गुर्हाळ
गुर्हाळ...
पन्नास,पंचावन्न वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत.
गावी पिंपळाचा मळा नावाचे शेतआहे.तिथली जमीन कसदार. विहीरीला मुबलक पाणी असे.ते उपसण्यासाठी किर्लोस्कर इंजीन होते.पाण्यावर ऊस जोमाने वाढे. डिसेंबर मधे उस पूर्ण गोडीला येई.तेव्हा मराठवाड्यात एकही साखर कारखाना नव्हता.होते फक्त पश्चिम महाराष्ट्रात. त्यामूळे उस गाळून गुळ तयार करणे हा एकच पर्याय होता.एक छोटा उद्योगच. गुर्हाळ. तो दरवर्षीचाच असल्याने,मळ्यात एक चुलाण व धूर जाण्यासाठी धुराडे बांधून ठेवले होते.ते पाला पाचोळा घालून बंद केलेले असे.गुर्हाळ सुरू व्हायच्या आधी ते मोकळे करून,सारवून स्वच्छ केले जाई. समोर मोकळ्या जागेत तात्पुरते पत्र्याचे गुर्हाळ घर तयार केले जाई.लागणारे साहित्य,तयार ढेपी ठेवण्यासाठी,जेवणासाठी त्याचा उपयोग होई. गणपतीच्या मुर्तीची स्थापना होई.आधण निघाल्यावर प्रथम गुळाचा नैवेद्य गणपतीला.तिथे गुळ आळण्यासाठीचा वाफा,असे. समोर टाकलेल्या पलंगावर बसून आजोबा व वडील देखरेख करीत.रात्री वडील मळ्यात झोपत.कधी मी पण सोबत जाई.
उस तोडणी चे काम मजूरांच्या जोड्या करत. उस कोयत्याने तोडून, पाला व वरचा भाग (वाढे) काढून, उसाच्या मोळ्या बांधून बैलगाड्यातून चरकाजवळ आणून टाकायच्या.रस काढायचा चरक घरी होता.सिलेंडरच्या आकाराचे तीन लोखंडी भरीव चक्रे,(दोन मोठे (नर)एक छोटे (मादी))जोडून ते लोखंडी पायावर जमिनीत रोवायची .ते फिरवण्यासाठी आडवे लाकडी दांडे जोडायचे जे बैलाचे साहाय्याने फिरवले जात. दांड्या सोबत चरक गोल फिरे. चरकात घातलेला उस पिळून दुसरीकडून चिपाड होऊन येई. निघालेला रस ,चरकाचे पन्हाळीतून, बाजूचे खड्ड्यात ठेवलेल्या पिंपात पडे. बैल हाकायला माणसे असत.उस खात चरकाचे बैल हाकायचे काम माझ्याही आवडीचे.
उसाची चिपाडे(सोतरी) मोकळे जागेत पसरवून वाळवले की ,तेच चुलाणाचे इंधन म्हणून वापरले जाई.एक पिंप अर्ध्या तासात भरे .रस घागरीने चुलाणा वरील कढईत टाकला जाई.तीन पिपे रस कढईत पडल्यावर चुलाण पेटवले जाई.चुलाणात जळण घालणारे मजुरास
'जाळवे ' म्हणत.उसाचा रस कढईत पडल्यापासून,ते गुळाची ढेप (भेली)तयारहोई पर्यंतचे काम येरागबाळ्याचे नाही.गुळास चांगली चव व रंग येणे महत्वाचे.त्यासाठी गुळ करणारा 'गुळव्या' सर्वात महत्वाचा घटक.त्याची कामे अनेक.तो अष्टावधानी असावा लागतो.रसावरील मळी लांब दांड्याचे चाळण्यांनी काढून स्वच्छ करणे, फावड्याने रस घोटणे,त्यात आवश्यक रसायने,वनस्पती मिसळणे,चुलाणातील आच कमी ,जास्त करण्यास सांगून ,रस उकळण्यावर सतत लक्ष ठेवणे हे सातत्याने करावे लागते.थोडी ढिलाई झाली की काम बिघडू शकते.त्याला एक मदतनीस पण असे.एक दोन वर्षे गुळव्या चे हाताखाली उमेदवारी केली की तो पण गुळव्या म्हणून काम करायला पात्र होत असे.
कढई पाकाला आल्यावर तयार द्रव म्हणजे काकवी. त्या नंतर थोड्या वेळात उकळण्याची प्रक्रिया पूर्ण होते. कढईतील उकळणारे रसात होणार बदल पाहायला मजा वाटे.अधून मधून मळी काढायचे काम पण मी करायचो.उकळत्या रसाने भरलेली दहा बारा फुट व्यासाची कढई उचलणे सोपे व्हावे म्हणून कढईला असलेल्या चार रींगांतून दोन मोठे दांडे घेतले जात.सात आठ माणसे "हर हर महादेव "च्या गजरात दांड्यांनी ,कढई उचलून त्यातील तप्त द्रव गुर्हाळ घरातील तयार वाफ्यात रिकामे करीत .तोथंड होउन पूर्णपणे आळल्यावर पत्र्याचे बादल्यात भरायचा.काही वेळाने गुळाच्या ढेपी वा भेली तयार .तेव्हा कुठे गुळव्याचे काम संपे.रोज अशी चार पाच आधणे (कढाया )निघत.
