विष्णू सहस्त्रनाम
गावात,ब्राम्हणांची वीस बावीस घरे.देशमुख गल्लीतली देशमुखांची पंधरासोळा;पाटील गल्लीत जोशांची चारपाच,जहागिरदार ,कुलकर्णी,देशपांडे, पुराणिक यांची एकेक.वर्षभरातील नेहमीचे कुलाचार,सणवार प्रत्येक घरी, आपापल्या परीने होत असत.उन्हाळ्यात ,विष्णू सहस्त्र नाम सप्ताहाचे निमित्ताने मात्र सर्वजण एकत्र येत.
या विश्वाची उत्पत्ती,स्थिती,आणि विलय,ज्याच्या लीलेने होतो त्या परमेश्वर श्रीविष्णूला,वेदकाळा पासून ,पुराण काळापर्यंत ,ज्या ज्या नावांनी संबोधिले गेले त्या एक हजार नावांचे संकलन असलेले हे संस्कृत श्लोक भिष्माने युधिष्ठीराला सांगितले.महाभारतातील 'अनुशासन पर्वात 'याचा उल्लेख आहे.यात शिवाचे नावांचा ही समावेश आहे. याचे उच्चारणाने सर्व पापे नष्ट होतात,भौतिक जगातील सर्व सुखे मिळतात व मृत्योपरांत स्वर्ग प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे.हीच श्रद्धा,भावना मनात ठेवून आमच्या पूर्वजांनी,कधी तरी;केव्हा ते माहिती नाही,विष्णू सहस्त्र नाम सप्ताह सुरू केला असावा.पुढील पिढ्यांनी तो अनेक वर्षे सुरू ठेवला होता.
गल्लीतील ,अंदाजे चाळीस×पन्नास फुट आकाराच्या वरती पत्रे ,समोर सलग पाच सहा दरवाजे व पूढे प्रशस्त दगडी ओटा असलेल्या एकमजली वास्तूला का कोण जाणे 'किल्ला' म्हणत.शेतमाल,अवजारे ठेवण्यासाठी वापरला जाणारा हा ' किल्ला'गावातले पहिले डॉक्टर,आबाकाकांच्या
मालकीचा.या जागेत विष्णूसहस्त्रनाम सप्ताह होत असे.
सप्ताहाचे एक दोन दिवस अगोदर,'किल्ल्याची' स्वच्छता करून तयारी होई.मध्यभागी भिंतीला खेटून मोठ्या लोखंडी पेट्या (ट्रंका)एकावर एक पायरी सारख्या रचून त्यावर रंगीत कपडा अगर रेशमी साडी अंथरून ते सुशोभित केले जाई.मंडप म्हणून पण, साड्यांचेच आच्छादन असे.दोन्ही बाजूसअखंड तेवणार्या मोठ्या समया मांडल्या जात.रांगोळ्या व माफक सजावट होई.देवाचे आसनाजवळ समोर मधोमध मोठा चौरंग मांडला जाई.त्याचे दोन्ही बाजूस पाठ म्हणणार्यासाठी आसने म्हणून दोन दोन लाकडी पाट.प्रत्येक पाटामागे टेकण्यासाठी एकेक पाट.त्यास आधार म्हणून पत्राचे चौकोनी डबे मांडलेले.ते स्थीर राहावे म्हणून त्यात मोठे दगड टाकायचे.पंधरा लिटर तुपातेलाचे असे रिकामे डबे वरचे झाकण अर्धे कापून त्यात लाकडी दांड्या आडवे टाकून ,आडाचे पाणी काढण्यासाठी घरोघरी वापरले जात. ठरलेल्या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर,सप्ताह सुरू होई.
तयार केलेल्या उच्चासनावर एका चौरंगावर,श्रीविष्णूच्या मुर्तीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना केली जाई.
