दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
खरं तर समाजात आजकाल हे नातं, अनेकवेळा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतयं. पूर्वीची चाकोरी सोडून, आपण नवे विचार(?) रुजवू पाहतोय.
लग्नानंतर काही काळाने, काही ठिकाणी नवरा बायकोचं पटेनासं होतं. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, तात्विक गरजांची गणितं चुकत आहेत, असं वाटू लागतं. अनेक पातळ्यांवर आपल्या जोडीदाराचं, अपूर्णत्व जाणवू लागतं. मग आपलंच मन, सखा/सखी शोधू लागतं. अनेकांना अशी व्यक्ती सापडतेही... मन मोकळं होऊन, आपण सुखाचा श्वास घेतोयं, अशी गोड जाणीव होते. ती अनेक प्रसंगातून पक्की होत जाते. नकळत हे नवीन नातं, दृढ होत राहतं... आणि आपण, आपल्या कुटुंबापासून स्वतःच्याही नकळत दुरावत जातो... आता आपल्या प्रत्येक सुख-दुःखाच्या क्षणी, पहिली आठवण, जोडीदाराची न येता, सख्याची/ सखीचीच येते आणि त्या व्यक्ती भोवतीच, आपलं सर्व आयुष्य फिरत राहतं.
या सर्व गडबडीत, जोडीदारा समवेत भावनिक का होईना, पण प्रतारणा घडतेय का.. याचा विचार सहसा केला जात नाही.. आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे, नवीन सखा/सखी यांच्या बरोबर देखील सगळं सुरळीतपणे घडत नाहीच. पण तिथे मात्र उदार मनाने, चुकांना क्षमा केली जाते... उणीवा झाकून घेतल्या जातात.. आणि "त्या" नात्यातलं हळुवारपण आपसूक जपलं जातं....
काही जोडपी, समजून उमजून तडजोडीने जगत रहातात. तर काहींची वेगळे होण्यापर्यंत मजल जाते. समाजात थोडी चर्चा होते, आणि लोकं सोयीस्करपणे ह्या घटना विसरून जातात...
पण यामध्ये आपण सुखी झालो, तरी समाधानी होतो का ? आयुष्य १००% बरोबर चाललयं, ही मनाला खात्री वाटते का ? मन स्वतःच्या यशस्वीतेची ग्वाही देतं का ? की काहीतरी कमतरता उरतेच......???
या पाडव्याच्या निमित्ताने, प्रत्येकाने आपलं आणि आपल्या जोडीदाराचं, मनातल्या मनात परीक्षण करावं... दोघातलं अंतर वाढत नाही ना, हे नक्की पहावं. प्रेम असेल तर वाढवावं.. नसेल तर डोळसपणे करावं... हळूहळू का होईना रुजवावं... अन् मनात आवर्जून फुलवावं...!! चूक समजलीच तर, अजूनही वेळ गेलेली नाही, हे ठरवावं.. खुलभर दुधाची कहाणी आठवावी.... आनंदाने पुढे जावं, जातच रहावं......!!!
सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा !!
जयगंधा..
२८-१०-२०१९
प्रतिक्रिया
20 Nov 2020 - 9:43 am | अथांग आकाश
लेखन आवडले!!!
20 Nov 2020 - 11:14 pm | Jayagandha Bhat...
धन्यवाद.