'अरूणाचल पंचरत्नम' (भावानुवाद)

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
29 Nov 2020 - 11:59 am

दि. २९/११/२०२० (कार्तिक पौर्णिमा)

प्रस्तावना: भगवान रमण महर्षींचा आश्रम पंचमहाभूतांपैकी अग्निचे स्वरूप, तसेच साक्षात शिवस्वरूप मानल्या गेलेल्या अरूणाचल पर्वताच्या पायथ्याशी आहे हे आता तसे सर्वज्ञात आहे. दर वर्षी तमिळ पंचागाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला अरूणाचलाच्या शिखरावर दीप महोत्सव असतो. या शुभदिनी भगवान रमण महर्षींनी रचलेल्या 'अरूणाचल पंचरत्न' या पाच श्लोकी काव्याचा मराठी अनुवाद करण्याचा हा प्रयत्न - भगवान श्री रमण महर्षींच्या चरणी समर्पित!

(१)
karuṇā-pūrṇa-sudhābdhe kabalita-ghana-viśvwarūpa kiraṇāvalyā.
aruṇāchala paramātmann-aruṇo bhava citta-kañja-suvikāsāya

हे अरूणाचल परमात्म्या, माझ्य हृदयस्थानी कलिकास्वरूपात वसलेले (ज्ञान) कमळ उमलण्यासाठी आणि ते (सच्चिदानंद स्वरूपबोधात) पूर्णपणे विकसीत होण्यासाठी तू रविसमान दीप्तीमान हो! हे करूणेने ओथंबलेल्या अमृताच्या सागरा, अवघ्या घन विश्वाचे सारे सौंदर्य आणि वैभव तुझ्या स्वरूपातच तर सामावलेले आहे.

(२)
tvayyaruṇācala sarvaṁ bhūtvā sthitvā pralī-na-me-taccitram,
hṛdyaham-ityātma-tayā nṛtyasi bhoste vadanti hṛdayaṁ nāma

हे अरूणाचला, तुझे सत्यस्वरूप इतके भव्य आहे की विश्वरूपी चलचित्राची उत्पत्ती, स्थिती आणि लय तुझ्यातच सामावलेले आहेत. (जीवमात्रांचे) आंतरिक स्वरूप तूच असल्याने सर्वांच्या अंतःकरणात अहंस्फुरणेच्या रूपात तुझेच नृत्य अहर्निश सुरू असते. हे प्रभो, हृदय हे तुझेच एक नाव आहे.

टीपः अहंस्फुरणा - ('मी आहे' अशी शुद्ध चैतन्यस्वरूप स्वसंवेद्य जाणीव).

(३)
aham-iti kuta āyātī-tyanvṣyāntaḥ praviṣḥayā'tyamaladhiyā,
avagamya svaṁ rūpaṁ śāmyatyaruṇācala tvayi nadīvābdhau.

स्थिर चित्ताने 'मी आहे' या चैतन्यस्वरूप जाणीवेच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी अंतर्मुख झालेल्या व्यक्तीला आत्मबोध होतो. हे अरूणाचला, सागरात विलीन झालेल्या नदीप्रमाणेच अशी व्यक्ती आत्मस्वरूपात सामावून जात परम विश्रांत अवस्थेत अचलपणे स्थिर होते.

(४)
tyaktvā viṣayaṁ bāhyaṁ ruddha-prāṇena ruddha-manasa'antastvām,
dhyāyan-paśyati yogī dīdhitim-aruṇāchala tvayi mahīyaṁ te

प्राण आणि मनावर ताबा मिळवलेल्या, बाह्य नामरूपात्मक जगाचा (मनाने) अव्हेर केलेल्या, अंतरी सतत तुझेच ध्यान करत असलेल्या योग्याला तुझ्या तेजाची प्रचिती येते. हे अरूणाचला, अशा योग्याला तुझ्यात (अनन्य भावाने विलीन झाल्याने) परमानंदाचा अनुभव येतो.

(५)
tvayyarpita-manasā tvāṁ paśyan sarvam tavākṛtitayā satatam,
bhajate'ananyaprītyā sa jayatyaruṇāchala tvayi sukhe magnaḥ.

ज्याने आपले मन तुझ्या पायी समर्पित केले, तुझ्या स्वरूपात अवघे विश्व सामावलेले आहे आणि विश्वरूपाने तूच क्रीडतो आहेत हे जाणले, सदा सर्वकाळ तुझी स्तुती करण्यातच धन्यता मानली, इतकेच नव्हे तर स्वतःवर करावे इतकेच प्रेम तुझ्यावर केले, असा निर्वैर निर्मळ वृत्तीचा भक्त तुझ्याशी एकरूप होऊन जातो. हे अरूणाचला, तुझ्या सच्चिदानंद स्वरूपात हरवून जात (तो परमपद प्राप्त करतो).

उपसंहारः श्री रमण महर्षींनी त्यांना दिसलेले अरूणाचलाचे स्वरूप साक्षात देववाणीत शब्दबद्ध केलेले आहे. या पाच श्लोकरूपी काव्यरत्नांमधे उपनिषदांचे सार सामावलेले आहे.

(मूळ स्त्रोतः https://archive.arunachala.org/docs/collected-worm/pancaratnam/)

अनुवादकविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

29 Nov 2020 - 5:01 pm | प्राची अश्विनी

अतिशय व्यापक अर्थ आहे. अनुवाद आवडला.

सतिश गावडे's picture

29 Nov 2020 - 5:30 pm | सतिश गावडे

निसर्गाशी एकरुप होण्याच्या, त्याच्यापासून प्रेरणा घेण्याच्या आपल्या परंपरांबद्दल आदर वाटतो.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Nov 2020 - 9:00 am | ज्ञानोबाचे पैजार

https://youtu.be/Dtp1uAtJ2yM

मधे एकदा कोणत्यातरी कार्यक्रमात हे ऐकायला मिळाले होते आणि अतिशय आवडले होते पण नंतर विसरुन गेलो होतो.

भावानुवाद अतिशय आवडला

पैजारबुवा,

मूकवाचक's picture

30 Nov 2020 - 5:09 pm | मूकवाचक

प्राची अश्विनी, सतिश गावडे आणि ज्ञानोबाचे पैजार यांन मनःपूर्वक धन्यवाद!

वाह, खूप सुंदर! संतांची समजावून देण्यातली सहजता आणि सोपेपणा अतुलनीय आहे रे! _/\_