"ओम विश्वं विष्णूर्वषट्कारो भूतभव्य भवत्परभो।"
विशिष्ट वय आणि सुरातअखंड पाठ सूरू होत.तीन तासाची एक पाळी.अशा दिवसातून आठ पाळ्या.पाठासाठी एकावेळी चार वाचक किंवा पाठकरी .वाचकाने आंघोळ करून सोवळ्यात येणे आवश्यक असे.समयांमधे तेल टाकणे तेवत ठेवणे,वाचकांना पाठाच्या मधे चहा देणे, पुढचे पाळीचे वाचकांना वेळेची कल्पना देऊन बोलावून आणणे,आवश्यकता असेल तर बदली वाचक मिळवण्याची व्यवस्था करणे,अशा कामासाठी एक सहाय्यक वा मदतनीस असे. परगावी असलेले अनेक जण उन्हाळ्याचे सुट्टीत गावी येत.त्यामूळे पुरेसे वाचक मिळत.कधीतरी एखादा कमी पडे. मग तरुणांना जास्तीची पाळी करावी लागे .कुठल्या वेळी कोण कोण पाठाला बसणार याची व्यवस्था अगोदरच करावी लागे.इच्छुकांची यादी तयार करून त्यांचे सोयीनुसार वेळा ठरवून सर्वांना पूर्वसूचना दिली जाई.ऐनवेळी एखादा वाचक उपलब्ध नसल्यास काय करायचे याचेही नियोजन करावे लागे.रोजची पूजा, नैवेद्य ,पंगत ,वाचकांना चहा,दिव्यांसाठी तेल, वाचकांसाठी विष्णूसहस्त्रनामाच्या पुस्तिका ई.अनेक गोष्टींचे ही पूर्वनियोजन आवश्यक असे.
सकाळी नऊ ते बारा ,संध्याकाळी सहा ते नऊ ह्या पाळीत
बहुतेक जेष्ठ मंडळी असत.स्त्रियां पाठाला बसत नसत.पण
कामातून वेळ मिळाला की किल्ल्यात येऊन बसत. कांही जणी सोबत पाडसी ही म्हणू लागत.तर कांहीची नुसती श्रवणभक्ती असे.
दिवसाचे व रात्री बारा पर्यंत चे पाठांसाठी विशेष अडचणी नसत.प्रश्न रात्री बारा ते तीन व तीन ते सहा या पाठांचा असे. ती वेळ कठीण.या वेळच्या पाळ्यांची जबाबदारी तरुण मंडळीवर असे.रात्रीच्या शांत वेळेत संथ गंभीर आवाजात म्हणले जाणारे विष्णूसहस्त्रनामाचा अनुभव निश्चित वेगळाच.पण काही अडचणी असत.सगळीकडे पूर्ण शांतता,
डोळ्यात झोप,अनेकदा चौघांपैकी एखादा गैरहजर,सहाय्यक आपले काम संपवून बाजूला पेंगत असलेला.अशा स्थितीत तीन तासाचा पाठ करणे अवघड होई.त्यावर तोडगा म्हणजे चौघापैकी तिघांनी अति संथ लयीत पाठ म्हणायचा,व एकेकाने आळीपाळीने जागेवरच विश्रांती घ्यायची.चहा घेतला की हुषारी वाटायची.पहाटे समोरचे आडावर पाणी भरणारांची वर्दळ सुरू होई.पाठ संपायला अर्धा पाऊण तास असे. पुढचे वाचक केव्हा येणार याचे वेध लागत.त्यांना सुचना देणे,बोलावणेसाठी,सहाय्यकाला जावे लागे. पुढचे वाचक आले की,त्यांचेकडे सूत्रे सोपवून घरी जायचे अन झोपायचे.सर्वांत आधी आलेला वाचकप्रथम व शेवटी आलेला सर्वांत शेवटी जाई.
रोज दुपारी पूजा व आरती होई.प्रत्येक दिवसाचे यजमानपद वाटून दिलेले असे.त्या त्यादिवशी त्या त्या यजमानाचे हस्ते पूजा आरती असे.त्या दिवशीचा नैवेद्य आणि पंगत पण त्यांच्याकडे असे.पहिल्या व समाप्तीच्या दिवसाचे यजमानपद मात्र आबाकाकांच्या घराकडे असे. पंगतीसाठी जेवणाची तयारी अर्थात घरच्या स्त्रियांकडे. गल्लीतील इतर महिला पण मदतीला येत.जेवण साधेच.वरण भात पोळी भाजी असा बेत.समाप्तीला मात्र लाडू किंवा शिरा अतिरिक्त असे.पत्रावळ्या वर जेवण वाढले जाई.'वदनी कवळ घेता' म्हणून पंगत सुरू होई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आणि श्री गुरुदेव दत्तचा गजर होई.श्लोक म्हटले जात.