सकाळी नउ वाजता चरक सुरू होई.रात्री तीन चे दरम्यान शेवटची कढई उतरे पर्यंत मळ्यात जाग असे.थंडीचे दिवस असायचे.चुलाण धगधगते असे.बाजूची जमीन पण तापे.कामाने थकलेले लोक तिथेच झोपून थंडीपासून बचाव करुन घेत.
उस गुळ खाण्यासाठी, रस पिण्यासाठी ,गावातून मुले माणसे गर्दी करत. उनाड मुले उस पळवून नेत.त्यांना आवरता आवरता गडी त्रासून जात.
गुळाच्या ढेपी बैलगाडीने सकाळी घरी येत. रसाची घागर अन उस अन काकवी येई.गल्लीत घरोघरी त्याचे वाटप होई. घरी रसाच्या पोळ्या ,रसाचा भात, असे पदार्थ होत.एखाद्या दिवशी घरातील सगळ्यांचे मळ्यातच वनभोजन होई.
गुर्हाळ एक दीड महिना चाले.काम करणारे लोकांसाठी ते दिवस कष्टाचे असत .माझ्या साठी मात्र तो एक उत्सवच जणू . परगावाहून पाहुणे ही येत.गावातील प्रतिष्ठीत पुरुष स्त्रीयांना बोलावले जाई.आद्रक लिंबू टाकून रस आणि एरंडाचे पानावर चिकीचा गुळ दिला जाई.वाफ्यातील गुळाची साय अलगदपणे उसाच्या कांड्यावर धरुन चाखणे हा परमानंदच. ती चव अजूनही जीभेवर रेंगाळते.
केव्हा तरी गुर्हाळ संपून जाई. उस तोडल्यामुळे उघडा झालेला मळा, बंद चरक,विझलेले चुलाण,उखाडलेले गुर्हाळ घर, रिकामा वाफा पाहून मन उदास होई.
तयार गुळ विक्रीसाठी माजलगाव किंवा जालन्याला नेला जाई .तो पर्यंत गुळाच्या ढेपींनी माडी भरलेली असे. ढेपी उकरून खाणे अन त्यापायी आई ची बोलणी खाणे हे माझ्या साठी नित्याचे. नको तेवढा गूळ खाल्ला की त्रास व्हायचा.पण चवीपुढे त्याचे काय?
आता लक्षात येते की आजोबांना वडिलांनी , गुर्हाळ व्यवसाय म्हणून केलाच नाही. नफा तोट्याचा हिशोब नव्हताच .घरच्यांनीच नाही तर इतरांनी ही खाउन पिउन तृप्त व्हावे हाच मुख्य उद्देश. त्यातून जो काही उरेल तो फायदा.
कालांतराने बैल चरकाचे जागी इंजीनावरचे चरका(क्रशर)वर गुर्हाळ सुरू झाले.काम दुप्पट वेगाने होऊ लागले. पण गुर्हाळाची मजा गेली.नंतर साखर कारखाने उभे राहिले आणि गुर्हाळे बंदच झाले. शेतात उस अजूनही असतो.तो कारखान्याला जातो.गावाकडे गेल्यावर उस खात खात शेतात चक्कर मारायला आवडते .तेव्हा गुर्हाळाची आठवण येते. काही वर्षांपूर्वी प्रवास करताना उकळत्या रसाचा ,काकवीचा ,गुळाचा ,गोड वास आला. कुठे तरी गुर्हाळ सुरू होते.गाडी थांबवली.तो गंध श्वासात भरून घेतला. आणि तो काळ ,ते वातावरण ,ती माणसे ,
समोर दिसायला लागली.अचानक डोळे पाणावले. किती वर्षे लोटली,गुर्हाळ अन त्याच्या गुळा सारख्या गोड आठवणी अजूनही जात नाही मनातून.
नीलकंठ देशमुख .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सुंदर!
धन्यवाद
गावाकडच्या आठवणी छान लिहिल्या
धन्यवाद
गुळा सारख्या गोड आठवणी!!
धन्यवाद.
मस्त लीहल आहे
धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून
छान.
आवडले.
जिभेवरल्या ताज्या गुळाच्या
धन्यवाद
गुर्हाळाच्या, "इतरांनी ही
धन्यवाद.
तुमचे लेख चांगले असतात पण...
धन्यवाद.इथे मी नवीन आहे.
देशमुख साहेब ऐकावे जनाचे करावे मनाचे!!!
धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया.
काकवी
धन्यवाद. काकवी मस्तच .
"गुऱ्हाळ लावणे" हा वाक्प्रचार कसा तयार झाला असेल?
धन्यवाद.माझ्या मोबाईल वर
खुल्ताबाद मधल्या टाकळी ह्या
धन्यवाद प्रतिक्रिये बद्दल
आठवणी आवडल्या
धन्यवाद
सुरेख आठवणी . बाकी या
धन्यवाद. कथा वाचण्यात नाही.
हि श्री . भा . रा . भागवत
एरंडाचे गुर्हाळ वाचलेले. फाफे
वर्णन करताना योग्य शब्दाचा वापर आवडला
धन्यवाद. अशा प्रतिक्रिया
रम्य आठवणी
धन्यवाद. बाजरीच्या भाकरी सोबत
छान आठवणी . साधारण
प्रतिक्रिया वाचून छान वाटले
सुरेख आठवणी
धन्यवाद. गावरान भेंडी एरंडी