर्क करू शकता. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com

विज्ञानविचार

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 Dec 2020 - 6:31 pm | तुषार काळभोर

पहिलं म्हणजे तुम्ही monocularमधून हे अभूतपूर्व दृष्य पाहिलं त्याबद्दल अभिनंदन.
त्याचे जबरी फोटो काढून आमच्याशी शेअर केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार.
हौशी खगोल फोटोग्राफी च्या मानाने फार उच्च दर्जाचे फोटो काढले आहेत. (म्हणजे हौशी हा माझा समज. तुम्ही अनुभवी वा व्यावसायिक फोटोग्राफर असाल तर मग करा, ही विनंती). अगदी शनीची कडी आणि गुरूचे चंद्र हे सगळं एका फोटोत पाहायला मिळणं फार दुर्मिळ आहे.

आणि, तुम्ही तुमचा आनंद, छंद अन ज्ञान सर्वत्र शेअर करताय, याबद्दल कौतुक (माझी लायकी नसली तरी)!

खरंच, मानवंदना द्यावी असा लेख v उपक्रम!!

चौकटराजा's picture

23 Dec 2020 - 6:59 pm | चौकटराजा

ज्याने टेलिस्कोप मधून शनीची कडी पाहिली तो जिंकला मी अर्धा जिंकलो कारण मी कौसानी येथून गुरूचे चार चन्द्र पाहिले होते ! गुरु व शनी यान्चे कक्षा लक्शात घेता ही युति विलक्षणच म्हटली पाहिजे ! आपले अभिनन्दन !

कंजूस's picture

23 Dec 2020 - 7:10 pm | कंजूस

आणि तुम्ही आकाश दर्शन कार्यक्रम करता हे वाचून आनंद झाला.
आता माझे निरीक्षण बंद पडलं. खूप दूर जावं लागतं. उजेड सगळीकडेच झाला. राजमाची, भीमाशंकर हेसुद्धा बाद झालं.

कंजूस's picture

23 Dec 2020 - 7:11 pm | कंजूस

एकूण छानच आहे .

दुर्गविहारी's picture

23 Dec 2020 - 7:49 pm | दुर्गविहारी

खूपच छान फोटोग्राफी आणि माहिती सुद्धा !अश्यावेळी स्कायगेझ ऍप उपयोगी पडते.

मार्गी's picture

23 Dec 2020 - 8:54 pm | मार्गी

@ पैलवान जी, मी शनीची कडी व गुरूचे उपग्रह इ. लहानपणापासून मोनोक्युलरमध्ये बघतच आलो आहे. पण त्यातून फोटो येत नाहीत. हे सगळे फोटो नुकत्याच घेतलेल्या ११४/५०० टेलिस्कोपने घेतलेले आहेत.

@ कंजूस जी, धन्यवाद!

@ दुर्गविहारी जी, स्कायगेझ किंवा तत्सम एप्स खूप प्राथमिक गोष्टी दाखवतात. प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्काय सफारी उपयोगी पडतं. डीप स्काय ऑब्जेक्टस, लघुग्रह, धुमकेतू इ. माहिती व स्थिती त्यात असते.

टवाळ कार्टा's picture

23 Dec 2020 - 9:31 pm | टवाळ कार्टा

भारी

Bhakti's picture

23 Dec 2020 - 10:02 pm | Bhakti

आणि हे फक्त आकाश दर्शन नाही तर त्यामध्ये विज्ञान आहे, एकाग्रता आहे.मस्तच!

प्रचेतस's picture

24 Dec 2020 - 9:02 am | प्रचेतस

मस्त एकदम.

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Dec 2020 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार

फारच छान वाटले वाचताना आणि फोटो / व्हिडीओ पहाताना मजा आली.
पैजारबुवा,

तुम्हाला हरवलेला छंद सापडला आणि त्या आनंदात आम्हाला सहभागी केल्याबद्दल खूप आभार.

खगोलशास्त्रावर, ग्रहतारेनक्षत्रांवर नियमित लिहाल ही अपेक्षा

सौंदाळा's picture

25 Dec 2020 - 9:27 am | सौंदाळा

हेच म्हणतो
मार्गी, टेलिस्कोप ची माहिती मिळेल का? कॉन्फिगरेशन, किंमत, ऑनलाइन किंवा पुण्यात कोठे मिळू शकेल?

मार्गी's picture

25 Dec 2020 - 11:52 am | मार्गी

.वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!!

@ सौंदाळा जी, हा टेलिस्कोप तेजराज कंपनीचा startracker 114/500 tabletop आहे. हा त्यांच्या साईटवर ऑनलाईन घेता येतो. हा ११,७०० चा आहे. तुम्ही एखाद्या छोट्या व आणखी प्राथमिक पातळीवरच्या टेलिस्कोपने काही काळ आकाश बघितलं असेल तर हा घेऊ शकता. तसं नसेल तर एखादा छोटा ६०- ७० मिमीचा रिफ्रॅक्टर टेलिस्कॊप घेऊन काही काळ आकाश पाहा आणि कालांतराने आवड, इंटरेस्ट बघून नवीन घेऊ शकता.