या काळात गल्लीत चैतन्य संचारे.रात्रं दिवस सततविष्णूसहस्त्रनाम कानावर पडे,त्याचा परिणाम असावा. पूजा वआरतीला लोक जमत तेव्हा तर वातावरण भारून जात असे.संध्याकाळी लोक आपापल्या घरासमोरच्या ओट्यावर बसलेले असत.गल्लीत मध्यभागी असलेले आडाचे कट्ट्यावर पण लोक असत.भोवतालच्या मोकळ्या जागेवर मुला मुलींचे खेळ,दंगामस्ती सूरू असे.आरतीची वेळ झाली की सगळे किल्ल्यात येत.आत जागा न मिळालेले बाहेरच्या ओट्यावर बसत.आरती सुरू असतानाही पाठ चालूच राही.आरती नंतर जमलेले लोक ही वाचकांसोबत पाठ म्हणू लागत.संथ लयीत सूरू होणारा सामुहिक पाठ हळूहळू वेग पकडे.आवाज ही वाढत जाई.पाठ शेवटाकडे जाताना तर टिपेला पोहंचे.शंभर सव्वाशे लोकांच्या एकत्रित आवाजात होणारा, त्या परमतत्वाच्या नामघोष,अनेकांच्या मनात सात्विक भाव जागृत करून जाई.अंगावर रोमांच उभे राहत.काहींच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागत.हा पाठ संपल्यावर प्रसाद घेऊन लोक जात. पण वाचकांचे पठण संथ लयीत सुरूच राही.
सात दिवस कसे जात कळत नसे.समाप्तीचा दिवस कधी येई कळत नसे. त्या दिवशीची पूजा व आरती जोरात होई.त्यानंतर समाप्तीचा पाठ.सामुदायिक पाठ शेवटाकडे येई.
'शंखंभृनंदकी चक्री शारंड़्धन्वा गदाधराः।
रथांड़्पाणिरक्षोभ्य:सर्वप्रहरणायुध:॥'
मागील सात दिवसाचे सवयीने यानंतरही पून्हा पाठ सुरू राहील असे वाटायचे.पण वाचकांच्या जागा रिकाम्या असत. रिकामी आसने व शांततेने, विष्णूसहस्त्रनाम सप्ताहाची समाप्ती झाली हे लक्षात यायचे. मनात रितेपणाची भावना नकळत घर करायची. सगळे सुरळीत पार पडल्यामूळे हायसे ही वाटे.समाप्तीच्या पंगतीत,सप्ताहात झालेल्या गमंतीजमती आठवून त्यास कारणीभूत व्यक्तीची थट्टा,होई.पाठात चुकीचे उच्चार करणारे लोकांवर विनोद केले जात.त्यांनाजास्त लाडू घेण्याचा आग्रह होई.
सप्ताह संपला तरी , सगळ्यांचे एकत्र येणे ,हे वातावरण,हे भारलेपण,
तात्पुरते संपले आहे;पण पून्हा पुढील वर्षी हे सगळे अनुभवायला येईल ही आशा असे.
शेवटचा सप्ताह एकोणीसशे सत्त्याऐंशी/अठ्ठ्याऐंशी साली झाला असावा.त्यावेळी हा शेवटचा सप्ताह आहे हे कुणालाच माहिती नव्हते.
काळाचे ओघात जूनी,जेष्ठ,मंडळी या जगातून कायमची गेली .सप्ताहाचे आयोजन करण्यात पुढाकार घेणारी माणसे राहिली नाहीत.अनेक लोक नोकरी धंद्याच्या शोधात गाव सोडून गेली.अनेकांनी घरे शेती विकून इतरत्र स्थलांतर केले.त्यांची घरे बंद झाली, अन गावी येणे पण.
वसंतकाका (माझेवडील)एकोणीसशे एकोन्नवद साली निवर्तले.त्यानंतर आमचे गावाकडचे घर बंद झाले .सुट्टीत गावी जाऊन राहण्यासाठी कारण उरले नाही.