सौंदाळा's picture

25 Dec 2020 - 1:55 pm | सौंदाळा

धन्यवाद, भाचीला खूप आवड आहे तिला भेट म्हणून द्यायचा विचार आहे

नवख्या खगोलशास्त्रज्ञासाठी कोणती दुर्बीण वापरता येईल?

निनाद's picture

26 Dec 2020 - 5:18 am | निनाद

कोणती दुर्बिण घ्यावी याबद्दल येथे चांगली माहिती आहे.
https://skywatcheraustralia.com.au/first-time-buyers-guide/

अजय देशपांडे's picture

1 Jan 2021 - 3:39 pm | अजय देशपांडे

PRODUCT DETAILS
Newtonian Telescope
Product Code - 001Buyer Feedback:
View Latest Prices
Send Inquiry
• Offered By :LENSEL OPTICS PVT. LTD.
• Product Added On :Aug 10, 2009
• Last Updated On :Aug 11, 2009
Salient Features of Newtonian Telescope :-
The Universe, Yours to Discover

Celebrating the “International Year of Astronomy” with motto – ‘Astronomy for All’.

An economical Newtonian Telescope with a 100 mm (4 inch), F/6 Parabolic Primary Mirror and a 10 X Eyepiece that provides great value for money is just launched by Lensel Optics Pvt Ltd.

Specifications of this inexpensive product:
• Primary Mirror focal length : 600mm.
• Primary Mirror Aperture : 100 mm (F/6).
• Eye piece : 10 X Huygenian.
• Magnification : 24X (with 10 X eyepiece).
• Mount : Robust Alt-azimuth mount with a knob for fine Azimuth movement.
• Modifications possible : User can convert to Polar mount by providing wedge suitable for latitude of his location.
• Material of Construction : Powder Coated steel, Rigid PVC, and high quality glass front surface mirrors with protective coatings.
About LENSEL OPTICS PVT. LTD. :-
Established in 1979 , LENSEL OPTICS PVT. LTD. has made a name for itself in the list of top service providers of Telescope & Binoculars in India. LENSEL OPTICS PVT. LTD. is listed in Trade India's list of verified companies offering wide array of Newtonian Telescope etc. Contact here for Telescope & Binoculars in Chinchwad, Maharashtra.

आंबट चिंच's picture

25 Dec 2020 - 9:39 pm | आंबट चिंच

शनीची कडी दिसतात म्हणजे भारी आहे.
गुरुचे चंद्र नाही का दिसले.
आता सुद्धा photo टाका आणि हो
तो प्रशिक्षण वर्ग इथे पण रोज चालू करा विनंती

मार्गी's picture

28 Dec 2020 - 8:26 pm | मार्गी

धन्यवाद! एका फोटोत गुरूचे चंद्र दिसतातच ना. पण मला अगदी बेसिक फोटोग्राफी येते, सो शनीची कडी (तितका शार्पनेस) आणि गुरूचे उपग्रह एकाच वेळी दिसत नाहीत (शार्पनेस हवा तर ब्राईटनेस कमी करावा लागतो). तुम्हांला इंटरेस्ट असेल तर तुम्हांला माझ्या उपक्रमाची आणखी माहिती शेअर करायला आवडेल. तुमचा नंबर मला मॅसेज कराल का? माझा नंबर वर पोस्टमध्ये आहे. धन्यवाद.

कानडाऊ योगेशु's picture

25 Dec 2020 - 9:41 pm | कानडाऊ योगेशु

फोटो जबरा आले आहे. शनिचे कडे दिसण्याचा आनंद अवर्णनीयच असावा.
मी ही उघड्या डोळ्यांनी ही युती नकळत पाहिली. नकळत अशासाठी कि विमानाच्या टेललाईटसारखा एक प्रकार पश्चिमेला दिसला. पण तो काही हलत नव्हात म्हणुन चकित झालो. दुसर्या दिवशी कन्येने सांगितले कि तिने काल आकाशात ही युती पाहिली होती. तेव्हा डोक्यात प्रकाश पडला कि मी ही नशिबवान ठरलो म्हणुन. पण तदनंतरच्या दिवशीही हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ दिसत होते.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

26 Dec 2020 - 1:30 am | ॲबसेंट माइंडेड ...

एक प्रामाणिक प्रश्न!
अशा घटना झाल्या काय किंवा न झाल्या काय त्याने सर्वसामान्यांच्या जीवनात काय फरक पडतो?