आता गल्लीत देशमुखांची चार पाच घरे उरली आहेत.गल्ली तशीच आहे.किल्ला ही आहे.अधून मधून गावी जाणे होते.क्वचित मुक्कामही होतो.संध्याकाळी ओट्यावर बसलेले की लोक येतात.गप्पा होतात.जुन्या गोष्टी निघतात.विष्णूसहस्त्र नाम सप्ताह आठवतो .अन सामुदायिक पाठाचे स्वर कानावर पडतात असा भास होतो.आपोआप किल्ल्याकडे लक्ष जाते.सप्ताहाच्या,पाठांच्या,अन त्या भारलेल्या दिवसांच्या आठवणी पोटात दडवलेला किल्ला बंद असतो.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
19 Dec 2020 - 9:20 pm | रमेश आठवले
छान लेख.
19 Dec 2020 - 10:26 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून छान वाटले
19 Dec 2020 - 10:08 pm | पॉइंट ब्लँक
जुना काळ डोळ्यासमोर उभा केलात एकदम. असं प्रत्यक्ष सप्ताहात जावुन ऐकण्यात जो अनुभव आहे तो तंत्रज्ञान कितीही पुढारलं तरी देवू शकत नाही, मग ते डोल्बी साऊंड असो नाही तर ४k व्हीडिअओ असो. तुलनेने दक्षिण भारतात लोकांनी त्यांच्या रीती परंपरा चांगल्या जपल्या आहेत. आजही बेंगलोरमध्ये शनिवारी संध्याकाळी बालाजीच्या मंदिरात मराठीत विठ्ठल भजन ऐकायला मिळते. लोकांच रहाणीमान कितीही पुढारलं तरी आपल्या रिती परंपरा सोडल्या नाहीत इथे लोकांनी. '
19 Dec 2020 - 10:28 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे.
पण ते सगळं विस्मरणात चाललंय.
मी तसा सुदैवी. चांगल्या गोष्टी अनुभवल्या आहेत. म्हणून लोकासमोर नवीन पिढी समोर आणाव्या वाटतात.
20 Dec 2020 - 12:50 am | फारएन्ड
आवडला.
20 Dec 2020 - 11:40 am | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
20 Dec 2020 - 8:37 am | सौंदाळा
खूपच छान, सगळे डोळ्यासमोर उभे राहिले.
20 Dec 2020 - 11:39 am | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
20 Dec 2020 - 12:11 pm | प्राची अश्विनी
खूप छान!
20 Dec 2020 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडलं लेखन. समारोपाकडे वळतांनाचा भाग हळवा करणारा. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
20 Dec 2020 - 2:51 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. आपला प्रतिसाद उत्साह वाढवणारा आहे
20 Dec 2020 - 1:15 pm | सतिश गावडे
आमच्या गावात होणार्या हरीनाम "सप्त्या"ची आठवण झाली :)
20 Dec 2020 - 2:56 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.
हरीनाम सप्त्या आमच्या कडे अजूनही आहेत. आता इव्हेंट झाले आहेत. राजकारणी मंडळी पण अनेक ठिकाणी त्यात शिरली आहेत.आमच्या गावात सुदैवाने नाही.
20 Dec 2020 - 1:24 pm | अथांग आकाश
गावाकडच्या गोष्टी खुप आवडल्या!
हे तर खास आवडले!!
20 Dec 2020 - 2:58 pm | नीलकंठ देशमुख
खूप छान वाटलं.
'तो 'भाव जागृत होण्याचा अनुभव वेगळाच. अजूनही विसरत नाही
20 Dec 2020 - 8:45 pm | रंगीला रतन
एक नंबर लिहलय.गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या.
पुलेशु.
20 Dec 2020 - 10:20 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद
20 Dec 2020 - 10:26 pm | कपिलमुनी
काकड आरती , हरिनाम सप्ताह, भजनं वगैरे बंद पडलेल्या प्रथा आठवल्या.
21 Dec 2020 - 10:57 am | नीलकंठ देशमुख
खरे आहे. पण खेड्यातून अजूनही हे सगळे सुरू आहे
22 Dec 2020 - 2:16 pm | सिरुसेरि
सुरेख वर्णन . हे लेखन वाचुन "वास्तुपुरुष" या चित्रपटाची आठवण झाली .
22 Dec 2020 - 6:51 pm | नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.