चौकटराजा's picture

26 Dec 2020 - 9:20 am | चौकटराजा

यावर्षी करोना मुळे पंढरीची वारी नेहमीसारखी झाली नाही. दिवाळी कधी आली कधी गेली कळले नाही आता ३१ डिसेम्बर ही " कोरडा" जाणार ! सामान्य लोकाना काय फरक पडला ? काही नाही ! ज्याना गुरू व शनिची भ्रमण कक्षा किती विशाल आहे याचे ज्ञान आहे त्याना फरक नक्कीच पडतो ! लस हा विषय सध्या तरी जीवशास्त्रज्ञांच्या कक्षेतर आहे तोवर सामान्य माणसाला काही फरक पडणार नाही पण ती नाकाम झाली तर नक्कीच फरक पडेल ! हो ना ? वारी ,दिवाळी ,न्यू इयर व लस यात हा गुणात्मक फरक आहे !

चौकटराजा's picture

26 Dec 2020 - 9:22 am | चौकटराजा

वरील प्रतिसादात कक्षेतर ऐवजी " कक्षेत " असे वाचावे !

आंबट चिंच's picture

26 Dec 2020 - 8:25 am | आंबट चिंच

तुम्ही जी खरड टाकली आहे तिला उत्तर मिळालं काय किंवा नाही मिळालं काय तुम्हाला काय फरक पडतो ?
मुळात तुम्ही जन्माला आलात, लिहायला, बोलायला शिकलात त्यातून मिपावर सदस्यत्व मिळालं हीच मोठी घटना नाही ये का ?

प्रिय दादा/ताई/काका/काकू/मामा/मामी/आजोबा/आजी यापैकी जे तुमच्या वयाला आणि व्यक्तिमत्वाला साजेसे असेल ते संबोधन स्वीकारा!
शब्दांची वारेमाप उधळपट्टी करणे टाळून विचारलेला प्रामाणिक प्रश्न तुम्हाला समजला नाही त्यासाठी फोड करून सांगतो!
चंद्रग्रहण/सूर्यग्रहण होते त्याने सामान्य लोकांवर काही बरेवाईट परिणाम होतात असे म्हणतात. तसे काही परिणाम अशा घटना घडल्यावर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात घडतात का? असा हा प्रश्न आहे.

मार्गी's picture

26 Dec 2020 - 11:19 am | मार्गी

इतकी चर्चा होते आहे इथे तर!!! @ शेर भाई, नवखा खगोलशास्त्रज्ञ म्हणजे काय? सुरुवातीला तरी नुसत्या डोळ्यांनी आकाश बघून ठळक तारे- तारकागुच्छांची ओळख करावी, डोळ्यांनी दिसणा-या गोष्टी बघाव्यात. त्यामध्ये मग आनंद आला, आवड वाढली तर छोटा टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलर घ्यावा. एकदम टेलिस्कोपकडे शक्यतो जाऊ नये. आधी कन्सेप्टस क्लीअर असाव्यात; बघण्याची क्षमता यायला हवी.

@ अबसेंट माइंडेड. हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. फरक काहीच पडत नाही. पण ह्या निमित्ताने आपण ही चर्चा करत आहोत, लोक थोडं आकाश बघत आहे, हा फरक तर पडतोच आहे ना? आणि अशी एखादी घटना सगळ्यांना विशेष वाटेल असं काहीच नाही. ज्याला वाटेल त्याला वाटेल. तुम्हांला किंवा इतरांना दुसरी एखादी गोष्ट आकर्षित करू शकेल.

आणि ही खगोलीय घटना अशी नव्हती, कक्षतेल्या गतीची रूटीन गोष्टच होती. केवळ शनी- गुरू व आपलं स्थान ह्यामुळे आपल्याला ती तशी दिसली. आणि अर्थातच एकाच व्ह्यूमध्ये दोन्ही ग्रह म्हणजे सुंदर दृश्य. सौंदर्य म्हणूनच त्या घटनेची व्हॅल्यू आहे!

मार्गी's picture

28 Dec 2020 - 8:27 pm | मार्गी

२३ डिसेंबरला घेतलेला गुरू- शनीचा हा अजून एक व्हिडिओ. व्ह्यूमध्ये सुरुवातीला शनी दिसतो आणि तो बाहेर गेल्यावर गुरू येतो! https://youtu.be/WjEjHRMJphw इथे बघता येईल.

चौथा कोनाडा's picture

29 Dec 2020 - 5:18 pm | चौथा कोनाडा

वाह, क्या बात हैं !
फोटो आणि लेखन दोन्ही आवडले !

अजय देशपांडे's picture

1 Jan 2021 - 3:26 pm | अजय देशपांडे

माझ्याकडे ४ इंची रेफ्लेक्टोर telescope आहे त्याबरोबर फक्त १ eyepcice आला आहे २५ mm , आणी त्यला rock न पिनिओन focucer पण नाही आला मला त्यासाठी rock न पिनिओन फोकुसर हवा आहे आणि त्याबरोबर eyepice पण
६mm,१५ m,, २५ mm साधे सुधा चालतील